शेतीच्या शोधाचे ऐतिहासिक परिणाम

 

 –किशोर देशपांडे

  इसवी सनाच्या दहा हजार वर्षांपूर्वी फक्त पन्नास ते ऐंशी लक्ष मानव पृथ्वीवर वास्तव्य करत होते. त्या सर्वांच्या, एकमेकांशी विशेष संबंध नसलेल्या, छोट्या छोट्या शिकारी व भटक्या टोळ्या असायच्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकात मात्र, या भटक्या मानवांची संख्या रोडावून दहा ते वीस लक्ष इतकीच शिल्लक राहिली. परंतु, दरम्यानच्या काळात शेतीचा शोध लागल्यामुळे जगभर शेतीवर अवलंबून असणाऱ्या मानवांची संख्या तब्बल पंचवीस कोटींवर पोहोचली होती. लोकसंख्येचा एवढा प्रचंड विस्फोट, त्यापूर्वीच्या चाळीस लक्ष वर्षांत मानवजातीच्या इतिहासात कधीही झाला नव्हता. हा कृषी क्रांतीचा एक महत्वाचा परिणाम.

        भटक्या अवस्थेतील मानवांची एक टोळी साधारणतः शंभरेक चौरस कि.मी. परिसरात फिरत राहायची. त्या परिसरातले डोंगर, नद्या, ओढे, जंगल, कुरण, हे सगळं काही त्यांचं घरच असायचं. निसर्गाच्या खाणाखुणा त्यांना ओळखीच्या होत्या. आपल्या परिसरात बदल घडवून आणण्याचे आगीखेरीज अन्य साधन त्यांना उपलब्ध नव्हते. खरं तर अन्य जीवजंतू असतात तसे मानवही निसर्गाचा एक हिस्सा म्हणूनच जगायचे. शेतीने मात्र मानवाचे निसर्गाशी असलेले हे घट्ट नाते तोडले. एक तर त्याचा परिसर घर आणि शेतीपुरता सीमित झाला. आपलं घर आणि शेती यांची मनुष्यप्राण्यात आसक्ती बळावत गेली, आणि बाकी भूगोल परका झाला. निसर्गावर प्रक्रिया करून उत्पादन घेणे शक्य झाल्यामुळे मानव निसर्गापासून तुटला, त्याच्यात परात्मभाव शिरला. घर, शेती, पाळीव प्राणी ही त्याने निर्माण केलेली कृत्रिम दुनिया. तिचे रक्षण करण्यासाठी तो ‘बाहेरच्या’ निसर्गाशी लढत राहिला; परक्या मानवांचा, जंगली प्राण्यांचा, किड्यामुंग्यांचा ‘आपल्या’ छोट्याशा दुनियेत प्रवेश नको म्हणत त्या सर्वांना शत्रूस्थानी ठेवू लागला!

हेही वाचा- आकलनाची उत्क्रांतीhttps://bit.ly/2T6ai3L

  कृषीक्रांतीचा मानवी मनावर झालेला आणखी एक परिणाम म्हणजे माणसे भविष्याची चिंता करू लागली. फळे व कंदमुळे शोधणाऱ्या व प्रसंगी छोट्या-मोठ्या शिकारी साधणाऱ्या भटक्या मानवाला उद्याची चिंता नसायची. कारण भविष्यावर तो नियंत्रण ठेऊ शकत नव्हता. याउलट, शेतकरी मात्र जवळ महिन्याभराचा अथवा वर्षभराचा धान्यसाठा असला तरीही पुढच्या व त्याच्या पुढच्या काळाची चिंता बाळगून असतो. कारण भविष्यासाठी काही योजना करणे त्याच्या हाती असते. म्हणजेच भावी काळातील घटनांना यथाशक्ती नियंत्रित करण्याची क्षमता माणसाची चिंताही वाढवते. कोरडा किंवा ओला दुष्काळ, महापूर, साथीचे रोग यांमुळे शेतकऱ्याच्या मेहनतीवर पाणी फिरते. त्याच्या हाती नसलेल्या या गोष्टी त्याची चिंता अधिक वाढवतात.

