बिबळ्यांची नाळ जुळे …

सौजन्य -लोकसत्ता
महानगरातल्या माणसांना राजीखुशीने वा नाइलाजाने शहरीकरण स्वीकारावेच लागते, तसे ते मानवेतर सृष्टीदेखील नकळत स्वीकारू लागल्याचे दिसते. संजय गांधी उद्यानातील बिबळ्यांच्या जीवनशैलीबद्दल जे संशोधन प्रसिद्ध झाले, ते वेगळे काय सांगते आहे?

………………………………………………………………………………………..
आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे. शहरीकरणाच्या प्रक्रियेतून कुणालाच माघार bibatyaघेता येणार नाही आणि कुणीच त्यातून वगळले जाणार नाही. महानगरे हा तर विकासाचा महामार्ग आहे. म्हणजे, महानगराच्या परिसरात जे जे काही येते, ते सारे विकासाच्या प्रक्रियेत सामावले जाणार, हे अपरिहार्य आहे. महानगरांच्या आश्रयाने राहणाऱ्या माणसांनी हे वास्तव केव्हाचेच स्वीकारून टाकले आहे. कारण त्याचा त्यांच्या जगण्याशी थेट संबंध आहे. तसा, जगण्यासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाचाच या प्रक्रियेशी थेट संबंध आहे. त्यातील कुणाला राजीखुशीने, कुणाला नाइलाजाने तर कुणाला कळत नकळत हे वास्तव स्वीकारावेच लागणार आहे. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेणे आणि त्यानुसार आपल्या जीवनशैलीची घडी बसविण्यातच शहाणपण आहे. माणसाचा मेंदू तल्लख असल्याने आणि त्याला आजच्याबरोबरच उद्याचाही विचार करावा लागत असल्याने त्याने हे शहाणपण मान्यच केले आहे. माणसाव्यतिरिक्त ज्यांचा प्रश्न उरतो, त्यांनाही या नव्या जीवनशैलीच्या प्रवाहात सहभागी व्हावेच लागणाार आहे. कारण उद्याचा विचार करण्याची त्यांच्यात प्रथा नसली, तरी त्यांच्या आजच्या जगण्यावर याच जीवनशैलीचा प्रभाव आहे. साहजिकच, त्यांना जगण्याची नवी घडी बसवावी लागणार आहे. एखाद्या फुटपाथवरल्या वडापाव आणि समोसा-भज्यांच्या टपरीसमोर घुटमळणारी कावळ्यांची गर्दी आणि झाडाझुडपांच्या फांद्यांवरील काटय़ाकुटय़ांच्या जंगली घरटय़ांऐवजी सिमेंटच्या जंगलातील एखाद्या सुरक्षित कोपऱ्यात तारा-दोऱ्यांनी आधुनिक शैलीत बांधलेल्या घरटय़ात वाढणाऱ्या चिमण्यापाखरांच्या पिल्लांचा चिवचिवाट ही त्या बदलत्या जीवनशैलीचीच मूर्त रूपे आहेत. आता शहरातली झाडेदेखील, सिमेंटच्या जंगलातील एखाद्या भेगाळलेल्या भिंतीतच उगवतात आणि मिळेल तेवढय़ाच मोकळ्या जागेत आपला पसारा मांडतात. मुळाशी येईल तशा आणि तेवढय़ाच पाण्यावर पोसण्याची आणि त्याच पाण्यावर फोफावण्याची सवय त्यांनीदेखील लावून घेतली आहे. त्यांची पुढची पिढीदेखील, फूटपाथवरल्या पेव्हर ब्लॉकमधील फटींच्या मातीतच रुजू लागली आहे आणि तेथेच खुरटत वाढू लागली आहे. शहरीकरणाच्या जीवनशैलीत हे सारे अपरिहार्य आहे, हे या मानवेतर सृष्टीनेदेखील मान्य केलेले दिसते. अर्थात, त्याविना त्यांना पर्यायदेखील नाही. अन्यथा, जन्मू नका, उमलू नका आणि वाढूदेखील नका, हा या जीवनशैलीचा त्यांना मिळालेला धडा आहे. त्यांना आपले भविष्य माहीत नसले, तरी वर्तमानकाळ जगण्याची त्यांची धडपड खरे म्हणजे, वाखाणली पाहिजे. माणसाने त्यापासून बोध घेतला पाहिजे आणि शहरीकरणाला, विकासाला विरोध करण्यात शहाणपण नसते, नाइलाजाने का होईना, ते स्वीकारावेच लागेल हे शिकले पाहिजे.
