-संदेश कुडतरकर
कधीतरी तिच्याबद्दल लिहायचंय होतं, पण त्यासाठी आजचा मुहूर्त अनपेक्षित होता. ऑफिसमधून आल्यानंतर रात्री मी टीव्हीजवळ फिरकतही नाही. मनोरंजनाच्या नावाखाली जे काही चालू असतं, ते सहन होत नाही. पण आज संजय मोने दिसले आणि त्यांनी सई ताम्हणकरच्या नावाचा पुकारा केला, तेव्हा थबकलो. कार्यक्रम होता ‘कानाला खडा’. त्यानंतरचा एक तास हा मंतरलेला होता. इतक्या एकाग्रतेने टीव्हीवरचा एखादा कार्यक्रम शेवटचा कधी पाहिला असेन, आठवत नाही. पण संजय मोने गप्पा मारत होते आणि सई संवाद साधत होती, ते ऐकतच राहावंसं वाटत होतं.
एक काळ होता जेव्हा सई ताम्हणकर हे नाव ऐकलं की फक्त ‘जपून जपून जपून जपून जा रे, पुढे धोका आहे’ हे गाणं आणि तिचे बिकिनीमधले फोटोज एवढंच मला आठवायचं. कारण सई म्हणजे तेवढंच आहे, हे इंटरनेट आणि माध्यमांनीच आमच्या पिढीपर्यंत पोहोचवलेलं. ‘अनुबंध’ ही तिची मालिकाही मी पाहत नव्हतो. मुळात मालिकाच तेव्हा पाहत नसल्यामुळे. ‘सनई चौघडे’मधली अवघडलेली आणि आंग्लाळलेले उच्चार करणारी सई लक्षातही राहिली नव्हती. थोडीफार राहिली असेल ती तिच्या ‘कांदेपोहे’ या गाण्यामुळे. ‘गझनी’ सिनेमात तिचा फार लहानसा रोल होता. नंतर सईचं नाव ऐकलं ते माझ्या रूममेटने सांगितलेल्या पुण्यात घडलेल्या प्रकारामुळे आणि छापून आलेल्या उलटसुलट बातम्यांमुळे. ‘पुणे ५२’ चित्रपट म्हणून रुचला नाही, पण त्यातलं एक दृश्य मनावर कोरलं गेलंय. सई किचनमध्ये दुधाची पिशवी कापत असताना गिरीश कुलकर्णी आत येतो आणि त्याच्याशी संग करायला सुरुवात करताना ती हातातल्या कात्रीने त्या मादक गुलाबी ड्रेसचा स्ट्रॅप कापते. इतकं सेन्शुअल दृश्य मला एकही पाहिलेलं आठवत नाही. आणि कदाचित ते सईमुळेच लक्षात राहिलेलं. ‘बालक पालक’चं पोस्टर रिलीज झालं, त्यातही पुन्हा सईच. आणि त्यातही पुन्हा ती मादक दिसली होती. मदन देवधरला नेहाताईचं वेड न लागेल तर नवल…
नंतर ‘दुनियादारी’मधली सई पाहिली तेव्हा अवाक झालो होतो. तरीही ते खूप काही ग्रेट म्हणावं असं वाटलं नाही. ‘टाईम प्लीज’मधली राधिका पुन्हा लक्षात राहिली ती तिच्या अभिनयामुळेच. “ए तुझा नवरा मला त्रास देतोय” हे प्रिया बापटला उद्देशून ती ज्या लाडिकपणे, खोडकरपणे म्हणते, ते फक्त तीच करू जाणे! ‘हंटर’ पाहिला मात्र, झटका बसल्यासारखं काहीतरी झालं. त्यातली तिने साकारलेली भाभी पाहताना वाटलं की मित्रांकडून अधूनमधून कधीकधी गॉसिप्समध्ये ऐकलेले किस्से या अशाच, पुरुषांना आव्हान देणाऱ्या भाभीबद्दल असावेत. ‘YZ’मध्ये महाराजांच्या नादी लागलेली पर्णरेखा तिने ज्या सहजतेने साकारली होती, ते पाहून अवाक् झालो. मधल्या काळात दिवाळी अंकांच्या मुखपृष्ठांवर वगैरे तिचे फोटो झळकत होतेच. थोडक्यात ती पाठ सोडायला तयार नव्हती. तिच्याकडे ठरवूनही दुर्लक्ष करता येत नव्हतं. “तुम्ही माझ्याबद्दल गॉसिप करू शकता, पण मला इग्नोअर नाही करू शकत” असं जणू आव्हानच…
