-प्रवीण बर्दापूरकर
मध्यंतरी ‘काँग्रेस , पक्ष की समृद्ध अडगळ ?’ हा मजकूर ( ब्लॉग ) लिहिला होता . त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना एका ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यानं ( मेलद्वारे) दिलेली प्रतिक्रिया अशी होती-“ काँग्रेस पक्षाचे भवितव्य संकटात आहे आणि त्याबाबत काँग्रेसने काय करायला हवे यासंबंधी सतत काही ना काही लिहिले-बोलले जातेय . सर्व भाषांतल्या वृत्त वाहिन्यांवर अधूनमधून चर्चा झडतात. त्यात काँग्रेस पक्षातर्फे कोणीच भाग घेत नाही . याला ‘रिकामी उठाठेव‘ म्हणायचे का ?
या संदर्भात मला एक चुटका आठवतो .
एका पार्टीत बरेच स्त्री-पुरुष एकत्र आलेले असतात . त्यातल्या एका प्रतिष्ठित गृहस्थाच्या विजारीची झिप उघडी असल्याचे त्याच्या एका मित्राच्या लक्षात येते . तो त्याला थोडे बाजूला घेऊन जातो आणि त्याच्या कानात सांगतो , ‘मित्रा , तुझी झिप उघडी आहे, ती बंद कर .’
त्यावर तो गृहस्थ उतरतो , ‘ते तू कशाला सांगायला हवे ? मला माहीत आहे .’
काँग्रेस पक्षाची अवस्था याहून वेगळी नाही .
माझा तो मजकूर वाचून एकेकाळी कॉँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले एक ज्येष्ठ नेते म्हणाले , ‘आमच्या पक्षाची इतकी काळजी तुम्ही लोक करत होतात म्हणून आम्ही निवडणुका लढवण्यात आणि सत्तेत राहण्यात मग्न राहिलो त्या काळात काँग्रेसची देशावर असणारी पकड ढिली कशी झाली हे समजलंच नाही . आता परिस्थिती हाताबाहेर गेलीये , हेच खरं !’
■■
हे आठवण्याचं कारण , देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते आणि (महा)राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी नुकतीच काँग्रेसवर केलेली बोचरी टीका हे आहे . जमीनदाराचा पडका वाडा , ( त्यांनी ‘हवेली’ हा शब्द वापरला आहे ) असं काँग्रेसच्या सद्य अवस्थेचं वर्णन शरद पवार यांनी केलेलं आहे आणि ते अचूक आहे , त्यात काही गैर नाही . मात्र असं असलं तरी या अवस्थेला जबाबदार कोणकोण आहे याचीही प्रामाणिक कबुली शरद पवार यांनी जर दिली असती तर ते योग्य ठरलं असतं पण , शरद पवार नेहेमी मुद्दामच काही तरी बोलायचं बाकी ठेवतात , तसंच याही वेळी घडलं आहे आणि असं घडणं हा शरद पवार यांच्या बाबतीत योगायोग कधी नसतो , असाच आजवरचा अनुभव आहे .
आधी कॉँग्रेसबद्दल बघूयात ; त्यासाठी त्याच जुन्या मजकुराचा आधार घेऊन मग शरद पवार यांच्याकडे जाऊयात . या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान असणारा , पंतप्रधानपदी राहिलेल्या दोघांच्या प्राणाचं बलिदान दिलेल्या , सत्तेत तब्बल सहा दशकं राहिलेल्या , या देशाला विकासाच्या वाटेवर नेणार्या आणि अगदी गाव-खेड्यापर्यंत पसरलेल्या काँग्रेस पक्षाची वाताहत झालेली आहे . इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळापासून हा पक्ष अधिकाधिक व्यक्तीकेंद्रीत होत गेला , गांधी कुटुंब तसंच काही नेते आणि त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित झाला , पक्ष संघटनेची वीण उसवली आणि कार्यकर्ता पक्षापासून दुरावत गेला . कधीकाळी संसदेच्या सभागृहात कायम बहुमतात असणार्या या पक्षाला गेल्या दोन निवडणुकात लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळवता येण्या इतक्याही जागा संपादन करता आलेल्या नाहीत , इतकी या पक्षाची वाताहत झालेली आहे . गेल्या साडेतीन-चार दशकात या पक्षाची रीतसर संघटनात्मक बांधणी झालेली नाही . त्यासाठी आवश्यक असणार्या पक्षांतर्गत निवडणुका झालेल्या नाहीत आणि दिल्ली पासून ते गल्लीपर्यंत ‘तेच ते’ नेते आहेत ; नवीन कार्यकर्त्यांची ताज्या दमाची मोठी फौज उभारली गेलेली नाही .
