कोरोना कनफ्यूजन: काही प्रश्न, काही तर्क

-आशुतोष शेवाळकर

कोरोना व्हायरस विषयात मागील काही दिवसात एवढी वेगवेगळी माहिती आदळत आहे की त्यामुळे सामान्य माणूस पार गोंधळून केला आहे. भयभीतही झाला आहे. माहितीच्या भडिमारामुळे ‘अब और करो ना और कनफ्यूज’ अशी त्याची स्थिती झाली आहे. मात्र सध्या गोंधळून जाण्याऐवजी काही गोष्टी शांतपणे समजून घेण्याची गरज आहे.

 १. आठवडाभरापूर्वी इंडियन मेडिकल काऊंसिलने पत्रकार परिषदेत करोना व्हायरसचं  संक्रमण झालं तरी ८० टक्के लोकांना काहीच त्रास होणार नाही. प्रत्येकामध्ये असलेल्या रोगप्रतिकारक शक्तीनेच तुम्ही त्यावर मात करू शकाल,. २० टक्के लोकांना कफ सर्दी, खोकला व ताप येईल मात्र  यातील केवळ पाच टक्के लोकांनाच ‘लाईफ सपोर्ट’(व्हेंटिलेटर) ची गरज पडू शकेल असं जाहीर केलं होतं.

यात ८० टक्के संसर्ग होऊनही काहीच त्रास न झालेले लोकं हे ‘कॅरियर्स’ असतात का? त्यांच्यापासून इतर लोकांना संसर्ग होऊ शकतो का? आणि तसा होऊ शकत असेल तर असा संसर्ग होऊ शकण्याचा धोका किती दिवसपर्यंत असतो? या प्रश्नांची उत्तरे नव्हती.

कोरोना हा फुफ्फुसांशी निगडीत विकार असल्याने रोग्याचं फुफ्फुसामधलं ‘इन्फेक्शन’ प्रमाणाबाहेर वाढलं तर कृत्रिम श्वसनाद्वारे फुफ्फुसांना आराम देऊन ते दुरुस्त करण्यासाठी फक्त व्हेंटिलेटर लागत असावा, असा मी हे वाचून अंदाज केला होता. ‘व्हेंटिलेटर’ लागले म्हणजे शेवटचा प्रवास अशी जी आपली ‘व्हेंटिलेटर’विषयी सर्वसाधारण कल्पना आहे, तसा तो प्रकार नसावा असंही मला वाटलं.

८० टक्के लोकांना काहीच त्रास होणार नाही, २० टक्के लोकांना फक्त सर्दी, खोकला होणार असेल तर मग आपण या रोगाला एवढे घाबरतो का आहोत? हे ‘कन्फ्युजन’ मला पहिल्यांदा झालं होतं.

  २.  करोनाचा मृत्यूदर हा याआधी येऊन गेलेल्या सार्स आदी विषाणूच्या मृत्यूदरापेक्षाही कमी म्हणजे २ टक्केच असल्याचेही सांगितले जाते आहे. संख्याशास्त्राच्या अशा अंदाजात घराबाहेर पडल्यावर अपघाताने मरण्याची शक्यताही २ टक्के अशीच सांगितली जाते.  तरीही याचं एवढं ‘पॅनिक’ का केलं जात आहे, हे न कळून हे ‘कन्फ्युजन’ अधिक वाढलं.

३. आपल्या देशातल्या प्रथम बाधितांची संख्या व त्यांच्या प्रसाराचा वेग हा पण इतर देशांच्या तुलनेत अगदी कमी आहे.  ३३ कोटी लोकसंखेच्या अमेरिकेत चार लाखाच्या जवळपास ती आहे, तर १३० कोटीच्या आपला देश आता पाच  हजाराच्या जवळपास पोहोचला आहे.

एकदा रुग्ण ‘डिटेक्ट’ झालेत की त्याची संख्या गुणाकाराने वाढते असं म्हणतात. आपल्या येथे आता वेग वाढत असला तरी अद्याप बेरजेनेच तो वाढतो आहे.

अमेरिकेत एवढी भयंकर स्थिती असताना अजूनही त्यांच्या ५२ स्टेटसपैकी फक़्त १० स्टेटसमधेच संपूर्ण लॉकडाउन आहे. बाकीच्या स्टेटमधे नाही.

आपल्याकडे तुलनेने संसर्ग कमी असतानाही पंतप्रधान, मुख्यमंत्री यांची सततची निवेदनं, पोलिसांची दहशत, मीडियावर २४ तास कोरोना बुलेटीन, सोशल मीडियावरच्या पोस्ट्स हे या फुरसतीच्या दिवसात सतत बघण्याने हे प्रकरण निश्चितच काही तरी गंभीर असावं, असं दर वेळी वाटत गेलं आणि मन पुन्हा पुन्हा गोंधळात पडत गेलं. या संसर्गाने वृद्ध आणि मुलांना धोका होऊ शकतो,  त्यांच्यासाठी आपल्याला उद्योगधंदा सोडून घरी बसणं आवश्यकच आहे, असं स्वत:ला  ‘जस्टीफाय’ करत मनाची तगमग शांत करणं सुरु राहिलं.

