होय, मी मालिका लिहिते!

-मिथिला सुभाष
*****
मालिकांचा चेहरामोहरा बदलला याचं श्रेय वाहिनीपासून संवाद लेखकापर्यंत सगळ्यांचे मिळून असले तरी…. तो चेहरा जर तुमच्यापैकी काहीजणांना आवडत नसेल तर तो दोष यापैकी एकाचाही नाही. कारण प्रेक्षकांना जे हवंय, तेच दिलं जातंय. त्यामागचे कष्ट, त्यात ओतला जाणारा पैसा, त्यातून पोसली जाणारी कुटुंबं आणि त्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या वाहिन्यांचे व्यवहार कुणालाच माहीत नसतात. जुन्या मालिकांची उदाहरणं दिली जातात. त्या मालिका ‘टीआरपी’ नाही म्हणून बंद झाल्या हे कोणाला माहित नसतं. ‘अमुक मालिका बंद करा,’ हे सांगणं सोपं असतं. पण ती मालिका बंद झाली तर किती लोकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळेल याची कल्पना सामान्य प्रेक्षकाला नसते.
********************************************

संपादकांनी विषय सांगतांनाच मला हे शीर्षक सांगितलं आणि क्षणार्धात मी लेख लिहायला तयार झाले. मी मालिका ‘लिहिते’ म्हणजे नेमकं काय करते, हे एकदा सांगायचंच होतं मला.
माझ्या माहेरी अभिजात संगीत-साहित्याचं वातावरण होतं. ज्या घरात तानपुरा आणि पुस्तकं नाहीत, ते घर म्हणजे ‘सराय’ – धर्मशाळा असते, असं माझे वडील म्हणायचे. माझे वडील मास्टर विनायक यांच्याकडे संवाद-दिग्दर्शक म्हणून काम करत होते. कुठला संवाद बोलतांना आवाजाचे चढ-उतार, आवाजाची पट्टी, आवाजाची फेक कशी असावी हे शिकवणारा माणूस म्हणजे ‘संवाद-दिग्दर्शक.’ आज हे पद नसतं. वडील इतरत्र गाणी वगैरेही लिहीत होते.

विनायकरावांच्या मृत्यूनंतर ते इंडस्ट्रीतून फेकले गेले. हे माझ्या जन्माच्या पूर्वीचं सांगतेय मी. आज मी सत्तर वर्षांची आहे.. म्हणजे तुम्हाला मास्टर विनायक माहित नसण्याचीच शक्यता जास्त.. विनायकराव म्हणजे नंदा या अभिनेत्रीचे वडील..

ज्या काळात, माझ्या वयाची मुलं-मुली “आम्ही समग्र पुलं किंवा समग्र वपु वाचलंय,” असं म्हणतांना कॉलर ताठ करायची, तेव्हाही मी जीए, चिंत्र्यं, पुरू शिव असे लेखक, कवी वाचत होते.. त्यांच्या कविता कंठस्थ करत होते. या यादीत यथावकाश ग्रेस, महेश एलकुंचवार, इंदिरा संत आणि इतर समकालीन कवी-लेखकांचा समावेश झाला. अर्थात ‘समग्र पुलं’ मीही वाचलंय. हिंदी-भाषक असल्यामुळे हिंदी-उर्दू वाचनही भरपूर होतंच. पण ‘अभिजात’ किंवा ‘क्लासिक्स’मधे मी तेव्हाही अडकून पडले नाही. या वाचनासोबत वयानुरूप गुलशन नंदा, चंद्रकांत काकोडकर आणि या दोघांचे जे कुणी समकक्ष होते, तेही वाचत होते. त्यामुळे ‘अभिजात’ म्हणजे, ‘माझ्या टोपीतले रंगीत पीस’ किंवा ‘खांद्यावरची किनखापी झूल’ आहे असं मला कधीच वाटलं नाही.

