मितवाssss

-मिथिला सुभाष

“सुख म्हणजे काय? भरपूर शरीरसुख, खूप ड्रेसेस, साड्या, दागिने, नातेवाइकांना वाटणारं कौतुक, आलिशान घर, नोकरचाकर म्हणजे सुख? …. नाही अवंती.. बोटाला सुई टोचल्यावर तिथे औषध कोणीही लावतं ग.. पण बोटावर उगवलेला तो रक्ताचा लालचुटुक ठिपका पटकन तोंडात घ्यायला ‘मितवा’ लागतो.. ताप आल्यावर कपाळावर थंडं पाण्याच्या पट्ट्या नर्स पण ठेऊ शकते, पण त्याच कपाळावर उष्ण ओठ टेकवतो तो मितवा.. त्याने सुट्टीच्या दिवशी किचनमधे माझ्या आगेमागे करावं.. मी फोडणी घालत असतांना त्याने मागून मला मिठी मारावी आणि फोडणी करपावी.. त्याने दाढी करतांना माझ्या नाकाला फेस लावावा आणि मी खोटी तक्रार करत तो त्याच्याच टी-शर्टला पुसावा.. कधीतरी रात्री मी त्याच्या खांद्यावर मान ठेऊन रफी ऐकत अर्धी रात्र जागवावी.. एकमेकांच्या पाठीवर शब्द लिहून ते ओळखण्याचा खेळ खेळावा.. हे मितवा’च करू शकतो, नवरा नाही..!”

अवंती समजुतीने म्हणाली, “अग उर्मी, ही तर सगळी स्वप्नं आहेत.. संसार म्हणजे स्वप्नं नसतं!”

“होय अवंती, संसार म्हणजे स्वप्न नसतं, पण संसारात स्वप्नं असायला काय हरकत आहे? दोघांचीच स्वप्नं.. ज्याचा पासवर्ड फक्त दोघांकडेच असतो.. नजरा भेटल्या तरी ती स्वप्नं ओपन होतात.. आसपासच्या कोणाला काही कळतच नाही आणि ही दोघं मनातल्या मनात तरंगत आपापली कामं करत राहतात.. असा नवरा हवा होता मला.. मी माझी बायकोची, सुनेची सगळी कर्तव्यं विनातक्रार पार पाडत होते ना?? मग त्याने माझ्यासाठी ‘मितवा’ व्हायला काय हरकत होती?”
*********************
विवेकचा कॉल कट केला तेव्हा अवंतीचे हात थरथरत होते. तिच्या घशाला कोरड पडली होती, ‘उर्मी घरातून निघूनच गेली..??’ अवंती सर्द झाली होती. ती पाण्याचा ग्लास घेऊन शांतपणे बसली. पण मनातला कोलाहल काही केल्या थांबत नव्हता. गेले काही महिने उर्मीचं काय चाललंय ते अवंतीला माहीत असलं तरी ती असं काही करेल आणि ‘त्याच्या’बरोबर निघूनच जाईल असं तिला अजिबात वाटलं नव्हतं. तिला अचानकच एकदम अपराधी वाटायला लागलं, विवेकसाठी. पण त्याचा आवाज थंड, सपाट, काहीही विशेष न घडल्यासारखा होता. त्याने फक्त माहिती दिली होती, त्याची बायको घरातून निघून गेली होती-

“उर्मी दोन दिवस घरात नाहीये अवंती.. मला वाटतं निघून गेली ती तिच्या बॉयफ्रेंडबरोबर”
“काय..????”
“हो.. आता ठेवतो मी फोन.. माझी आई येणार आहे आज.. तिला सांगायला काहीतरी स्टोरी बनवावी लागेल मला. आपली सून अशी स्वत:च्या बॉय फ्रेंडबरोबर… कळतंय ना तुला?”
“हो.. पण म्हणजे.. अशी कशी…” अवंती चाचरत विचारात होती.
“तिला तुरुंगात असल्यासारखं झालं होतं इथे..” कडवट सुरात विवेक म्हणाला.
“हं…!”अवंतीला उर्मीचं WhatsApp स्टेटस आठवलं. “ये जिन्दगी जो है नाचती तो क्यों बेडियों में हैं तेरे पांव..!”

