संजय राऊत: भारतीय असंतोषाचे मराठी प्रतिक

 

दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत हे सामनात ‘रोखठोक’ हे सदर नियमित लिहितात. त्या सदरातील निवडक लेखांचा संग्रह असलेले ‘गोफ’ हे पुस्तक काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाले आहे . या पुस्तकाला ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक संजय नहार यांची विस्तृत प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी संजय राऊत यांचे लेखन आणि विविध प्रसंगात ते घेत असलेली भूमिका महाराष्ट्रासाठी किती महत्वाची आहे, याचा वेध घेतला आहे.

-संजय नहार

स्वातंत्र्यपूर्व काळात बलाढ्य अशा इंग्रज सत्तेविरूद्ध देश एकत्र झाला तो विविध कारणांमुळे. महात्मा गांधींनी त्यासाठी अहिंसात्मक प्रतिकार हे माध्यम म्हणून वापरले तर लोकमान्य टिळकांनी शब्द हे शस्त्र म्हणून वापरले. त्यांनी ब्रिटीश सत्तेविरुद्ध सातत्याने प्रहार केला. ‘आमचे काय करायचे ते आम्ही पाहू; मात्र तुम्ही हा देश सोडून जा’, हे सांगण्याचे धाडस त्यांनी दाखवले. त्याची किंमतही मोजली. म्हणूनच भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात लोकमान्य टिळकांचे स्थान अनन्यसाधारण आहे. सिंहगर्जना करणारा ‘केसरी’ अशी त्यांची प्रतिमा तयार झाली. त्यांना जहालमतवादी मानले जात असे आणि म्हणूनच त्यांना भारतीय असंतोषाचे प्रतिकही समजले जाते. संजय राऊत यांच्याबद्दल विचार करताना  मला त्यांच्यात लोकमान्य टिळक व गोपाल कृष्ण गोखले या दोन महान नेत्यांचा समन्वय दिसून येतो.

लोकमान्य टिळकांची विरोधकांवर तुटून पडणारी प्रखर लेखणी व जनेतेच्या ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे आक्रमक नेतृत्व आणि गोपाल कृष्ण गोखले यांची मवाळ पण सामाजिक सुधारणेची भूमिका संजय राऊत यांच्या व्यक्तिमत्वात अनेकदा दिसून येते.सध्याच्या परिस्थितीत दोन्ही भूमिका तेवढ्याच आग्रहाने  ते मांडतात. त्या अर्थाने संजय राऊत स्वातंत्र्यानंतरच्या भारतीय असंतोषाचे मराठी प्रतिक आहेत.

मराठी माणसाचे वर्णन करताना संत तुकाराम म्हणतात,

मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास । कठीण वज्रास भेदू ऐसे ॥1॥

मेले जित असों निजोनियां जागे ।  जो जो जो  जें मागे तें तं देऊॅ

भले तरि देऊँ कासेची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणू काठी॥

मायबापाहूनि बहू मायावंत। करूं घातपात शत्रूहूनि॥

अमृत ते काय गोड आम्हांपुढे। विष तें बापुडें कडू किती

तुका म्हणें आम्ही अवघेचि गोड । ज्याचें पुरे कोड त्याचेपरि ॥

या लेख संग्रहातील लेख हे असेच आहेत. कधी नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणणार्‍या तुकारामांसारखे तर कधी अंधश्रद्धांवर तुटून पडणारे प्रबोधनकार ठाकरेंची धग जाणविणारे, तर प्रसंगीशब्बीर शहाला एक वाघ माणसाळतोय असे म्हणण्याइतके मेणाहून मऊ विष्णूदाससुद्धा त्यांच्या लेखनात डोकावतात.