म्हणूनच चाळीशीच्या उंबरठ्यावर जेव्हा मी पूर्णवेळ मालिका लिहिण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया वक्र झाल्या. (ही ‘तथाकथित’ अभिजात उपमा आहे!) “जिने केलेल्या ‘भय इथले संपत नाही,’ या कवितेवरचं भाष्य ऐकून दस्तुरखुद्द ग्रेस इम्प्रेस होतात, जी मुलगी चिंत्र्यं’ची आवडती लेखनिक आणि शिष्या होती, त्या बाईने मालिका लिहायच्या?” हा आक्षेप म्हणजे, ‘तुमच्याकडे एवढ्या साऱ्या पैठण्या आहेत ना, मग तुम्ही कॉटनच्या साड्या कशाला नेसता?’ असं विचारण्यासारखं आहे. पैठण्या ‘ठेवणीत’ ठेवायच्या असतात राव, रोजच्याला गुदडायला सूती साड्याच कामी येतात. मऊ.. उबदार..!! याच मऊशार उबेसाठी मी मालिका लिहायला घेतल्या. आणि आज मी माझ्या कामाच्या प्रेमात आहे. माझ्या ‘पैठण्या’ माझ्याकडे आहेत, ‘खास’ समारंभांसाठी..!! पण रोजचं आयुष्य रंगीत, चमकदार आणि नर्म-मुलायम अशा सूती तान्याबान्याने समृद्ध झालंय.

मालिका म्हणजे त्या-त्या काळाचा आरसा असतो. त्या काळातल्या सार्वजनिक अभिरुचीचं प्रतीक असतं. अतिशय जबाबदारीने हे विधान केलंय मी. लेख वाचल्यावर ते वाचकांच्या लक्षात येईलच. ही अभिरुची कसकशी बदलत गेली आणि तशीच का बदलली हा आजचा विषय नव्हे. आता मी माझ्या मालिका-लेखनाकडे येते.

एका मालिकेच्या मागे लेखकांचा एक चमू – पूर्ण टीम – असते. बहुतेकवेळा वाहिनीकडून विषय सुचवला जातो. किंवा एखाद्या निर्मात्याकडे असलेला एखादा विषय वाहिनीकडून मान्य केला जातो. ती फार ‘थिन लाईन’ असते. म्हणजे दीड ते दोन पानं फक्त. त्यावर एक १५-२० मिनिटांचा ‘ऑडीओ पायलट एपिसोड’ बनवला जातो. त्यात पूर्ण कथा थोडक्यात सांगितलेली असते. वाहिनीच्या ‘रिसर्च’ खात्याची माणसं तो पायलट एपिसोड वेगवेगळ्या गावातल्या, शहरातल्या वेगवेगळ्या प्रेक्षकांना ऐकवून त्यांना या कथेत आणखी काय हवंय, कथेचा प्रवास कसा झालेला तुम्हाला आवडेल, हे विचारून त्यांचा ‘कल’ घेतात. त्यानुसार त्या लाईनवर एक लेखक कथा बनवतो. कथेवर शिक्कामोर्तब झालं की हाती असलेल्या कथेपैकी एका महिन्यात किती कथा ‘वापरली’ जाणार, याचा अंदाज घेऊन त्या कथेचे अनेक भाग पाडले जातात. मग त्यातल्या एका भागाचे सव्वीस भाग केले जातात. ही झाली एका महिन्याची कथा. त्यानंतर पटकथाकार त्या सव्वीसपैकी प्रत्येक भागातून बनवतो रोजची सहा ते दहा दृश्यं. आणखी एक लेखक मालिका पूर्ण होईपर्यंत सतत कथाविस्तार करत राहतो, मग शेवटी संवाद. ही सगळी कामं फक्त एक किंवा दोन लेखक मिळूनही करू शकतात, तसं करतातही. पण एवढ्या टप्प्यातून त्या कथेला जावंच लागतं. मायबाप प्रेक्षकांची आवड बघून दर आठवड्याला त्यानुसार त्यात बदल करण्याचं काम ‘कथा-विस्तार’ करणारा लेखक करतो. “मायबाप प्रेक्षकांची आवड” म्हणजे काय ते पुढे येईलच. शेवटी संवाद लिहिले जातात आणि एक एपिसोड चित्रिकरणासाठी तयार होतो.

