-अॅड. किशोर देशपांडे
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे २७ जुलै रोजी अमरावतीला व्याख्यान झाले. त्या भाषणात “भारत हिंदू देश झाला पाहिजे. परंतु सर्व धर्म समभावाच्या उपदेशामुळे यात अडचण येत आहे. अशा प्रकारचा उपदेश देणाऱ्या नेत्यांना आता राजकारणातून बाहेर काढले पाहिजे “ अशा आशयाचे विधान त्यांनी केल्याचे वृत्त आजच्या ‘दै.हिंदुस्थान’ मध्ये प्रकाशित झाले आहे. त्या निमित्ताने हा लेखन प्रपंच .
लाखो खेड्यापाड्यांमध्ये पसरलेल्या आबालवृद्ध स्त्रीपुरुषांना निदान मागील पिढीपर्यंत हजारो वर्षांपासून सांगण्यात आलेले हिंदू धर्माचे एक प्रमुख तत्व म्हणजे ‘चराचरात जळी- स्थळी- काष्ठी- पाषाणी परमात्म्याचा वास आहे’, हे होय. हे तत्व काढून टाकले तर हिंदू धर्म त्याचे इतर धर्मांच्या तुलनेत असलेले श्रेष्ठत्वच गमावून बसेल. ‘ईशावास्यम् इदम् सर्वं यत्किंच जगत्यां जगत’, ‘सर्वं खलु इदं ब्रह्म’, हे उपनिषदांचे उद्घोष आहेत. संतांच्या शिकवणीतून, विद्वानांच्या लिखाणातून, कीर्तनकारांच्या कीर्तनांतून, इतकेच नव्हे तर तमाशांच्या माध्यमातून देखील हे तत्व अगदी निरक्षर लोकांपर्यंत पोचले असून आपापल्या परीने सामान्य जनांनी ते आत्मसातही केले आहे.
चराचरात वास करणाऱ्या या ईश्वराचा शोध अनंत मार्गांनी हिंदुजन घेत आले आहेत. हे ईशत्व प्रत्येक मानवात आत्म्याच्या रूपात उपस्थित असते, अशी करोडो हिंदूंची ठाम श्रद्धा आहे. आत्म्याचा आणि परमात्म्याचा शोध घेण्याचे व्यक्तिगणिक असंख्य रस्ते, विधी व पद्धती असू शकतात, हे देखील कोणताही हिंदू सहज मान्य करतो. आणि हेच हिंदू धर्माचे बलस्थान आहे. मध्यपूर्वेत उगम पावलेल्या यहुदी, ख्रिश्चन व इस्लाम या तिन्ही धर्मांनी त्यांचा देव हा सृष्टीपेक्षा पूर्णतः वेगळा तर कल्पिला आहेच, शिवाय त्या देवाने प्रेषितामार्फत दिलेल्या संदेशांचे अनुकरण न करणाऱ्यांना अडाणी किंवा विरोधक मानून ख्रिश्चन व इस्लाम या धर्मांनी तर धर्मांतराच्या प्रयत्नांना प्रोत्साहनही दिले आहे. सर्वसामान्य हिंदूंना तर ईश्वरप्राप्तीचा एकच मार्ग असू शकतो ही मांडणीच मुळात पटत नाही. त्यामुळे मुस्लीम व ख्रिस्ती बांधव देखील त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ईश्वराच्या निकट पोचू शकतात, असे आपण समजतो आणि तेवढ्यासाठी धर्म परिवर्तनाची गरज नाही, असेही मानतो.
कदाचित याच बलवत्तर श्रद्धेमुळे आपल्या देशावर गेली हजार वर्षे इस्लामी व ख्रिस्ती राजवटी असूनही हिंदूंची बहुसंख्या कायम राहिली. अर्थात ही बहुसंख्या कायम ठेवण्याचे बऱ्यापैकी श्रेय इस्लामी व इंग्रज राज्यकर्त्यांनाही द्यावे लागेल. कारण त्यांनी हिंदूंच्या धार्मिक व व्यक्तिगत कायद्यांमध्ये फारसा हस्तक्षेप केला नाही. एक वकील म्हणून मला माहिती आहे की स्वातंत्र्यापूर्वी आपले सर्वोच्च न्यायालय म्हणजे इंग्लंडची प्रीव्ही कौन्सिल होती, ज्यात सर्व न्यायाधीश ख्रिश्चन असायचे. परंतु विवाह,दत्तक,पोटगी,घटस्फोट,एकत्र हिंदू कुटुंबातील वाटण्या इ. मुद्यांवर हिंदू धर्मातील शास्त्रे, स्मृती, रूढी व परंपरा जाणून घेण्याचा ते कसोशीने प्रयत्न करायचे आणि त्यानुसारच निवाडा द्यायचे. यामागे तत्कालीन परकीय राजवटींचा दूरगामी स्वार्थ देखील असू शकतो. कारण व्यक्तिगत जीवनात हस्तक्षेप केल्यास बंडाळी माजण्याची त्यांना भीती असावी.
असो. मुख्य मुद्दा आहे की सर्वसामान्य हिंदूंना सर्वधर्म समभावाची शिकवण देण्याची आवश्यकता नाही, कारण असा समभाव हिंदूंच्या रक्तातच आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्वच सरसंघचालक व प्रवक्ते आजवर म्हणत आले आहेत. पण असे म्हणणे वेगळे आणि भिडे गुरुजींचे म्हणणे वेगळे. नेत्यांना राजकारणातून खरेच हद्दपार करायचे असेल तर गुरुजींनी प्रथम उपनिषदांचा धिक्कार करावा. रामकृष्ण परमहंसांचा, स्वामी विवेकानंद, श्री अरविंद, डॉ. राधाकृष्णन यांचाही धिक्कार करावा आणि जमल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देखील धिक्कार करावा. तरच सर्वधर्म समभावाचा उपदेश करणाऱ्या नेत्यांना राजकारणातून हद्दपार करण्याची प्रक्रिया गुरुजीना सुरु करता येईल.
(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत)
9881574954