    ४.   करोनाचा ‘व्हायरस’ हा थुंकी, शेंबूड यांच्यामधून संसर्गाने होऊ शकतो असेच सगळीकडे सांगितले जात आहे. हा प्रत्यक्ष संसर्ग टाळायला १ मीटरचं अंतर राखायचं ,असंही सांगितलं जात आहे. संसर्गित व्यक्तीचे हे ‘ड्रोप्लेट्स’ उडून कुठे पडले असतील व त्याला आपला हात लागला व तोच हात चुकून आपल्या नाकातोंडाला लागला तर हा अप्रत्यक्ष संसर्ग होऊ शकतो. व त्यासाठी सतत हात धुवायचे आहेत,असे सांगितले जातं आहे.

     पण प्रत्यक्ष संसर्गापेक्षा अशा अप्रत्यक्ष संसर्गात लागण होण्याची शक्यता स्वाभाविकच कमी होत असेल नं? कुठल्याही ‘व्हायरस’चं आयुष्य ७२ तासांपेक्षा जास्त नसतं, असं वैद्यकीय शास्त्र सांगतं. माणसाच्या शरीरात जर ते ७२ तासांपेक्षा जास्त नसेल तर मग तो ‘व्हायरस’ करोना का असेना, टेबल, खुर्ची, दाराचे हँडल, रस्ता अशा निर्जीव वस्तूवर ५-१० मिनिटांपेक्षा जास्त वेळ जिवंत कसा काय राहू शकत असेल? ५-१० मिनिटे श्वास बंद झाला तर माणूस देखील मरतो.मग अशा वेळी मानवी पेशीपासून संबंध तुटलेला ‘व्हायरस’ निर्जीव पृष्ठभागावर १२ तासापर्यंत तग तरी कसा काय धरू शकत असेल?

आणि तरीही सगळीकडचं सगळ्या गोष्टींचं, इमारतींच सॅनीटायझेशन, विविध म्युनसिपालट्यांच्या फवाऱ्यानी रस्ते, नाल्या धुणे कशासाठी सुरू आहे, हे कळत नाही. उत्तर प्रदेश सरकारने इतर प्रांतातून परतलेल्या मंजुरांवर जंतूनाशकाचा फवारा मारणे तर फारच अनाकलनीय व अमानुष वाटले.

    ५. ‘कोरोना’ या विषाणूच्या संसर्गाची सुरुवात चीनमधून झाली. चीनमधून जे प्रवासी बाहेर देशात गेलेत तिथे तिथे तो पसरला ,असे सांगण्यात येत आहे. चीनसोबत भारताचे व्यापारी संबंध सगळ्यात जास्त आहे. बांधकामाच्या  उपकरणांपासून खेळणी, पिचकाऱ्या, पतंग, गणपती, दिवाळीचे दिवे या  सगळ्याच गोष्टी आजकाल भारतात चीनमधून बोटी भरून भरून येतात. या खरेदीसाठी भारतातील अनेक व्यापाऱ्यांचे चीनमध्ये नियमित जाणे येणे असते. त्यामुळे चीनमधून जगभरात गेल्या तीन महिन्यात जितके प्रवासी गेले असतील त्या सगळ्यांच्या संख्येपेक्षा जास्त प्रवासी भारतात या तीन महिन्यात आले असण्याची दाट शक्यता आहे . असे असताना  भारतात या विषाणूंचा प्रादुर्भाव हा इतर देशांच्या तुलनेत फारसा झालेला नाही, असं का असावं?

याची तीन कारणं वाटतात. एक म्हणचे अत्यंत ‘हायजेनिक’ अशा वातावरणात राहणाऱ्या विदेशी लोकांपेक्षा ‘अन-हायजेनिक’ वातावरणात राहण्याची सवय असलेल्या आपण भारतीयांची रोगप्रतिकारक शक्ती कदाचित जास्त असू शकते. दुसरं कारण म्हणजे करोनाचा विषाणू कदाचित तापमान संवेदनशील [Temperature Sensitive] असावा. यामुळे उत्तर ध्रुवाजवळ त्याचा प्रसार जास्त आणि विषुववृत्तावर (इक्वेटर) कमी असं असू शकतं. तिसरं कारण मनात आलं ते म्हणजे,  हे कदाचित जैविक शस्त्रांनी खेळलं जात असलेलं आर्थिक युद्ध असावं. अर्थव्यवस्था अडचणीत असलेल्या चीनला युरोप व अमेरिकन अर्थव्यवस्थेला काहीतरी धक्का पोहोचवल्याशिवाय यापुढे जागतिक स्पर्धेत तग धरणे कठीण झालं असावं. त्यामुळे चीनला ज्या देशात जास्त संसर्ग व प्रसार हवा आहे तिथे तो जास्त झाला असावा. भारताची लोकसंख्या ही चीनी वस्तू वापरणारी म्हणून चीनसाठी ग्राहकांची बाजारपेठ आहे. इथं चीनला हा प्रसार, संसर्ग नको असेल व म्हणून इथे फक्त बाहेरून येणाऱ्या प्रवाशांमुळेच संसर्ग झाला असावा व म्हणूनच तो मर्यादित असावा., असा एक विचार येवून गेला.