‘मालिका लेखन म्हणजे काय,’ हे खरोखर जाणून घेण्यासारखे आहे. हल्ली मी फक्त संवाद लिहिते. मालिकेचे लेखक सतत तापल्या तव्यावर बसलेले असतात. मग तो पटकथालेखक असो नाहीतर संवाद लेखक. मी अर्थातच संवाद लेखकाच्या चष्म्यातून सांगणार. पूर्वी काळ वेगळा होता. सगळं लिहून तयार झाल्यावर चित्रीकरण सुरु व्हायचं. आज परिस्थिती बदलली आहे. जगात जशी स्पर्धा आहे तशी ती आमच्या क्षेत्रातही आहेच. त्यात टिकायचं म्हणजे प्रेक्षकांना काय हवंय त्यावर बारीक लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे टीआरपी जसा येतो तसे बदल करावे लागतात. अनेकदा तर उद्या शूट होणाऱ्या भागाची पटकथा रात्री येते. मग संवाद लेखक रात्रभर जागून संवाद लिहितो. दुसऱ्या दिवशी त्याचं शूटिंग होतं. त्याच रात्री तो एडीट होतो, त्यात म्युजिक घातलं जातं, तो अपलोड केला जातो आणि तिसऱ्या दिवशी तो भाग तुम्ही पाहता.

प्रेक्षकांपर्यंत मालिका पोचते ती संवाद लेखकाच्या भाषेत. तो ‘फायनल प्रॉडक्ट’ तयार करत असतो. त्याला सतत अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं. मालिका सुरु झाल्यापासून तिच्यात काय-काय घडले, कोण कसे वागले, हे लक्षात ठेवावे लागते. संवाद लिहितांना प्रत्येक पात्रानुरूप भाषा, लहजा बदलावा लागतो. पन्नाशीची प्राध्यापिका, तिची विशीतली विद्यार्थिनी आणि त्याच वयाचा विद्यार्थी यांची भाषा, लहजा वेगळा असावा लागतो. प्रत्येक पात्र या परिस्थितीत कसा विचार करेल आणि कुठल्या शब्दात व्यक्त होईल याचा विचार संवाद-लेखकाला करावा लागतो. त्यासाठी त्याला ‘परकायाप्रवेश’ करावा लागतो. आणि हे करण्यासाठी त्याच्या हातात वेळ फार कमी असतो. उद्या सकाळी नऊ वाजता शूटिंग सुरु होणारे आणि आज रात्री नऊ वाजता मी त्यातला पहिला सीन लिहायला घेतलाय. त्यामुळे, कुणीही उठून ‘संवाद-लेखक’ नाही बनू शकत. हे काम कष्टाचं तर आहेच, त्याहून जास्त कौशल्याचे आहे. संवाद लिहिण्याचं कौशल्य नसलेल्या हल्लीच्या काही लेखकांच्या हे गावीही नसतं की कोकण सोडून महाराष्ट्रातल्या इतर भागातला ब्राह्मणेतर समाज ‘काकू’ आणि ‘पोळी’सारखे शब्द वापरत नाही. ते लोक ‘काकी’ आणि ‘चपाती’च म्हणतात. त्यांच्या घरात ‘चिंचगुळाची’ आमटी नसते. रस्सा, कालवण नाही तर डाळ, डाळीची आमटी असते. हेच व्यवस्थित लिहिता यावं म्हणून मी महाराष्ट्रातल्या जवळजवळ सगळ्या बोलीभाषा शिकले.. असो!