अवंतीने फोन कट केला आणि पटकन whatsApp उघडलं. उर्मीच्या प्रोफाईलवर दोन लालचुटुक गेंदेदार गुलाब झळकत होते… आणि बदललेलं स्टेटस, “हां ये वोही है, हां ये वोही है, तू एक प्यासा और ये नदी है!” अवंतीने कपाळाला हात लावला. इतकं समजावलं हिला, दाताच्या कण्या केल्या. पण शेवटी ही त्या अपूर्वबरोबर…! ‘मितवा’ म्हणे..!! अवंतीला पुढे विचार करवेना. तिने सरळ फोन लावला. उर्मीचा फोन बंद होता. अवंतीने एक मेसेज टाकला, ‘कुठेयस? फोन कर..!’
*******

अवंतीला मुंबईच्या मुलाने पसंत केलं तेव्हा तिला सगळ्यात जास्त आनंद या गोष्टीचा झाला की ती आता उर्मीच्या जवळ असेल. लहानपणापसूनची मैत्रीण. दोघी मराठी घेऊन बीए झाल्या होत्या आणि आता अवंती देखील लग्न होऊन मुंबईत आली होती. उर्मी होतीच मुंबईत.. दोघींच्या अगदी रोज गप्पा व्हायच्या फोनवर. लग्नाच्या आधीपासूनच रोज रात्री पडणारं स्वप्न अवंतीला सांगितलं नाही तर उर्मी अस्वस्थ व्हायची. उर्मी दिसायला नक्षत्रासारखी, घरची परिस्थिती उत्तम, त्यामुळे लग्न जमेपर्यंत शिक्षण, हा प्रकार तिच्याबाबतीत नव्हता. विवेकचं स्थळही असं होतं की तिला नोकरीची गरज नव्हती. त्यामुळे तिचं लग्न अवंतीच्या आधी झालं आणि ती मुंबईला आली. त्याच वर्षी अवंतीने एमएच्या टर्म्स भरल्या. पण लगेच तिचंही ठरलं आणि तेही नेमकं मुंबईतच.. आता दोघी मैत्रिणी पुन्हा एकत्र आल्या होत्या..

“मी आता नवऱ्याच्या पैशाने जमके शॉपिंग करणार, मुंबईचे सगळे मॉल्स पालथे घालणार आणि मज्जा करणार,” हे मनात घेऊन उर्मी मुंबईत आली आणि तिचं तस्संच आयुष्य सुरु झालं. विवेक एका मोठ्या एमएनसीमधे बडा अधिकारी होता. शानदार घर, आलीशान राहणीमान, दिमतीला नोकरचाकर, दोन गाड्या, कुठे कसली उणीवच नाही. विवेकच्या आईने उर्मिला पसंत केलं होतं आणि नकार देण्यासारखं काही नाही म्हणून विवेकने शिक्कामोर्तब केलं होतं. स्वत:च्या हुशारी आणि कर्तबगारीवर उच्च पदाला पोचलेला विवेक आणि स्वप्नांच्या जगात रममाण होणारी उर्मी. युरोपात मधुचंद्र आटपून ती आली आणि रीतसर संसाराला लागली. आटपून? हा शब्द पहिल्यांदा उर्मीच्या तोंडून फोनवर ऐकला तेव्हा अवंतीच्या दाताखाली खडा आल्यासारखं झालेलं तिला स्पष्ट आठवलं. पण नंतर असे खडे येतच राहिले. उर्मीच्या लग्नाला वर्ष झालं.. अवंतीचं घर, आणि युनिव्हर्सिटी असं सुरु होतं. उर्मीत झालेला बदल अवंतीला जाणवला. पण चिमटीत पकडण्यासारखं काही नव्हतं. उर्मी येत राहिली.. दोघींच्या भेटी होत राहिल्या.. एरवी उर्मी दिवसभर घरात म्युजिक ऐकत लोळत असायची. दुपारनंतर घराबाहेर पडायची. शॉपिंग करायची. मॉल्समधे टाईमपास करायची. अवंतीचं एमएचं एक वर्ष शिल्लक होतं. तरी ती दर आठवड्याला उर्मिला भेटायची. दोघी तासाचे तास एकत्र असायच्या.

