साभार: साप्ताहिक साधना
– संकल्प गुर्जर
पहिल्या महायुद्धालासुद्धा लाजवेल इतकी मोठी मनुष्यहानी १९१८ ते १९२० ही तीन वर्षे चाललेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीने केली होती. या साथीमध्ये कमीत कमी एक कोटी सत्तर लाख तर जास्तीत जास्त पाच कोटी माणसे मृत्युमुखी पडली होती, असे मानले जाते. मात्र बीबीसीच्या अंदाजानुसार, तर हा आकडा दहा कोटींपर्यंतसुद्धा असू शकतो. जगाची तेव्हाची लोकसंख्या दोनशे कोटी होती, असे साधारणतः मानले जाते. त्यापैकी सुमारे पन्नास कोटी लोकांना या फ्लूची लागण झाली होती. म्हणजे जगातील प्रत्येक चौथ्या माणसाला स्पॅनिश फ्लू झाला होता आणि लागण झालेल्यांपैकी सुमारे दहा टक्के माणसे मृत्युमुखी पडली होती. मात्र इतकी भीषण साथ आलेली असूनही आज स्पॅनिश फ्लूविषयी वैद्यकीय व संशोधनक्षेत्रातील लोक सोडले तर इतरांना फारच कमी माहिती आहे.
…………………………………………………………..
सन १९१४ ते १९१८ या काळात पहिले महायुद्ध प्रामुख्याने युरोपात लढले गेले. चार वर्षे चाललेल्या या भीषण युद्धाने विसाव्या शतकाच्या इतिहासावर अतिशय खोलवर ठसा उमटवला. या युद्धामुळे युरोपात राजकीय उलथापालथ झाली. रशिया, जर्मनी, ऑटोमन टर्की व ऑस्ट्रिया-हंगेरी ही चार साम्राज्ये लयाला गेली आणि अनेक नवे देश उदयाला आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा विध्वंसक कारणासाठी उपयोग कसा करावा याचे प्रात्यक्षिक या महायुद्धात जगाला मिळाले. पहिल्या महायुद्धात झाला तितक्या प्रमाणातला नरसंहार मानवी इतिहासात यापूर्वी कधीही झालेला नव्हता. या भीषण युद्धात सुमारे दीड कोटी माणसे (सैनिक व सामान्य नागरिक) मारली गेली असे मानले जाते. मात्र या पहिल्या महायुद्धालासुद्धा लाजवेल इतकी मोठी मनुष्यहानी १९१८ ते १९२० ही तीन वर्षे चाललेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीने केली होती. या साथीमध्ये कमीत कमी एक कोटी सत्तर लाख तर जास्तीत जास्त पाच कोटी माणसे मृत्युमुखी पडली होती, असे मानले जाते. मात्र बीबीसीच्या अंदाजानुसार, तर हा आकडा दहा कोटींपर्यंतसुद्धा असू शकतो. जगाची तेव्हाची लोकसंख्या दोनशे कोटी होती, असे साधारणतः मानले जाते. त्यापैकी सुमारे पन्नास कोटी लोकांना या फ्लूची लागण झाली होती. म्हणजे जगातील प्रत्येक चौथ्या माणसाला स्पॅनिश फ्लू झाला होता आणि लागण झालेल्यांपैकी सुमारे दहा टक्के माणसे मृत्युमुखी पडली होती. मात्र इतकी भीषण साथ आलेली असूनही आज स्पॅनिश फ्लूविषयी वैद्यकीय व संशोधनक्षेत्रातील लोक सोडले तर इतरांना फारच कमी माहिती आहे. सध्या कोरोना विषाणूने जो हाहाकार माजवला आहे तो पाहता शंभर वर्षांपूर्वीच्या या साथीकडे दृष्टिक्षेप टाकणे, तेव्हाच्या परिस्थितीची आजच्या काळाशी तुलना करणे आणि त्या साथीपासून काही धडे घेणे उद्बोधक ठरू शकेल.