तर, संवाद-लेखक हा लेखकांच्या माळेतला ‘शेवट’चा असतो, म्हणूनच महत्त्वाचा असतो. मेरूमणी..!! हा मणी आणि त्याची माळेशी बांधलेली गाठ मजबूत असावी लागते, नाहीतर सगळी माळ विस्कटून जायला वेळ नाही लागत. संवाद लेखकाला चेहरा नसतो, पण मालिकेचा चेहरा संवाद लेखक असतो असं म्हंटलं तर वावगं ठरू नये. ‘मुगले आझम’ म्हंटल्यावर, अनारकलीने अकबराला उद्देशून एका श्वासात म्हंटलेला, “ज़िल्लेइलाही, आपने की हुई अनगिनत इनायतों के ऐवज में, ये कनीज़ अनारकली, आपको अपना खून माफ़ करती है,” हा पल्लेदार संवाद आठवतो की नाही? किंवा, “कितने आदमी थे,” “मेरे पास मां है,”सारखे संवाद अमर होतात ना? कारण ती घटना त्या संवादांनी सजून प्रेक्षकांपर्यंत पोचलेली असते. पटकथाकार नि:संशय महत्त्वाचा असतो, त्याने सिच्युएशनच नाही दिली तर त्यावर संवाद लेखक डोकं मारेल काय?? अनुवादित साहित्यात जी जागा अनुवादकाची असते, तीच जागा मालिकेत संवाद-लेखकाची असते. त्याने ती संपूर्ण कथा आपल्या भाषेत अनुवादित करून प्रेक्षकांना दिलेली असते. त्यासाठी त्याच्याकडे भाषेचे सामर्थ्य आणि ती वापरण्याची बुद्धी असावी लागते. नेमके आणि चपखल बसणारे शब्द वापरावे लागतात. भाषा येते म्हणून तिची उधळमाधळ करून चालत नाही. आणि हे सारे पटकथाकाराने आखून दिलेल्या चौकटीत राहून करावे लागते. ‘आमचं मराठी चांगलं म्हणून आम्ही संवाद लिहिणार,’ इतकं सोपं नसतं ते. पण भल्या-भल्यांना हे भान नसतं. मालिका लेखकांना सततच ‘तुच्छ’ म्हणून हिणवणाऱ्या महाभागांना माझी एक नम्र विनंती आहे…

गेल्या काही वर्षात हिंदी, मराठी किंवा कुठल्याही भारतीय भाषांतल्या मालिकांच्या बाबतीत असं काही वातावरण झालेलं आहे की, ‘तथाकथित’ विद्वानांच्या गराड्यात, ‘तुम्ही काय करता,’ या प्रश्नाचं उत्तर म्हणून, ‘मी मालिका लिहिते,’ हे सांगतांना उगाच चोरासारखे वाटते. वरच्या वाक्यातला ‘तथाकथित’ हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. त्या सगळ्यांना मला एक सांगावसं वाटतं.. फक्त पंधरा मिनिटात, दिलेल्या स्क्रीनप्लेच्या आखीव चौकटीत राहून, सगळ्या पात्रांच्या मनात शिरून, त्यांच्या-त्यांच्या भाषेतले संवाद लिहित, मालिकेचा टोन-लहजा न बदलता, पात्राचा स्वभाव, मालिकेची कथा न बदलता, फक्त एका फायनल ड्राफ्टमध्ये, दोन पानांचा एक असा सीन लिहून बघावा, जो बघतांना प्रेक्षकांचे भान हरपते.. बघा जमतंय का ते.. आणि एका रात्रीत असे नऊ ते दहा सीन्स किमान लिहावे लागतात..
किंवा
आठ ते दहा दृश्यांचा असा स्क्रीनप्ले अर्ध्या दिवसात एक लिहून बघावा ज्यात कथेचे तारतम्य असेल, तिचा विस्तार असेल, प्रेक्षकांची पसंती असेल, चॅनलमधल्या तज्ज्ञांशी बोलून ठरवलेल्या सगळ्या गोष्टी त्यात येतील.. आणि मुख्य म्हणजे जो वाहिनीच्या वरिष्ठांच्या मर्जीस उतरेल.. हे अजिबातच सोपं नसतं.. एका चांगल्या लेखकाने हे कसब मिळवण्यासाठी आपली अर्धी हयात खर्ची घातलेली असते..

