राम,सीता आणि रावण सध्या काय करताहेत?

-नितीन पखाले

३३ वर्षांपूर्वी म्हणजे साधारणत: १९८७-८८ साली दर रविवारी सकाळी ९ वाजता दूरदर्शनवर रामानंद सागर यांची ‘रामायण’ ही मालिका सुरू झाली की, रस्त्यांवर संचारबंदी सदृश स्थिती असायची. लोकं घराघरांत दाटीवाटीने बसून रामायण बघत चक्क दूरदर्शन संचाला हार, फूलं, अक्षत वाहून पडद्यावरील राम-सीतेस ओवाळायचे. इतके वेड या मालिकेने लोकांना लावले होते. सध्या कोरोना संसर्गामुळे देशात सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये माणसं घराबाहेर पडू नये, सोशल डिस्टन्सिंग यशस्वी व्हावे या निमित्ताने दूरदर्शनवर दररोज सकाळी ९ व रात्री ९ वाजता रामायण मालिका पुन्हा प्रसारित होत आहे. मात्र आजही या मालिकेची लोकप्रियता कमी झाली नसल्याचेच गेल्या काही दिवसात दिसून येत आहे. या निमित्ताने या मालिकेतील राम, सीता, रावण हे पात्र साकारणारे कलाकारही पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. स्वाभाविकच त्या मालिकेत प्रमुख भूमिका वठविणारे कलाकार आता काय करतात, कुठे असतात याबाबत अनेकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. या मालिकेतील राम (अरूण गोविल) आपल्या कुटुंबासह या मालिका पाहात असल्याचा फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आणि या कलाकारांच्या वर्तमान आयुष्यात डोकावण्याची सर्वसामान्यांची उत्कंठा अधिकच वाढली. या उत्कंठतेचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.

९० च्या दशकात रामायण ही सर्वाधिक लोकप्रिय मालिका होती आणि या मालिकेने प्रेक्षकांच्या गर्दीचे (आताचा टीआरपी) सर्वच रेकॉर्ड्स तोडले होते. त्याकाळी रामायणातील कलाकार अरूण गोविल (राम) आणि दीपीका चिखलिया (सीता) हे सार्वजनिक जीवनात कुठेही गेले की, राम-सीता म्हणूनच लोकं त्यांची पूजा करायचे, पाया पडायचे! तर अरविंद त्रिवेदी (रावण) घराबाहेर पडले तर त्यांना लोकांचा रोष सहन करावा लागायचा. या तिन्ही कलाकारांचे आयुष्यच रामायण मालिकेने जणू बदलविले होते. रामायण मालिकेने या कलाकारांना जशी लोकप्रियता दिली तसेच व्यावसायिक जीवनात बरेच नुकसानही केले. रामायणापूर्वी बॉलिवूडसह अन्य प्रादेशिक चित्रपटसृष्टीत बऱ्यापैकी स्थिरावलेल्या या तिन्ही कलाकारांच्या वाट्याला रामायणानंतर मात्र ऐतिहासिक पात्रांच्याच भूमिका आल्या. पुढे अरूण गोविल, दीपीका चिखलिया आणि अरविंद त्रिवेदी हे ‘विक्रम वेताळ’, या मालिकेतूनही एकत्र दिसले. परंतु, रामायणासारखी उच्च कोटीची लोकप्रियता नंतर या कलाकांराना वाट्याला आली नाही. रामायण मालिकेच्या लोकप्रियतेचा फायदा घेत सीता अर्थात दीपीका चिखलिया आणि रावण म्हणजे अरविंद त्रिवेदी हे कलाकार काही काळ राजकीय मंचावरही गेले होते. . दोघेही १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून खासदार म्हणून संसदेत निवडून गेले होते. वैयक्तिक आयुष्यात सीता (दीपीका चिखलिया) गणेशाची भक्त आहे तर रावण (अरविंद त्रिवेदी) मात्र श्री रामाचे निस्सीम भक्त आहेत. आपण साकारत असलेल्या पात्राचा आपल्या खासगी आयुष्यातील सवयींवरही परिणाम होतो, याचा अनुभव खुद्द मालिकेतील श्री रामाने घेतला. या मालिकेपूर्वी अरूण गोविल हे ‘चेन स्मोकर’ होते. परंतु, रामाचे पात्र साकारताना त्यांनी सिगारेट सोडली ती कायमचीच!

