
विदर्भ प्रांत महाराष्ट्रात सामिल होण्याची किंमत म्हणून महाराष्ट्र विधानसभेचं एक अधिवेशन दरवर्षी नागपुरात भरविण्याचा यावर्षीचा उपचार बुधवारी पार पडला़. १९५३ मध्ये झालेल्या नागपूर करारान्वये विदर्भाचं भलं करण्याच्या नावाखाली महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून दरवर्षी हा हिवाळी अधिवेशनाचा कुळाचार पार पडतो़. या एवढ्या वर्षात नेते व आमदारांच्या किमान पाच पिढ्या येऊन गेल्यात, पण विदर्भाचं मात्र काही भलं झालं नाही़ स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी असल्याने या निरर्थक कुळाचारात काही बदल होईल, अशी आशा होती़. मात्र नागपूर अधिवेशनाचं वांझोटेपण संपविण्यात त्यांनाही अपयशच आलं. किमान नागपूर करारातील अटीन्वये हे अधिवेशन सहा आठवडे चाललं पाहिजे याविषयात मुख्यमंत्री आग्रही राहतील असे वाटले होते़, पण सत्तेची काय मजबुरी

कित्येक वर्षापासूनचा हा परिपाठ याहीवर्षी कायम होता़. त्यात काहीही बदल नव्हता़. पवार व मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विधिमंडळाचे अर्ध्यापेक्षा जास्त सदस्य तीन दिवसांपेक्षा जास्त गायब असतात हे माहीत असूनही दरवर्षी त्यांच्या वाढदिवसादरम्यानच अधिवेशन का आयोजित केले जाते, हे कळत नाही़. ते दोघेही महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते आहेत़. त्यामुळे त्यांच्या पक्षाचे आमदार आपली निष्ठा दाखविण्यासाठी तिकडे पळणार हे पक्के असते़. असे असताना १२ डिसेंबरनंतर अधिवेशन घ्यायचे, हे का ठरत नाही? अनेक प्रश्नांप्रमाणे याही प्रश्नाचे उत्तर मिळत नाही़. नागपूर अधिवेशन हे तसंही उत्सवी, टाईमपास अधिवेशन असतं. त्यामुळे कामकाजाच्या दहा-बारा दिवसातले चार-पाच दिवस पळता यावे यासाठीच पवार आणि मुंडेसाहेबांचा जन्मदिवस मध्ये येईल, यापद्धतीने अधिवेशनाच्या तारखा ठरविल्या जात असाव्यात़. यावर्षी काँग्रेस पहिले तीन दिवस कर्जमाफीच्या मागणीवर अडून बसली़. कॉंग्रेस आमदारांनी कामकाज होऊ दिले नाही़. तिकडे सत्तेतील विरोधक शिवसेनेने महाराष्ट्राचे महाधिवक्ता अॅड़श्रीहरी अणेंच्या ‘विदर्भ स्वतंत्र झाल्याशिवाय विदर्भाचा विकास शक्य नाही’, या वक्तव्याचा मुद्दा लावून धरला़. याविषयात विदर्भवाद्यांनी अणेंची बाजू उचलून धरली़ भाजपाने नेहमीप्रमाणे अडचणीच्या विषयात मिठाची गुळणी धरली़. अलीकडे शिवसेना ठोकायला सॉफ्ट टार्गेट झालं आहे़. विदर्भाची मागणी न्याय्य आहे़. स्वतंत्र विदर्भ झाला पाहिजे वगैरे ठीक आहे़. पण महाराष्ट्राच्या महाधिवक्ता पदावर असणा-या माणसाने त्या पदावर असताना असं बोलणं चुकीचंच होतं. स्वतंत्र विदर्भाची एवढी खुमखुमी आहे तर अणेंनी ते पद सोडून आपलं मतं मांडलं पाहिजे़. रस्त्यावर उतरलं पाहिजे़. पण याविषयात भाजपाने शिवसेनेच्या विरोधाकडे संपूर्ण दुर्लक्ष केलं. शिवसेनेला कोणीही साथ न दिल्याने पहिल्या आठवडयानंतर त्यांचाही विरोध थंडावला़. दुस-या आठवडयाच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी १० हजार ५१२ कोटींचं पॅकेज आणलं. आजकाल हे कोटयवधीचे पॅकेज म्हणजे शासनाच्या आॅलरेडी मंजूर असलेल्या योजनांवरील पैशांची गोळाबेरीज करून केलेली धूळफेक असते हे माहीत असल्याने त्या पॅकेजचं कोणालाच कौतुक नसतं. शेततळे, जलयुक्त शिवार, प्रत्येक शेतात विहीर हे घासून गुळगुळीत झालेले विषय सोडले तर पॅकेजमध्ये काही दम नाही़. जलयुक्त शिवार योजना चांगली असली तरी शेतक-यापेक्षा आमदारांचे ठेकेदार नातेवाईक व कार्यकर्त्यांचे त्यात जास्त भले होत असल्याचे दिसून येते़. आता तर आमदारच जलयुक्त शिवार समितीचा अध्यक्ष होणार असल्याने आनंदच आहे़.
