लेखक : ज्ञानेश महाराव
(संपादक, साप्ताहिक ‘चित्रलेखा’)
—————-
भारताला स्वातंत्र्य हे कुणा एका ‘वीर- वीरांगना’च्या पराक्रमामुळे मिळालेलं नाही. त्यासाठी असंख्य शिरकमळं धारातीर्थी झाली आहेत. पारतंत्र्या विरोधातल्या ह्या संघर्षाची सुरुवात महात्मा गांधीजीच्या नेतृत्वाखालील ‘काँग्रेस’ने ‘ब्रिटिश सत्ते’विरोधात पुकारलेल्या ‘असहकाराच्या चळवळी’पासून वा १८५७ च्या फसलेल्या सैनिकी बंडापासून झालेली नाही. ती कधीपासून झाली ते सांगताना शाहीर आत्माराम पाटील लिहितात-
स्वराज्यक्रांती पणी लावले, सर्वधर्म-पंथ-
महान राष्ट्रीयतेचा केला, महाराष्ट्र धर्म ॥१
सह्याद्रीच्या कडेकपारी, लढला शिवराया-
हिमालयाच्या स्वातंत्र्याचा, घडविला मूळ पाया ॥२
स्वराज्यासाठीच्या लढाया लढताना मावळे शत्रूवर ’हर हर महादेव’ अशी गर्जना करीत तुटून पडत. त्यानंतर देशाला समता-स्वातंत्र्य-बंधुता यांचे धडे देणाऱ्या सगळ्या सामाजिक- राजकीय लढाया महाराष्ट्रात झाल्या ; त्या ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशी घोषणा देत झाल्या. मग तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा चवदार तळ्याचा संग्राम असो की, ‘संयुक्त महाराष्ट्र’चा लढा असो. भारतीय लष्कराच्या अनेक रेजिमेंट आहेत. त्यांच्या घोषवाक्यात देव-देवतांची नावं गुंफली आहेत. त्याला अपवाद ‘मराठा रेजिमेंट’चा आहे. त्याचे घोषवाक्य ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’ असे आहे. ह्या रेजिमेंटची स्थापन ब्रिटिश काळात ४ फेब्रुवारी १७६८ रोजी बेळगावात झाली आहे.
हा इतिहास आणि वर्तमान लक्षात ठेवून ‘प्रबोधन’कार ठाकरे ‘दगलबाज शिवाजी’ ह्या पुस्तिकेत लिहितात, ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामघोषात इतकी ताकद आहे की, ‘जय शिवाजी’ म्हणताच ३३ कोटी देव-देवतांची फलटण पेन्शनीत निघते!” ह्या ताकदीचे दुःख सलत असल्यामुळेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या तोंडून शिवरायांना जुने-पुराणे ठरवलं जात असावं.
यापूर्वी कोश्यारींनी ‘रामदास नसते, तर शिवाजी छत्रपती झाले नसते, असे अकलेचे तारे तोडण्यासाठी काळी टोपी झटकली होती. कोश्यारी हे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखेच ‘भाजप’मध्ये स्थापित केलेलं रा.स्व. संघाचं ‘प्रॉडक्ट’ आहे. पूर्वी संघ शाखेवर ‘शिवाजी म्हणतो’ हा खेळ खेळला जायचा. त्यामुळे कोश्यारींना टीकेचे कितीही जोडे हाणले तरी त्यांना ‘शिवाजी’ हा खेळाचा विषय वाटणार!
वीर सावरकर यांनीही छत्रपती शिवरायांना ‘काकतालीय न्यायाने’ (कावळा बसायला नि फांदी तुटायला) झालेला राजा असं म्हटलंय. स्पष्ट शब्दांत सांगायचं तर ‘संधिसाधू’ म्हटलंय. ‘अंधश्रद्धा निर्मूलन’च्या कथेतील ‘नामू न्हावी’ या पात्राद्वारे छत्रपतींची टवाळी केलीय; तर ‘जय जय शिवराया’ ह्या आरतीत शिवरायांना ‘हिंदूरक्षक’ ऐवजी ‘आर्यरक्षक’ म्हटले आहे. मग भारतातील मूलनिवासी द्रविडांचे रक्षक कोण?
