।। सापळा ।। सावधान…

प्रणव हळदे

पंधरा ते वीस दिवसांपासून हल्दीराम थाठबाट मधील थाळी खायची खूप इच्छा होत होती. मला तिथली थाळी फार आवडते. एक तर जेवायला गेल्यावर काय मागवायच यावर होणारी भली मोठी वेळखाऊ चर्चा नसते व त्यानंतर कोणाची तरी थोडी का होईना नाराजी पण नसते.

मला या थाळी मधील पदार्थ, चव आवडतात. मुख्य म्हणजे अन्न वाया जात नाही सोबत अनलिमिटेड असल्याने कमी पडायचा प्रश्न येत नाही.

तर अश्या माझ्या आवडणाऱ्या बहुगुणी थाळी ची मला आठवण येत होती. पण लॉकडाऊन मुळे शक्य नव्हतं. तशातच साधारण सकाळी अकरा वाजता च्या सुमारास फेसबुक बघता बघता चक्क अभिनंदन हल्दीराम ची ऍड दिसली. ते सुद्धा एक थाळी वर दोन थाळी फ्री. ते फक्त २००/- रुपयात. इतकं स्वस्त असल्यामुळे अजूनच तोंडाला पाणी सुटल. त्यातच सम्पूर्ण थाळीचा फोटो होता त्यामुळे माझ्या डोळ्यासमोर सगळ्या भाज्या, गोड पदार्थ, अन्य जिन्नस पिंगा घालू लागले.

तीन थाळ्या सहजच रात्रीच्या जेवणात पुरल्या असत्या म्हणून आंघोळीला जाण्या ऐवजी पुन्हा फोन घेऊन बसलो. तिथे दिलेल्या नंबर वर फोन केला. लागलीच फोन वर पलीकडून राजस्थानी टोन मध्ये आवाज आला.
“नमस्कार ! कब चाहीये थाली” ?
“आज शाम 7.30 बजे. क्या क्या है थाळी मे”? मी
“6 चपाती, 6 सबजी, 3 स्वीट, पापड, आचार ” तोच अदबपूर्ण आवाज.
माझ्या मनात ती थाळी दिसू लागली.

तोच आवाज परत
” सर एक लिंक भेज रहा हू आप क्लीक करीये”
मी आलेली लिंक क्लीक केली.
माझ्या मनात हल्दीराम बद्दलचा आदर अजून वाढला.
“किती करतात कस्टमर करता. म्हणूनच इतक मोठ झालं हल्दीराम” मनात म्हंटल.

त्याने एक गुगल फॉर्म पाठवला व फोन वर सांगितलं की “सर इसमे आप की इन्फॉर्मेशन भर दिजीए”
मी पण तालात ती माहिती भरली.
मग एक अट होती की १० रुपये डेबिट कार्ड ने त्यांनी दिलेल्या नंबर वर पाठवायचे.
मी ते सुद्धा केलं.
खर तर ते 10 रुपये गेलेच नाहीत.
” आप के 10 रुपये आ गये. शाम 7.30 बजे 3 थाळी आपके अड्रेस पर पहुच जायेगी. सर प्लीज बआपको एक नंबर आयेगा ऊस पे अपना नाम दोबारा भेजीए” तोच अदबपूर्ण आवाज.

माझ्या मनात आलं पैसे तर गेले नाहीत हा आले का म्हणतो आणि नाव पुन्हा का मागतो आहे? अचानक मन साशंक झालं. माझ्यातला कॉम्प्युटर इंजिनिअर जागा झाला. मी फोन कट केला. अन गुगल वरून अभिनंदन हल्दीराम चा मोबाईल नंबर घेऊन त्यांना विचारणा केली. तर ते म्हणाले आमची अशी काही स्कीम नाही.

डोक्यात लख्ख प्रकाश पडला. ती थाळी व सगळं एक झटक्यात डोक्यायातून बाहेर आल नशा उतरल्या सारख. पहिले बँकेचे अँप उघडलं . ऑनलाईन ट्रांनझाक्शन सर्विस तसच डेबिट कार्ड ब्लॉक केली. डेबिट कार्ड रद्द करून नवीन डेबिट कार्ड करता अर्ज पण केला.

बँक मॅनेजर सौरवला फोन करून माझं खात 24 तास करता बंद करायला सांगितलं. पोलीस कम्प्लेनट करायचं ठरवलं.
शर्व कडून ते नंबर ब्लॉक केले व ही ऍड कशी खोटी आहे व तुम्ही कसे फसले यात या विषयावर चार समजूतदारीच्या गोष्टी त्याच्याकडून मुकाट्याने ऐकल्या. तरीही मनात माझं काय चुकलं? असा इगो भरला प्रश्न आलाच.

