सनातन धर्म, वसाहतवाद आणि आधुनिकता

-अ‍ॅड. किशोर देशपांडे

तामिळनाडूचे द्रमुक नेते उदयनिधी स्टालिन यांनी एका नवीन वादाला तोंड फोडले आहे. सनातन धर्म हा एक डेंगू अथवा मलेरियासारखा रोग असून त्याचे निर्मूलन करणे आवश्यक आहे, अशा आशयाचे विधान उदयनिधी यांनी केले आहे. पंतप्रधान मोदींसह भाजप आणि हिंदुत्ववाद्यांनी या संधीचा लाभ घेऊन उच्चस्तरीय राळ उठवणे जरी सुरु केले असले, तरी त्यांचा तो आक्रोश केवळ मतपेट्यांवर नजर ठेऊन असल्यामुळे, फारसा वैचारिक प्रतिवाद त्यांच्या निषेधामध्ये आढळून येत नाही. उलट विरोधी पक्षाची गोची करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश्य दिसतो. परंतु कॉंग्रेससह अनेक विरोधी पक्षदेखील या मुद्यावर लेचीपेची भूमिका घेताना आढळतात; कारण त्यांचीही नजर निवडणुकीवरच आहे. त्यामुळे राजकीय स्वरूपाच्या आरोप- प्रत्यारोपांना बाजूला ठेवून विचारमंथन होणे आवश्यक आहे.

उदयनिधी स्टालिन

हिंदुत्ववाद्यांसकट हिंदु धर्माच्या सर्व अभिमान्यांचे नेहमीच असे म्हणणे असते की, आमचा हा धर्म अतिशय सहिष्णू असून मुस्लीम व ख्रिश्चन हे धर्म मात्र असहिष्णू आहेत. तसेतर भारताच्या संविधानाने देखील प्रत्येक व्यक्तीला विचार स्वातंत्र्य बहाल केले आहेच. परंतु उदयनिधी यांच्या वर नमूद विधानानंतर वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांपासून ते छोट्यामोठ्या कथित साधुसंतांपर्यंत सर्व नव-हिंदुत्ववाद्यांनी जी आक्रमक आणि हिंसक भाषा वापरली आहे, ती तर सहिष्णूतेच्या तत्त्वाला हरताळ फासणारी आणि संविधानाचा उघड उघड उपमर्द करणारी आहे. खरंतर उदयनिधी यांनी केवळ आपले विचार व्यक्त केले, सनातन धर्माचे निर्मूलन करण्याचा कोणताही कार्यक्रम आखलेला नाही.

प्राचीन भारतीय उपनिषदांनी सृष्टीमध्ये व सृष्टीबाहेरही केवळ एकच तत्त्व अस्तित्वात आहे असे सांगून, त्या तत्त्वालाच परब्रह्म नि परमात्मा अशी नावे दिली आहेत. असे हे तत्त्व अनादि, अनंत व अक्षय असल्यामुळे त्यांनी त्यास ‘सनातन’ असेही म्हटले आहे. उपनिषदांचा फार मोठा प्रभाव हा भगवद्गीता, बुद्ध, भक्तीमार्गी व सुफी संतांवर पडला. सनातन तत्त्वाप्रमाणेच आपला धर्मही सनातन म्हणजे अनादि व अनंत असल्याचे कल्पून, सनातन धर्म हा भारतीय उपखंडातील लोकांचा धर्म मानला जात असे. परंतु अजाण वा सजाण ऊर्जेसारखे एखादे तत्त्व या सृष्टीत सनातन असू शकते; पण मानवप्राणी हा स्वतःच जर का सनातन नाही, तर त्याने निर्माण केलेला कोणताही धर्म हा सनातन कसा असू शकेल? मग कालांतराने येथील धर्मास ‘हिंदुधर्म’ असे नाव प्राप्त झाले. एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकांत तर जे कट्टर रूढीवादी लोकं होते, त्यांनाच फक्त सनातनी म्हटले जायचे.

सध्याचा हिंदू धर्म म्हणजे शास्त्रे, पुराणे, रूढी, परंपरा, स्वतंत्र भारतातील हिंदू धर्मीयांना लागू झालेले कायदे आणि त्या कायद्यांचा न्यायालयांनी वेळोवेळी लावलेला अर्थ अशा सर्व गोष्टींचे एक गाठोडे आहे. पण हिंदुत्व, हिंदू धर्म, सनातन धर्म हे तिन्ही एकच आहेत आणि आम्ही धर्माची बदनामी मुळीच सहन करणार नाही अशी आक्रस्ताळी भूमिका नवहिंदुत्ववादी घेत आहेत. वास्तविक स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या काळात उदयनिधीपेक्षाही जहाल मते हिंदू धर्माबाबत व्यक्त केली होती आणि तरीही त्यावेळच्या सनातन्यांनी त्यांच्याविरुध्द इतकी हिंसक भूमिका घेतली नव्हती. हिंदू धर्मात जणू वाईट काहीच नाही आणि जर काही असलेच तर आम्ही त्याची दखल आमच्या परीने घेऊ; स्वतःला हिंदुत्ववादी न म्हणविणाऱ्या हिंदूंनाही तसा हक्क नाही, असेच या नवहिंदुत्ववाद्यांचे धोरण दिसते. उदाहरणार्थ जन्माष्टमीच्या निमित्ताने जो भयंकर धुडगूस घातला जातो, त्यावर हे हिंदुत्ववादी सोशल मीडियावर टीका करतात; पण इतरांनी अशीच टीका केलेली त्यांना मुळीच चालत नाही.