जवळपास सहा वर्षांपूर्वी, पश्चिम महाराष्ट्रातील रानावनात वावरणारा एक बिबळ्या, चुकून गावाच्या हद्दीत शिरला, आणि एक भटके कुत्रे त्याच्या नजरेस पडले. त्याच्या जिभेला पाणी सुटले आणि त्याने कुत्र्याचा पाठलाग सुरू केला. हे कुत्रे भटके असले तरी माणसांच्या संगतीने वाढल्यामुळे आणि माणसांच्या सोबत वावरल्यामुळे त्या कुत्र्याच्या अंगी चलाखी पुरेपूर भिनलेली असावी. रानातल्या संस्कृतीत वाढलेल्या आणि शिकारीचे केवळ परंपरागत कौशल्य असलेल्या त्या बिबळ्याला चुकवत या कुत्र्याने माणसांच्या वस्तीत आणलेच आणि एका विहिरीपाशी येताच बिबळ्याला गुंगारा दिला. बिबळ्या विहिरीत पडला. गाव गोळा झाले. मग काही प्राणिमित्रांनी त्याला बाहेर काढले आणि त्याचे नामकरणही केले. माणसांच्या जगात यापुढे आपल्याला ‘आजोबा’ या नावाने ओळखले जाणार याची कल्पनादेखील नसलेल्या त्या बिबळ्याच्या गळ्यात जीपीएस यंत्रणा असलेला पट्टा बांधून तब्बल सव्वाशे किलोमीटरवर मुंबई महानगरीच्या कुशीत असलेल्या संजय गांधी उद्यानात त्याचे बस्तान बसविले गेले. माणसांच्या जंगलाच्या कुशीत वसलेले हे जंगल अलीकडे मुंबईचे उपनगरच झाले आहे. फक्त तेथे माणसांची वस्ती तुरळक असल्याने वन्य प्राण्यांची वस्ती अधिक आहे. उपनगरी गाडीची धडधड थांबली की रात्र झाली असे समजून येथील प्राणी उपजीविकेसाठी बाहेर पडतात. गाडीचा पहिला भोंगा झाला की घरी परत यायचे, अशी सक्त शिकवण आता त्यांच्या पिल्लांना त्यांच्या आईबापांकडून मिळालेली असावी. त्यामुळे त्यांची रात्रदेखील जंगलातील रात्रीएवढी लांबलचक नसते. जंगलात सूर्यास्त झाला, की रात्र होते. इथल्या जंगलात तसे नसते. कारण या जंगलानेदेखील विकासाच्या आणि शहरीकरणाच्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेल्या नाइलाजाचा स्वीकार केलेला आहे. या जंगलात दाखल झालेल्या ‘आजोबा’ला ते जुळवून घेताना कदाचित काहीसे अवघड गेले. जंगलातून जाणारा वाहनांच्या रहदारीने गजबजलेला रस्ता पार करताना एका रात्री आजोबाला एका भरधाव वाहनाची धडक बसली आणि नागरी जंगलाशी जुळवून घेतले नाही, तर जगणे कठीण होईल, हे बहुधा या जंगलातील अन्य प्राण्यांनाही उमजून चुकले.. कदाचित तेव्हापासून या जंगलातील प्राण्यांनी शहरी जंगलातील जीवनशैलीचा बिनबोभाट स्वीकार केला असावा.
