‘कामयाब’: संजय मिश्रा, हार्दिक मेहताचा इम्पॅक्टफुल चित्रपट

-सानिया भालेराव

संजय मिश्रा’ या अद्भुत माणसाचा आणि हार्दिक मेहता यांनी दिग्दर्शित केलेला बराच काळ स्मरणात राहील असा इम्पॅक्टफुल चित्रपट “कामयाब”! हा चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर आला आहे. हा पिक्चर मार्चमध्ये जेव्हा थिएटरमध्ये आला तेव्हाच पाहून आले होते. कारण हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नाही पाहिला तर च्यायला आपल्या चित्रपटवेडाला आयमिन “प्रेमाला” तोंड कसं दाखवणार?.. तर ही गोष्ट आहे टिपिकल बॉलिवूड मसाला पिक्चरमध्ये लिंबू टिंबू रोल करणाऱ्या एका ज्युनियर आर्टिस्टची (ज्यांना खरं तर कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणायला हवं) म्हणजे आपला “द संजय मिश्रा”.. एकेकाळी ज्युनिअर आर्टिस्ट किंवा साईडच्या साईडचा हिरो किंवा व्हिलन असे टिपिकल बॉलिवूड मसाला रोल करणारा.. जो आता एका छोट्या पोरीचा आजोबा झालेला आहे. अचानक एक दिवस एक रेडिओ चॅनल त्याला हुडकत येतं त्याच्या घरी, त्याच्या मुलाखतीसाठी.. ( त्या सीनमध्ये संजय मिश्रा अक्टिंगमध्ये बाप का आहे ते उमजतं ) आणि त्याला कळतं की आपले एकूण ४९९ पिक्चर झाले आहेत.. मग आता आता हा आकडा ५०० करायचा म्हणजे आयुष्यात काहीतरी केलं, मिळवलं असं वाटेल… असा विचार त्याच्या टक्कल पडलेल्या डोक्यात शिरतो आणि त्याच्या आयुष्यातला खरा पिक्चर सुरु होतो.. उमजतं का त्याला “कामयाब” होण्याचं गुपित निदान सरते शेवटी तरी.. ही या चित्रपटाची गोष्ट.

बॉलिवूडमधलं फसवं स्टारडम, जशी समाजात जातीची उतरंड आहे तशी तद्दन खोट्या स्टार पावरनुसार मायानगरीत अक्टर्सची वरची जात ते खालची अशी एक सिस्टीम असते.. हे सगळं हा चित्रपट बघताना जाणवत राहतं, अंगावर येत राहतं आणि रडवत राहतं.. काळजाचं पाणी करणारे बरेच मोमेंट्स आहेत चित्रपटात आणि ते पाहत असताना आपल्याला होणारं रियलायजेशन..आणि म्हणून हा चित्रपट खरंतर प्रत्येक माणसाचा आहे. बाकी स्टोरी सांगण्यात काही मजा नाही कारण चित्रपटावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसाने खरं तर आवर्जून थिएटरमध्ये ( आता ते शक्य नाही म्हणून नेटफ्लिक्सवर) जाऊन हा पिक्चर पाहायला हवा आणि अनुभवायला हवा पण या चित्रपटाच्या निमित्ताने एक दुसरी बाजू जी यामध्ये फार हळुवारपणे दाखवली आहे.. साईड हिरोसारखी.. ती म्हणजे एकूणच कामयाब आणि सक्सेसबद्दल असणारा हव्यास … याबद्दल जे जाणवलं ते लिहायला हवं..

आता माझे स्वतःचे असे प्रचंड व्हिम्स आहेत.. म्हणजे माझ्या आयुष्यात मी स्वतः वाढून घेतलेले चिक्कार प्रॉब्लेम्स आणि डोक्याला भुंगा लावणाऱ्या गोष्टी आहेत.. त्यातली एक अशी की मला जेव्हा पासून थोडी अक्कल आली तेव्हा पासून पिक्चर बघताना मेन हिरो हिरोईनपेक्षा “नको त्या लोकांकडे” माझं लक्ष जायचं.. जसं की हिरो – हिरोईनच्या मागे नाचणारे लोक.. म्हणजे हिरो मग तो अगदी आपला सल्लू भाई का असेना, कितीही भारी वगैरे नाचत असला तरी माझं लक्ष मात्र त्याच्या मागे जबराट मुंडी हलवून नाचणाऱ्या एक्सट्रा डान्सरकडेच असायचं.. सल्लू “दुलहन हम ले जायेंगे” कितीही स्टाईल मारत म्हणत असला आणि सरतेशेवटी दुलहन त्यालाच मिळणार आहे हे या येड्याला माहित असलं तरी आपल्यालाच ती मिळणार आहे रादर मिळाली आहे या आनंदात नाचणारा तो.. माझं सगळं लक्ष वेधून घ्यायचा… कतरिनाने कितीही लटके झटके मारले तरी तिच्या मागे नाचणाऱ्या पोरींमध्ये दुसऱ्या रांगेतली डावीकडून चौथी पोरगी, तिच्याकडे माझं लक्ष.. मेकअप गॉडी असूनही छान दिसणारी, आपल्याकडे कुणी फार बघणार नाहीये, पर डे नुसार आपल्याला चार पैसे मिळणार आहेत हे विसरून नाचणारी.. ती मुलगी.. यांच्याकडेच माझं लक्ष… व्हिलनचे चमचे, हिरोईनची मैत्रीण, हिरोचा चुलत काका, वगैरे लोकांबद्दल फार कुतूहल वाटायचं. मेन हिरो हिरोईन पेक्षा जरा जास्तंच आवडून गेलेले कित्येक रोल्स या लोकांचे मला आठवतात आणि आवडून गेले आहेत. हिरोचे वडील. हिरोईनची आई टाईप रोल करणारे ऍक्टर्स कित्येकदा मेन कॅरेक्टर पेक्षा उजवे. हे सगळे कलाकार म्हणजे कॅरेक्टर आर्टिस्ट.. यांनी कितीही जीव ओतून काम केलं तरी यांची सो कॉल्ड स्टार पावर खोट्या झगमगत्या सिताऱ्यांपेक्षा कमीच.. बोमन, संजय मिश्रा, केके मेनन, मनोज बाजपेयी, कुमुद मिश्रा, पंकज त्रिपाठी, इरफान,पियुष मिश्रा, दीपक डोब्रियाल, सीमा पाहवा ( जो आयरॉनिकली स्वतः या चित्रपटात आहे) असे काहीसे झळाललेले खरे सितारे बोटावर मोजण्या इतकेच.. यांचं स्ट्रगल, त्यांना मिळणारी वागणूक हे आपल्या पांढरपेशा मनाला न पचणारी आणि सहन न होणारी..

