( स्थलांतरितांच्या वेदना व्यक्त करणारं हे रेखाटन नासिकचा ज्येष्ठ चित्रकार दोस्तयार धनंजय गोवर्धने , याचं आहे . )
-प्रवीण बर्दापूरकर
||१||
परवच्या भेटीत दोस्तयार मुकुंदा बिलोलीकर म्हणाला , ‘चला , एकदाचं २०२० हे वर्ष संपलं . तुझ्यासाठी हे वर्ष खूपच दु:स्वप्न ठरलं .’
माझी बेगम मंगला हिच्या प्रदीर्घ आजारानं झालेल्या निधनाचा संदर्भ त्याच्या म्हणण्याला होता . क्षणभर थबकून मी म्हणालो , ‘ते दु:ख माझ्या एकट्याचं कसं ? वैयक्तिक दु:खाचं सामुहिकीकरण होतांना २०२० मध्ये बघायला मिळालं . दु:खाचा एक वेगळा आणि अतिव्यापक भेसूर पोत सरल्या वर्षात अनुभवायला मिळाला .’
कृष्णबिहारी ‘नूर’ यांची एक गझल आहे , कोणतं ही कारण नसतांना जगणं अचानक एक सजा बनून गेलं–
‘जिंदगी से बडी सजाही नहीं
और क्या जुर्म है पता ही नहीं ।’
( शुजात खान यांच्या आवाजात ही गझल मला फार भावते )
बेगम मंगलाची वाटचाल मृत्यूच्याच्या दिशेनं निर्णायकपणे सुरु झाली तेव्हाचा आणखी एक संदर्भ आहे , महेश एलकुंचवार यांच्या एका लेखात तेव्हा वाचलं होतं , ‘दु:खापेक्षा आपणच मोठं होऊन जावं’. हे वाचल्यावर वाटलं होतं , बेगमच्या मृत्यूचा शोक , दु:ख आणि नंतरचं एकाकीपण सहन करण्याचं बळ आपल्याला आधीच मिळालं आहे . प्रत्यक्षात मात्र तसं घडलं नाहीये…अजूनही . बेगम गेल्यावर तसं घडणं शक्यही नव्हतंच म्हणा पण , एखादी अभिव्यक्ती मग ती कविता असो की लेख , गाणं असो की चित्र की शिल्प , एका वेगळ्या स्वरुपात जेव्हा अनुभवायला मिळते तेव्हा गहिरी उदासी असलेला एहसास आपल्याला घट्ट वेढा घालतो .
२०२०नं माझ्या किंवा अन्य कुणा एकट्याच्याच वाट्याला दु:ख आणलं नाही तर कोरोनानं निर्माण केलेला , असंख्य एक-एकट्याच्या दु:खाचा तो एक विश्वव्यापी भेसूर सामुहिक एहसास होता . कोरोनाचं रुप जसजसं आक्राळविक्राळ होत गेलं आणि बळींचा आंकडा वाढू लागला तसतसं त्या दु:खाला असंख्य नवीन धुमारे फुटले आणि ते समस्त मानव जमातीवर चाल करुन येत आहेत असं वाटू लागलं .
६ मार्चला बेगमनी अखेरचा श्वास घेतला तेव्हा आपल्याही देशावर कोरोनाचं संकट घोंघावू लागलं होतं . हे संकट महाभीषण असेल याची कल्पनाच तोवर आलेली नव्हती . खूप तपशीलात जात नाही पण , तो जो सुरुवातीचा टाळेबंदीचा काळ होता , त्या काळात या देशातल्या प्रत्येकच माणसाच्या जगण्यावर एकटेपणानी झडप घातली . ही नुसती एकटेपणाची झडप नव्हती , ती केवळ एक अनामिक घनगर्द भीती नव्हती तर मृत्यूची भेसूर आणि अनामिक छाया होती . जसे दिवस सरत गेले तशी ती मृत्यूची छाया अतिशय आक्राळ-विक्राळ झाली आणि केवळ वैयक्तिक नव्हे तर सामूहिक जगण्याचा सुद्धा सगळा पोतच विस्कटून टाकला .