स्पॅनिश फ्लूचा नेमका उगम कोठे झाला असावा, याविषयी मतमतांतरे आहेत. संशोधकांच्या एका गटाचे असे मत आहे की, या साथीचा उगम फ्रान्समधील ब्रिटिश लष्करी छावणीत झाला. पहिल्या महायुद्धात लाखो ब्रिटिश सैनिक जर्मन सैन्याचा सामना करण्यासाठी फ्रान्समध्ये तळ ठोकून होते. या सैनिकांची अवस्था अतिशय हलाखीची होती. त्यांना महिनोन्महिने खंदकात राहावे लागत होते, खाण्यापिण्याबाबत टंचाई होती व एकूण स्वच्छतेच्या नावाने फारशी काही बरी परिस्थिती नव्हती. अशाच एका लष्करी छावणीत पोर्क आणि चिकनच्या माध्यमातून स्पॅनिश फ्लूचा प्रसार झाला असावा, असे मानले जाते. त्या छावणीत सुमारे एक लाख माणसांचा वावर होता. त्यांच्या माध्यमातून ही साथ इतरत्र पसरली असावी. संशोधकांच्या दुसऱ्या गटाचे असे मत आहे की, या साथीचा उगम अमेरिकेत झाला असावा आणि युरोपात ब्रिटन व फ्रान्सच्या बाजूने लढायला आलेल्या अमेरिकी सैनिकांमुळे ही साथ इतरत्र पसरली. आणखी एका गटाचे असे मत आहे की, आताच्या कोरोनाप्रमाणेच या स्पॅनिश फ्लूच्या साथीचे उगमस्थान चीनच आहे. चीनमधून ही साथ आधी अमेरिकेत गेली असावी आणि अमेरिकी सैनिकांच्या माध्यमातून ती युरोपात पसरली असावी, असे काही जण मानतात.
शंभर वर्षांपूर्वीच्या त्या काळातल्या अचूक नोंदी सापडणे कठीण आहे. तसेच ते महायुद्धाचे दिवस असल्याने कशाला प्राधान्य द्यावे आणि कशाला देऊ नये, याविषयीसुद्धा बरीच बंधने होती. त्यामुळे या साथीचे नेमके मूळ शोधण्यात खूप अडचणी आल्या आहेत. मात्र यापैकी कोणत्याही गटाचे मत खरे असले तरीही हे नाकारता येत नाही की, ही साथ पक्ष्यांमधून माणसांत आली व युरोप-अमेरिकेत फार वेगाने पसरली. पुढे ती वसाहतवादी जोखडाखाली असलेल्या आशिया आणि आफ्रिका खंडातही पसरली. या साथीमुळे जगभरात भीषण प्रमाणात माणसे मारली गेली, हेही निर्विवाद सत्य आहे. (अपवाद एकच चीन. चीनमध्ये या साथीने फारसे बळी घेतले नाहीत. कदाचित चिनी लोकांमध्ये या साथीचा सामना करण्यासाठी आवश्यक ती प्रतिकारशक्ती तयार झालेली असावी. या साथीचा उगम चीनमध्ये झाला असावा, या भूमिकेला पुष्टी देणारी अशी ही गोष्ट आहे.)
खरे तर ही साथ साऱ्या जगभरात पसरलेली असताना आणि साथीच्या उगमस्थानाशी स्पेनचा कोणताही संबंध नसताना या साथीला ‘स्पॅनिश फ्लू’ असे नाव का मिळाले असेल, असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. पहिल्या महायुद्धात ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स आणि इटली हे देश जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी व टर्की यांच्याविरुद्ध लढत होते. स्पेन हा युरोपीय देश त्या युद्धात अलिप्त राहिलेला होता. त्यामुळे या फ्लूची साथ १९१८ मध्ये जरी वरील सर्व देशांत पसरलेली होती, तरीही त्याविषयीच्या बातम्या देण्यावर या देशांमध्ये बंधने होती. युद्ध चालू असल्याने नागरिकांना काय सांगावे आणि काय सांगू नये याचा निर्णय सरकार घेत असे. त्यामुळे युरोपातील इतर देशांत या साथीच्या बातम्या सुरुवातीच्या काळात येऊ शकल्या नाहीत. मात्र स्पेनमध्ये या फ्लूविषयीच्या बातम्या येत होत्या. अगदी स्पेनच्या राजालाही या फ्लूची लागण झाली होती. परिणामी लोकांना असे वाटले की, अशी काही साथ ही केवळ स्पेनमध्येच आलेली आहे. त्यामुळेच या फ्लूला ‘स्पॅनिश फ्लू’ असे नाव मिळाले.
