गांधी कथा -१
त्रिवेंद्रमच्या हरिजन सेवक संघाचे एका छोटेसे आणि आटोपशीर असे छात्रालय होते. १९३७ मध्ये गांधीजीनी छात्रालयाला भेट दिली. मुलांना दिलं जाणारं खाण बारकाईनं पहात त्यांनी विचारलं ” मुलांना ताक दिलं जातं का? आणि नारळाचं तेल इकडचं आहे की बाजारातलं?”
संचालक म्हणाले ” प्रत्येक मुलाला भांडभर मठ्ठा देतो.”
बापूंनी विचारलं ” पण त्यात दूध आणि लोण्यापेक्षा पाणीच जास्त असेल ना?”
हे ऐकल्यावर सगळे हसायला लागले . बापूंनी मुलांकडे वळून म्हटलं ” रेक्टर तुमच्या बरोबर जेवतात की घरी जेवतात?”
रेक्टर हसत म्हणाले ” मी दिवसभर मुलांच्यात असतो. रात्री दहानंतर घरी जातो.”
गांधींनी विचारले ” मग घरी गेल्यावर तुम्हाला काही खावं लागतं ना?”
रेक्टरनी उत्तर दिलं ” आम्ही त्रावणकोरची माणसं रात्री उशीरा खाता नाही.”
” ही फारच चांगली गोष्ट आहे.” गांधीजी उत्तरले.
छात्रालयाचे पदाधिकारी गोविंदन रेक्टरची बाजू घेत म्हणाले ” इथं शुद्ध दूध मिळणं कठीण आहे. म्हणून मठ्ठ्यात पाणी जास्त असतं . काय करणार? एका दोन गायींची गरज आहे. आपण गुजरातवरून पाठवू शकाल का?”
गांधीजी विनोदानं म्हणाले ” जरूर पाठवू. पैसे द्या .लगेच पाठवू.”
” पण आमच्याकडे पैसे कुठून येणार?”
गांधीजी हसत हसत म्हणाले ” मग तुमच्या राज्याच्या मंदिरातून एक एक सोन्याचं भाडं का नाही आणत? चोरू नका.त्रावणकोर सारख्या हिंदू राष्ट्रात चोरीचं नाव असता कामा नये. पण कोणत्याही चांगल्या कामासाठी , हरिजनांना जेवू घालायला भीक मागणे ही काही नवीन गोष्ट असता कामा नये. जा त्या अधिकाऱ्यांना सांगा, स्पृश्यास्पृश्य भाव आता संपलाय.ब्राम्हणांना आपण दूध पाजू शकता तर मग हरिजन मुलांना पितळ्याच्या भांड्यातून मठ्ठा सुद्धा पाजू शकत नाही?”
सौजन्य -विजय तांबे