“मला ना असं वाटतं की ओंजळभर चांदण्या आरस्पानी काचेच्या वाडग्यात ठेवाव्या आणि घरातले सगळे दिवे घालवून त्या लुकलुकत्या प्रकाशात विवेकच्या खांद्यावर मान ठेऊन रफीची गाणी ऐकत बसावं. पण असं म्हंटलं की विवेक माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतो, काही बोलतच नाही!”

“अग काय बोलणार उर्मी तो? हे विचित्रच आहे तुझं.”

“असू दे विचित्र. पण नुसतं, ‘हो का वेडाबाई? करुया हां एक दिवस हा बेत,’ असं म्हणायला काय जातं त्याचं? तो असं नुसतं बोलला ना तरी त्याचे शब्द झेलून ग्लासभर पाण्यात घोळवेन मी, छान गुलाबी रंगाचं सरबत होईल.. गोड-गोड..!! आणि त्याच्यासमोर बसून पिऊन टाकेन, पण तो काही बोलतच नाही!”

आता अवंतीला तिच्याकडे विचित्र नजरेने पाहावंसं वाटायचं. पण नाही पाहायची ती तसं. कारण ती उर्मिला लहानपणापासून ओळखत होती. अत्यंत हुशार, सालस, सुगृहिणीचे सगळे गुण जन्मजात अंगात असलेली उर्मी अत्यंत स्वप्नाळू होती. कॉलेजमध्ये असतांना तिच्या कल्पना अफलातून वाटायच्या. ‘आपल्या मितवाला छोटासा करून, चांदीच्या शिंपल्यात मखमल अंथरून त्यात ठेवायचा आणि तो शिंपला आपल्या गळ्यात घालायचा. घरी गेल्यावर त्याला त्यातून बाहेर काढायचा, आणि एका फुंकरीत मोठा करून त्याच्या गच्चं गळ्यात पडायचं,’ असं काहीतरी ती जागच्या जागी उड्या मारत बोलली की सगळ्या मैत्रिणी हसायच्या.

“गच्चं असंच म्हणायचं ना उर्मी..?” एक कुणीतरी विचारायची.

“हो.. चकलीतला ‘च’ नाही म्हणायचा, चहातला ‘च’ म्हणायचा.. गच्चं..!!

मैत्रिणी म्हणायच्या, वेडीच आहेस. थोडं आणखी मोठं झाल्यावर कळलं की ती वेडी नाही, अतिशय क्रिएटिव्ह आहे. असोशीने प्रेम करू शकणारी आहे. थोडक्यात, या जगातली नाहीये!

पण विवेक पूर्णपणे या जगातला होता. त्याची नोकरी, त्यातले प्रेशर्स, त्याच्या मिटींग्ज, दौरे, कॉन्फरन्सेस, सतत वरच्या जागेवर जात राहण्याची महत्वाकांक्षा.. आणि या सगळ्यामुळे उर्मीसाठी त्याच्याकडे वेळ नसणे..! उर्मीचे लुकलुकते डोळे हळूहळू विझायला लागले. त्याला सांगितल्यावर तो म्हणायचा, “रोमॅन्टिक असायचं म्हणजे काय ग? रोज रात्री किती मजा करतो आपण, ते पुरत नाही का तुला..?!” असं त्याने दोन-चार वेळा म्हंटल्यावर उर्मीने तो विषय काढणं बंदच केलं. रोमांसचा विवेकने घेतलेला अर्थ तिच्या आकलनाच्या पलीकडचा होता, शिवाय वाद घालणं तिच्या स्वभावात नव्हतं, ती मिटत गेली. तिचं शॉपिंग आणि मॉल्समधली भटकंती सुरूच होती. पण ट्रायलरूममधून नवीन ड्रेस घालून बाहेर दाखवायला येणारी, दोन्हीकडे तो परीसारखा चिमटीत धरून गोल फिरून, ‘कसा दिसतोय? मस्त ना?’ असं विचारणारी उर्मी मात्र हरवायला लागली.

