ओबीसी ह्या प्रवर्गाचे जन्मदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर

-प्रा. हरी नरके

बौद्धांचे आणि अनुसुचित जातींचे उद्धारकर्ते अशी आज डॉ. बाबासाहेब आंबडकरांची प्रतिमा माध्यमांनी तयार केलेली आहे. महात्मा गांधी, पं. नेहरू, लो. टिळक हे सार्‍या देशाचे नेते मात्र डॉ. बाबासाहेब हे दलितांचे नेते अशी जाणीव कोरण्यामागचे राजकारण कधीतरी आम्ही शांतपणे समजून घ्यायला हवे. ४० वर्षांपूर्वी मी नामांतर आंदोलनात तुरूंगात गेलो तेव्हा तिथे मी नानाविध जातीधर्माचे सत्याग्रही लोक बाबासाहेबांना मानणारे पाहिले. त्यांच्याशी बोलल्यावर माझी मनोमन खात्री झाली की बाबासाहेबांना असे मर्यादित, सिमीत करण्यामागे एक कारस्थान आहे. आज बाबासाहेब हे जगातले सर्वाधिक अभिमानाचा जसा विषय आहेत तसेच ते सर्वाधिक द्वेशाचेही धनी आहेत ह्यामागचे एंटायर पॉलिटिक्स काय आहे?

बाबासाहेबांनी आरक्षण आणल्यामुळे आमचे नुकसान झाले असे सवर्णांमध्ये जाणीवपूर्वक बिंबवले जाते. एका बाजूला बाबासाहेबांचे अपहरणही करायचे आणि त्याचवेळी तरूण पिढीमध्ये त्यांच्याबद्दल द्वेशही पसरवायचा असा दुटप्पी व्यवहार कोण करतेय?

बाबासाहेबांनी १९३० मध्ये सर्वप्रथम ओबीसी हा प्रवर्ग जन्माला घातला हे किती बलुतेदार, अलुतेदार [ शूद्र ] लोकांना माहित आहे? त्यांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा नेहरू सरकारमध्ये ओबीसींना न्याय मिळत नव्हता म्हणून दिला होता हे कितीवेळा सांगितले जाते? किती कुणबी, माळी, तेली, वंजारी, आग्री, सुतार, शिंपी, सोनार, मराठ्यांना माहित आहे की बाबासाहेबांच्या हृदयात आणि चळवळीत सर्वाधिक जिव्हाळ्याचा विषय ओबीसी हा होता? स्वतंत्र ओबीसी जनगणनेची १९४६ साली त्यांनीच सर्वप्रथम मागणी केलेली होती.

१०२ वर्षांपूर्वी १९१८ साली त्यांनी शेतकर्‍यांच्या व्यथा, त्यांच्यापुढच्या शेतीसमस्या मांडणारं पुस्तक लिहिलं. “स्मॉल होल्डींग्ज इन इंडीया अ‍ॅंड देअर रेमेडीज”. त्यांचे हे पुस्तक किती शेतकरी जातींना माहित आहे? शेतीवरचा बोजा कमी करा, एकच मुल शेतीत ठेवा, बाकीच्यांना तिथून बाहेर काढा नी उद्योग, व्यापार, शिक्षण, सेवा क्षेत्रात घाला. शेतीमालाला योग्य बाजारभाव, सिंचन आणि उद्योगाचा दर्जा मिळायला हवा. शेतकरी सुखी तर देश सुखी. हे उपाय तातडीने केले नाहीत तर शेतकरी डेंजर झोनमध्ये येईल असं भाकीत त्यांनी शंभर वर्षांपुर्वी केलं होतं. एकप्रकारे त्यांनी शेतकरी आत्महत्त्यांचा इषाराच दिला होता.

