आपल्याला माहीत असलेल्या महाभारताची ही मूळ स्त्री. कौरव-पांडवांची पणजी. धृतराष्ट्र-पंडूची आजी आणि भीष्माची आई..!! सावत्र आई..!! (मधल्या अंबिका, अंबालिकाला कुणी विचारतच नाही. पण मी तुम्हाला) थोडक्यात कथा सांगते.. ती सांगता-सांगताच माझं इंटरप्रिटेशन लिहिते. सत्यवतीपासून सुरु करू.
ही कोळीण होती. मी नेहमी तुम्हा सगळ्यांना ‘मुखवटा’ कादंबरी वाचायला सांगते. कारण, आपण बहुतेक सगळे आपल्या जाती-वंशाचा अभिमान धरून असतो. ती जात आणि वंश कुटुंबातल्या पुरुष पूर्वजांची असते. पण आपली गुणसूत्रे स्त्री पूर्वजांकडून देखील आलेली असतात. आणि त्यांच्या जाती काहीही असू शकतात. सत्यवतीनंतरचा पूर्ण कुरूवंश कोळणीचा वंशज होता. असो!
महाभारताची मूळ स्त्री म्हणून सत्यवती महत्त्वाची आहेच, पण तिचं आयुष्य देखील अतिशय सनसनीखेज आहे. माणूस किती महत्त्वाकांक्षी असू शकतो आणि नियती कशी त्याच्या पाठीशीच दबा धरून बसलेली असते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे सत्यवतीचं आयुष्य! तिच्या जन्माची पण एक चित्तरकथा आहे. शिकारीला गेलेल्या एका राजाने आपले वीर्य एका द्रोणात घालून राणीकडे पाठवलं, ते नदीत सांडलं, एका माश्याने (स्त्रीलिंगी) ते गिळलं आणि त्यातून जन्म वगैरे..!! पण निषाद (म्हणजे कोळी) राजाला जाळ्यात सापडलेल्या एका मोठ्या माशाच्या पोटातून ही कन्या मिळाली. तिच्या अंगाला अतिशय उग्र अशी माशांची दुर्गंधी होती. ती निषादाच्या घरात वाढायला लागली. अतिशय देखणी, मादक अशी ती होती. (इतर गुण तुम्ही जोडा.) पण तिच्या शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे कुणी तिच्याशी बोलायला पण जात नसे. यमुना नदीतून प्रवाशांना या काठावरून त्या काठावर घेऊन जायची. अशातच एकदा तिच्या नावेत पाराशर ऋषी येऊन बसले. प्रवासात त्रास नको म्हणून त्यांनी तिच्या शरीराचा माशांचा वास घालवून तिथे कस्तुरीचा सुगंध आणला. सत्यवती उपकृत झाली. तिने ऋषीचे पाय धरले आणि त्याला सांगितलं की मी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे. ऋषीने लगेच नावेभोवती धुकं तयार केलं आणि सत्यवतीशी संभोग केला. या संभोगातून व्यासऋषी जन्माला आले. (ही सुरुवातीची कथा थोडक्यात सांगतेय रे मुलांनो!) नियती बहुतेक त्यावेळी खदखदा हसत असावी. कारण हे घडलं नसतं तर महाभारत घडलं नसतं. झालं, व्यास जन्माला आला. “तुला तुझ्या मुलाची आठवण आली तर कधीही त्याचे स्मरण कर, तो उपस्थित होईल,” असं सांगून पाराशर आपल्या मुलाला सोबत घेऊन निघून गेला आणि सत्यवती पुन्हा कुंवार झाली.
आता मत्स्यगंधा सत्यवती, योजनगंधा सत्यवती झाली. तिच्या अंगगंधाने वेडावलेला हस्तिनापुरचा राजा शंतनू सारखा घोडा फेकत यमुनेच्या काठावर यायला लागला. पण पोरगी हुशार झाली होती. “लग्न कर आणि मगच तुला जे हवे ते मिळेल,” अशी अट टाकली. इथून तिच्या महत्त्वाकांक्षेचा वारू उधळला! अखेर राजाने तिच्या बापाकडे जाऊन तिला मागणी घातली. लेकीने बापाला कानमंत्र दिला. त्यानुसार निषादराजाने शंतनूला सांगितलं, “तू हिच्याहून एवढा मोठा, त्यातून विधुर, एका तरुण मुलग्याचा (भीष्माचा) बाप. उद्या तू उलथलास तर माझ्या पोरीचे हाल कुत्रं खाणार नाही. त्यामुळे तू मला वचन दे की हिला आणि तुला जो मुलगा होईल तोच तुझ्या राज्याचा राजा होईल!”