मालिकांचे विश्व बदलले आहे, हे मलाही मान्य आहे. खाजगी वाहिन्या अस्तित्वात आल्यावर, त्यांचा हेतू व्यवसाय करणे हा होता. तोपर्यंत आपल्याला ‘प्रबोधन’ करणारी एकुलतीएक सरकारी वाहिनी माहीत होती. सरकारी वाहिन्यांच्या पाठीशी ‘सरकार’ असतं. पण खाजगी वाहिन्यांना त्याच व्यवसायातून पैसा कमावून, तोच पुन्हा त्या व्यवसायात घालायचा असतो. जेव्हा व्यवसाय म्हणून एखादा उपक्रम सुरु केला जातो तेव्हा प्रेक्षकांना काय हवंय, हे पाहणं सक्तीचं होऊन जातं. सोपं करून सांगायचं तर, गिऱ्हाईक मागेल त्या वस्तूची’च’ पुडी बांधून द्यावी लागते. “तुम्ही हे खाऊ नका, हे तुमच्या प्रकृतीला हानिकारक आहे,” असं सांगण्याचं काम दुकानदाराचं नसतं. डॉक्टरचं असतं. दुकानदार हे सांगायला लागला तर तो बुडेल. त्यामुळे मालिकांच्या विश्वात जे बदल झालेत ते प्रेक्षकांना जे हवे तेच आहेत, तेच असतात. त्यांना जे हवे तेच मालिका देत आहेत. मालिकांचे टीआरपी बघून त्यांना जाहिराती मिळतात. जाहिरातदार या वाहिन्यांच्या ‘पाठीशी’ असतात. त्यामुळे मालिकांचा चेहरामोहरा बदलला याचं श्रेय वाहिनीपासून संवाद लेखकापर्यंत सगळ्यांचे मिळून असले तरी…. तो चेहरा जर तुमच्यापैकी काहीजणांना आवडत नसेल तर तो दोष यापैकी एकाचाही नाही. कारण प्रेक्षकांना जे हवंय, तेच दिलं जातंय. त्यामागचे कष्ट, त्यात ओतला जाणारा पैसा, त्यातून पोसली जाणारी कुटुंबं आणि त्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या वाहिन्यांचे व्यवहार कुणालाच माहीत नसतात. जुन्या मालिकांची उदाहरणं दिली जातात. त्या मालिका ‘टीआरपी’ नाही म्हणून बंद झाल्या हे कोणाला माहित नसतं. ‘अमुक मालिका बंद करा,’ हे सांगणं सोपं असतं. पण ती मालिका बंद झाली तर किती लोकांवर उपासमारीची कुऱ्हाड कोसळेल याची कल्पना सामान्य प्रेक्षकाला नसते.

निर्माता, त्याच्या कार्यालयात काम करणारी माणसं, दिग्दर्शक, कलावंत, कथालेखक, पटकथा लेखक, संवाद लेखक, क्रिएटिव्ह हेड, शेड्यूलर, कॅमेरामन, प्रकाशयोजनाकार, रंगभूषाकार, वेशभूषाकार, इस्त्री करणारे, मालिकेला लागणाऱ्या वस्तूंची सोय करणारे प्रोडक्शनवाले, ध्वनीलेखन करणारे, संगीत पुरवणारे, संकलन करणारे, सेट लावणारे, आणि या प्रत्येकाचे दोन-तीन सहाय्यक, शिवाय सेटवर काम करणारे मदतनीस, (ज्यांची ओळख ‘स्पॉट बॉयज’ अशी असते, पण प्रत्येक सेटवर ज्यांना सर्रास ‘दादा’ म्हंटलं जातं,) आणि या सगळ्यांची कुटुंबं.. म्हणजे किमान शंभर माणसांना रोज दोन वेळचं जेवण एक मालिका देत असते. हा फक्त एका मालिकेचा हिशोब आहे. प्रत्येक वाहिनीवर असणाऱ्या रोजच्या सहा ते सात मालिका आणि अशा आठ ते अकरा वाहिन्या..! करा हिशोब..!! यात वाहिन्यांमधे नोकरी करणारे मी मोजलेच नाहीएत.
‘एवढ्या लोकांच्या पोटाला अन्न देतात म्हणून कशाही मालिका बनवायच्या काय?’

