हिंदुत्ववादी व पुरोगामी : एकमेकांना ‘सुधारण्याची स्पेस’ नाकारत आहेत का?

बीइंग इन्क्विझिटिव्ह – १ 

-उत्पल व्ही. बी.

वसंत पळशीकर यांचा ‘गोध्रा’या शीर्षकाचा एक लेख ‘नवभारत’च्या मे २००२ च्या अंकात प्रकाशित झाला होता. हा लेख म्हणजे मिलिंद ओक यांच्या ‘गोध्रा’ या पुस्तिकेवरील टिपण आहे. भारतीय विचार साधना प्रकाशनाने ही पुस्तिका एप्रिल २००२ मध्ये प्रकाशित केली होती. भारतीय विचार साधना हे प्रकाशनगृह हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या प्रसारार्थ साहित्य प्रकाशित करते हे बहुतेक वाचकांना माहीत असेल. किशोर बेडकिहाळ यांनी संपादित केलेल्या ‘जिहाद, गुलाल आणि सारीपाट’ या पुस्तकात हा लेख आहे. हिंदू-मुस्लिम जातीयवादावरील (जमातवादावरील?) वसंत पळशीकरांच्या लेखांचं संकलन म्हणजे हे पुस्तक. हमीद दलवाई, नरहर कुरुंदकर, अ. भि. शहा यांच्या मुस्लिम जातीयवादाविषयीच्या भूमिकेवर टिप्पणी करणारे लेख या पुस्तकाच्या पहिल्या विभागात आहेत. शिवाय मुस्लिम मानसिकता, धर्मनिरपेक्षता/सांप्रादायिकता, भारत-पाकिस्तान संबंध आणि दंगली अशा पुढील चार विभागात इतर लेख आहेत.

‘गोध्रा’ या लेखात पळशीकर लिहितात की एका अंगाने पाहिल्यास विश्व हिंदू परिषद, तबलीगी जमात व तत्सम अन्य धर्मीय संघटनांच्या धर्मकेंद्रित कार्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण सामान्य अनुभव असा की ‘विशुद्ध धर्मा’चे पालन जसे वाढते तसे पालन करणाऱ्यांच्या ठायी कट्टरता, इतरांविषयी दुरावा, असहिष्णुता वाढते. याचे एक कारण हे की ‘विशुद्ध धर्म’ हा रेखीवपणे, धारदारपणे अन्य धर्मीयांपासून स्वतःचे वेगळेपण व श्रेष्ठत्व अधोरेखित करण्यावर भर देतो. त्याची मांडणी ही शब्दप्रामाण्य, ग्रंथप्रामाण्य वाढवणारी असते आणि एका धर्मपीठाची मक्तेदारी सत्ता प्रस्थापित करू पाहणारी असते. पळशीकर पुढे लिहितात की तबलीगी जमात, मदरसे किंवा विश्व हिंदू परिषद यांच्या संदर्भात मिलिंद ओक यांची दृष्टी सम नाही ही खरी समस्या आहे. तबलीगी जमात व अन्य मुस्लिम संघटनांचे कार्य त्यांच्या मनात तीव्र प्रतिक्रिया उत्पन्न करते, पण विश्व हिंदू परिषद व अन्य हिंदू संघटना यांचे कार्य मात्र तीव्र स्वागतशील प्रतिसाद उत्पन्न करते.

आपापल्या धर्माचे उन्नत व विशुद्ध रूप सिद्ध करण्याची बौद्धिक वा व्यावहारिक कृती योग्य दिशेने व वळणाने होत आहे याची खूणगाठ कोणती हा कळीचा प्रश्न आहे असं पळशीकर पुढे म्हणतात आणि ते महत्त्वाचं आहे.

