-संजय सोनवणी
सुहास शिरवळकर नामक एक साहित्यिक नवोन्मेषाचं वादळ ज्या काळात घोंगावलं तो काळ एका परीने साहित्य मरणोन्मुखतेचा काळ होता. पाश्चात्त्य नवसाहित्य संकल्पना उचलत—उधार घेत मराठी साहित्य व समीक्षा वाट चालत होती. परस्परांची पाठ थोपटत साहित्यिक महत्ता गायली जात होती. (आजही त्यात विशेष फरक पडलेला नाही.) त्या काळात ‘वाचक’ फारच गृहीत धरला जात होता. किंबहुना ‘आम्ही लिहितो तेच साहित्य!’ असा दर्पही साहित्य – कंपूमध्ये आला होता. बिचारा मराठी वाचक यामुळे घायकुतीला आला नसता तरच नवल. अर्नाळकर – गुरुनाथ नाईक काही प्रमाणात वाचक बाळगून राहिले; परंतु त्यांच्या मर्यादाही कालानुरूप वाचकांच्या लक्षात येऊ लागल्या होत्या. खांडेकरी वा फडक्यांचे साहित्य केवढे कृत्रिम आहे हेही लक्षात येऊ लागले होते. त्यांना ‘समीक्षकीय’ महत्ता वा राजमान्यता असली, तरी जनमान्यता ओसरू लागलेली होती. एखादे नेमाडे ‘कोसला’च्या रूपातून उत्तर वसाहतवाद काळातील तरुणाईचे चित्रण करताना दिसले, तरी ती भूमिका / चित्रण हताशवादी होते. पलायनवादी होते. इतर शेकडो लेखक लिहीत होते, एवढेच. परंतु त्या लेखनाला चैतन्याचे धुमारे नव्हते. वाचक खिळून राहील, विचार करील, स्वप्ने पाहील असा प्रभावी स्वप्नाळूपणा वा आशावादही त्यात नव्हता. किंबहुना या सर्वच काळातील साहित्य हे वाचकांसाठी नव्हे, तर समीक्षकांसाठीच लिहिले जात होते अशा काळात सुहास शिरवळकरांनी समीक्षकांची पर्वा न करता ‘वाचक’ हेच मूलध्येय मानीत पराकोटीच्या ऊर्जेने विपुल लेखन करीत वाचकांच्या एक नव्हे, तर दोन पिढ्या घडवल्या. आज ते नाहीत. पण आजही त्यांचे तेवढेच वाचक आहेत.
सुशि कादंबरी वा कथा लिहीत नसून वाचकाशी हितगुज साधतात. ती हितगुज साधण्याची शैली असामान्य आहे जी अन्य साहित्यिकांत – अगदी पाश्चात्त्यही – दिसत नाही. कारण शिरवळकर आपल्या शब्दशैलीने वाचकांना गुंतवत नेत. मग अतार्किक घटनाही तार्किक वाटत, असंभाव्य ते संभाव्य वाटे. आणि हेच साहित्यिकाचे यश नव्हे काय?
रहस्य – गूढाचे आकर्षण ही प्रत्येक मानवी जीविताची व्यवच्छेदक गरज आहे- निकड आहे. आजीच्या कुशीत डोकं लपवीत भूता-खेतांच्या कथा ऐकल्या नसतील असा माणूस विरळा. प्रत्येक गावात कोणते-ना- कोणते ऐतिहासिक, न उलगडलेले रहस्य असते. कोणते–ना–कोणते घर झपाटलेले असते. याबद्दल लिहिणे फक्त ‘लोकप्रिय’ या शिवीकारक संकल्पनेत टाकून साहित्य – विचार – मंथन करणारे कोणत्या जनसाहित्याचा विचार करतात, हा प्रश्न अनुत्तरणीय आहे असे दुर्दैवाने म्हणणे भाग पडते.
खरे साहित्य हे सोद्देश्य कधीच नसते. विशिष्ट फॉर्मची निवड, शैलीची जाणीवपूर्वक निवड हे साहित्याला घातक असते. खऱ्या साहित्याचा कोणताही ठरावीक आकारबंध नसतो – तसा निकषही नसतो. जर तसे घडले, तर साहित्य कृत्रिम होते. साहित्य वाचकांसाठी असते. लिखित शब्द हे वाचकांसाठी असतात. वाचक घडवणे हेच शब्दप्रभूंचे कार्य असते. हे जर मान्य असेल, तर शिरवळकरांनी त्या विशिष्ट कालखंडातील वाचकांसाठी नेमके हेच कार्य केले.