शंतनूला एकदम भीष्म आठवला. पुत्रप्रेम उफाळून आलं. (भीष्म समोर उभा ठाकला असता तर आपलं काही खरं नाही, हेही आठवलं असेलच!) शंतनू तिथून निघून गेला. पण तो उदास राहायला लागला. “चाफा बोलेना, चाफा हसेना, चाफा जेवेना”टाईप्स! अखेर भीष्माने बापाला कारण विचारलं. बापाने ते सांगितलं. भीष्माला तेव्हापासूनच (आपलं सोडून) बाकीच्यांची लग्नं लावून देण्याची खोड होती. तो निषादराजाकडे पोचला. आपल्या बापासाठी सत्यवतीला मागणी घातली. निषादने त्याच्या अटी सांगितल्या. त्याला म्हणाला, तू एक वेळ गप बसशील. पण तुझं लग्न झाल्यावर तुझी बायको मुलं गप बसणार नाहीत. हे ऐकलं आणि भीष्माने त्याची ती जगप्रसिद्ध प्रतिज्ञा केली! “मी आमरण ब्रह्मचारी राहीन!” (पण तुम्हाला एक माहीत आहे का? भीष्माच्या डिफॉल्ट सिस्टीममधे काहीतरी गडबड होती असा एक विचारप्रवाह आहे. आज देखील किन्नर जमात भीष्माला आपला देव मानते. असो.)
राजा शंतनू खुश झाला. त्याने भीष्माला ‘इच्छामरणा’चं वरदान दिलं. शंतनू-सत्यवती विवाह झाला. त्यांना चित्रांगद आणि विचित्रवीर्य नावाचे दोन मुलगे झाले. चित्रांगद एका युद्धात मेला, त्या धक्क्याने राजा शंतनू मेला.
विचित्रवीर्य लग्नाचा झाल्यावर भीष्माने त्याच्यासाठी काशी नरेशच्या तीन मुली पळवून आणल्या. त्यातल्या अंबेची गोष्ट तुम्ही इथेच वाचली आहे. अंबिका आणि अंबालिका मात्र विचित्रवीर्याच्या तावडीत सापडल्या. पण व्यसनाधीनतेमुळे राज्याला वारस दिल्याशिवाय विचित्रवीर्याचा मृत्यू झाला.
आता सुरु होते सत्यवतीची खरी कहाणी! आणि ओघाने येणाऱ्या अंबिका-अंबालिकाची देखील हीच कहाणी. त्यांच्या नशिबात ‘ओघाने येणे’च आहे, मुख्य प्रवाहाचा मान नाही!
राज्याला वारस नाही म्हंटल्यावर सत्यवती हवालदिल झाली. तिने भीष्माला सांगितलं की तू तरी लग्न कर. पण तो बाबा शब्दाचा (आणि लंगोट का) पक्का! काय करावं ते सत्यवतीला सुचेना.. तिला व्यासाची आठवण आली. भीष्मपेक्षा वयाने लहान असेल पण माझा थोरला मुलगा आहे! तिने भीष्माला विश्वासात घेतले. त्याला सगळं सांगितलं. यमुनेत असलेल्या एका बेटावर तपसाधनेत मश्गुल असलेल्या व्यासाला हस्तिनापुरी आणण्यात आलं.
वर्षानुवर्षे आंघोळ न केलेली, अंगावर मळाची पुटे, केसांच्या जटा झालेल्या, नखं वाढलेली, असा तो व्यास आपल्या आईसमोर उभा राहिला. तिने आपल्या या वेदशास्त्रसंपन्न ऋषीपुत्राला आदेश दिला की तुझ्या दोन्ही भावजयांशी (अंबिका-अंबालिका) अंगसंग कर आणि नियोग पद्धतीने पुत्रप्राप्ती होऊ दे.
किती करुण आहे हे. मला लिहितांना देखील त्रास होतोय. अंबिका आणि अंबालिकाच्या मनाचाच नव्हे तर त्यांच्या शरीराचा देखील विचार केला गेला नाही. आणि हे केलं सत्यवतीने. शारीरिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या पण एरवी समर्थ असलेल्या नवऱ्याची शेज सजवणे आणि स्त्री-संगाच्या बाबतीत पूर्ण अनभिज्ञ असलेल्या अडाणी परपुरुषाशी संग करणे, या दोन्ही गोष्टी अतिशय मनस्तापाच्या, शारीरिक वेदनेच्या आणि अपमानाच्या असतात. दोन्हीकडे वेगवेगळ्या कारणाने ओरबाडणे, हिसकावून घेणे असते. त्यातून हे काही एखाद वेळेला घडले नसेल. विचित्रवीर्य नवराच होता, राजकुमार होता, लग्नानंतर काही वर्षे जिवंत होता. आणि त्याच्या निधनानंतर व्यास ऋषी..!! दोघीजणी गरोदर होईपर्यंत व्यास महालात होते. राजकुळाला वारस मिळावा म्हणून, इच्छा नसली तरी मुकाट्याने, नको असलेल्या एका पुरुषाला आपल्या शरीराचा भोग घेऊ देणं..!! स्त्रीचा याहून मोठा अपमान शक्य नाही..!! त्या फक्त मुलाला जन्म देणाऱ्या ‘यंत्र’ होत्या. आधी नवऱ्याचे ‘यंत्र’ आणि मग व्यासाचे.