दुसरा आठवडा हा विधिमंडळाच्या कामकाजापेक्षा भाजपा आमदारांच्या संघभूमीच्या दौ-याने जास्त गाजला़. संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी भाजपा आमदारांचा तिथे वर्ग घेतला़. मुख्यमंत्री व विधानसभेचे अध्यक्षच दक्ष स्वयंसेवकाच्या भूमिकेत असल्याने भाजपा आमदारांचा नाईलाज होता़. तसंही संघाच्या मुशीतून घडलेल्या आमदारांना विधिमंडळ, तेथील कायदे, नियम, कामकाज, देशाचं संविधान यापेक्षा संघाचं स्वयंसेवक असणं महत्त्वाचं वाटत असतं. संघाची मर्जी नसली तर आपल्या कार्यक्षेत्रात मनमोकळेपणाने काम करता येत नाही, हा भाजपा आमदारांचा अनुभव आहे़. त्यामुळे तब्बल ११७ आमदारांनी हेडगेवार-गोळवलकरांसमोर नतमस्तक होण्यात धन्यता मानली़. २२ आमदारांनी मात्र या सत्ताबाह्य केंद्राकडे पाठ फिरविली़. त्याचे परिणाम दुस-याच दिवशी त्यांना पाहावयास मिळाला़. त्या सर्वांना भाजपाने नोटीस दिली़. गमतीची गोष्ट म्हणजे भाजपाचे सहयोगी आमदार महादेव जानकर व विनायक मेटेंनाही नोटीस पाठविण्यात आली़. या संपूर्ण एपिसोडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर भाजपात आलेल्या डॉ़ सुनील देशमुखांसारख्या आयुष्यभर काँग्रेसमध्ये राहिलेल्या आमदारांची सॉलिड गोची झाली. त्यांना एकदम धर्मपरिवर्तनासारखा अनुभव आला असेल़. बाकी या भेटीमुळे संघाची पकड काय असते, हे संघ परिवाराबाहेरील भाजपा आमदारांच्या लक्षात आले असेल़. बाकी संघाला मानलं पाहिजे़ ९० वर्षे अथकपणे केलेली मेहनत ते वाया जाऊ द्यायला तयार नाहीत़. भाजपाचे आमदार, खासदार हे संघाच्या अजेंड्यानुसारच चालेल . केंद्र व राज्य सरकारचा कारभार संघाच्या प्राथमिकतेनुसारच होईल, हे ते यावेळी प्रकर्षाने देशाला, महाराष्ट्राला दाखवून देत आहेत .
संघ सरकारवरील आपला प्रभाव स्पष्टपणे दाखवून देत असला तरी राज्य सरकारमध्ये मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोडले तर इतर कुठल्याही मंत्र्यांचं अस्तित्व, प्रभाव ठसठशीतपणे जाणवत नाही, हे या अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा लक्षात आलं. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा बाळगून

(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत़)