उर्मी हसली की झरणारी फुलं ओंजळीत घेऊन ती तिच्यावरच उधळणारा आणि जर कधी रडली तर तो मोती जिभेच्या टोकावर अलगद झेलणारा ‘मितवा’ तिला नवरा म्हणून हवा होता. विवेक तसा नव्हता. त्याने तिचा मितवा होण्याऐवजी तिला स्वत:च्या पत्नीचे ‘मानाचे पद’ देऊ केले होते. त्याला उर्मी आवडायची. ती देखणी होती, हुशार होती. तिने सगळ्या नातेवाईकांशी नीट जमवून घेतलं होतं. ती सुगरण होती. तिला कुठल्याही कामाचा कंटाळा नव्हता. तिच्या या प्रत्येक गुणाचा वापर कुठे, कसा, कधी नेमकेपणाने करायचा हे त्याला माहीत होते. आयुष्याकडे बघण्याचा दोघांचा नजरिया वेगळा होता. दोघं आपापल्या जागी बरोबर होते. फक्त.. हो, फक्त नेहमीप्रमाणे देव जोडी लावायला चुकला होता, एवढंच..!

मधल्या काळात अवंतीचं एमए पूर्ण झालं, तिला एका महाविद्यालयात नोकरी लागली. याच दरम्यान उर्मीची अपूर्वशी ओळख झाली. तो तिच्या जिम’मधे होता.. म्हणे..! सावळा, उंच.. देखणा… कपाळावर हेअरलाईनमधे भोवरा असल्यामुळे मध्यभागात छान आडव्या ‘एस’सारखं वळण घेऊन उजव्या भिवयीपर्यंत झेपावणारे दाट केस, मधाचे ठिपके घातल्यासारखे डोळे, आणि या सगळ्यापेक्षा दिलक़श त्याची वागण्यातली अदा.. दिसण्यातला केअरफुली केअरलेसनेस…! उर्मीच्या मते पुरुषाच्या व्यक्तिमत्वातला सगळ्यात हवाहवासा वाटणारा ‘जीवघेणा’ गुण! जो त्याला परफेक्ट ‘मितवा’ बनवतो. हे सगळं तिनेच सांगितलेलं. एखाद्याचं असं वर्णन उर्मीच करू जाणे. “सतत इनशर्ट करून, बुटंबीटं घालून, चापून भांग पाडणारे पुरुष मला नाही बाई आवडत,” असं ती पूर्वीही म्हणायची. “अग संसाराला असेच नवरे बरे असतात,” हे तिला तेव्हाही कधी सांगण्याची इच्छा झाली नाही आणि तिला अपूर्व भेटल्यावर तर शक्यच नव्हतं. ‘अपूर्व-पुराण’ वाढतच चाललं होतं. अवंतीच्या संस्कारी मनाला कुठेतरी टोचणी लागली होती. तिने अनेकवेळा उर्मीची कानउघाडणी केली, पण ती हसत उडवून द्यायची. म्हणूनच अवंतीने कधीही अपूर्वला भेटण्याचा विषय काढला नाही.

पण उर्मी तिच्या नेहमीच्या झोकात यायला लागली होतो. ‘कित्ती-कित्ती गोड’ ‘कित्ती-कित्ती छान’ ‘कित्ती-कित्ती लाड येतात त्याच्यावर’ ‘कित्ती-कित्ती मिस करतेय’ असं सगळं ‘कित्ती-कित्ती’ सुरु असायचं. तिच्यासाठी जग तिच्याचसारखं पारदर्शक होतं. तिचे डोळे पुन्हा तिच्या मनाचा तळ दाखवणारे नितळ, स्वच्छ झाले होते. त्यातलं मळभ धुवून गेलं होतं. नजर कायम समोरच्या दृश्याच्या पलीकडचं काहीतरी ‘कित्ती-कित्ती सुंदर’ बघण्यात हरवलेली. ती पुन्हा पूर्वीसारखी दिसायला लागली, तजेलदार, ओठाच्या कोपऱ्यात सतत एक खट्याळ-चोरटे स्मित आहे की काय असं वाटणारी, आपली कॉलेजमधली मैत्रीण उर्मी. कधीही जमिनीवर उभी न राहणारी, सतत अधांतरी तरंगणारी. काहीही मजेदार सांगतांना कुणाची पर्वा न करता जागच्या जागी उड्या मारत, टाळ्या पिटत, हसरे डोळे नाचवत ‘मज्जा’ सांगणारी उर्मी..!