काय घडलं नाही गेल्या वर्षभरात ? कोरोनानं जगण्याचे सर्वच संदर्भ बदलून टाकले. समाजकारण , राजकारण , अर्थकारण , उद्योग , शिक्षण , वैद्यकशास्त्र अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर एका अतिशय महाभीतीदायक संदर्भानं अशी की चाल केली की प्रत्येक माणसाच्या डोळ्यात मृत्यूचं भय दाटून आलं . माणसाच्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनात तोवर प्र्स्थापित झालेले सर्व मापदंड तपासून पाहण्याची नितांत गरज निर्माण झाली . आपण समजतो तितकं आयुष्य सोपं नसतं . एखादी अनपेक्षित आपत्ती सगळं होत्याचं नव्हतं करुन टाकते ; खूप मोठी उलथापालथ होते , सुन्न करणारी आगतिकता येते आणि असहाय्य होऊन बघत राहण्याशिवाय आपल्या हाती कांहीच उरत नाही , हे जगानं २०२० मध्ये अनुभवलं .
अशी नैसर्गिक आपत्ती हाताळण्यात आपण कोणतीही कसूर ठेवली नाही असा दावा भलेही केंद्र सरकार आणि राज्य सरकार करोत पण , या दोन्ही सरकारांना ते आव्हान समर्थपणे पेलवलं नाही हे मात्र खरं . त्याच्या तपशीलात जात नाही . थोडासाही अवधी न देता टाळेबंदी लागली गेली . सर्व व्यवहार अचानक ठप्प झाले .जगणं किती कठीण आहे हे त्या काळात अनुभवायला लागलं . दोन्ही सरकार चूकच वागले असा काही माझा दावा नाही . परंतु जी काही घिसाडघाई या दोन्ही सरकारांकडून घडली त्याचे फार मोठे परिणाम लोकांना सहन करावे लागले .
जगात लक्षावधी जण कोरोना झाल्यामुळे मृत्यू पावले . कांही जगण्याच्या घाईत अकारण चिरडून मेले . कांही टांचा घासून मृत्युच्या अधीन झाले . अनेकांना रोजगार गमवावे लागले . बाजारपेठ ठप्प झाली . लोकांना जगणंही असह्य झालं . जगण्याची एक वेडी स्पर्धा आणि त्यातून येणारं भीषण असं दारिद्रय , भीषण अशी अगतिकता या सगळ्या काळात अनुभवायला मिळाली . माणसं घरात कोंडली गेली . त्या सलग कोंडण्यातून अपरिहार्यपणे येणार्या नैराश्यानं अनेकांना गाठलं . स्थलांतरितांचा प्रश्न निर्माण झाला . ते काही केवळ मोठ्या शहरातून आपल्या गावाकडे जाणाऱ्या लोकांचे तांडे नव्हते . ते वेदनेचं तांडव होतं . तो रक्ताळलेल्या टाचांचा प्रवास होता . हे सगळं २०२० मध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर माणसाच्या जगण्यावर भीषणपणानं आदळलं आणि प्रत्येक माणूस अधिकाधिक असाह्य होत गेला . आर्थिक दुष्परिणाम तर अनेक जाणवले . त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले . त्यातही राजकारण खेळण्याची किळसवाणी मनोवृत्ती आपल्याला अनुभवायला मिळाली आणि राजकारण्यांविषयी असणारी एक नफरत , जी आपल्या मनात ज्योतीच्या स्वरुपामध्ये मंदपणे तेवत होती तिचा वणवा झाल्यासारखं चित्र निर्माण झालं ..
दु:खाचं सामूहिकीकरण ही संकल्पना यापूर्वीही मांडली गेलेली आहे पण , दोन जागतिक महायुद्धानंतर आता ती पुन्हा अनुभवायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं . ते या २०२० नी अनुभवायला दिलं . तो अनुभव म्हणजे भविष्याच्या चिंतेचा पेटलेला ता दाह होता . अनेकांनी असंख्यांनी जी काही स्वप्न रंगवलेली होती त्याचा पेटलेला तो वणवा होता . असं खूप काही या २०२० मध्ये घडत गेलं . २०२० नी सगळ्यात महत्त्वाचं काय शिकवलं असेल तर ते हेच की , कोणताही कुसूर नसतांना ‘जिंदगी से बडी सजाही नहीँ’ . हे जे शिकणं होतं यातून आपण २०२१ मध्ये सावरणार का ? हाच खरा प्रश्न आत्ताच्या घटकेला आहे . हा प्रश्न पडण्याचं कारण कोरोनाचा नवा अवतार आता पुन्हा अस्तित्वात आलेला आहे आणि २०२१ वर सुद्धा त्याच २०२० मध्ये दाटून आलेल्या महाभयानक नव्या भीतीचं मळभ घोंघावू लागलेलं आहे . हे मळभ २०२१मधे कायमचे दूर होवो हीच शुभेच्छा .
