पवारांनी जे पेरलं ते उगवलं…

-अविनाश दुधे

आपल्या ५६ वर्षाच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीत जे-जे काही पेरलं ते भरभरून उगवलं आहे, याची प्रचिती थोरल्या पवारांना बुधवारी आली असावी. आपण मोठे केलेले नेते आपला उल्लेख ‘विठ्ठल’, ‘दैवत’ ‘परमेश्वर’ असा जरी करत असले तरी आपण आयुष्यभर विरोधकांना जे डाव टाकून नेस्तनाबूत केले, तेच डाव टाकून आपल्या चेल्यांनी, आपल्याला धोबीपछाड दिली याची जाणीव पवारांना नक्कीच झाली असेल.

( कालच्या अजित पवारांच्या शक्ती प्रदर्शनात बोलताना धनंजय मुंडे यांनी ‘आमचे गुरु शरद पवार आहेत. मी गुरुचा खरा चेला आणि विद्यार्थी आहे. मग, गुरुजींना शिकवलेला धडा, मीच पुन्हा त्यांच्या परस्पर गिरवला, तर तो गुरुजींचा आदर्श समजायचा की अपमान समाजायचा, असं विधान केलं. अशीच काहीशी भाषा छगन भुजबळ आणि प्रफुल्ल पटेलांचीही होती.)

बुधवारी दोन्ही पवारांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनानंतर काही गोष्टी अगदी स्पष्ट झाल्या आहेत. शरद पवारांनी २०१४ पासून मोदी शहांसोबत चुंबाचुंबी चालवली होती, हे काही लपून राहिलेच नव्हते मात्र त्यातील बारकावे काल समोर आलेत. २०१४ नंतर किमान तीन – चारदा शरद पवारांच्या मोदी शहा फडणवीसांसोबत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली. आराखडा ठरला. मात्र प्रत्येकवेळी पवारांनी पलटी मारली. तत्व, मूल्य विचारधारा आदी कारणं समोर करून आपला पुरोगामी गळू कुरवाळण्याच्या नादात शरद पवारांनी डबल ढोलकी वाजवली. (सूडाच्या राजकारणात डॉक्टरेट मिळविलेले मोदी-शहा हे विसरणे शक्यच नव्हते. ते संधीची वाट पाहत होतेच. ही संधी शरद पवारांनीच त्यांना दिली.)

प्रत्येक वेळेस भाजपसोबत सत्ता स्थापनेची चर्चा सुरू झाली की पवार संदिग्ध भूमिका घेत असतं. खापर मात्र अजित पवारांवर फुटत असे . थोरले पवार महाराष्ट्रातील ‘मीडियाचे डार्लिंग’ असल्याने प्रत्येक वेळी त्यांच्या मुत्सद्देगिरीवर भरभरून लिहिलं गेलं, बोललं गेलं. त्यांनी पुतण्याला कसं जमिनीवर आणलं, याच्या कहाण्याही कौतुकाने सांगण्यात आल्या.

अजित पवार आणि अनेक वर्षापासून पवार साहेबांसोबत काम करत असलेले त्यांचे सहकारी साहेबांचे हे दुहेरी राजकारण जवळून पाहत होते. तुमची भाजपसोबत एवढी सलगी आहे, अनेकदा सत्तास्थापनेबाबत बैठका झाल्या आहेत, तर सत्तेत गेलं पाहिजे हा राष्ट्रवादी नेत्यांचा, आमदारांचा आग्रह ते ज्या सत्ता संस्कृतीत वाढले आहेत, ते पाहता अनाठायी नव्हता. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर हा आग्रह तीव्र झाला, मात्र तेव्हाही शरद पवारांच्या डोक्यात वेगळी गणित असावीत.

‘ लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्राचा दुसऱ्या भागात शरद पवारांनी उद्धव ठाकरेंचं आपल्या पक्षावर कसं नियंत्रण नव्हतं आणि पक्षात काय चाललं आहे, याची त्यांना काहीही खबरबात नव्हती, याबाबत काहीशी कठोर टीका केली आहे. मात्र तीच चूक पवारांनीही केली. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांच्या मनात काय खदखदत आहे, याचा अंदाज शरद पवारांना आला नसेल, असे म्हणता येत नाही. पण कुशल शिकाऱ्याला आपल्या क्षमतेबाबत जसा अवाजवी आत्मविश्वास असतो, तसेच पवारांचे झाले.

महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरेंप्रमाणेच पवारांचाची दबदबा कायमचा संपवायच्या, या संधीची मोदी, शहा, फडणवीस वाट पाहत आहे, हे माहीत असतानाही पवारांनी राजकारणातील बहुतेक काका मंडळी जी चूक करतात ती केली. पक्षाच्या अंतर्गत सत्ताकारणात क्षमता, धडाडी आणि महत्त्वाकांक्षा असलेल्या अजित पवारांकडे सूत्रे देण्याऐवजी त्यांनी सुप्रिया सुळेंकडे पक्ष सोपवला. (आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो नाही हा काय आमचा दोष, हे अजित पवारांचे कालच्या भाषणातील वाक्य लक्षात घेतलं, तर त्यांना ते किती जिव्हारी लागलं आहे, हे लक्षात येतं.) शेवटची काडी तेथे पडली. ती सरसरून पेटली आणि तिचा वणवा झाला.

या धक्क्यातून शरद पवार बाहेर येतात का, याची उत्सुकता असणार आहे. ते दाखवत नसले तरी हा धक्का जबर आहे. लढण्याची जिगर, पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबाबत असलेले प्रेम, जिव्हाळा आणि आदर आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन महाराष्ट्र पिंजून काढण्याचा संकल्प या गोष्टी बाजी उलटवू शकतात. असे झाले तर शरद पवार नावाची कहाणी अजरामर ठरेल.

शरद पवारांसाठी आणखी एक गोष्ट अनुकूल आहे. ती म्हणजे मोदी, शहा आणि फडणवीसांनी आधी शिवसेना आणि आता राष्ट्रवादीबाबत जे काही केलं त्याबाबत सामान्य जनतेमध्ये चीड आहे, संताप आहे. लोकांच्या या भावना आणखी काही महिने कायम राहिल्या आणि त्यांनीच सूडाच्या राजकारणाचा हिशेब करण्याचा निर्णय घेतला तर आणखी काही महिन्यानंतर खूप काही वेगळं चित्र दिसू शकेल.

बघूया. दरम्यानच्या काळात महाराष्ट्राच्या सत्ताकारणात भरपूर तमाशे पाहायला मिळणार आहेत, हे नक्की!

(लेखक ‘मीडिया वॉच’ अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

(अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा किंवा www.avinashdudhe.com वर क्लिक करा)

Previous articleखणखणतं नाणं पवारसाहेबांचेच!
Next articleमिटकरी, तुमची राजकीय वाटचाल पाहणे मजेशीर ठरेल!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.