ज्या वयात प्रेमाचे विभ्रम मनावर मोरपीस फिरवतात, त्या वयात या दोघी विकृत नवऱ्याच्या तावडीत होत्या. त्याच्यावर अनेक वैद्यांचे उपचार सुरु होते, म्हणजे ‘पुत्रकामेष्टी यज्ञ’ होतच असणार. आणि ज्या वयात स्पर्शाच्या किमयेने मनाची कळी खुलवायची, त्या वयात दोघींना, बायकांच्या बाबतीत निपट अनाडी व्यासाची शेज सजवावी लागली, त्याची मुलं जन्माला घालावी लागली.. या दोघी अक्षरश: मातीमोल झाल्या… आणि ते सारे त्यांची सासू सत्यवती हिच्या देखरेखीखाली..! अशा स्त्रिया फक्त पायाभरणीच्या कामी येतात, कळसावर कधीच पोचत नाहीत..!! मग त्या अंबिका-अंबालिका असोत, नाहीतर सत्यवती. ‘महाभारत’ म्हंटल्यावर द्रौपदी, कुंती, गांधारी आठवतात, विद्रोह करणारी अंबा आठवते. झाडून सगळ्या कमनशिबी..!! पण काहींना ‘स्मरणा’चे वरदान पण नाही. त्यातल्या अंबिका-अंबालिका. त्यातलीच सत्यवती.
कथेकडे येऊ परत! व्यासाचा अवतार बघून अंबिकेने भीतीने डोळे मिटले, तिला नेत्रहीन पुत्र झाला. धृतराष्ट्र! अंबालिका व्यासाचे भयंकर रूप पाहून भीतीने पांढरी पडली. तिला पंडू झाला. एक राजपुत्र तरी धड असावा म्हणून तिसऱ्यांदा ‘नियोग’ करायचा असं ठरवलं गेलं. अंबिकेच्या शयनकक्षात व्यासाला पाठवलं. पण ती एवढी घाबरलेली होती की तिने दासीला पुढे केलं. म्हणायला दासीपुत्र, पण अतिशय विद्वान, निर्व्यंग विदुर जन्मला. दासीपुत्र असल्यामुळे युवराजपद त्याला मिळालं नाही. तशी तर सत्यवती पण क्षत्रिय नव्हती, तिचा वंश स्वीकार केला गेला. कारण ती निषाद’राजा’ची कन्या होती आणि दासी होती तशाच एका सेवकाची कन्या.
सत्यवतीने जे-जे ठरवलं ते-ते नियतीने हाणून पाडलं. पांडवांना जन्म झाल्यावर जेव्हा पंडू मेला आणि सत्यवतीची नातसून कुंती, विधवा म्हणून समोर आली, तेव्हा सत्यवती वैफल्याने ग्रासली. तिने पुन्हा एकदा आपल्या मोठ्या पुत्राला-व्यासाला बोलावून घेतलं. व्यास त्रिकालज्ञानी होता. त्याने कुरुकुलाचे भविष्य आपल्या मातेला सांगितलं. भावनिकदृष्ट्या खचलेली, सर्व बाजूने कोसळलेली सत्यवती आपल्या दोन सुना, अंबिका आणि अंबालिकेला घेऊन वानप्रस्थाला निघून गेली आणि तिथेच तिघीजणी अन्नत्याग करून मरून गेल्या..!!
इमारत बनवण्यासाठी हजारो विटा येतात. त्यातल्या काही पायाभरणी करतात, काही कळसाला लागतात आणि काही फुटून तिथल्याच मातीत मिसळतात. सामान्य माणसाला कळसाची वीट दिसते, सुजाण लोकांना पायाभरणीत लागलेल्या विटांची जाण असते. पण फुटून मातीत मिसळलेल्या विटा कुणाच्याच खिजगणतीत नसतात. सत्यवती, अंबिका आणि अंबालिका या अशाच महाभारतातल्या फुटून मातीमोल झालेल्या विटा.