संजय राऊत कोठल्या गटाचे आहेत, नेमके कोणत्या विचारांचे आहेत हे आम्हाला कळत नाही. अशी प्रतिक्रिया जेव्हा त्यांच्याबद्दल व्यक्त होते तेव्हा तिच प्रतिक्रिया म्हणजे संजय राऊत हे समस्त मराठी माणसांच्या भावनांचा पुरस्कार करतात याचा पुरावा असतो. महाराष्ट्र हा कधीही एका गटाचा किंवा विचारांचा नव्हता. तो जितका संत नामदेवांचा होता तितकाच तो संत ज्ञानेश्वरांचाही होता. जितका तो संत तुकारामांचा होता तितकाच तो तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांचाही होता. तो छत्रपती शिवाजी महाराजांचा तर होताच होता पण तो पेशव्यांचाही होता. लोकमान्य टिळक , गोपाळ कृष्ण गोखले, महादेव गोविंद रानडे, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, प्रबोधनकार ठाकरे, सावरकर आणि गोपाळ गणेश आगरकरांचाही होता. तो सामान्य मराठी माणसाचा जसा होता तसाच तो महाराष्ट्र घडविणार्‍या यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि अगदी शरद पवार यांचाही आहे. म्हणूनच राष्ट्रपती अथवा पंतप्रधान या पदासाठी शिवसेना नेहमी मराठी माणसाच्या पाठिशी आपली शक्ती उभी करते. या प्रत्येकाचे विचार आणि कृती यात समानता होती, असे नाही. अनेकदा तर अंतर्विरोधही होते. तरीही महाराष्ट्र हा या सर्वांचा होता. म्हणूनच संजय राऊत या सर्वांचे एकत्रित प्रतिनिधीत्व करतात. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या लेखणीत उमटते.

‘रोखठोक’  हा ‘सामना’ तील साप्ताहिक स्तंभ देशभर चर्चेत असतो. हे सदर मराठीत असते. पण यातील विचार एवढे खणखणीत असतात की त्याचे पडसाद देशभर उमटतात.  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय यांची महाराष्ट्राशी आणि मराठी मातीशी असलेली नाळ कायम ठेवत संजय राऊत यांनी पूर्ण देशात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची एका अर्थाने दहशत अथवा प्रभाव असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोंदींवर ‘बाजीराव मोदी’ म्हणून टीका करणे असो की, अमित शहा यांना ‘आदिलशाह’ म्हणत त्यांना महाराष्ट्राचे शत्रू संबोधणे असो, अशा प्रकारे दिल्लीला केवळ महाराष्ट्रच आव्हान देऊ शकतो ,हे त्यांनी वेळोवेळी वेगवेगळ्या प्रसंगच्या निमित्ताने लेखन करताना दाखवून दिले आहे.

कधी पोपवर तर कधी सद्दाम हुसैनवर लिहून जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणार्‍या मराठी माणसाच्या जीवनात जगातील घडामोडींबाबत जागल्याची भूमिका बजावली. ही गोष्ट सोपी नाही. लांगूलचालन करून, पुढे पुढे करून अथवा बदललेल्या सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करून आपण काही मिळवावे असे वाटत असण्याच्या आणि तसे ते मिळत असतानाच्या काळात आपल्या भूमिकांशी प्रामाणिक राहणार्‍यालाच इतिहास घडवता येतो. असा इतिहास लिहिेणे आणि घडविणे यात फरक असतो म्हणूनच संजय राऊत यांच्यावर टीका करणारेही त्यांच्या ‘सच्चाई’, ‘रोखठोक’ सारख्या सदरांची आवर्जून दखल घेतात. त्यांच्या फटकार्‍यांनी घायाळ होणार्‍यांनाही ही जनभावना आहे, असे बर्‍याचदा मान्य करावे लागते. असाच वाचकांशी थेट संवाद करणार्‍या रोखठोकमधील लेखांचा संग्रह या पुस्तकाच्या निमिताने मराठी वाचकांच्या भेटीस येत आहे.

जगभरच्या मराठी माणसाला शिवसेनेचे नेहमीच आकर्षण वाटते. ज्याप्रमाणे देशातून काँग्रेस संपू नये ती शिल्लक राहावी. हे देशहितासाठी आवश्यक आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मा. मोहन भागवत यांना जाहीरपणे सांगावे लागले; त्याप्रमाणेच दिल्लीची गादी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार्‍या प्रत्येक मराठी माणसालाही शिवसेना सदैव अशीच तळपत राहावी. तिने मराठी माणसाचा आवाज कायम बुलंद ठेवावा, असे प्रामाणिकपणे वाटत असते.