काही महिन्यापूर्वी कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या भीषण घटनांमुळे जो जनक्षोभ उसळला होता त्याच्या आणि या घटनांमधील हिंदुत्वाच्या धाग्याच्या पार्श्वभूमीवर पळशीकरांचे वरील मुद्दे आठवतात. या घटनांवर, विशेषतः कठुआ येथील घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. मी स्वतःदेखील उद्वेगाने प्रतिक्रिया लिहिली. नंतर हिंदुत्वनिष्ठ मंडळींकडूनही प्रतिक्रिया आल्या. त्यात प्रामुख्याने निवडक निषेध, या घटनांचा संबंध हिंदू धर्माशी जोडणे याविरोधी प्रतिक्रिया होत्या. शब्दांची, विशेषतः तीव्र शब्दांची अडचण अशी असते की त्यांना उत्तर म्हणून तीव्रतर शब्द उमटू शकतात. हे घटनांनाही लागू होतं. कठुआसारख्या घटनेत जे झालं ते इतकं वाईट होतं की त्यावरील प्रतिक्रिया तीव्र असणं समजण्याजोगं होतं. बहुधा बऱ्याच हिंदुत्वनिष्ठ मंडळींना ते समजून घेता आलं नसावं. गेल्या काही वर्षांत आपलं परस्पर सौहार्द चांगल्यापैकी बिघडलेलं आहे. त्यात प्रतिक्रियांच्या अशा टकरीमुळे भर पडत असते.

याबाबत बोलावंसं वाटतं याचं कारण हिंदुत्वनिष्ठ आणि विरोधक यांच्यातील मारामारी आजची नसली तरी आज ती गंभीर वळणावर आहे असं दिसतं. त्यात समाजमाध्यमांचा वाटा अर्थातच मोठा आहे. दृष्टिकोनात मूलभूतच फरक असल्याने मतभेद राहणार हे उघड आहे. प्राचीन भारतातील जडवादी आणि चैतन्यवादी यांच्यातील संघर्षाचंच हे विस्तारित, ‘मल्टीपोलर’ रूप आहे असं म्हणता येईल. पण या वादात मुळातील वादविषयाचा धागा बाजूला पडला आहे की काय अशीही शंका कधीकधी येते. मुळातील जे वादविषय आहेत त्यात दृष्टिकोनातील फरकाबाबत फारसं काही करता येणार नाही, पण हा फरक बाजूला ठेवून प्रत्यक्ष जगण्यात आपण काही विधायक करू शकतो का असा विचार करायला हवा आहे. सुमारे दीड-एक वर्षांपूर्वी भाजप समर्थक कार्यकर्त्या शेफाली वैद्य यांच्याशी एक सविस्तर ‘व्हॉट्सअॅप चर्चा’ झाली होती. चर्चा चांगली झाली होती. त्यात मी त्यांना एके ठिकाणी असं म्हटलं होतं की मी तुमच्या बाजूला येणार नाही हे तुम्हाला माहीत आहे आणि तुम्ही माझ्या बाजूला येणार नाही हे मला माहीत आहे. त्यामुळे प्रश्न एवढाच उरतो की आपण ‘शांततामय सहअस्तित्व’ कसं टिकवायचं ?

मला असं दिसतं की जर काही गोष्टी खुलेपणाने स्वीकारल्या गेल्या तर हे होऊ शकेल. वरील चर्चेमध्ये शेफाली वैद्य मला असं म्हणाल्या होत्या की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही बऱ्याच समजूतदारपणे बोलताय. आता इथे आपण थोडं खोलात जाऊ. २०१४ पासून राजकीय आघाडीवर जे सुरू आहे ते आपण पाहतोच आहोत. त्याबरोबर सामाजिक ध्रुवीकरण झालं आहे, समर्थक-विरोधक कडाक्याने भांडतायत. या गदारोळात मीही आहे. माझंही एक मत आहे. भाजप का नको याविषयी माझं काहीएक म्हणणं आहे आणि ते मी मांडलेलं आहे. पण तरी सत्तेत असणाऱ्या पक्षाचं मूल्यमापन केवळ माझ्याच निकषांवर करता येत नाही हे मला मान्य आहे. तिथे ‘होलिस्टिक’ विचार करावा लागतो. मला ज्या पक्षाची वैचारिक बैठक मान्य नाही त्या पक्षाने जर काही चांगली कामं केली, धोरणात्मक दृष्ट्या चांगले निर्णय घेतले  तर मला ‘फक्त त्या गोष्टींचं स्वागत’ करता यायला हवं. मला आणि आपल्या सगळ्यांना आपल्यातील मतभेदांच्या वर जाऊन एकमेकांतील गुणांचं (ते गुण तत्कालिक प्रभाव टाकणारे असले तरी) कौतुक करता यायला हवं.