त्यातच गेल्या सुमारे सव्वादोन वर्षापासून या पक्षाला कायमस्वरुपी अध्यक्ष नाही आणि तो नसल्याचं कोणतंही सोयरसुतक या पक्षाच्या नेत्यांना तसंच नेतृत्व करणार्या गांधी घराण्याला नाही , अशी चारही बाजूंनी मोडकळीस आलेल्या वाड्यासारखी अवस्था सध्या पाहायला मिळते आहे . याचं एक कारण म्हणजे या पक्षाला शीर्षस्थानी आवश्यक आहे तसं खंबीर नेतृत्व सध्या नाही . जे शीर्ष नेतृत्व ‘गांधी’ घराण्याचं आहे ती एक अपरिहार्य अगतिकता असल्याचं आजवर समजलं गेलं पण , आता त्या गांधी नावाचा करिष्मा ओसरु लागलेला आहे , असं म्हणण्यास खूप वाव असल्यासारखे निवडणुकांचे निकाल आहेत .
श्रीमती सोनिया गांधी यांना नेतृत्व सोडायचं आहे , असं दिसत नाही आणि अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावरही पक्षावरची पकड ढिली होऊ देण्यास राहुल गांधी तयार नाहीत , असा हा तिढा आहे . आहे त्या नेतृत्वाच्या भोवती बहुसंख्येनं स्वार्थी , बेरके, जनाधार नसलेल्या आणि जुनाट विचारांच्या ( Fossil ) , खुज्या उंचीच्या नेतृत्वाचा भरणा आहे . या बहुसंख्य नेत्यांची मानसिकता पराभूततेची आणि नव्या नेतृत्वाला नेस्तनाबूत करणारी आहे . या बहुसंख्य नेत्यांना शीर्ष नेतृत्व म्हणून कुणी तरी गांधी तर हवे आहेत पण , त्या ‘गांधी’ची पूर्ण हुकमत मात्र नको आहे , असा हा अवघड गुंता आहे. यामुळे पक्षाची स्थिती आणखी वाईट होत चाललेली आहे . अलीकडच्या काळात भाजपशी लढण्यात राहुल गांधी यांच्याशिवाय त्या आघाडीवर अन्य कुणीच दिसत नाही . सर्व विरोधी पक्षांना या लढाईसाठी एकत्र आणण्यातही काँग्रेस पक्ष अयशस्वी ठरलेला आहे .
पक्षाला उभारी देण्याऐवजी , राहुल गांधी यांना बळ प्राप्त करुन देण्याऐवजी काँग्रेस नेते कसे बेजबाबदार वागत आहेत , याचं उत्तम उदाहरण म्हणजे मध्यंतरी २३ नेत्यांनी केलेल्या बंडाकडे पाहायला हवं . इतकी वर्ष पक्षात पदं आणि सत्तेत प्रदीर्घ काळ खुर्ची ऊबवूनही यापैकी एखाद-दुसरा अपवाद वगळता अन्य कोणीही नेता किमान त्याच्या तरी राज्यात तरी पूर्ण जनाधार मिळवू शकलेला नाही , याची प्रामाणिकपणे कबुली देण्याचं धाडस या नेत्यांनी दाखवलं नाही . गेल्या सहा-सात वर्षात राहुल गांधी देशभर फिरुन नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात उठवत असलेल्या मोहिमेत हे नेते का सहभागी झाले नाहीत , असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला असता तर हे सर्व नेते निरुत्तर झाले असते . राज्यसभेत भाजपला बहुमत नव्हतं तरी किती वेळा या नेत्यांनी भाजपवर टीकेचे आसूड ओढले , विविध संसदीय अस्त्रांचा वापर करुन किती प्रसंगात सत्ताधारी भाजपची कोंडी लोकसभा आणि राज्यसभेत केली , याही प्रश्नांची उत्तरे जर या नेत्यांनी दिली असती तर चांगलं झालं असतं.