शेतीतून पैदा झालेल्या ‘अतिरिक्त’ धान्यसाठ्यामुळे आधी मोठी खेडी, नंतर कसबे आणि शहरे वसून शेकडो-हजारो माणसे एका ठिकाणी राहणे शक्य झाले. परंतु, इतक्या मोठ्या संख्येने एकमेकांशी सहकार्य करून शांततेत राहणे ही काही माणसाची उपजत जैविक प्रवृत्ती नव्हती. लाखो वर्षे मानव-प्राणी काही डझन व्यक्तींच्या टोळ्यांमध्येच राहायचा. परंतु, कृषीक्रांतीनंतर केवळ काही हजार वर्षांतच प्रचंड मोठी राज्ये व साम्राज्ये अस्तित्वात आली. माणसाची जैविक उत्क्रांती तर गोगलगायीपेक्षाही मंदगतीने होत आहे. त्यामुळे, मोठ्या प्रमाणावर सामुदायिक सहकार्य ही मानवाची जैविक प्रेरणा नसून त्याच्यातील कल्पकतेने रचलेल्या अनेक मिथकांमुळे ते शक्य झाले आहे. इसवीसनाच्या साडेआठ हजार वर्षांपूर्वी, काही शेकड्यांमध्ये मोजता येतील इतकीच माणसे मोठ्या गावात रहात असत. इसवीसनपूर्व सात हजारमध्ये त्यांची संख्या पाच ते दहा हजार पर्यंत वाढली. इ.स.पूर्व तीन हजार एकशे साली इजिप्तमध्ये ‘फरोहां’च्या राज्यात लाखो नागरिक होते. इ.स.पूर्व दोन हजार दोनशे पन्नासच्या आसपास ‘अक्कादियन’चे पहिले साम्राज्य निर्माण झाले. त्यात दहा लक्ष नागरिक व पाच हजार चारशे खडे लष्कर होते. इ.स.पूर्व हजार ते पाचशे या कालावधीत तर मध्यपूर्वेत असिरीयन, बाबिलोनियन इत्यादी महासाम्राज्ये अवतरली. त्यांचे अधिराज्य कित्येक दशलक्ष प्रजेवर असायचे आणि त्यांच्याजवळ हजारो सैनिकांचे लष्कर उपलब्ध असायचे. आपले लाखो सैनिक व सुमारे एक लक्ष कर्मचारी पोसण्यासाठी चीनचे सम्राट चाळीस कोटी प्रजाजनांकडून करवसुली करत. शेतीच्या जीवावर पण स्वतः शेती न करता जगणारा एक अल्पसंख्य अभिजन वर्ग जगभर उदयास आला, आणि त्या अल्पसंख्य वर्गानेच इतिहास घडवला. आधुनिक औद्योगिक युगाच्या प्रारंभापर्यंत जवळपास जगातील नव्वद टक्के लोकं शेतीमध्ये कष्ट उपसत होते. इतिहास घडवण्यात त्यांची कोणतीही भूमिका नव्हती. त्यांना जेमतेम जगता येईल इतकीच सवड ठेऊन त्यांचे सर्व ‘अतिरिक्त’ उत्पादन अभिजन वर्गाला पोसण्यासाठी हिरावले जात होते.

हेही वाचा-मानवजातीचे प्रश्नांकित भविष्य!https://bit.ly/30chGhS

      विविध धर्म, प्राचीन राज्ये, मध्ययुगीन साम्राज्ये, आधुनिक राष्ट्रे, बहुराष्ट्रीय कंपन्या, संयुक्त राष्ट्रसंघ – या सगळ्याच कल्पित व्यवस्था आहेत, नैसर्गिक नाहीत. परंतु अशा प्रकारच्या कल्पित व्यवस्था आकारास आल्यामुळेच प्रचंड प्रमाणावर मानवी समूह एकमेकांच्या सहकार्याने संस्कृतीची उभारणी करू शकले. तथापि, कोणत्याही कल्पित व्यवस्थेला बहुसंख्य लोकांची मूकसंमती व पाठिंबा असल्याखेरीज ती व्यवस्था फार काळ टिकू शकत नाही. भारतातले आपले चिर-परिचित उदाहरण द्यायचे झाल्यास, काही हजार वर्षे आपल्या येथे मनुस्मृतीवर आधारित समाजव्यवस्था टिकून राहिली. ती निश्चितच एक कल्पित व्यवस्था होती. सर्व माणसे समान नसतात, हाताची बोटे सारखी नसतात. काही माणसे निसर्गतःच श्रेष्ठ तर काही कनिष्ठ असतात. स्वतः परमेश्वराने चातुर्वर्ण्य-व्यवस्था निर्माण करून ब्राह्मण, क्षत्रिय नि वैश्य या उच्चवर्णांच्या सेवेसाठी बहुसंख्य ‘शूद्र’ मानवांना जन्मास घातले आहे; या कल्पितावर हिंदूधर्मातील बहुसंख्य लोकांचा विश्वास नसता तर वर्ण व जाती-व्यवस्था इतकी दीर्घकाळ टिकून राहू शकली नसती.