याच संजय गांधी उद्यानातील बिबळ्यांच्या जीवनशैलीबद्दल करण्यात आलेले संशोधन अलीकडेच प्रसिद्ध झाले. त्यातूनदेखील हेच वास्तव सामोरे आलेले दिसते. आता या जंगलातील बिबळ्यांची नाळ शहराशी जुळत चालली आहे. त्यांना जंगलातील साहसी शिकारीऐवजी, शहराच्या आडोशाने राहणाऱ्या आणि सहजपणे पकडता येणाऱ्या शिकारीचा सराव झाला आहे आणि मानवी जीवनशैलीला धक्का न लावता सुरक्षित जगण्याची त्यांची धडपड सुरू झाली आहे. माणसाशी वैर ओढवून घेतले, तर जगणे असह्य़ होईल, त्यामुळे आहे त्या स्थितीतील हे जंगल आपले मानावे आणि जमेल तसे जगावे, हे मानवी शहाणपण त्यांनाही सरावाने येऊ लागले आहे. आमच्या हक्काच्या जंगलावरील माणसाचे आक्रमण सहन करणार नाही, असा इशारा देण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांत त्यांनी करूनही पाहिला. पण अखेर त्यांना नमतेच घ्यावे लागले. कधी मानवी वस्तीत घुसण्याचा प्रयत्न केला, तरी कुत्र्यांच्या संघटित टोळ्या पाठलाग सुरू करतात आणि शेपूट सावरत जंगलात पळ काढावा लागतो. पण एखादे कुत्रे आगाऊपणा करून जंगलात शिरते आणि बिबळ्यांना आयती शिकार मिळते. खरे म्हणजे, माणसाने आखून दिलेली हद्द जंगली प्राण्यांना माहीतही नसते. तरीदेखील आता स्वत:च्या सुरक्षिततेसाठी बिबळ्यांनाच आपल्या वावराची हद्द आखून घ्यावी लागली असावी. गेल्या काही वर्षांत माणूस आणि बिबळ्या यांच्यातील संघर्ष निवळत चालला आहे, असे या जंगलाची देखभाल करणारे अधिकारी सांगतात, त्यावरून हे खरेच असावे. माणसाशी दोन हात करण्याऐवजी, जुळवून घेण्याची अक्कल आल्यामुळे इथल्या बिबळ्यांनी कदाचित परस्परांमधील भांडणे सामंजस्याने संपविली असावीत. अन्य कोणत्याही जंगलापेक्षा, मानवी वस्तीने घेरलेल्या या जंगलात बिबळ्यांची संख्या अधिक आहे, यामागचे गुपितही हेच असावे.
ग्रामीण भागातील बिबळ्यांना मात्र अजून हे शहाणपण आलेले दिसत नाही. म्हणूनच, मानवी वस्तीवर बिनदिक्कत जीवघेणे हल्ले करण्याची हिंमत त्यांच्यात अजूनही शाबूत आहे. पण ही हिंमत आम्ही फार काळ टिकू देणार नाही. कारण शहरीकरणाचे वारे आता ग्रामीण भागाच्या दिशेने सुसाट सुटणार आहेत. विकासाची स्वप्ने सोबत घेऊन हे वारे ग्रामीण भागात घोंघावू लागतील, तेव्हा बिबळ्यांनाच नव्हे, माणसाव्यतिरिक्त तेथे जगणाऱ्या सगळ्यांनाच, जगण्याची नवी शैली खुशीने किंवा सक्तीने, स्वीकारावीच लागेल. मग तेथील बिबळ्यांची नाळदेखील शहरांशी जुळून जाईलच!
सौजन्य -लोकसत्ता

Previous articleपोरकटांचे पौरुष
Next articleकुतूहल निर्माण करणारा कुंभमेळा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here