असा काय फरक पडणार होता या माणसाला एक पिक्चर करून? ४९९ चा पाचशे हा आकडा करणं इतकं महत्वाचं होतं का? सोबत मुलगी आहे, नात आहे तरीही हा माणूस या वयात काय शोधू पाहतो आहे? खरंच.. आपण जे केलं ते पुरेसं आहे किंवा मी आयुष्यात काहीतरी कमावलं हे वाटणं किती महत्वाचं असतं? यातला गमतीचा आणि दुर्दैवाचा भाग म्हणजे आपण काय कमावलं याच गणित प्रत्येकाचं वेगळं कारण हा हिशोब करण्याचे नियम प्रत्येकाचे वेगळे.. कामयाबी.. सक्सेस… यश.. याचं मोजमाप करायचं तरी असतं कसं? या एका प्रश्नाभोवती खरंतर आपलं आयुष्य फिरत असतं.. आपल्याही नकळत.. मला वाटतं प्रत्येक जन्माला येणाऱ्या माणसाची नैसर्गिक गरज ही असते की आपलं कौतुक व्हावं.. हे वेड आपल्यात कुठून येतं कोणास ठाऊक.. लहानपणी स्वतःत रमणारं बाळ पाहिलं आहे? कसं आपल्यात असतं ते.. काय बघू नई काय नाही अशी त्याची नजर असते.. आपण हसलो की आपलं कौतुक होतं हे काही दिवसांनी बरोब्बर कळतं त्या पठ्ठयाला आणि मग आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी ते पुढे प्रयत्न करत राहतं.. लहान पोराचं एका वयात आपल्यावर ड्रामा करणं हे याचंच एक्स्टेंशन.. माझ्याकडे लक्ष द्या.. मग ते रडून मिळणार असेल, चिडून मिळणार असेल, गाऊन, नाचून, अभ्यास करून, मेडल मिळवून इत्यादी इत्यादी करून मिळणार असेल.. अटेन्शन मिळणं ही कामयाब वाटण्याचा एक मार्ग.. आणि काहींच्या बाबतीत हे वय वाढलं तरी तसंच राहतं, वाढतही जातं..

व्यक्तिपरत्वे कामयाब वाटण्याचे हे मार्ग बदलत जातात.. काहींसाठी प्रसिद्धी, काहींसाठी पैसा, आकडे, नंबर…पाच हजार दोनशे एक्कावन्न गोष्टी असू शकतील.. प्रत्येकासाठी वेगळ्या.. आता कोणाला यश कशात दिसतं हा त्याचा वैयक्तिक आऊटलूक.. मोस्टली यशाच्या मोजमापाची वजनं भौतिक आणि मूर्त स्वरूपाची असतात.. मग तो माणूस सगळं विसरून मागे लागतो यशाच्या.. यात आपण काय गमावतो आहोत आणि काय कमावतो आहोत हे त्याला काही काळाने लक्षात येतं.. काही जणांना शेवट आला तरी उमजत नाही, काहींना वेळ गेल्यावर उपरती होते आणि काहींना वेळ हाती असतांना.. आता ज्यांना ही जाणीव हातातून वेळ निसटून जायच्या आधी होते.. कदाचित तेच खरे “कामयाब”.. आणि हा चित्रपट अत्यंत सटली आपल्याला हे सांगून जातो. मित्रांचा घोळका, जमवलेली पुस्तकं, कमवलेली माणसं, साठवलेलं मैत्र, प्रेम, नाती.. यात समाधान शोधता येऊ शकतं.. काळाची ती गरज आहे आणि इथून पुढे ती वाढत जाणार आहे हे माझ्या पिढीला जर आता याच क्षणी कळू शकलं तर कामातला राम आणि जगण्यातला सुकून कशात आहे हे कदाचित आम्हाला कळू शकेल… हे लिखाण त्या सर्व लोकांसाठी जे स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या कामावर असलेल्या प्रेमासाठी आणि भौतिक, आर्थिक फुटपट्ट्यांवर मोजता न येणाऱ्या गोष्टींसाठी जगले, जगत आहेत.. कामयाबीचा खरा अर्थ जे शोधत आहेत, जगत आहेत आणि उपभोगत आहेत…

कामयाब’चा ट्रेलर-

https://youtu.be/8KwQkxW1bVc

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात त्या काम करतात . त्यांची स्वतःची या विषयात काम करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे . वेगवेगळ्या भाषेतील पुस्तकं वाचणे, चित्रपट बघणे व त्यावर लिहिणे ही त्यांची आवड आहे )

[email protected]

Previous articleमहाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवे..
Next articleशाहू महाराज: काळाच्या पुढे असणारा कृतीशील विचारवंत
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here