आणि आज तिचा नवरा सांगतोय ती घरातून पळून गेली..!

अवंतीने नाशकाला जाऊन उर्मीला भेटायचं ठरवलं. ती काही केल्या फोन घेत नव्हती. ती माहेरच्या घरीच आहे की त्याच्याबरोबर कुठे दुसरीकडे…?? तिने माहेरी काय सांगितलंय हेही माहीत नसल्यामुळे तिच्या आईशी बोलण्याचं धाडस अवंतीला होत नव्हतं. मधे दोन महिने निघून गेले होते. अवंतीने घाबरतच विवेकला फोन केला. त्याने शांतपणे सांगितलं की ती माहेरीच आहे, पण तिला परत यायचं नाहीये. कदाचित त्याच्याबरोबर लग्न वगैरे..!! तो गप्पं बसला. थोड्या वेळाने म्हणाला, जाण्याआधी एकदा येऊन जा, तिच्या कवितेच्या वह्या हव्या आहेत तिला, त्या तशाही मला कळत नाहीत. मी घरात नसलो तरी काढून ठेवलेल्या असतील, आमची केअरटेकर देईल तुला. बाकी दागिने वगैरेंची वाटणी कोर्टात होईलच. अवंतीच्या घशात आवंढा दाटला.
अवंती नाशिकला उर्मीच्या घरी पोचली तेव्हा ती बंगल्याच्या बाहेर बागेतच भेटली. टाचा उंचावून जाईच्या वेलीवरची फुलं काढत होती. अवंतीला पाहून धावत आली आणि तिला बिलगली. थोडी फिकुटली होती, पण डोळ्यातल्या चांदण्या लुकलुकत होत्या.
“मला माहीत होतं, तू येशील..म्हणूनच मी तुझे फोन घेत नव्हते.”
“बोलू नकोस माझ्याशी.. काय करून बसलीएस हे..?? आता माझ्याबरोबर मुंबईला चल मुकाट्याने.”
“………….”
“काय म्हणतेय उर्मी मी..?? तो इथेच आहे तुझ्याबरोबर..??”
“तो काय म्हणतेस तू त्याला..? माझा मितवा आहे तो, अपूर्व आहे त्याचं नाव..निदान तू तरी ते विसरता कामा नये. कुठे जाणार तो मला सोडून..?”
“मी कशाला लक्षात ठेऊ त्याचं नाव?”
“चल आपण घरात जाऊया.. आई आणि वहिनी पण घरात नाहीयेत.. निवांत गप्पा मारता येतील”
हिला आत्ताही निवांत गप्पा सुचताहेत..?? पण अवंती काही बोलली नाही. दोघी उर्मीच्या खोलीत आल्या. जुनीच खोली, शाळेपासून अवंतीच्या ओळखीची. अवंतीची नजर अपूर्वला शोधत होती. मधेच तिने उर्मीकडे पाहिलं. तिच्या ओठांच्या कोपऱ्यावर ते नेहमीचं हसू आलेलं होतं, चोरटं, खट्याळ..! काचेच्या एका वाडग्यात सोनचाफ्याची फुलं ठेवली होती.

“अपूर्वला अतिशय आवडतो सोनचाफ्याचा वास..!”

“इतकी कशी ग कोडगी झालीस तू? लग्न झालंय तुझं विवेकशी. आणि तू इथे त्या अपूर्वबरोबर..”

“मी नाही जगू शकत अपूर्वशिवाय.. आणि हे पक्कं लक्षात आल्यावरच मी घर सोडलं आणि त्याच्याबरोबर इथे आले… विवेकवर का अन्याय करावा मी..?”

“आई, दादा काही बोलले नाहीत..??”
“मी काय म्हणतेय ते कळतच नाहीये त्यांना..”
“साधी माणसं आहेत ती, नाही कळणार त्यांना..”
उर्मी गप्पं बसून राहिली. अवंतीलाही काय बोलावं ते सुचत नव्हतं. तिने पर्समधून उर्मीच्या कवितेच्या वह्यांचं पाकीट काढलं. तिच्या हातात दिलं. उर्मीने त्याची पिन काढली, मोरपीस हाताळावं तशी नाजूकपणे एक वही बाहेर काढली.