||२||
२०२१ मधल्या पहिल्या सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या अनेक पोस्ट वाचनात आल्या , प्रकाश वृत्तवाहिन्यांवरही दृश्ये पाहिला मिळाली . त्या संदर्भात बेगम मंगलाच्या साथीनं आम्ही ( म्हणजे अंजली आणि मिलिंद देशपांडे , पुष्पा आणि रवी जोशी दोस्तांसह ) अनुभवलेले कांही क्षण शेअर करतो –
२०१७च्या जानेवारी महिन्यात आम्ही सर्व चेरापुंजीहून शिलॉंगला परततांना मावळता दिनकर दिसला .
कारमधून खाली उतरलो तर हाडाला झोंबणारा थंडssssssगार वारा आणि सर्वदूर पसरलेला सन्नाटा…तोही इतका गहिरा की स्वत:च्याही श्वासाचा आवाज वैरी वाटावा .
गावात-खेड्यात-जंगलात-जगाच्या सर्वदूर भागात इतकी भटकंती झाली पण मावळणाऱ्या सूर्याच्या प्रकाशात इतके तपशील यापूर्वी कधी दिसल्याचं आठवत नाही .
( इच्छुकांनी फोटो झूम करून पाहावा ! )
मावळतीचे ते विविध रंग एकमेकात इतक्या तृप्तीने विलीन झालेले की रंगांचं एक महादेखणं , अतिलोभस रुप समोर आलं ; त्यात त्या काळ्या रंगाने अशी बहार आणली की ते एकूण दृश्य सुख-दु:ख कवेत घेतलेल्या आणि त्या झाडांसारखे दोस्तयार साथीला असणाऱ्या एखाद्या माणसाचं परिपूर्ण जगणं वाटलं .
||३||
भारतातलं पहिलं सूर्यदर्शन कुठ होतं ठाऊक आहे ?
आपल्या देशातलं सर्वात पहिलं सूर्यदर्शन होतं ते दार्जीलिंगजवळ !
ते स्थळ येतं अरुणाचल प्रदेशात आणि त्याचं नाव आहे डोंग .
भल्या पहाटे आणि अजस्र थंडीत उठून सुमारे २८-३० किलोमीटर्स प्रवास करुन एका डोंगरावर जायचं आणि कितीही गरम कपडे घातलेले असले तरी कुडकुडत सूर्याची वाट पाहणं असा तो अनुभव असतो .
आपल्या डाव्या हाताला दूरवर कांचनगंगा ( जंगा ) ची हिमशिखरे दिसत असतात आणि समोर सोनेरी लालसर रंग उधळत सूर्य दर्शनाला येतो …मग ती किरणे कांचनगंगावर पडतात आणि ती पर्वत रांगही उजळून निघते .
तो सोनेरी लालसर रंग आधी गडद असतो , मग तो गडदपणा विरळ होत जातो आणि कांचनगंगा पर्वतरांग लखलखीत रुपेरी होत जाते .
त्या सोनेरी लाल रंगाची उधळण ते कांचनगंगाचं रुपेरी होणं , हा अवघ्या बारा-पंधरा मिनिटांचा खेळ इतके रंगविभ्रम निर्माण करतो की त्यात आपलं अस्तित्व विलीन होतं .
अनिमिष नेत्रांनी तो एक वेगळा अनुभव आपल्या रंध्रारंध्रात सामावला जातो…एका विलक्षण तुप्तीचे ते क्षण असतात .
||४||
२०२१ हे नवं वर्ष म्हणजे-
जिंदगी कि किताब में एक कोरा पन्ना और जुडने जा रहा है !
इस पर कुछ ऐसा लिखिये , जो पिछले पन्ने पर लिखे से बेहेतर हो !!
असं आपल्या सर्वांच्या बाबतीत घडावं , बस्स !
–लेखक नामवंत संपादक व राजकीय घडामोडींचे विश्लेषक आहेत
9822255799