शिरवळकरांचे कोणतेही पुस्तक वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती ही की, त्यांच्या लेखनात एखाद्या पुराणिकाची ओघवती वाणी आहे. शिरवळकरांना गूढ, रहस्य आणि चकित करणारा गुण म्हणजे प्रसन्न पण कधी-कधी मिश्कील चावट होणारा विनोद, यांची पराकोटीची आवड होती. खरे तर १९७० नंतरच्या पिढीशी पु. ल. देशपांडे यांच्यानंतर नाळ जोडणारा हा एकमेव लेखक. त्याला पराकोटीची सामाजिक–राजकीय पार्श्वभूमी आहे. हा सामाजिक बदल आणि त्यातून नव- पिढीत येणारे नैराश्य याला समर्थ वाट देणारा हा एकमेव लेखक. कारण शिरवळकरांच्या कोणत्याही कथेत वा कादंबरीत नैराश्य हा दुर्गुण कधीच नव्हता. दारा बुलंदपासून ते अमर विश्वास या पात्रांतून त्यांनी फक्त लढवय्ये चित्रित केले. त्याच काळात मराठी साहित्यात निराशवादी साहित्यशैलीची लाट आली होती. शिरवळकर पलायनवादी नव्हते. स्वतः मध्यमवर्गीय असूनही त्यापार किमान वैचारिक-सांस्कृतिक झेप घेण्याची त्यांची अनिवार तयारी होती. ‘दुनियादारी’ ते ‘तुकडा तुकडा चंद्रमध्ये ती ठळक होते.
वाचकांनी त्यांना पसंती दिली, कारण ते त्यांचे हृद्गत बोलत होते. जनसामान्यांच्या आशा-आकांक्षा व्यक्त करीत असताना एका ‘फॅन्टसी’त ते त्यांना नेत होते. पण त्यांच्या ‘फॅन्टसी’ अवास्तव आणि जड शब्दबंबाळ नव्हत्या, तर नव्या पिढीला स्वप्ने दाखवत आशावादी होण्याचा संदेश देणाऱ्या होत्या.
मराठीतील बाकी, जवळपाच सर्वच साहित्यिक हे लेखन हा पार्टटाईम धंदा समजतात व तो करतात. बव्हंशी असे लेखक प्राध्यापक असतात वा वकील. बाकी हौशी. मानधन मिळो वा न मिळो, प्रसिद्धी पुरस्कार येनकेनप्रकारेण त्यांना हवे असतात व ते मिळवतातही. शिरवळकर हे एकमेव साहित्यिक जे फक्त लेखनावर आजीवन जगले. त्यांनी उपजीविकेसाठी ना कोणती नोकरी पत्करली ना कोणता धंदा केला. प्रकाशकांच्या फसवणुकीही त्यांनी राजरोस पचवल्या. फक्त लेखनावर नुसता जगणारा नव्हे, तर परिवार समर्थपणे पेलणारा अन्य दुसरा साहित्यिक मराठीत कधी झाला नाही. हे भाग्य त्यांना लाभले कारण त्यांनी वाचकांच्या हृदयाशी थेट नाळ जुळवली. गेल्या तीन पिढ्या त्यांनी वाचनानंदाने समृद्ध केल्या. आजही त्यांचे वाचक तेवढेच आहेत आणि सुशि हयात नाहीत हे असंख्य वाचकांना आजही माहीत नाही. एवढे त्यांचे लेखन ताजेतवाने आहे. मी, आजही, खूप कंटाळलो तर सुशिंची कोणती ना कोणती कादंबरी मिळवून वाचत बसतो. मनोमन टीकाटिप्पणी चालू असली, तरी प्रत्येक पान शब्दन्शब्द वाचत जात असतो. असा लेखक मराठीला मिळाला हेच अहोभाग्य आहे. इतर लेखकांना हे भाग्य का मिळत नाही, मराठीला वाचक का नाहीत असले प्रश्न सुशिंशी फेटाळले जातात. खरे तर मराठी साहित्य संस्कृतीला अनेक सुशिंची गरज आहे. तरच मराठी भाषा जोमाने फोफावेल कारण ती जरा वाचनीय होईल.
सुशिंची कादंबरी–कथासंग्रहांची शीर्षके हासुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. अल्पशब्दीय पण अन्वर्थक शीर्षक देणारा हा एकमेव साहित्यिक. त्यातही त्यांनी धोपटमार्ग वापरला नाही. एका परीने हा त्यांनी रूढ परंपरेशी केलेला विद्रोह होता. जीएंच्या अर्पणपत्रिकांतील साहित्यिकता शोधणाऱ्यांनी जरा सुशिंच्या शीर्षकांबाबतही अभ्यास करायला हवा.
ज्या काळात ‘मराठी’ वाचणे हा नव्या पिढीला रटाळ अभिशाप वाटत होता, त्या काळात सुशिंनी मराठी माणसाला वाचायला लावले. लक्षावधी ‘प्रेमात पडलेले’ वाचक निर्माण केले. हे एक अफाट कर्तृत्व आहे. ते वाचक आजही आहेत आणि पुढेही राहतील. त्यातूनच एक नवा सुशि कधीतरी, कोठेतरी निर्माण होईल, याची मला खात्री आहे.
सुशिंना मी काका म्हणायचो. आमची व्यक्तिगत मैत्री अल्पकालीन, पण साहित्यरूपाने ते आजही माझे मित्र आहेत आणि पुढेही राहतील.
(संजय सोनवणी हे अनेक गाजलेल्या पुस्तकांचे लेखक व अभ्यासक आहेत)
7721870764