मात्र या फ्लूमुळे होणारे झटपट मृत्यू पाहता, अशी काही साथ आलेली आहे आणि हा फ्लू नेहमीपेक्षा वेगळा आहे, हे नागरिकांच्या लक्षात आलेच होते. तसेच या फ्लूची लक्षणे दिसल्यापासून फार कमी कालावधीत माणसे प्राण गमावतात, हे लोकांनी पाहिले होते. त्यामुळे सरकारे आपला खोटेपणा फार काळ टिकवू शकली नाहीत. आपल्याही देशात स्पॅनिश फ्लूची साथ आली आहे आणि त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजायला हवेत, हे अखेर मान्य करावेच लागले. मात्र प्रत्यक्ष साथ येणे आणि सरकारने ते मान्य करणे यादरम्यान महत्त्वाचा वेळ वाया गेला होता. त्यामुळे साथीच्या दरम्यान मृत्यूचे प्रमाणही मोठे राहिले. आताही असेच काहीसे झाले आहे. चीनमध्ये कोरोनाची साथ आली आहे व हा विषाणू नेहमीपेक्षा वेगळा आहे, हे तिथले डॉक्टर्स सांगत होते. मात्र चिनी सरकारने त्याकडे केवळ दुर्लक्षच केले असे नाही, तर त्या डॉक्टरांना शिक्षाही केली. मात्र अखेर या साथीचा प्रभाव पाहता, चिनी सरकारलाही नाइलाजाने‘ साथ आली आहे’ हे मान्य करावे लागले.
स्पॅनिश फ्लू नेहमीच्या फ्लूपेक्षा वेगळा होता. नेहमी जो फ्लू होत असे, त्यापासून सर्वाधिक धोका हा लहान मुले व ७० वर्षांवरील माणसांना असे. स्पॅनिश फ्लूमध्ये मात्र १८ ते ४५ वयोगटातील व्यक्ती जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडल्या. युरोपात युद्धासाठी गेलेले विविध देशांचे सैनिक याच वयोगटातील होते. त्यामुळे या फ्लूच्या साथीने पहिल्या महायुद्धावरही आपला प्रभाव पाडला. दोन्ही बाजूंचे सैनिक फ्लूची शिकार झाले होते व दोन्ही बाजूंच्या सैनिकी बळावर याचा परिणाम झाला. पहिले महायुद्ध १९१८ मध्येच संपण्यात जी काही इतर अनेक कारणे आहेत, त्या मध्ये या साथीचाही समावेश करायला हवा. जर्मनीच्या ताब्यातील रशियन युद्धकैद्यांनाही या फ्लूची लागण झाली व त्यांच्यामार्फत हा फ्लू रशियातही पोहोचला. पुढे नोव्हेंबर १९१८ मध्ये महायुद्ध संपले आणि अनेक देशांमध्ये जो विजयोत्सव साजरा केला गेला, त्याच्या माध्यमातून हा फ्लू सामान्य जनतेतही पसरला. युरोपात लढलेल्या ब्रिटिश सैनिकांमार्फात हा फ्लू ब्रिटनच्या आफ्रिका आणि आशिया खंडातील वसाहतींमध्ये पोहोचला. अगदी दूरवरचे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व पॅसिफिक महासागरातील छोटे देशही यापासून सुरक्षित राहू शकले नाहीत.