राहिलेली आंघोळ उरकली. शांतपणे पूजा केली. थोडं जेवण पण केलं. अन पोलीस स्टेशन कडे निघालो. प्रबोध कडून एक इन्स्पेक्टर चा नंबर घेतला. अजनी पोलीस स्टेशन बाहेर थांबून आलेले sms बघत होतो. तर माझ्या खात्यातून पैसे वळते झाल्याचे sms येत होते. थोडं मन धाकधूक करू लागल होत. 200 रुपयांची 3 थाळी ही हाव मला किती रुपयात पडणार होती त्याचा विचार येत होता.

पोलीस स्टेशन मध्ये गेलो. खांडेकर साहेब बदलून गेलेत अस समजलं. तिथल्या पोलीस ला सगळं पोटतिडकीने सांगितलं. तो तितक्याच हळुवारपणे म्हणाला की सर सायबर क्राईम ला जा. इकडे काही होणार नाही.

कार मध्ये बसून पुन्हा हल्दीराम ला फोन केला व तुमच्या नावे अस सुरू आहे हे सांगितलं. त्यावर तो म्हणाला “पता है. हमने पोलीस को बाताया है”. अन फोन बंद केला.
तिथूनच मी त्या फेसबुक पोस्ट वर फ्रॉड आहे वैगरे msg लिहिले.

सायबर क्राईम ला गेलो. बाहेर एक पोलीस होता त्याला विचारलं तर तो म्हणाला “कितने पैसे गये आपके”
मी म्हंटल “कुछ भी नही”
“फिर क्यो इतना भाग दौड कर रहे हो?”
“किसीं और का नुकसान ना हो इसलीये”
त्याने एक बिकट दृष्टीने बघितलं अन बोलला “ऑनलाईन कम्प्लेनट कर दो”
मी कार मध्ये येऊन बसलो अन ऑनलाईन तक्रार नोंदवली.

आता छान AC लावून गाणे ऐकत थंड डोक्याने सगळा घटना क्रम आठवू लागलो. सगळे sms परत वाचले. 24999, 1500, 1200, 500, 400 असे व्यवहार झाले होते. काही दुकानात तर काही फ्लिपकार्ट वर. मनात आलं कीं कोणत्याही ऑनलाईन व्यवहारात OTP लागतो. तो कसा मिळणार. तर फोन बघितला त्यात समजलं की एक अँप माझ्या फोन मध्ये डाउनलोड झाली होती. ती अँप होती.
“Automatically forward sms to your phone/pc”

सगळं गणित समजलं. मी त्यांनी पाठवलेली लिंक क्लीक केली तेव्हा ती अँप डाउनलोड झाली असेल व त्या अँपमुळे मला आलेला OTP तिकडे फॉर्र्वर्ड झाल्याने ते लोक पैसे काढू शकत होते.
ही मंडळी जास्त हुशार वाटली कारण पैसे बँकेत वळते न करता ऑनलाईन वस्तू विकत घेत होते. म्हणजे जास्त रिस्क नव्हती. पेमेंट झालं तर वस्तू मिळणार नाही झालं तर व्यवहार रद्द. अस भन्नाट डोकं असलेले लोक लुबाडणूक करतात. फक्त झटपट पैसे मिळवण्यासाठी. पकडले जाण्याची रिस्क कमी असल्याने व फार कमी लोक पोलीस कडे जात असल्याने असल्या फसवणूक करणाऱ्यांची हिम्मत वाढते.

वाईट त्या हल्दीराम च्या मॅनेजर च वाटलं की त्याला माहिती असून त्याने तात्काळ कोणतीही ऍक्शन घेतली तर नाहींच पण मला सुद्धा खूप थंड रिस्पॉन्स दिला. देवाच्या कृपेने मी या सापळ्यातून सही सलामत बाहेरही पडलो. पुढे असल्या कोणत्याही ऑनलाईन प्रकारात कोणी बळी पडू नये म्हणून “पुढच्याला ठेच मागचा शहाणा ” या उक्ती प्रमाणे मी हा प्रसंग लिहितो आहे. यामुळे किमान एक जण जरी सावरला तरी हा लेख सत्कारणी लागला अस होईल.

Previous articleपासवानांच्या ‘चिराग’ची फडफड !    
Next articleतक्रार करण्यासाठी जागा मिळाली की निम्मी भांडणं कमी होतात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here