 इटली, स्पेन ,अमेरिका या देशांच्या तुलनेत भारतातल्या कोरोना बधितांच्या strains च्या अभ्यासावरून तेथील कोरोना हा जास्त virulent आहे, असेही निदान भारतीय शास्त्रज्ञांनी केले आहेत. हे जर खरं असेल तर हा निष्कर्ष जैविक युद्धाच्या या शक्यतेला अधिक पुष्टी देतो. इटली, अमेरिकेतले ‘प्रत्यक्ष व्हायरस’ बाधित व आपण ‘सेकंड हँड व्हायरस’ बाधित  म्हणून आपल्यातला संसर्ग, परिणाम, मृत्यू व प्रसार कमी असं हे असू शकतं.

६.  आपल्याकडे टेस्टच्या ‘किटस्’ कमी आहेत आणि त्यामुळे टेस्टिंगच कमी असल्यामुळे आपल्याकडची रुग्णांची संख्या वाढत नाही आहे, असं ही ही रुग्ण संख्या कमी असल्याचं कारण सांगितलं जातं. पण हेही मनाला तेवढंसं पटत नाही. ‘टेस्ट’ जरी झाली नाही तरी ज्यांना त्रास झाला, लक्षणं आलीत ते रुग्ण डॉक्टर, हॉस्पिटलचा उपचार घ्यायला येण्यामुळे तर ‘डिटेक्ट’ झालेच असते.

७.  आता नुकत्याच आज आलेल्या अहवालानुसार भारतातल्या कोरोना पॉजिटिव्ह रुग्णामध्ये ९० टक्के लोकांमध्ये काहीच लक्षणं आढळलेली  नाहीत, फक्त १० टक्के लोकांमध्ये सर्दी, खोकला व कफ अशी लक्षणं आढळली आहेत.

याचा अर्थ खूप पसरणारा पण जीवाला फारसा धोका नसणारा असा हा साथीचा आजार आहे का? आणि तो तसा असेल तर मग त्याला इतकं आपण का घाबरायचं?

आमच्या लहानपणी डोळे येण्याची साथ जवळपास दरवर्षीच येत असे. हा पण असाच जलद गतीनी पसरणारा अति संसर्गजन्य रोग असेल.  गावातल्या प्रत्येकाचेच एकदा तरी डोळे येऊन जात, कुणाकुणाचे तर या काळात दोनदा पण डोळे येत असत. पण या साथीनी कुणाचे डोळे गेल्याचे कधी ऐकलेले नाही, किंवा कोणाला चष्मा लागल्याचे सुद्धा ऐकलेले नाही.

सारांश : हा ‘कोरोना’ जे काही असेल ते असो… पण आता एकतर हा इतर साथीच्या रोगांसारखा तीन-चार महिन्यात निघून जाईल किंवा कदाचित हा कायमस्वरूपी आपल्यात राहायला आलेला असेल. कायमस्वरूपी तो राहायला आला असेल तर  काही कायमस्वरूपी इलाज त्यावर शोधून काढल्याशिवाय आपल्याला तरणोपाय नाही. हा कायमस्वरूपी उपाय म्हणजे एकतर याच्या प्रतिबंधाची लस आपल्याला शोधावी लागेल. हा रोग धोक्याचा असला वा नसला तरी ‘देवीचा रोगी कळवा, १ हजार रुपये मिळवा’ सारखा याचा पूर्ण नायनाट केल्याशिवाय आता आपल्याला गत्यंतर नाही.

आणि असं करण्यासाठी पहिल्या टप्प्यातली लढाई कदाचित आपल्यासाठी वर दिलेल्या सगळ्या कारणांमुळे थोडी सोपी असली, तरी दुसऱ्या टप्प्यातली लढाई मोठ्या लोकसंख्येमुळे आपल्यासाठी दीर्घकालीन असणार आहे. आणि अशा दीर्घकालीन लढाईच्या या दुसऱ्या टप्प्याच्या वेळी सध्याची आपली इतकी ‘हाइप’ व ‘ओव्हररिअ‍ॅक्शन’ यांनी आपली ‘लांडगा आला रे आला’सारखी गत केली नाही म्हणजे मिळवली.

दीर्घकालीन लढाईसाठी एवढया मोठ्या लोकसंख्येचा धीर,पेशन्स  टिकवायचा असेल, तर सुरुवातीचा असा अतिरेक आपल्या अंगलट येऊ शकतो.

जे काही असेल ते असो पण सध्याचं आपल्या देशाचं  वातावरण हे ‘गणपती दूध पितो..’ च्या दिवसांची आठवण करून देण्यासारखं आहे, हे मात्र  मात्र खरं.

(लेखक हे सुप्रसिद्ध व्यावसायिक आहेत )

Previous articleफिलॉसॉफी इन अ‍ॅक्शन
Next articleराम,सीता आणि रावण सध्या काय करताहेत?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.