-अविनाश दुधे
भारतीय स्वातंत्र्यसंग्राम चळवळीतील ज्या नेत्यांबाबत जनसामान्यांमध्ये अगदी टोकाच्या भावना आहेत. त्यामध्ये विनायक दामोदर सावरकर यांचा अव्वल क्रमांक लागतो़. सावरकरांइतका देशभक्त, त्यागी, प्रतिभावंत, प्रचंड दूरदृष्टी असणारा नेता भारतात झाला नाही, असं एक समूह अगदी मनापासून मानतो . दुसरा समूह अगदी खालच्या पातळीवर जाऊन ‘माफीवीर’, ‘संडासवीर’, गांधी हत्येच्या कटातील एक आरोपी… अशा शब्दांमध्ये सावरकरांचा उद्धार करतात . ‘द वीक’ या प्रसिद्ध साप्ताहिकाने आपल्या ताज्या अंकात ‘A lamb lionised ‘ (शेळीचे सिंहीकरण) या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या कव्हर स्टोरीने सावरकरांच्या कर्तृत्वाबद्दलचा वाद नव्याने उफाळून आला आहे . या स्टोरीच्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासाची पाने खंगाळली जात आहेत . ‘द वीक’ च्या स्टोरीत फारसं नवीन असं काही नाही़. अंदमानच्या तुरुंगातील Jail History ticket तसेच सावरकरांच्या समकालीन कैद्यांच्या नोंदीवरुन काही वेगळे मुद्दे तेवढे मांडण्यात आले आहे . सावरकरांचे भक्त अंधारकोठडी, साखळदंड, कोलू ओढण्याची शिक्षा आदी ज्या कारणांमुळे सावरकरांचं ग्लोरीफिकेशन करतात, तसं प्रत्यक्षात काहीही घडलं नसून वस्तुस्थिती वेगळी आहे, असे या स्टोरीत नमूद करण्यात आले आहे. सावरकरांच्या अंदमानातील ९ वर्ष १० महिन्याच्या तुरुंगवासात त्यांनी व त्यांच्या पत्नीने एकूण सातवेळा ब्रिटीश सरकारकडे माफीनामे सादर केले़. सावरकरांनी कोलू वगैरे कधी ओढावा लागला नाही . साधे दोरी वळण्याचे काम त्यांना देण्यात आले होते़. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार झाले, हे खोटे आहे . सावरकर हे अखंड भारतवादी वगैरे नव्हते, तर पाकिस्तानसोबत शिखीस्तान या शिखांच्या स्वतंत्र्य राष्ट्रासाठी ते अनुकूल होते़. अंदमानातील सुटकेनंतर सावरकरांनी इंग्रजांसोबत कायम मित्रत्वाचे धोरण ठेवलेत. आदी अनेक गोष्टी ‘द वीक’ च्या स्टोरीत आहेत. ‘द वीक ‘ च्या या स्टोरीने सावरकरांचे समर्थक आणि विरोधकांत जोरदार जुंपली आहे . आपल्याकडे प्रॉब्लेम हा आहे की, श्रद्धेच्या कोंदणात बसविलेल्या माणसांची चिकित्सा आम्हाला अजिबातच मंजूर नसते़. जी माणसं आपल्या स्वकर्तृत्वाने मोठी होतात, ती सुद्धा सर्वसामान्य माणसांसारखी हाडामासाची माणसं असतात़ त्यांना सुद्धा प्रेम, राग, लोभ, मोह, द्वेष, वासना या भावना, विकार असतात, हे समजून घेण्याची आपली तयारीच नसते़. मोठी माणसं म्हणजे आदर्शाचा पुतळा असतात . ते चुका करूच शकत नाहीत, अशी आमची भाबडी समजूत असते़. ही गोष्ट जशी सावरकरांच्या भक्तांना लागू आहे ,तशीच ती गांधी , नेहरू , पटेल , विवेकानंद , आंबेडकर , हेडगेवार , गोळवलकर, इंदिरा गांधी आणि अगदी मोदींच्याही भक्तांना लागू आहे .
