अश्लील उद्योग मित्र मंडळ

-सानिया भालेराव

धर्मकीर्ती सुमंतने लिहिलेला आणि अलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ हा पिक्चर बऱ्याच कारणांसाठी स्पेशल आहे. अश्लील उद्योग हा मराठीतला एक वेगळा प्रकार नक्कीच आहे. आजवर मराठीत काहीच वेगळं होत नाही, तेच ते जुने पुराणे विषय घेऊन चित्रपट बनवतात असं सतत टोमणे मारायचं एक फॅड आहे. मग जेंव्हा वेगळे विषय अशा चित्रपटातून हाताळले जातात तेंव्हा आपण बॅकसीट का घ्यावी? चित्रपटाची गोष्ट सांगत नाही कारण ट्रेलर चित्रपटाला संपूर्ण न्याय देणारं आहे. कॉमिक पॉर्न स्टारसाठी असणारं ऑब्सेशन, आजच्या तरुण पिढीचा सेक्स आणि एकूणच सेक्शुएलिटीबाबत असणारा दृष्टीकोन आणि यात हरवत जाणारं त्यांचं तारुण्य. हा विषय मुळातच मला स्वतःला फार इंट्रेस्टिंग वाटला. बाकी तसंही चित्रपटाची समीक्षा वगैरे मला करता येत नाही, पण या चित्रपटाच्या निमित्ताने काय वाटलं यावर लिहिलं गेलं पाहिजे.

मुळात अश्लीलता म्हणजे नक्की काय असा विषय.. जास्त बोलल्या न जाणारा हा विषय चित्रपटातल्या आतिष, सना, पूर्णा, फ्लेक्सी,चळ, श्रीराम, पीव्ही, कॉमिक पॉर्न स्टारची इमजे कॅरी करणारी सई आणि अतिशच्या आयुष्यातला वेगवेगळी रूपं घेऊन येणारा अमेय वाघ यांच्या थ्रू आपण बघतो.आजची तरुण पिढी ज्या व्हर्चुअल अनुभवांनी ग्रासली आहे यात सेक्शुअल फेंटसीज हा फार गंभीर विषय. पॉर्न ऍडिक्शन आणि त्या अनुषंगाने वाहवत जाणारी ही पिढी. आपण कितीही डोळे मिटून याकडे दुर्लक्ष केलं तरी हे आहे. खरं तर जेंव्हा आतिश या पिक्चरमध्ये ती कॉमिक्स वाचतो तेंव्हा जाम नॉस्टॅल्जीक वाटतं. ती तसलीं पुस्तक तारुण्यसुलभ वयात सगळ्यांनीच वाचली असतात खरं तर. पण आज उघडपणे ‘हो आम्ही वाचली होती’ असं किती जण/जणी म्हणतील? आणि आपण जे करतो पण बोलत नाही.. कदाचित त्यालाच अश्लील म्हणत असावे किंवा जे खरंतर करावसं वाटत आणि करतो सुद्धा मनातल्या मनात ते असावं अश्लील..

चित्रपटात बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टींतून काही इशूज एड्रेस केले आहेत. सनाचं बायसेक्शुअल असणं, पूर्णाचं मुलगी असूनही काहीसं कूल असणं, आतिशच्या मनातल्या डेमनचा चेहेरा एकच.. अमेय वाघ.. तोच चेहेरा त्याला कॉलेजच्या चपराश्यामध्ये किंवा पोलिसामध्ये दिसणं.. अतिशच स्लो बर्निंग कॅरेक्टर.. जाम डोक्यात जाणारं.. दिशाहीन तरुण वगैरे.. सईचं स्त्रीला तिच्या देहापलिकडे पाहा असं सांगणं.. काहीसं प्रीची वाटणारं पण तरीही..चित्रपटाची नेरेटिव्ह स्टाईल थोडी वेगळी. मला “The End of the F***ing World” या टीव्ही सिरीजची फार आठवण येत होती हा चित्रपट पाहताना. काही ठिकाणी नक्कीच थोडा दिशाहीन होतो हा चित्रपट पण तरीही धर्मकीर्तीचे डायलॉग्स, अभय महाजनचा सॉलिड अभिनय, पर्ण आणि सायलीची त्याला उत्तम साथ, आणि अलोक राजवाडेचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच क्रेडीटेबल आहे. आपल्याला वेगळं पाहायचं असतं, त्याची सुरवात होत असेल तर त्यात चुका काढत बसण्यापेक्षा प्रेक्षक म्हणून वेलकमिंग राहायला पाहिजे. असे पिक्चर प्रोड्युस करताना होणारे हाल, रिलीजच्या वेळी नोटिसा पाठवून दिले जाणारे त्रास.. हे असं होत राहीलं तर प्रयोगशीलतेला वाव मिळेल का? या चित्रपटाच्या शिर्षकाला विरोध केल्या गेला एका विशिष्ट विचारांच्या संघटनेकडून.. का तर म्हणे ही एक सॉफ्ट पॉर्न फिल्म आहे..अरे क्काय.. जग कुठे चाललंय.. आपण कुठे आहोत.. चित्रपट न बघताच हे असं जोखणं.. मला म्हणून विचाराल तर खरी अश्लीलता हीच. चित्रपटांचं होणारं हे असं मॅड सेन्सरींग.