“अग उर्मी, आपण बीए’च्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हाची ना ग ही वही?”
“हं..!!”
“बघू..” असं म्हणत अवंतीने तिच्या हातातली ती वही घेतली. सहज चाळता-चाळता शेवटच्या पानावर आली. आणि अवंतीला शॉक लागला. संपूर्ण पानभर सहस्त्रनामावली लिहिल्यासारखं ‘अपूर्व, अपूर्व, अपूर्व’ लिहिलेलं होतं. तिला झर्रकन सगळं आठवलं. हसत सांगणारी उर्मी, ‘कुणालाही आजपर्यंत भेटला नसेल असा प्रियकर मला भेटेल, माझा मितवा, त्याचं नाव अपूर्व असेल.. अपूर्व! जसा पूर्वी कधी झालाच नाही!’ अवंती भेलकांडली.

“उर्मी..???”
उर्मीने काही न बोलता उरलेल्या दोन वह्या तिच्या हातात दिल्या. अवंतीला माहीत होतं, दोन्ही वह्यांची शेवटची पानं अपूर्वच्या नावाने भरलेली होती. तरी तिने कन्फर्म केलं. हो, तशीच होती दोन्ही पानं. अवंतीने पूर्वी कितीदा तरी पाहिली होती ती. तिला उर्मीचं मघाचं वाक्य आठवलं, “तो काय म्हणतेस तू त्याला..? माझा मितवा आहे तो, अपूर्व आहे त्याचं नाव..निदान तू तरी ते विसरता कामा नये. कुठे जाणार तो मला सोडून..?” अवंती कासावीस झाली. आपण अशा कशा विसरलो..??

“तुझा अपूर्व कुठेय उर्मी?”
“हा काय..!!” उर्मीने वहीच्या पानावर बोट ठेवलं.
“नाही, नाही, तुझा मितवा..ज्याच्याबरोबर तू मुंबईहून इथे आलीस, तो अपूर्व, तो कुठेय?”

“असे अपूर्व कधी प्रत्यक्षात असतात का अवंती? प्रत्येकीच्या मनात तिचा मितवा असतो. आणि तो असा वहीच्या शेवटच्या पानावर असतो.. मग लग्नानंतर त्याला नवऱ्याच्या अस्तित्वात शोधत राहायचं. किती जणींना आपला कल्पनेतला मितवा लग्नाच्या नवऱ्यात सापडतो मला माहीत नाही. ज्या मुली खूप भाग्यवान असतात, त्यांच्यासाठी त्यांचा नवराच त्यांचा मितवा बनतो. माझ्याबाबतीत दोन्ही गोष्टी नाही घडल्या. मला विवेकमधे माझा मितवा सापडला नाही आणि त्याला माझ्यासाठी अपूर्व बनता आलं नाही. त्याचा रस फक्त माझ्या देहाच्या चढ-उतारात, वळणं-वेलांट्यांत. म्हणून मग मी इथे निघून आले माझ्या अपूर्वबरोबर..!”

उर्मीचं सांगून झालं होतं. ती सोनचाफ्याच्या वाडग्यात आत्ता आणलेली जाईची फुलं भोवती-भोवतीने मांडत होती..
अवंतीला राहवलं नाही, तिनं कळवळून विचारलं-
“अग पण जिममधे तुला भेटला होता तो अपूर्व…?”
“तुम्हा लोकांना काहीही कळत नाही…” असं म्हणत उर्मी अवंतीजवळ येऊन बसली.. बोलायला लागली..

“पालकांनी ठरवलेली लग्न म्हणजे काय असतं अवंती? दोन अनुरूप कुटुंबं एकमेकांना पसंत करतात. आणि त्या दोन कुटुंबांनी नात्यात राहावं म्हणून त्यातल्या एका कुटुंबातला मुलगा आणि दुसऱ्या कुटुंबातली मुलगी आपलं शरीर आणि मन झिजवत राहतात.. जन्मभर..!”
अवंती बघतच राहिली उर्मीकडे.. “अग पण सहवासाने प्रेम नाही का निर्माण होत?”
उर्मीची नजर खिडकीतून दिसणाऱ्या सोनचाफ्याच्या झाडावर जाऊन अडकली होती. ती बोलत राहिली-

“सहवासाने प्रेम नाही निर्माण होत अवंती, ओळख होते. ती तर अंगावर उगवलेल्या अनाहूत चामखिळाशी पण होते. त्या ओळखीचं रुपांतर प्रेमात होण्यासाठी दोघांनी काहीतरी प्रयत्न करायचे असतात. रोज रात्री शरीरांची झटापट, आणि गलितगात्र होऊन एकमेकांकडे पाठ करून झोपणं म्हणजे प्रेम असतं?”