‘सात सोनेरी पाने’मध्ये शिवरायांच्या सर्वधर्मसमभावाला ’सगुण-विकृती’ ठरवले आहे. अशा सावरकरांनी अंदमानच्या तुरुंगातून सुटकेसाठी ‘ब्रिटिश सरकार’ला जेलमधून सुटका करण्यासाठी दया- माफीपत्रे पाठवली होती. त्याचे जाहीर प्रदर्शन राहुल गांधी यांनी करताच; ‘भाजप’चे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवरायांनाच ’माफीवीर’ ठरवण्याचा नीचपणा केला. हा शिवरायांच्या ऐतिहासिक कार्य-कर्तृत्वाचा घोर अपमान आहे. तशाच त्या महाराष्ट्राच्या अस्मितेला- स्वाभिमानाला दिलेल्या डागण्याही आहेत.
शिवरायांच्या चरित्राची छेडछाड करण्याचा हा उद्योग २००३ मध्ये झालेल्या विदेशी लेखक जेम्स लेन याच्या माध्यमातून घडवून आणलेल्या बदनामी प्रकरणापासून सुरू आहे. तो आता शरद पवार आणि नितीन गडकरी यांची तुलना राज्यपाल कोश्यारी यांनी कालच्या शिवरायांशी करण्यापर्यंत पोहोचला आहे. ताजे प्रकरण हे राहुल गांधी यांच्या भाषणापासून सुरू झाले.
राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात सुरू असताना १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा (जन्म : १८७५) यांची जयंती होती. झारखंड मधील ’उलिहात’ गावात राहाणाऱ्या आदिवासी बिरसा मुंडा यांचे शिक्षण ‘जर्मन मिशनरी स्कूल’मध्ये झाले होते. वडिलांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्यामुळे बिरसांना ख्रिस्ती मिशनऱ्यांचा आणि ब्रिटिश राजवटीचा राग यायचा.
आदिवासींवर होणारे अत्याचार असहनीय झाल्याने त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. १८९५ साली त्यांनी छोटा नागपूर भागात आदिवासींना संघटित करून ब्रिटिशांच्या अन्यायी सत्तेविरोधात आंदोलन पुकारले. ब्रिटिशांनी बिरसांना अटक केली. तरुंगात जीवघेणा छळ केला. त्यातच बिरसा मुंडा यांचा रांचीच्या कारागृहात ९ जून १९०० रोजी ऐन पंचविशीत मृत्यू झाला. यानंतर लोकांनीच ’बिरसा मुंडा’ यांना ‘जननायक’ हा किताब दिला. त्यांच्या या बलिदानाचे जयंती दिनी स्मरण करताना राहुल गांधी त्या दिवशीच्या सभेत म्हणाले, ”बिरसा मुंडा यांना जीव वाचवण्यासाठी सावरकरांप्रमाणे ब्रिटिशांकडे माफी मागता आली असती. तशी संधीही होती. पण बिरसा यांनी ती नाकारली. म्हणून ते खरे स्वातंत्र्यवीर आहेत!”
यावेळी राहुल गांधी यांनी सावरकरांची माफीपत्रेही दाखवली. बिरसा मुंडा यांच्या जयंतीला सावरकरांच्या माफीचा कोळसा उगाळण्याची गरज नव्हती, हे खरेच आहे. पण त्याचवेळी बिरसा यांच्या स्वातंत्र्यासाठीच्या कार्याचा गौरव करताना, संधी असूनही बिरसा यांनी माफी ऐवजी बलिदान देणे पसंत केले आहे, तर त्याची सावरकरांच्या माफीनाम्याशी तुलना होणे, अटळ आहे. ती टाळल्याने सावरकरांची माफीपत्रे खोटी ठरणार नाहीत.