श्री राम – अरूण गोविल

रामायण मालिकेतील राम अर्थात अरूण गोविल यांचे मूळ गाव उत्तरप्रदेशातील मीरत. १२ जानेवारी १९५८ रोजी जम्नलेल्या अरूण यांनी मथुरेतून बी.एसस्सी.ची पदवी घेतली. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. मात्र शिक्षणानंतर त्यांनी सरकारी नोकरी करावी, असे त्यांचे वडील चंद्रप्रकाश यांना वाटायचे. शिक्षणानंतर अरूणने मात्र अभिनय क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी मुंबई गाठली. तिथे मोठ्या भावाच्या व्यवसायात लक्ष घातले. अरूण यांचे मोठे बंधू विजय गोविल यांनी अभिनेत्री आणि दूरदर्शनवर गाजलेल्या ‘फूल खिले है, गुलशन गुलशन’ या शोची होस्ट तब्बसूम हिच्याशी लग्न केले होते. मात्र आपली स्वतंत्र ओळख असावी या ध्येयातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाय ठेवला. दोन वर्षे प्रयत्न केल्यानंतर अरूण गोविल यांनी १९७७ मध्ये बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. राजश्री प्रोडक्शनच्या ‘पहेली’ चित्रपटातून त्यांनी सहायक अभिनेता म्हणून पदापर्ण केले. त्यांचे काम बघून त्यांना ‘सावन को आने दो’, ‘सांच को आंच नही’, ‘राधा और सीता’ आदी हिट चित्रपटातून प्रमूख भूमिका मिळाल्या. सावन को आने दो, हा चित्रपट तर सुपर डूपर हिट ठरला. त्याच दरम्यान रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत श्री  रामाच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. ही मालिका त्यांच्या आयुष्यातील माईल स्टोन ठरली. ते लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर पोहचले. त्यांना अशाच धार्मिक मालिकांच्या ऑफर येऊ लागल्या. ‘विश्वामित्र’ मध्ये राजा हरिश्चंद्राची, ‘बुद्धा’मध्ये गौतम बुद्धांची, ‘विक्रम आणि वेताळ’ मध्ये राजा विक्रमादित्याची भूमिका त्यांनी साकारली. या धार्मिक मालिकेतील भूमिकांमुळे मात्र पुढे त्यांच्या करिअरच्या बॉलिवुडमधील वाटा बंद झाल्या. ‘तुम्ही रामाची भूमिका साकारल्यानंतर ही लहान भूमिका कशाला करता, ती तुम्हाला शोभणार नाही. तुमचा चेहरा आणि अभिनय धार्मिक आणि ऐतिहासिक मालिकांसाठीच बनलेला आहे’, ‘रामजी क्या काम रहे हो’, अशी कारणे सांगून त्यांचा बॉलिवूडमधील प्रवास जणू बंदच केला. अरूण यांनी तेलगू, ओरिया, भोजपुरी आदि प्रादेशिक भाषांतील चित्रपटांमधूनही अनेक भूमिका केल्या आहेत. रामायणापूर्वी अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबतही अभिनय केला.

त्यांनी टेक्सटाईल डिझायनर आणि अभिनेत्री श्रीलेखासोबत विवाह केला. त्यांना अमल हा मुलगा आणि सोनिका ही मुलगी आहे. अमल हा सध्या मुंबईत बँकर आहे तर मुलगी सोनिका अमेरिकेत बोस्टनला असते.  २००८ मध्ये त्यांनी ‘अरूण गोविल  प्रोडक्शन्स प्रा.लि.’ हे स्वत:चे प्रोडक्शन सुरू केले. त्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांची निर्मिती, दिग्दर्शन त्यांनी केले. सध्या मुंबईत पत्नी, मुलगा, सून, नातू यांच्यासह मुंबईत असतात आणि दररोज पुन:प्रसारित होत असलेली ‘रामायण’ मालिका न चुकता बघतात. मात्र आजच्या राजकारण्यांनी प्रभू श्री रामाला राजकारणात जरा अधिकच वापरले, अशी खंतही त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली.

सीता – दीपीका चिखलिया

रामायण मालिकेत सीतेची भूमिका करणाऱ्या दीपीका चिखलिया-टोपीवाला या लग्नानंतर टिव्ही, चित्रपट क्षेत्रापासून दूर गेल्या. मात्र रामायणापूर्वी त्याही बॉलिवुडमध्ये स्थिरावल्या होत्या. दीपीकाचा जन्म मुंबईत झाला. बी.ए. झाल्यानंतर त्यांनी अभियन क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. दूरदर्शनवरील मालिका ‘रिश्ते नाते’ मधून त्यांची कारकीर्द सुरू झाली. रामायणामध्ये त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी सीतेची भूमिका साकारली आणि अजरामर केली. त्यानंतर ‘लव कुश’, ‘विक्रम आणि वेताळ’ या मालिकांमध्येही त्यांनी अनुक्रमे देवी सीता आणि राजकन्या रूपवतीची भूमिका साकारली. १९८३ मध्ये ‘सुन मेरी लैला, पत्थर, चींख, भगवान दादा, घर संसार’ आदी चित्रपटांमधून महत्वाच्या भूमिका केल्या. दीपीका यांनी ‘बी ग्रेड’ चित्रपटांमध्येही भूमिका साकारल्या. ‘रात के अंधेरे में’ या चित्रपटात ‘सेक्सी रोझी’ ची भूमिका केली होती. याशिवाय मल्ल्याळम, भोजपूरी, बेंगॉली, तेलगू , गुजराती आदी भाषेतील चित्रपटांत भूमिका केल्या. २३ वर्षांच्या विश्रामानंतर त्यांनी २०१८ मध्ये ‘गालिब’ या चित्रपटातून बॉलिवुडमध्ये पुन्हा पदार्पण केले होते. २०१९ मध्ये आलेल्या ‘बाला’ चित्रपटातही त्यांनी भूमिका केली आहे. चित्रपटांमध्ये त्यांच्या वाट्याला फार कमी यश आले. मात्र ही कमी रामायण मालिकेतील सीतेच्या भूमिकेने भरून काढली.