मात्र स्वातंत्र्यानंतर संविधानाच्या रूपाने भारताने याच्या नेमकी विपरीत असलेली पण ‘कल्पित’च व्यवस्था स्वीकारली आहे. आपल्या संविधानाने जन्मतःच सर्व माणसे समान असतात हे तत्व मानले आहे. स्वातंत्र्य, समता, न्याय ही काही मानवाच्या डी.एन.ए. मध्ये निसर्गाने कोरून ठेवलेली मूल्ये नाहीत. कल्पित मूल्यांना समाजाने मनापासून स्वीकारावे, यासाठी अगदी जन्मापासून वेगवेगळ्या प्रकारे व्यक्तींचे शिक्षण केले जात असते. जेव्हा बहुसंख्य समाज ती मूल्ये मनोमन स्वीकारतो तेव्हा समाजव्यवस्था टिकाऊ ठरते. बहुसंख्य गुंतवणूकदार आणि बँकर्स यांची भांडवलशाहीवर मनोमन श्रद्धा नसती तर भांडवलदारी अर्थव्यवस्था एक दिवसही टिकली नसती. ईश्वराच्या अस्तित्वावर पाद्र्यांची, मुल्लांची,पुजाऱ्यांची आणि सर्वसामान्य जनतेचीही मनोमन श्रद्धा नसती तर धर्म टिकून राहिले नसते. विस्मयकारी कल्पित कथा, मिथके व समाजव्यवस्था निर्माण करण्याची कुवत नि सवड कृषीक्रांतीने अभिजन वर्गास जगभर प्राप्त करून दिली.

हेही वाचा-मानवजात ‘अव्दितीय’ आहे का?https://bit.ly/2Sqw15U

   परंतु केवळ कल्पित कथा व मिथकांच्याच आधारे  प्रचंड मोठ्या प्रमाणावर मानवांनी एकमेकांशी सहकार्य करून मोठाल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक व्यवस्था उभ्या करणे शक्य झाले नसते. कर वसुली, प्रशासन यासाठी नोकरशाही लागते. राज्याच्या संरक्षणासाठी सैन्य लागते. त्यासाठी करवसुलीचे, पगाराचे हिशोब ठेवावे लागतात; सामानांच्या, माणसांच्या याद्या बाळगाव्या लागतात. थोडक्यात, बरीच माहिती साठवून ठेवावी लागते. माहिती साठवून ठेवण्याचे मानवाजवळ लाखो वर्षे एकच साधन होते, ते म्हणजे त्याचा मेंदू! पण या मेंदूच्या साठवण शक्तीला अंगभूत मर्यादा होती. उत्क्रांतीच्या दबावामुळे विविध झाडेझुडपे, जीवजंतू, पक्षी, प्राणी या सर्वांच्या गुणवैशिष्ट्यांची माहिती मेंदूत साठवून ठेवणे मानवाला भाग पडले. कोणती वनस्पती किंवा फळ गुणकारी आणि कोणते विषारी, हे त्याला जाणून घेणे गरजेचे होते. परंतु एका झाडास नेमकी  किती फळे लागतात, हे जाणण्याची आवश्यकता नव्हती.  आकडे आणि संख्या मोठ्या प्रमाणात मेंदूमध्ये साठविण्याची मानवाला  त्याच्या  भटक्या व शिकारी जीवनात गरजच नव्हती. शिवाय मानवी मेंदूत साठवलेली माहिती त्या मानवाच्या मृत्यु नंतर संपून जात असे.

हेही वाचा-शेतीचा शोध: एक ऐतिहासिक फसवणूक-https://bit.ly/2Ia7IaK

 इसवी सनापूर्वी तीन ते साडेतीन हजार वर्षांच्या काळात सर्वप्रथम मध्य आशियातील सुमेरियन लोकांनी लिपीचा शोध लावला आणि मेंदूच्या बाहेर माहिती साठविण्याचा मार्ग मोकळा झाला. या शोधाचा लाभ धर्मग्रंथ, साहित्य, महाकाव्ये, तत्वज्ञान, गणित, विज्ञान इत्यादी अनेकानेक विषयांचे ज्ञान व माहिती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्यात झाला. शेतीच्या शोधाचा हा एक अप्रत्यक्ष परिणामच म्हणता येईल.

(डॉ.युवाल नोआ हरारी यांच्या ‘सेपियन्स: मानवजातीचा संक्षिप्त इतिहास’ या ग्रंथाच्या आधारे)

(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)

9881574954

 

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here