मी मागे एकदा लिहिलं होतं ते पुन्हा लिहितो. भाजपच्या बाबतीत अडचण अशी आहे की जे निगेटिव्ह आहे ते इतकं अस्वस्थ करणारं आहे की पॉझिटिव्हकडे बघावंसंही वाटत नाही. पण तरी उद्या समजा माझ्या दृष्टीने भाजप हा पक्ष ‘सुधारला’, माझ्या कडक निकषांवर तो खरा उतरला तर मी काय करेन? मग मला त्याला समर्थन द्यावं लागेल. पण राजकीय पक्ष वगैरे दूरची गोष्ट झाली. मला असं वाटतं की आज आपण एकमेकांमध्येच ही ‘सुधारण्याची स्पेस’ नाकारतो आहोत. तसा प्रयत्न आपण करत नाही आहोत. शेफाली वैद्य जर असं म्हणत असतील की तुम्ही उदारमतवादी वाटत नाही कारण तुम्ही समजूतदारपणे बोलताय तर उदारमतवादी लोकांबद्दल आज इतरांना काय वाटतं, जर ते नकारात्मक नसेल तर का हा विचार मी सुरू करेन. इथे पुन्हा शेफाली वैद्यांशी इतर बाबतीत सहमत होण्याचा प्रश्नच नाही. जिथे विरोध आहे तिथे विरोध आहेच. शेफाली वैद्य यांच्या व्यक्तिमत्वात समजूतदारपणा आहे/नाही हाही एक मुद्दा असू शकतो. पण त्यांच्या लिबरल्सबद्दलच्या अनुभवांममुळे त्यांचं जे रीडिंग आहे ते तपासून बघायला काय हरकत आहे? माझ्यात एखादी सुधारणा होऊ शकत असेल तर ती सुधारणा कुणी सुचवली याला मी महत्त्व देऊ नये. ‘मॅटर ऑफ फॅक्ट’ म्हणून मला ते स्वीकारता यायला हवं.

हिंदुत्ववाद आणि बिगर हिंदुत्ववाद या संघर्षात आणि इतरही टकरींमुळे ‘पुरोगामी’ शब्दाला नकारात्मक छटा आली आहे. वास्तविक वैचारिक कल म्हणून हिंदुत्ववादी, समाजवादी, कम्युनिस्ट अशा विभागण्या मान्य केल्या तरी हे काही ‘वॉटर टाइट कंपार्टमेंट्स’ नाहीत. धार्मिक विचारप्रणालीला आपल्या विचारविश्वात स्वतःच्या आत्मिक स्वास्थ्यासाठी स्थान देणारा पण धार्मिक आयडेंटिटी धारदार होऊ न देणारा मनुष्य पुरोगामी असू शकतो असं मला वाटतं. पळशीकर म्हणतात तसं ‘विशुद्ध धर्मपालन’ करताना कट्टरता, असहिष्णुता वाढते. त्यामुळे धर्मपालनाला जगण्यात काहीएक स्थान असणाऱ्यांची जबाबदारी वाढते. आज समंजस हिंदुत्व कुणीच बाळगत नाही का? मला वाटतं असे अनेक लोक आहेत, पण खरं सांगायचं तर मला हा प्रश्न गोंधळात टाकतो कारण माझ्या आकलनानुसार हिंदुत्व ही धारणा कट्टर मुस्लिम धार्मिकतेला उत्तर म्हणून निर्माण झाली आणि पुढे तिची वाटचाल कट्टर मुस्लिम धार्मिकतेच्या वास्तव/अस्थानी भीतीपोटी झाली आहे. (मला दोन शक्यता दिसतात म्हणून स्लॅश वापरलं आहे. हा मुद्दा चर्चेला खुला आहे.)  ती भारतीयत्वाकडे न जाता किंवा आधुनिकतेकडे न जाता हिंदुत्वाभोवतीच रेंगाळत राहिली आहे. त्यामुळे प्रतिक्रियारहित अशी निव्वळ हिंदुत्व अशी काही संकल्पना आहे की नाही हे बहुधा तपासावं लागेल. जे असमंजस, विखारी हिंदुत्व आहे त्याचं दर्शन होत असतं. त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया येतात. यात गडबड अशी होते की या प्रतिक्रियांमुळे समंजस हिंदुत्ववादी दुखावले जाऊ शकतात. पण अशा प्रतिक्रिया, असा उद्वेग येणार हे त्यांनी समजून घ्यायला हवं.