मध्ययुगात बसवेश्वर, कबीर, चक्रधर, ज्ञानदेव, तुकारामादी महात्म्यांचा छळ करणारी मंडळी स्वतःस ‘सनातनी’ असे म्हणवून घ्यायची.अलीकडे आपले नवहिंदुत्ववादी सत्ताधीश हे वसाहतवादाच्या खुणा पुसून टाकण्याचे देखावे करत आहेत. दुसऱ्या देशांवर सत्ता मिळवून त्या देशातली शासनयंत्रणा, अर्थव्यवस्था आणि सांस्कृतिक जीवन आपल्या देशाच्या अर्थ व राज्यव्यवस्थेला अनुकूल करून घेणे हा झाला वसाहतवाद आणि इंग्रजांनी देखील हेच केले. स्वातंत्र्यानंतरही विकसित म्हणविणाऱ्या देशांचे याबाबतीतले दबाव झुगारणे हे भारतासारख्या विकसनशील देशांना नेहमीच शक्य होत नाही. पूर्वीचे मोगल साम्राज्य हे वसाहतवादी नव्हते; कारण इथली संपत्ती लुटून ते आपल्या मूळ देशांचा फायदा करून देत नव्हते. मोगल राजवटींचा किंवा ब्रिटिश वसाहतवादाचा फायदा घेण्याचा प्रयत्न हा वरिष्ठ मानल्या गेलेल्या जातींनीच केला. तसेच इस्लामी अथवा ब्रिटिश राजवटींनी हिंदू धर्मातील भयानक उतरंड असलेली भयंकर जातीव्यवस्था बदलण्याचा प्रयत्न केला नाही. किंबहुना त्यांनी तसा प्रयत्नसुद्धा करू नये, याची दक्षता कथित उच्चजातींनी घेतली. परंतु असे असूनही हिंदू धर्मातील उच्च- नीचतेच्या कल्पनेवर आधारित अशा विषमतेविरुध्द, या धर्मातूनच जोरदार प्रतिकार ब्रिटिश राजवटीत सुरु झाला आणि तोदेखील त्यांच्या वसाहतवादासोबत युरोपमधून भारतात वाहत आलेल्या आधुनिक मूल्यांमुळेच!

आता आधुनिक मूल्ये म्हणजे नेमके काय, हे समजून घेण्यासाठी तर पृथ्वीवरील जीवांच्या उत्क्रांतीचा इतिहासही थोडासा लक्षात घेणे आवश्यक ठरते. उत्क्रांतीमध्ये फक्त जीवांच्या देहाचाच विकास झाला नसून, त्यांच्या जाणीवांचा देखील विकास होत आलेला आहे. मानवप्राण्यात जाणीवेचा विकास हा सर्वाधिक झालेला आहे. परंतु कोणताही विकास हा आधी सामूहिक स्वरुपात, म्हणजे वेगवेगळ्या जीव-जातींमध्ये सामूहिक स्वरुपात होत गेला आणि मग पुढील टप्प्यांवर तो एकेका विकसित देहाच्या जीव-जातीमधील व्यक्ती-व्यक्तीमध्ये स्वतंत्रपणे होत गेला. आपल्यापुरते पाहायचे झाल्यास अगदी अलीकडच्या काळापर्यंत व्यक्तीपेक्षा समूहांना – म्हणजेच कुटुंब, जाती, गाव, धर्म यांना – अधिक महत्त्व होते. इतकेच नव्हे तर या समूहांनी व्यक्तीला करकचून बांधून ठेवले होते. गेल्या काही शतकांपासूनच ‘प्रत्येक व्यक्तीला मानव म्हणून स्वतःची एक अस्मिता व प्रतिष्ठा असावी आणि समूहांनी व्यक्तीला बांधून ठेवू नये’असे तत्त्व पृथ्वीवर प्रगटून युरोपमार्फत जगभर पसरले. तो एक नैसर्गिक उत्क्रांतीचाच कार्यक्रम असल्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय इत्यादी मूल्ये एकूण मानवजातीला स्वीकारणे भागच आहे. युरोपमध्ये आधुनिक शिक्षण घेऊन परतलेल्या सर्व थोर भारतीय नेत्यांना अशा मूल्यांची ओढ वाटणे स्वाभाविक होते. त्यामुळे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत या मूल्यांचा आणि व्यक्तीच्या प्रतिष्ठेचाही उद्घोष केल्या गेला. किंबहुना संयुक्त राष्ट्र संघटनेला देखील मानवाधिकारांची विशेष दखल घेणे भाग पडले आहे.