१९१८ ते १९२० या काळात स्पॅनिश फ्लूच्या एकूण तीन लाटा आल्या, असे मानले जाते. या फ्लूची १९१८ च्या सुरुवातीस आलेली पहिली लाट तुलनेने कमी धोकादायक होती. पहिल्या लाटेत या फ्लूची लक्षणे साधीच होती : अंगात ताप येणे, थंडी वाजणे, वगैरे. मात्र त्यानंतर आलेली दुसरी लाट ही सर्वाधिक धोकादायक होती, असे आकडेवारी सांगते. या दुसऱ्या लाटेमध्ये माणसांची शरीरे निळी पडणे, फुप्फुसात पाणी होणे, कानातून व नाकातून रक्त येणे अशीही लक्षणे होती. १९१८ च्या उत्तरार्धात आलेल्या या दुसऱ्या लाटेमध्ये नेहमीच्या फ्लूसोबतच न्युमोनिया होत असे. हे कॉम्बिनेशन फारच धोकादायक ठरले. (स्पॅनिश फ्लू विषाणूमुळे होत असे, तर या स्पॅनिश फ्लूच्या वेळेस आलेला न्युमोनिया हा जिवाणूंच्या माध्यमातून होत असे. विषाणू आणि जिवाणू अशा दोघांचाही शरीरावरील एकत्रित हल्ला परतून लावणे फार कठीण होत असे.) स्पॅनिश फ्लूमुळे झालेले मृत्यू हे मुख्यतः दुसऱ्या लाटेतील होते. या दुसऱ्या लाटेचा तडाखा इतका तीव्र होता की, केवळ एका वर्षात अमेरिकेतील सरासरी आयुर्मान बारा वर्षांनी कमी झाले. अमेरिकेचे सरासरी आयुर्मान १९१७ मध्ये पुरुषांसाठी ४८ वर्षे व स्त्रियांसाठी ५४ वर्षे होते, ते १९१८ मध्ये अनुक्रमे ३६ व ४२ वर्षे इतके खाली आले होते. (२०१९ मध्ये अमेरिकेचे सरासरी आयुर्मान ७८ वर्षे इतके आहे.) तसेच स्पॅनिश फ्लूमुळे एकूण मृत्यूचे प्रमाण इतके जास्त होते की, एड्समुळे चोवीस वर्षांत जितकी माणसे बळी पडली, त्याहून जास्त माणसे फ्लूच्या चोवीस महिन्यांत मृत्युमुखी पडली.
या स्पॅनिश फ्लूचा भारताला फारच मोठा फटका बसला होता. युरोपात लढलेल्या सैनिकांच्या माध्यमातून ही साथ भारतात पसरली होती, असे मानले जाते. मात्र तेव्हाच्या ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आधीची शंभर वर्षे भारताच्या आरोग्यविषयक गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केलेले असल्याने या साथीला तोंड देण्यासाठी भारत अगदीच असमर्थ होता. मुंबई शहराला या साथीचा खूपच मोठा फटका तेव्हा बसला होता. मुंबईच्या प्रत्येक घरातील किमान एक व्यक्तीला या फ्लूची लागण झाली होती. या साथीमुळे भारतात सुमारे एक ते दोन कोटी लोक मृत्युमुखी पडले असा अंदाज वर्तवला जातो. म्हणजे देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी साधारणतः सहा टक्के जनता स्पॅनिश फ्लूमुळे मरण पावली. यामध्ये स्त्रियांचे प्रमाण खूपच जास्त होते. कौटुंबिक व सामाजिक कारणांमुळे स्त्रियांच्या पोषणविषयक गरजा तेव्हा (काही प्रमाणात आजही!) दुर्लक्षितच राहत असत. त्यामुळे अपुऱ्या पोषणाअभावी स्त्रियांना या साथीचा खूपच जास्त फटका बसला.