फार कळीचा प्रश्न आहे हा. पण त्यालाही उत्तर आहे आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे. हल्ली तंत्रज्ञान इतकं विकसित झालेलं आहे की, कुठल्या मालिकेतला कुठला सीन, किती लोकांनी, किती वेळ पाहिला याचा रोजचा पूर्ण लेखाजोखा वाहिनीकडे येतो. हाच ‘टीआरपी चार्ट!’ प्रत्येक मालिकेचं काम पाहण्यासाठी वाहिनीने त्या-त्या मालिकेला आपल्याकडून एक ‘कार्यकारी निर्माता’ दिलेला असतो. वाहिनीचा हा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, निर्मिती-संस्थेच्या क्रिएटिव्ह हेडबरोबर सतत संपर्कात असतो. हीच मंडळी टीआरपी चार्टचा अभ्यास करून त्यानुसार आपल्या मालिकेत बदल करण्याविषयी निर्मात्याला सुचवतात आणि एक्झिक्युशन लेवल’वर ते बदल होताहेत की नाही यावर लक्ष ठेवतात. हे अतिशय कौशल्याचं काम असतं. आणि ते करणारी वाहिनीतली सगळी माणसं त्यात तज्ज्ञ असतात, प्रशिक्षित आणि अनुभवी असतात. त्यांना लहर आली म्हणून ते कुठल्याही मालिकेत बदल करत नसतात. ते फार जबाबदारीचं काम असतं. टीआरपी बघून त्यांना प्रेक्षकांचा ‘कल’ कळतो आणि त्यानुसार मालिका बनवल्या किंवा बदलल्या जातात. फक्त मराठी मालिकांबद्दल बोलायचं झालं तर, सगळ्या मराठी वाहिन्यांवरून प्रसारित होणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या मालिकांचे, सोमवार ते शनिवार प्रसारित झालेली सगळ्या भागातली सगळी दृश्यं, किती प्रेक्षकांनी किती वेळ सतत बघितली, कुठल्या सीनच्या वेळी चॅनल बदललं गेलं, त्यावेळी सदर मालिकेतलं कुठलं दृश्य सुरु होतं, त्यात कोण काय बोलत होतं, त्याचवेळी स्पर्धक वाहिनीवर असं काय सुरु होतं ज्यामुळे चॅनल बदललं गेलं, या हिशोबाचा तक्ता नुसता कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बघून माझ्यासारख्या माणसाचे डोळे फिरतात. आणि वाहिन्यांमध्ये बसलेली तज्ज्ञ मंडळी त्याचा ताबडतोब अभ्यास करून त्यातून निष्कर्ष काढत असतात. ‘उद्या करू’ हा शब्दप्रयोग तिथे चालत नाही. कारण आलेल्या नंबर्सनुसार पुढचे निर्णय घ्यायचे असतात. स्पर्धेत टिकायचं असतं. आणि हे सगळं कोणासाठी? कुणामुळे? आणि कोण ‘करवून’ घेत असतं?? मायबाप प्रेक्षक..!!

लोकशाही जशी लोकांसाठी, लोकांकडून, लोकांमुळे असते. तशाच मालिका देखील प्रेक्षकांसाठी, प्रेक्षकांकडून, प्रेक्षकांमुळे असतात. आम्ही सगळे तर फक्त निमित्तमात्र असतो. ‘मायबाप’ जे मागणार ते देण्याचं आमचं काम. आणि त्यामुळे मी अतिशय अभिमानाने सांगते की, होय, मी मालिका लिहिते. आणि माझ्या कामावर माझी श्रद्धा आहे, प्रेम आहे. मालिकांबद्दल मला कृतज्ञता वाटते!

सूचना: माझ्या काही मालिकांचे फोटो दिले आहेत. अलका कुबलने टीव्हीवर काम सुरु केलं तेव्हा तिची पहिली मालिका ‘आकाशझेप’ची कथा, पटकथा, संवाद माझे होते म्हणून तिचा फोटो दिलाय. बाकीचे तुम्ही ओळखाल. या माझ्या ‘काही’ मालिका आहेत.

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

(मिथिला सुभाष यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात – मिथिला सुभाष– type करा आणि Search वर क्लिक करा.)

Previous articleहोय, मी मालिका लिहिते!
Next articleजोतिबा, सावित्रीबाईंचे शिक्षक रेव्ह , जेम्स मिचेल आणि मिसेस मिचेल
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here