राहुल गांधी यांचे काही आरोप अंगलट आले हे खरं आहे , राजकारणात असं घडतच असतंही पण , त्याचसोबत राहुल यांच्या मागे यापैकी किती नेते पूर्ण ताकदीने उभे राहिले हाही मुद्दा महत्त्वाचा आहे . कारण त्या लढाईत पूर्ण ताकदीनं सहभागी न होऊन या बहुसंख्य नेत्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपलाच मदत केलेली आहे . राजकारणात पक्षनिष्ठा महत्त्वाच्या असतातच पण , त्यासोबत वेळोवेळी प्रतिस्पर्धी पक्षाविरुद्ध किती आक्रमक भूमिका घेतली, हेही त्याइतकंच महत्त्वाचं असतं ; अशा भूमिकातून त्या नेत्याचं नेतृत्व आणि पक्षाची प्रतिमा झळाळून निघत असते . काँग्रेसच्या या बहुसंख्य नेत्यांनी या काळात स्वीकारलेल्या मौनी भूमिकेमुळे भाजपला अप्रत्यक्षपणे बळ मिळालं , हे विसरता येणार नाही.
आता प्रकृती अस्वास्थ्यामुळे सक्रिय राहणं शक्य नसताना श्रीमती सोनिया गांधी यांनी पुन्हा हंगामी असेना अध्यक्षपद स्वीकारायला नको होतं . कोणत्याही दबावाला बळी न पडता सोनिया गांधी यांनी एक तर राहुल गांधी यांच्याकडे झुकणारा त्यांचा कल स्पष्ट सांगायला हवा होता आणि राहुल गांधी यांची रीतसर निवड होईपर्यंत एखाद्या ज्येष्ठ नेत्याकडे अध्यक्षपद सोपवून दूर होणं इष्ट ठरलं असतं किंवा गांधी घराण्याला या पदाचा कोणताही मोह नाही , हे एकदा निक्षून सांगून टाकत पक्षाच्या सर्व कटकटीतून मुक्त होत अन्य इच्छुकासाठी पक्षाच्या अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा करुन द्यायला हवा होता . पुन्हा हंगामी का असेना पद स्वीकारुन , हे पद ‘गांधी घराण्या’तच ठेऊ इच्छितात असा संदेश श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडून दिला गेला आहे .
■■
वरील विवेचन लक्षात घेता , काँग्रेसची विद्यमान अवस्था पडक्या वाड्यासारखी झालेली आहे , या शरद पवार यांच्या म्हणण्यासही सहमत होण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही . मात्र असं असलं तरी , शरद पवार यांनी काँग्रेसशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका कायम ठेवलेली आहे का , काँग्रेसचा हा वाडा पडू नये यासाठी डागडुजी करण्यासाठी काही प्रयत्न केले आहेत का , काँग्रेसच्या या अवस्थेला त्यांच्यासारखे पक्ष सोडून गेलेले अनेक काँग्रेस नेतेही जबाबदार आहेत हे शरद पवार यांना माहिती नाही का ? या ज्येष्ठ नेत्यांच्या यादीत शरद पवार यांच्यासोबत मोरारजी देसाई , जगजीवनराम , ब्रह्मानंद रेड्डी , यशवंतराव चव्हाण , प्रणब मुखर्जी , शंकरराव चव्हाण , नारायणदत्त तिवारी , अर्जुन सिंह , नसिकराव तिरपुडे , ममता बॅनर्जी , जगन मोहन रेड्डी अशा असंख्य अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे . काँग्रेसचा त्याग करुन स्थापन केलेल्या या सर्वांच्या नवीन पक्षात काँग्रेस हे नाव आहेच . म्हणजे काँग्रेस या नावाशिवाय हे नेते त्यांचं राजकीय अस्तित्व राखूच शकलेले नाहीत हे वारंवार स्पष्ट झालेलं आहे .
शरद पवार काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते होते आणि त्यांच्या पक्षाचा प्रभाव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी देशाच्या राजकारणातील आजही त्यांचं स्थान अत्यंत मोलाचं आहे यात शंकाच नाही . ज्या काँग्रेस पक्षांनं शरद पवार यांना तीन वेळा मुख्यमंत्रीपद , एकदा देशाचं संरक्षण मंत्रीपद आणि दीर्घकाळ कृषी मंत्रीपद दिलं , त्या काँग्रेस पक्षाच्या किमान महाराष्ट्रातील आजच्या पडक्या अवस्थेला शरद पवार हेही जबाबदार नाहीत का , नक्कीच आहेत ! पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी १९७८साली शरद पवार यांनी राज्यात ‘पुलोद’ प्रयोग करताना काँग्रेस पक्ष फोडला ( महाराष्ट्राच्या राजकारणात ‘खंजीर प्रयोग’ म्हणून ही पक्षफूट ओळखली जाते ) तेव्हापासून काँग्रेसच्या महाराष्ट्रातील एकहाती वर्चस्वाला लागलेली उतरती कळा अजून थांबलेलीच नाही…आजवरच्या राजकीय आयुष्यात शरद यांच्यासारखा दिग्गज नेता चारवेळा काँग्रेस सोडून गेला . त्यामुळे काँग्रेसच्या चिरेबंदी वाड्याला नुसते तडे गेले नाहीत तर काँग्रेस नावाच्या महाराष्ट्रातील हवेलीचे बुरुज ढासळले आहेत , यांचा विसर शरद पवार यांना पडावा हे आश्चर्यच म्हणायला हवं .