सुमारे ६०-७० वर्षांपूर्वीसुद्धा आपल्याकडे जाती-जातींची विषमतेवर आधारीत उतरंड, गावसमाजाने निर्माण केलेली घाण स्वच्छ करण्याचे काम करणाऱ्या जातींना अस्पृश्य समजणे, गावसमाजातील नि कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा दरारा असणे, स्त्रियांना व मुलांना स्वतंत्र आचरणाची आणि विचारांची मुभा नसणे असले सगळे प्रकार आपण अनुभवले आहेत. आधुनिकतेने मात्र या व्यवस्थेला भयंकर तडा दिला. दलित, मागास जाती, स्त्रिया व मुले, तसेच तुरुंगातील कैदीदेखील संविधानामुळे आणि मानवाधिकारांची दखल घेतली गेल्यामुळे अधिकाधिक स्वातंत्र्य उपभोगू शकले. त्यामुळे आता अराजक माजणार की काय, अशा चिंतेने व्यवस्थेतील पूर्वीची कर्ती मंडळी हैराण झाली. संघ नि भाजपाचे हिंदुत्व हे अशा चिंतेतूनही उदयास आले आहे; पण विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा दोन घोड्यांवर स्वार झालेल्या भांडवली औद्योगीकरणा- च्या आधुनिक लाटेला थोपविणे त्यांना शक्यच नव्हते. औद्योगीकरणाने व शहरीकरणाने जुन्या व्यवस्थेला आणखी जोरात धक्के देणे सुरु केले. निसर्गाने वा (असल्यास परमात्म्याने) जाणीवेची उत्क्रांती ही प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे वसाहतवाद, औद्योगीकरण, शहरीकरण अशा माध्यमांचाही त्याने उत्तम उपयोग करून घेतला. जुन्या सामाजिक नि धार्मिक व्यवस्थेतील वाईटासोबतच, काही चांगलेही नष्ट होत आहे; पण जे टिकाऊ स्वरूपाचे आहे, ते पुन्हा कधी ना कधी उगवत राहणारच.

हिंदू धर्मातील अनेक मुखंडांनी स्वतःला सनातनी म्हणवून घेत व्यक्तिस्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि व्यक्तीची प्रतिष्ठा (डिग्निटी) या सर्व आधुनिक मूल्यांचा विरोध केला. तरीही त्यांचे अनेक प्रतिनिधी असलेल्या घटना परिषदेने अशा मूल्यांचा भारतीय संविधानात समावेश केला. आतातर खरी परीक्षा हिंदुत्ववाद्यांची आहे. एकतर आडून-आडून वार न करता उघडपणे त्यांनी भारतीय संविधानातील अशा आधुनिक मूल्यांचा निषेध नोंदवावा किंवा हिंदू (त्यांच्या मते सनातन) धर्मातील या मूल्यांच्या विरोधात असलेल्या तरतुदी त्याज्य असल्याची जाहीर कबुली तरी द्यावी. एकट्या उदयनिधी स्टालिनचा विरोध करून भागणार नाही.

श्री मोहन भागवत यांनी नागपूर येथे आरक्षणाचे समर्थनार्थ केलेल्या विधानांचे सर्वस्तरीय स्वागत होणेदेखील आवश्यक आहे. मात्र सरसंघचालकांनी केलेली ती विधाने सर्व स्वयंसेवकांनी, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणि अन्य हिंदुत्ववाद्यांनी मन:पूर्वक स्वीकारणे आवश्यक आहे. तसेच प्राचीन भारतीय तात्त्विक परंपरेमध्ये लोकायत नि चार्वाक यांसारख्या नास्तिक दर्शनांना देखील काहीएक स्थान दिल्या गेले, याची जाणीव ठेवावी. शिवाय उदयनिधी स्टालिन अथवा अन्य सनातन धर्माच्या टीकाकारांना आणि नास्तिकांना देखील स्वतंत्र मत बाळगण्याचा अधिकार आहे असे मान्य करून, त्यांच्या तशा स्वातंत्र्याचा आदर करणेही तितकेच आवश्यक आहे – जसे की यापूर्वी जाहीरपणे मनुस्मृती जाळणाऱ्या डॉ. आंबेडकरांचाही आपण आदर करत आलोत.

(लेखक नामवंत विधिज्ञ आहेत) 

9881574954

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here