 रामायण मालिकेतील सीतेच्या भूमिकेमुळे मिळालेली लोकप्रियता दीपीका यांनी राजकारणातही आजमावली आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यांचे आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक व कार्यकर्ते होते. आरएसएसची विचारधारा आपल्या कुटुंबियांतही रूजली असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले. १९९१ मध्ये गुजरातमधील बडोदा लोकसभा मतदारसंघातून भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि त्या संसदेत खासदार म्हणून निवडूनही गेल्या. त्याचवर्षी त्यांचा उद्योजक हेमंत टोपीवाला यांच्यासोबत विवाह झाला. लग्नानंतर त्या पती हेमंत टोपीवाला यांच्या कॉस्मेटिक कंपनीत रिसर्च आणि मार्केटिंगच्या प्रमुख म्हणून काम बघायच्या. त्यांना निधी आणि जुही या दोन मुली आहेत. निधी ही मेकअप आर्टिस्ट आहे. एका मुलाखतीत त्यांना, ‘तुमचा नवरा श्री रामासारखा असावा, असे आपणास वाटते काय’, असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा ‘पती हेमंत यांनी पूर्णपणे प्रभू श्री रामासारखे वागावे, हे मला अजिबात आवडणार नाही’, असे उत्तर त्यांनी दिले.

रावण – अरविंद‍ त्रिवेदी

मूळचे मध्यप्रदेशातील उज्जैन येथील अरविंद त्रिवेदी यांचा जन्म ८ नोव्हेंबर १९३८ चा. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय इंदौरला स्थायिक झाले. त्यांचे मोठे बंधू उपेंद्र त्रिवेदी हे गुजराती नाटकांमधील प्रसिद्ध कलावंत होते. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत अरविंद यांनीही अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. अरविंद हे रामायणातील ‘केवट’च्या भूमिकेसाठी ऑडिशन्स द्यायला गेले होते. पंरतु, रामानंद सागर यांनी त्यांची शरीरयष्टी, देहबोली बघून त्यांना रावणाच्या भूमिकेकरिता निवडले आणि अरविंद यांनी ही भूमिका अजरामर केली. या मालिकेतील रावणाच्या भूमिकेमुळे ते लोकांसाठी खरोखरच्या आयुष्यातही लंकापती रावणच झाले होते. या भूमिकेसाठी त्यांना अनेकदा लोकांचा रोषही पत्कारावा लागला तर दक्षिण भारतात देव म्हणून सन्मानही मिळाला. आपल्या जीवनात अरविंद त्रिवेदी हे प्रभू श्री रामाचे निस्सीम भक्त आहेत. त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. १९७१ मध्ये ‘पराया धन’ या हिंदी चित्रपटातून त्यांची पडद्यावरील कारकीर्द सुरू झाली. मात्र त्यापूर्वी ते थिएटर आर्टिस्ट म्हणून परिचित होते. परंतु, त्यांना रामायणामुळे मिळालेली ‘रावण’ ही ओळख आजही कायम आहे. त्यांनी अनेक धार्मिक, ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील चित्रपट, मालिकांमध्ये काम केले. ‘विक्रम आणि वेताळ’, ‘योगी’ , ‘विश्वामित्र’ आदी मालिकांमधील त्यांच्या भूमिका गाजल्या. अरविंद यांचा विवाह १९६६ मध्ये नलिनी यांच्यासोबत झाला. त्यांना तीन मुली आहेत.

पडद्यावरील या ‘रावणा’स भारतीय जनता पार्टीने १९९१ च्या लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील साबरकांथा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि अरविंद त्रिवेदी खासदार म्हणून निवडून आले. २००२ मध्ये त्यांची केंद्रीय फिल्म प्रमाणिकरण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी विविध सामाजिक संघटनांसोबत काम सुरू केले. सध्या दूरदर्शनवर पुन:प्रसारित होत असलेली रामायण मालिका बघून अरविंद त्रिवेदी  भूतकाळातील आठवणींचा आनंद घेतात. रामायण मालिकेतील लक्ष्मण (सुनील लहरी) आणि सीता (दीपीका चिखलिया) यांच्या ते कायम संपर्कात असतात. आज ८१  व्या वर्षी आपला बहुतांश वेळ हा ‘राम नामा’चा जप करण्यातच जातो, असे हा ‘रावण’ निर्विकारपणे सांगतो!

(लेखक लोकसत्तेचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आहेत)

९४०३४०२४०१

 

Previous articleकोरोना कनफ्यूजन: काही प्रश्न, काही तर्क
Next articleविस्मरणात गेलेला १९२० चा स्पॅनिश फ्लू
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.