पहिल्यांदा १९७० साली पक्षात फूट पडली तेव्हा पक्ष फोडून शरद पवार ( तेव्हा देशात ब्रह्मानंद रेड्डी काँग्रेस आणि महाराष्ट्रात रेड्डी-चव्हाण ( यशवंतराव ) काँग्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ) काँग्रेसमधे गेले , मग त्यांनी समांतर काँग्रेसच्या तंबूत आश्रय घेतला त्यानंतर ‘पुलोद’ स्थापन करताना त्यांनी समाजवादी काँग्रेस स्थापन केली आणि सोनिया गांधी यांच्याशी पंगा घेऊन त्यांनी (महा)राष्ट्रवादी काँग्रेसचा सवतासुभा निर्माण करुन राज्यातली काँग्रेस खिळखिळी केली आणि इतक्या वेळ काँग्रेसच्या हवेलीला गंभीर क्षती पोहोचवूनही पवार यांना स्वबळावर राज्यात सत्ता कधीच प्राप्त करता आली नाही . प्रत्येक वेळी त्यांना सत्ता प्राप्तीसाठी काँग्रेससोबतच हात मिळवणी करावी लागली . म्हणजे राज्यात न काँग्रेस वाढली न (महा)राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष झाला आणि यात शिवसेना तसेच भाजपचा फायदा झाला हे विसरता येणार नाहीच .
काँग्रेसचा वाडा निश्चितच पडका झालेला आहे पण , तो तसा होण्यात देशभरातील शरद पवार यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांचाही हातभार लागलेला आहे , हे विसरुन चालणार नाही . शरद पवार यांनी त्याचीही कबुली कधी तरी द्यायला हवी ; म्हणूनच म्हणायला हवं की , काँग्रेसबाबत शरद पवार जे बोलले आहेत ते अर्धसत्य आहे .
(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)
९८२२० ५५७९९
…………………………………………………………………………………………
काँग्रेस ची वाताहत करण्यात शरद पवार सुद्धा जबाबदार आहेत, हे सत्य विसरता येणार नाही.
लोकांच्या मनात आजही काँग्रेस प्रती आस्था आहे. पण काँग्रेस ला हरविण्यात काँग्रेस चीच मंडळी कारणीभूत असतात हे अनेक निवडणुकीच्या निकालातून दिसून येते
दुसरे असे की काँग्रेस मध्ये अजूनही दादासाहेब, भैय्या साहेब ही संस्कृती कायम आहे सामान्य माणसांना ही नेते मंडळी सहज उपलब्ध होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे . त्या मुळे सामान्य लोकांची अगदी शुल्लक कामे जी या नेते मंडळीच्या एका फोन द्वारे होऊ शकते, होत नाहीत, एकूणच ही मंडळी अजूनही ग्राउंड किंवा जमिनीवरील नेते मंडळी म्हणून नावारूपास येऊ शकली नाहीत
दुसरीकडे भाजप शिवसेनेची मंडळी लोकांना सहज उपलब्ध होतात, किंबहुना कोणत्याही व्यक्तीच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी तत्पर असतात.
काँग्रेस च्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांची जुनी भूमिका सोडून, शिवसेना, भाजपा सारखी ठेवली तरच काँग्रेस चा काही टिकाव लागेल
शीर्ष नेतृत्वात बदल होणे आवश्यक आहे गांधी घरण्यातून काँग्रेस ला सोडविणे, किंवा घराणेशाहीच्या आरोपातून मुक्तता मिळविण्यासाठी ते आवश्यक आहे. काँग्रेस मध्ये नेतृत्वाची काही कमी नाही, पण गांधी घराण्याचा मनोनिग्रह कमी पडत आहे.