-संतोष अरसोड
शिवश्री आमदार अमोल मिटकरी
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम
काल परवाचे सत्ता नाट्यात तुम्ही एका वाहिनीसमोर बोलताना खूप हसत होते. बरं वाटलं असं हसताना पाहून.भक्त तर खूप हसत होते. राजकारणात भूमिका वगैरे काही महत्वाची नसते.महत्वाची असते ती लाचारी.मराठा सेवा संघाच्या चळवळीत तुमची जडणघडण झाली.साऱ्या महाराष्ट्रात तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली. अनेक पुरोगामी कार्यकर्त्यांनी खास करून बौध्द बांधवांनी तुम्हाला डोक्यावर घेतले.मात्र बौध्द बांधव तुमचे बोलघेवडेपण ओळखून चुकले आहे.आमच्या मंचावर येवून आम्हाला फुले आंबेडकर शिकवणारा हा कोण? अशी त्यांची भावना आहे.
तुम्ही खूप घसा कोरडा होई पर्यंत खिसाभर मानधन घेतले असे कार्यकर्ते बोलतात.या टोकदार वक्तृत्वामुळे तुम्ही अचानक आमदार झाला.चळवळीतील एक कार्यकर्ता राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आमदार झाला याचा अनेकांना आनंद होता.पण आमदारकी आपल्या डोक्यात घुसली हे राष्ट्रवादीचे अनेक जण खासगीत बोलतात .फोन उचलायला स्विय सचिव ठेवला तेव्हा मूळचा अमोल मिटकरी कुठे गेला हा प्रश्न अनेकांच्या डोक्यात घर करू लागला. संभाजी ब्रिगेड मधील अनेक कार्यकर्ते सुध्दा तुम्ही दूर केलेत.तुम्ही मोठ्या साहेबांविषयी किती आदराने बोलत होता.पण आता तुमची गोची झालीय.असो. खाल्या मिठाला जागावे लागेल.प्रवक्ते पद त्यासाठीच दिले आहे.
तुम्ही जेव्हा टीव्ही वर गोडसे, सावरकर यांच्यावर जहरी टीका करत होता तेव्हा तुमच्यावर पुरोगामी लोकं खुश होते. पडळकर सोबत डिबेट होत होती तेव्हा भक्त तुम्हाला मटणकरी म्हणत होते.आम्हाला खूप वाईट वाटत होते हे ऐकून. तुमचा तो समर्पयामि चा डायलॉग खूप फेमस झाला. सदैव फुले आंबेडकर तुमच्या ओठांवर होता. पण आता पुढे काय? या प्रश्नाने अनेक जण अस्वस्थ आहेत. भक्त पण खूप नाराज आहे.विचार महत्वाचा असतो,सत्ता नाही. एक अमोल खासदारकी सोडून देण्याचा निर्णय घेतो अन् दुसरा अमोल मात्र प्रसंगी टीव्ही समोर हसतो अन् सत्तेला चीपकुन राहतो.लय वाईट वाटते हो आमदार साहेब आता.
पुढचा काळ तुम्हाला गोपीचंद पडळकर सोबत घालवावा लागेल.वेळ प्रसंगी बागेश्र्वर बाबा जे मंचावर जावे लागेल.ज्या देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही वैफल्यग्रस्त झाला असे म्हणत होता त्या देवेंद्र फडणवीस यांचे पाय धरावे लागेल.नियतीचे मनात असले तर सावरकर जयंती चे तुम्ही रेशीमबागेत प्रमुख वक्ते राहाल.मग सावरकरांचा विज्ञानवाद सांगून ते कसे स्वातंत्र्यवीर होते हे तुम्हाला सांगावं लागेलच. एखादे वेळी गोडसेचे पण समर्थन करा लागेल.या पुढे विश्वगुरू मोदी, उप विश्र्वगुरू अमित भाई यांची मिमिक्री करता येणार नाही तुम्हाला. कधी काळी पवार, ठाकरे यांची मिमिक्री केली.नंतर ती बंद झाली.आता पुन्हा ती करावी लागली तर नवल वाटू नये.तुमच्या रक्तातील पुरोगामी विचार रेशीम बागेत गहाण ठेवून पुढली तुमची राजकीय वाटचाल कशी असेल हे पाहणे मजेशीर ठरेल.फुले, शाहू,आंबेडकर अन् सोबत गोडसे,सावरकर ,गोळवलकर हा नवा समरसता वादी विचार जर छगन भुजबळांच्या वैचारिक मदतीने तुम्ही जन्माला घातला तर खूप खूप उपकार होईल.अशा काळात तुम्हाला भक्त आणि पुरोगामी कसे स्वीकारतात याचे उत्तर सध्या तरी देता येत नाही. तुमच्या भाषणासाठी सतरंज्या उचलणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांची ही सात्विक भावना आहे . पुन्हा एकदा जय जिजाऊ ,जय शिवराय…जय ज्योती ,जय भीम.
तूर्त एवढेच.
(लेखक ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक आणि वेब पोर्टलचे कार्यकारी संपादक आहेत)
9623191923