“अग तू सुखी होतीस विवेकच्या संसारात..”

“सुख म्हणजे काय? भरपूर शरीरसुख, खूप ड्रेसेस, साड्या, दागिने, नातेवाइकांना वाटणारं कौतुक, आलिशान घर, नोकरचाकर म्हणजे सुख? …. नाही अवंती.. बोटाला सुई टोचल्यावर तिथे औषध कोणीही लावतं ग.. पण बोटावर उगवलेला तो रक्ताचा लालचुटुक ठिपका पटकन तोंडात घ्यायला ‘मितवा’ लागतो.. ताप आल्यावर कपाळावर थंडं पाण्याच्या पट्ट्या नर्स पण ठेऊ शकते, पण त्याच कपाळावर उष्ण ओठ टेकवतो तो मितवा.. त्याने सुट्टीच्या दिवशी किचनमधे माझ्या आगेमागे करावं.. मी फोडणी घालत असतांना त्याने मागून मला मिठी मारावी आणि फोडणी करपावी.. त्याने दाढी करतांना माझ्या नाकाला फेस लावावा आणि मी खोटी तक्रार करत तो त्याच्याच टी-शर्टला पुसावा.. कधीतरी रात्री मी त्याच्या खांद्यावर मान ठेऊन रफी ऐकत अर्धी रात्र जागवावी.. एकमेकांच्या पाठीवर शब्द लिहून ते ओळखण्याचा खेळ खेळावा.. हे मितवा’च करू शकतो, नवरा नाही.. !”

अवंती समजुतीने म्हणाली, “अग उर्मी, ही तर सगळी स्वप्नं आहेत.. संसार म्हणजे स्वप्नं नसतं!”
“होय अवंती, संसार म्हणजे स्वप्न नसतं, पण संसारात स्वप्नं असायला काय हरकत आहे? दोघांचीच स्वप्नं.. ज्याचा पासवर्ड फक्त दोघांकडेच असतो.. नजरा भेटल्या तरी ती स्वप्नं ओपन होतात.. आसपासच्या कोणाला काही कळतच नाही आणि ही दोघं मनातल्या मनात तरंगत आपापली कामं करत राहतात.. असा नवरा हवा होता मला.. मी माझी बायकोची, सुनेची सगळी कर्तव्यं विनातक्रार पार पाडत होते ना?? मग त्याने माझ्यासाठी ‘मितवा’ व्हायला काय हरकत होती?”

“म्हणून तू दुसरीकडे संधान…??”
उर्मी खिन्न हसली..

“दुसरीकडे कुठे ग..?? तो ‘मितवा’ माझ्या मनात होताच.. अपूर्व! माझी भावनिक घुसमट जेव्हा वाढली तेव्हा मी मनातला अपूर्व बाहेर काढला.. कोणाला ते कळलं नाही.. पण अग, तुलाही नाही कळलं?”

अवंतीला तिचं पूर्वीचं बोलणं आठवलं.. तो सोनचाफा आणि मी जाई..! जाई आणि सोनचाफा..! ती आणि तिचा मितवा..! समोर ठेवलेल्या काचेच्या नक्षीदार वाडग्यात सोनचाफे आणि जुईची फुलं एकमेकांच्या आधाराने महकत होते.. आणि दूर कुठेतरी गाणं सुरु होतं…..

मेरे मन ये बता दे तू
किस ओर चला है तू
क्या पाया नहीं तूने
क्या ढूँढ रहा है तू
जो है अनकही
जो है अनसुनी
वो बात क्या है बता..
मितवाssss

पूर्वप्रकाशन: डिजिटल दिवाळी अंक २०१४

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

(मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.)

Previous articleसुहास शिरवळकर: तीन पिढ्यांना वाचनानंद देणारा अफाट लेखक
Next articleकदम कदम बढाये जा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.