सावरकरांचे व्यक्तित्व आणि कर्तृत्वाचा सखोल आणि तटस्थ अभ्यास करणारे अभ्यासक सांगतात की, अंदमानच्या तुरुंगवासाअगोदरचे सावरकर आणि अंदमाननंतरचे सावरकर या दोन जणू भिन्न व्यक्ती असाव्यात, असा अंतर्बाह्य बदल त्यांच्या व्यक्तिमत्वात जाणवतो . अंदमानपूर्वीचे सावरकर हे प्रखर क्रांतिकारी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी हिंदू, मुस्लिम आणि देशातील सर्व धर्म, जातीच्या समूहांना सोबत घेऊन ब्रिटीशांना नामोहरम करण्याच्या विचारांचे आहेत. त्यांचं ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ हे पुस्तकं वाचलं की, हिंदू-मुस्लिम एकतेबद्दल ते किती भाबडा आणि स्वप्नाळू दृष्टीकोन बाळगून होते, हे लक्षात येते़. (इतिहासाचे अभ्यासक शेषराव मोरे यांनी सावरकरांचं १८५७ च्या बंडाबद्दलचं आकलन कसं चुकीचं होतं, हे ‘१८५७ चा जिहाद’ या पुस्तकात सप्रमाण सिद्ध केलं आहे . ) अंदमानपूर्वींचं सावरकरांचं इतरही साहित्य वाचलं, तर ते आदर्श पण अवास्तव कल्पनांनी भारले होते, हे स्पष्ट जाणवितं. अंदमानच्या कोठडीतून बाहेर आल्यानंतरचे सावरकर मात्र वेगळे होते़. ते हिंदुत्वाचे समर्थक व मुसलमानांचे विरोधक झाले होते़. इंग्रजांबद्लच्या त्यांच्या दृष्टीकोनात मोठा बदल झाला होता . त्याचवेळी महात्मा गांधींची प्रत्येक कृती, विचार त्यांना भोंगळ वाटायला लागला होता .
सावरकरांचे व्यक्तित्व आणि विचारातला हा बदल मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून समजून घेतला नाही, तर मोठी फसगत होते़. अंदमानच्या तुरुंगातील जवळपास दहा वर्ष, त्यानंतर काही काळ रत्नागिरी आणि येरवडा तुरुंगातील वास्तव्य या कालावधीत देशातील चित्र संपूर्णत: बदललं होतं. सावरकर तुरुंगवास संपवून बाहेर आले तेव्हा सामाजिक व राजकीय अवकाश महात्मा गांधी नावाच्या अवलियाने व्यापून टाकलं होतं. त्यांचा झंझावात एवढा प्रचंड होता की, या माणसाने देशावर गारुड केलं असं बोललं जातं होतं. अनेक वर्षेपर्यत वर्तमानापासून दूर असलेल्या सावरकरांना देशातील ही बदललेली परिस्थिती, जनमानसाचा बदललेला मूड याचं आकलन झालं नाही़. केवळ सावरकरांचीच ही स्थिती होती, अशातला भाग नाही़. लाला लजपत राय, बिपीनचंद्र पॉल या प्रमुख नेत्यांसह ऩ चि़ केळकर, दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे समर्थक, मोहम्मद अली जिना अशा अनेकांमध्ये एकदम जमिनीपासून उखडल्याची भावना निर्माण झाली होती . सगळं काही गांधीकेंद्रीत झाल्याने आपण बेदखल झालो आहोत, असे अनेकांना वाटायला लागले होते़. तेथून अनेकांच्या मनात गांधीद्वेषाची पेरणी झाली . सावरकर तेव्हा कुंठित अवस्थेत होते़. इंग्रजांनी माफीनामा स्वीकारुन तुरुंगातून बाहेर आणले होते़. मात्र रत्नागिरीत त्यांना स्थानबद्ध करुन ठेवले होते़. कुठल्याही प्रकारच्या राजकीय हालचाली करण्यास बंदी