हिंदू समाज हा एका अर्थाने सहिष्णू आहे म्हणूनच अशा प्रतिकिया येऊ शकतात. हिंदू समाज जातीच्या बाबतीत अतिशय असहिष्णू असला आणि आज विखारी हिंदुत्व प्रभावी होताना दिसत असलं तरी हा समाज ढोबळ मानाने समावेशक वृत्तीचा आहे. यातली एक व्यावहारिक बाजू अशी आहे की ‘हिंदू’ म्हणून एकच एक चेहरा नसल्याने या समाजाला समावेशक असण्यावाचून पर्यायही नाही. याबाबत सुरेश द्वादशीवारांनी दिलेली उपमा चपखल आहे. त्यांनी एका लेखात म्हटलं होतं की किराणा-भुसारच्या दुकानात किराणा आणि भुसार या नावाच्या वस्तू अस्तित्वात नसतात. अस्तित्वात असतं ते मीठ, मोहरी, साखर, रवा इ. हिंदू धर्म असाच आहे. इथे ब्राह्मण, मराठा, धनगर, माळी आणि इतर अनेक जाती असतात. फक्त ‘हिंदू’ असा कुणी नसतो. हिंदुत्वनिष्ठ मंडळींचा नेमका हाच आग्रह आहे की आपण सगळे ‘हिंदू’ आहोत म्हणून आपण एकत्र यायला हवं. ‘हिंदू आयडेंटिटी’ हा त्यांच्या प्रेमाचा विषय आहे. यात त्यांना संमिश्र यश मिळालं आहे. एक मोठा समुदाय या आयडेंटिटीच्या छत्राखाली आला आहे हे खरं आहे. (त्यातूनच विखारही उत्पन्न झाला आहे हे पुन्हा नोंदवू.) पण दुसरा मोठा समुदाय या छत्राच्या बाहेर आहे. शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांना हिंदुत्ववाद्यांनी आपलंसं करण्यामागे संख्याबळ वाढवणे हा स्पष्ट हेतू आहेच. अन्यथा हिंदू धर्माचे कठोर टीकाकार असलेले, हिंदू म्हणून मी मरणार नाही असं म्हणणारे आंबेडकर स्वीकारण्यामागची संगती लावता येत नाही.

माझा रोख समंजस हिंदुत्व, आजच्या संदर्भात पुरोगामी विचार म्हणजे काय, धार्मिकता आणि पुरोगामित्व ‘म्युच्युअली एक्स्क्ल्यूझिव्ह’ आहे की नाहीये, या दोघामंध्ये काही देवाणघेवाण शक्य आहे का या शोधाकडे आहे. हिंदुत्वाचा स्पेक्ट्रम सहिष्णुतेकडून टोकाच्या असहिष्णुतेपर्यंत विस्तारल्याने त्याला चिकित्सा, टीका, फटकारे या सगळ्या गोष्टीना सामोरं जावं लागणार हे मुळात समंजस हिंदुत्ववाद्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आता या प्रतिक्रिया, फटकारे फक्त हिंदू कट्टरतावादालाच का या मुद्द्यावर आणि समंजस हिंदुत्व, पुरोगामी विचार यांच्या सहअस्तित्वाशी संबंधित मुद्द्यांवर पुढच्या भागात बोलू.

 

(लेखक ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे संपादक आहेत)

9850677875

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Previous articleसोनचिडिया: अव्वल आधिभौतिक अनुभव देणारा चित्रपट
Next articleवो नहीं मेरा, मगर उससे मुहब्बत है तो है…!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here