या चित्रपटातल्या काही जागा मला जाम आवडल्या. एकतर आतिशचं सनासाठी खदखदणारं प्रेम.. आपल्याला ते वरकरणी फिजिकल वाटत असलं तरी ते तसं नसणारं… प्लॅस्टिकच्या फुलाने त्याच्या सुवासाने मन प्रसन्न करावं तसं.. सेक्स म्हणजे काय.. हा सईचा मोनोलॉग मला कैच्या कै आवडला. पुरुष आयुष्यभर एकाकीचं असतो आणि काही काळापुरतं का होईना स्त्री बरोबर तो आपलं ते एकटेपण घालवू पाहतो, एकरूप होऊ पाहतो.. अशा आशयाचं वाक्य. लिहिणाऱ्याच्या सेन्सिबिलिटीला दाद द्यायला हवी. जास्त लिहीत नाही कारण स्पॉयलर्स होतील मग अशा काही भारी मोमेंट्स आहेत या फिल्ममध्ये. फिल्म संपल्यावर बाहेर जेवत असताना मैत्रीण म्हणाली ” हमारे लिये भी ऐसा कुछ बनाना चाहिए यार “.. यावर मला खदखदून हसायला आलं. माझ्या मुलीच्या मुलीच्या मुलीच्या मुलीच्या मुलीच्या मुलीच्या मुलीला जेंव्हा मुली होतील, निदान तेंव्हा तरी हे असं काही शक्य होईल का असं वाटून गेलं? आणि लिहिलंच धर्मकीर्तीपासून प्रेरित होऊन माझ्यासारख्या एखाद्या वेडीने एखादीने, आणि केलंच डायरेक्ट अलोक सारख्या नितळ मनाच्या तरुणीने आणि लावले पैसे एखाद्या वेड्या प्रोड्युसर बाईने… तर कितीशे लीगल नोटिसा येतील याचा हिशोब करता येणार नाही. मुलगी, बाई इरॉटिक वाचते ही तशीही अश्लील बाब. बुवाजी होतीच लिपस्टिक अंडर माय बुरखा मधली. इनफॅक्ट मी इरॉटिका वाचते असं बाई उघडपणे म्हणाली की तिचा फोन, इनबॉक्स आणि आयुष्य भिकार मेसेजेसनी आणि काही अंशी विशिष्ट मानसिकता असलेल्या पुरुषांनी भरून गेलंच म्हणून समजा.. अगदी आजही..

अश्लीलता जर स्वतःची सेक्शुअलीटी मान्य करून, सेक्शुअल डिझायर्स एक्नॉलेज करण्यात आहे, एकाच व्यक्तीवर प्रेम करून तिच्यातल्या विअर्ड गोष्टींकडे कानाडोळा करण्यात आहे, भरकटतानाही आपलं तारतम्य जागेवर ठेऊन हवेत उडण्यात आहे, स्वतःला एक्स्प्लोअर करताना स्वतःशी आणि आपल्या बरोबर असणाऱ्या लोकांशी प्रामाणिक राहून किडे करण्यात आहे, थर्ड डिग्री अंडा पाव खाण्यात आहे आणि आपण चुकतो आहोत हे लक्षात आल्यावर सावरण्याचा प्रयत्न करण्यात आहे.. तर कदाचित मी आहे अश्लील.. मी ना कोणाला जज करते आणि ना कोणी मला जज करतं याचा स्वतःवर परिणाम करून घेते.. स्वतःला तपासत, चुका करत, ठेचाळत आणि मग जमेल तसं शिकत चालते आहे..आतिष सारखे खूप वेळ ठेवून मोड आलेल्या बटाट्यासारखे दिसणारे तरुण पोरं पोरी पाहते मी.. रस्ता भटकणारे..बिविल्डर्ड अवस्थेत वावरणारे.. चित्रपट समाज परिवर्तन करू शकतो आणि करू शकत नाही सुद्धा.. प्रेक्षकाच्या सजगतेवर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. पण यानिमित्ताने असे विषय हाताळले जाणं, यावर बोलल्या जाणं आणि आपण अजूनही कसे कोशात अडकलो आहोत याची जाणीव होणं.. हे इतकं जरी झालं तरी ते पुरेसं.. Cheers to being “अश्लील”.. चिअर्स टू “अश्लील उद्योग मित्र मंडळ”!

-(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )
[email protected]

Previous articleमाझ्या आयुष्यातील रिमार्केबल महिला
Next articleॲरिस्टॉटलची तत्वमीमांसा (मेटाफिजिक्स)
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.