शरद जोशींनी शेतकरी चळवळीला आयुष्य वाहिले होते. आज शेतकर्‍यांवर त्यांचे अनंत उपकार आहेत. पण त्यांनी शेतकरीनेते म्हणून बाबासाहेबांचा वा त्यांच्या या पुस्तकाचा कधीही उल्लेख केलेला नाही. हा दोष त्यांचा की ” शेतकर्‍यांचे उद्धारकर्ते हे बाबासाहेबांचे योगदान ” मांडण्यात आम्ही आंबेडकरवादी कमी पडलो याचा शोध घ्यायला हवा.?

डॉ. बाबासाहेबांनी १९२९ साली पहिली शेतकरी परिषद घेतली. त्यांनी विधीमंडळावर काढलेला पहिला मोर्चा दलितांचा नव्हता तर शेतकर्‍यांचा होता.

कसणाराला जमीन मिळावी म्हणून त्यांनी १९३२ मध्ये खोती रद्द करण्याचे विधेयक लिहिले. १९३६-३८ ला सर्व ताकदीनिशी मुंबई असेंब्लीत ते मंजूर व्हावे म्हणून लढा दिला.

डॉ. बाबासाहेब हे फक्त दलितांचे हे समीकरण इतके घट्टपणे कोरले गेलेय की १९१९ साली सर्वप्रथम “सर्व भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे” असे साऊथबरो कमिटीला सांगणारे डॉ. बाबासाहेब फारसे सांगितलेच जात नाहीत.

भारत हा जगातला सर्वात मोठा लोकशाही देश आहे. आपल्या आधी, बरोबर आणि नंतर स्वतंत्र झालेले अनेक देश लोकशाही टिकवू शकले नाहीत. हुकुमशाही किंवा लष्करी राजवट त्यांच्या वाट्याला आली. आपल्या शेजारच्या एका देशात अलिकडेच डॉ. आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात आली. तेव्हा तिथल्या सर्व विचारवंतांनी आवर्जून एक मुद्दा पुन्हापुन्हा मांडला. त्यांच्या घटनेच्या कमकुवतपणामुळे त्यांची लोकशाही मृतप्राय झाली. भारताची राज्यघटनाच इतकी मजबूत होती, आहे की तिच्या लोकशाहीची प्रगल्भता दिवसेंदिवस वर्धिष्णू होत आहे. तिथले सगळे वक्ते म्हणत होते, ” काश, हमारा संविधान लिखने के लिये हमे भी एक बाबासाहब डॉ. अंबेडकर मिलते. हमेभी एक बाबासाहब भीमराव अंबेडकर चाहिए. हमेभी भारत जैसा प्रजातंत्र चाहिए!”

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार आहेत. याबाबतचं त्यांचं योगदान आपल्याला त्यांची “भाषणे आणि लेखन” यांचे जे राज्य शासनानं २२ खंड प्रकाशित केलेले आहेत त्यातून बघायला मिळतं. त्यांचे विचार आणि त्यांनी केलेल्या विविध चळवळी आजही प्रेरणादायी ठरतात. भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष आणि देशाचे कायदामंत्री म्हणून राज्यघटनेच्या निर्मितीचे ते प्रमुख शिल्पकार ठरले. बुद्धधम्मविषयक चिंतनातून त्यांनी भारतीय गणराज्यांच्या प्राचीन वारशाला लोकशाहीची नवी झळाळी दिली.

भारतीय राज्यघटनेत प्राचीन भारतीय परंपरा आणि सर्वंकष परिवर्तन यांचा समतोल साधण्याचं फार अवघड काम बाबासाहेबांनी केलं. खरंतर हे भीमधनुष्य पेलणं सोपं नव्हतं. संविधानाच्या रूपानं एक राजकीय-सामाजिक क्रांतिकारी विधानच त्यांनी अस्तित्वात आणलं. त्यातून भारताच्या आधुनिकीकरणाला जोरदार चालना मिळाली.

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.)

Previous article‘ग्रेटेस्ट’ इंडियन!
Next articleझुगझ्वँग आणि एको चेंबर्सचा घोळ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here