घातली होती . सावरकरांसाठी ही सारी बंधन प्रचंड उद्वेगजनक आणि चरफडविणारी असतील . सावरकर हा माणूस प्रतिभावंत व उर्जावान होता, यात वादच नाही़. अशा कुठल्याही माणसाला वेगवेगळी बंधन टाकून जखडून टाकले, तर त्याच्या मेंदूत नकारात्मक विचारांची साखळी तयार झाली तर नवल नाही़. सावरकर अशा प्रकारे बंधनात असताना गांधीजी सुसाट सुटले होते़. ते संपूर्ण देशभर फिरत होते़. भारतच नव्हे, तर जगभर त्यांच्या व्यक्तिमत्वाची मोहिनी निर्माण झाली होती . येथे मानसशास्त्रीय अंगाने सावरकरांना समजून घ्यावे लागते़. दोन समान क्षमतेची माणसं. एकाला आपलं कर्तृत्व गाजविण्याची संपूर्ण मोकळीक, तर दुस-याला अनेक बंधनांनी जेरबद्ध करुन टाकलेलं. यातून सावरकरांची प्रचंड घुसमट झाली असणार . त्यात बंधन टाकणा-या इंग्रजांचंं आपण काही वाकड करु शकत नाही, या वस्तुस्थितीची जाणीव असल्याने गांधीबद्दल त्यांच्या मनात अढी निर्माण झाली . पुढे गांधीहत्येच्या कटातील सहभागात त्यांचं नाव आलं तो त्याच नकारात्मक विचारांचा परिपाक होता . हे सारं असं असलं तरी सावरकरांचे अंधश्रद्धा, रुढी-परंपरा आणि सामाजिक सुधारणांविषयक विचार क्रांतिकारी होते, हे बिलकूल नाकारता येत नाही . हिंदू समाजाची अवनती का झाली याविषयातील चिंतनातून ते आले होते़. त्यांचे ते विचार एवढे प्रबळ होते की, कट्टर हिंदुत्ववाद्यांना तेव्हाही आणि आताही ते पचनी पडत नाही़. ( गोहत्येबाबतच्या सावरकरांच्या मताबद्दल तेव्हाचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी ‘राजकीयदृष्टया जरी ते हिंदू राहिले तरी त्या चिंतनाने सांस्कृतिकदृष्या त्यांना मुसलमान बनवले,’ असे मत व्यक्त केले होते़. गोळवलकर त्यांची ‘प्रतिक्रियावादी हिंदू’ किंवा ‘नकारात्मक हिंदू’ अशीही संभावना करत़) सावरकरांचा कठोर बुद्धिवाद, विज्ञाननिष्ठता आणि जडवादामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्वातील दुभंगलेपण, त्यांचा गांधीव्देष, गांधीहत्येच्या कटातील कथित सहभाग हे सगळं लक्षात घेऊनही अनेक विचारवंत सावरकरांच्या प्रेमात आहेत . शेवटी काय सावरकर असो, गांधी, नेहरु, पटेल वा आंबेडकर … ते आपल्यासारखाच मातीचे पाय असणारी माणसं असतात, हे लक्षात घेऊन जर त्यांना समजून घेतलं तर कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह, अभिनिवेष, अंधभक्ती आणि विखारांपासून दूर राहता येतं.
(लेखक दैनिक पुण्यनगरीचे कार्यकारी संपादक आहेत)
संडासविर बायको इकडे तिकडे माफी मागत( फिरते)
७वेळा माफी स्वत:२३ वेळा माफी मागतो.
वरून विर म्हनतो कलंकीत हिंदू सार्या क्रांतीकाराना कलंकीत केले.स्वातंञ्य लढ्याला कलंक लावून या संडासविराने बायकोचा वापर करून सूटका करून घेतली.कलंकीत
सुटकेची मागणी व माफीनामा ह्यातील फरक करायला
शिका ! स्वातंत्र्यवीरांची राजनीती समजायची तुमची लायकी नाही !