त्यानंतर आलेल्या प्रत्येक चित्रपटात मात्र सईची मी दखल घेऊ लागलो. ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’मधली तिची गावरान व्यक्तिरेखा मोहक होती. ‘फॅमिली कट्टा’मध्ये तिने साकारलेली मंजू काळजाला हात घालत होती आणि ‘वजनदार’मधली कावेरी म्हणजे कहर होता. पारंपरिक कुटुंबातही आपलं स्वतंत्र अस्तित्त्व जपणारी, नवऱ्यावर प्रेम करत असूनही स्वतःचे निर्णय स्वतः घेणारी, आपल्या मैत्रिणीला – पूजाला – समजून घेणारी कावेरी… ‘कास्टिंग काऊच’चा पहिल्या सीझनचा सईचा एपिसोड हा मुद्दाम पाहण्यासारखा आहे. सईने मन जिंकलं होतं. शिक्कामोर्तब केलं होतं उत्तम अभिनेत्री असण्यावर. या एवढ्या काळात तिच्याबद्दल मनात आदर निर्माण झाला होता. कारण तिने शून्यातून जग निर्माण केलं होतं. स्वतःला ग्रूम केलं होतं. वादांमध्ये अडकून न राहता स्वतःला सिद्ध केलं होतं. हे सोपं नाही. आणि यासाठी तिच्याबद्दल मनात एक वेगळं स्थान नेहमीच राहील.
आजच्या तिच्या मुलाखतीत ती खूप सुंदर दिसत होती. खांदे उघडे पाडणारा तिचा ड्रेस पाहून आई जेव्हा म्हणाली, “शी… काय घातलंय हिने” तेव्हा क्षणभर डोक्यात तिडीक गेली आणि आईला सांगावंसं वाटलं, “अगं बाई, ती स्किनच्या पलीकडे गेलेली आहे. तिने अंगभर साडी नेसून गृहिणी पण साकारलीय आणि भाभी पण. आणि मुळात तो ड्रेस तिला आत्मविश्वासाने कॅरी करता येतोय. तुमच्या कमेंट्सकडे तिचं लक्षही नाहीये. I envy her confidence.” आणि त्याहूनही महत्त्वाची गोष्ट ती ज्या प्रामाणिकपणे सगळ्या वादांना उत्तरं देत होती, त्यावरून तर तिच्या बंडखोरपणावर जान कुरबान करावीशी वाटत होती. आयुष्यात कटू आठवणी ठेवून निघून गेलेल्या व्यक्तींबद्दलही चांगलं बोलण्याचा तिचा गुण मला घेता आला तरी पुरे, असंही वाटून गेलं. तिच्या बंडखोरपणाशी रिलेट करताना तिच्या जेन्युईन असण्याला कुर्निसात करावासा वाटला. आणि पुन्हा नव्याने प्रेमात पडावंसं वाटलं सई ताम्हणकरच्या. ती संधीही ती लवकरच देतेय… ‘Date With Saie’ या तिच्या नवीन वेब सीरिजमधून…
(संदेश कुडतरकर हे चित्रपट व चित्रपट कलावंत यांच्याबद्दल उस्फूर्त लेखन करणारे लेखक आहेत)
77383940223