भारत हा विविध भाषा, जात, धर्म, पंथ आणि संस्कृतीने नटलेला, अनेक अंतर्विरोध असलेला आणि तरीही एका सूत्रात बांधला गेलेला जगातील एकमेव देश आहे. राष्ट्रीय राजकारणात आणि समाज जीवनात महाराष्ट्राची भूमिका गेल्या तीनशे वर्षांमध्ये सर्वाधिक महत्त्वाची राहिली आहे. महाराष्ट्र-पंजाब आणि पश्चिम बंगाल यांचे प्रतिनिधीत्व करणारे लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल यांनी स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष आणि पंजाबच्या कर्तारसिंग सराभाबरोबर फाशी गेलेला विष्णू गणेश पिंगळे, भगतसिंग बरोबर फाशी गेलेले शिवराम हरी राजगुरू यांनी तेव्हाची गरज म्हणून हातात शस्त्रही घेतले होते. एकीकडे सत्याग्रह आणि उपोषणासारखे मवाळ मार्ग तर दुसरीकडे जहालमार्ग या दोन्हींचा मराठी माणसाने स्वातंत्र्यपूर्वकाळात नेहमीच वापर केला. म्हणूनच धारकरी आणि वारकरी अशीच महाराष्ट्राची सदैव ओळख राहिली पाहिजे. महाराष्ट्राने आपल्या नावाप्रमाणेच सगळ्या राष्ट्राला आपल्यात सामावून घेतले. महाराष्ट्राने आपल्या पोटात सर्वांना आईच्या भावनेने सामावून घेतले. असे उदाहरण जगात क्वचितच इतरत्र असेल. मात्र देशाचा विचार करता करता महाराष्ट्राचेच अस्तित्व धोक्यात आले तर राष्ट्राचे काय होईल, अशी शंका संजय राऊत जेव्हा व्यक्त करतात तेव्हा ती केवळ शंका नसते. साधार भिती असते.

महाराष्ट्र ज्या भारताचा आधार आहे असे आपल्याला वाटते, तो देश इस्त्रायल अथवा अमेरिका नाही हे मराठी माणसाने समजून घ्यायला हवे. हा देश कधीही साम्राज्यवादी नव्हता अथवा आपल्या उत्पादनासाठी  ग्राहकांच्या शोधात नसतो. नवनवीन प्रश्नांची निर्मिती आपण केली नाही.  पाश्चात्यांचे तंत्रज्ञान, विज्ञान याचा गरजेप्रमाणे वापर नक्कीच करायला हवा. मात्र तो एकमेव आदर्श असता कामा नये, असे  बाळासाहेब भारदे नेहमी म्हणत. पाश्चात्य विज्ञान आणि भारतीय तत्वज्ञान यांची सांगड घातली पाहिजे. प्रत्येक राज्याची, विभागाची एक ओळख, संस्कृती आणि अस्मिता आहे. तिला हजारो वर्षांचा इतिहास आहे. तिचा एकमेकांमध्ये संघर्ष न होता जोडणार्‍या दुव्यांना मजबूत करायला हवे. म्हणजेच देशाच्या विविध प्रांतांचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेनेने विशेषत: संजय राऊत यांनी पुढाकार घ्यायला हवा. इतिहासातून उत्तरे शोधायची असतात मात्र ते विसरुन जेव्हा सत्तेसाठी पुन्हा पुन्हा प्रश्न निर्माण केले जातात त्यातूनच नवनवे संघर्ष उभे राहतात. ते ऐक्याच्या मुळाशी येतात. संघर्ष हवेत मात्र ते संघर्ष देश मजबूत करणारे, प्रत्येक राज्याच्या भाषेचा आणि अस्मितेचा सन्मान करणारे हवेत.  हे करण्याची सर्वाधिक क्षमता महाराष्ट्राचीच आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी जगभर फिरण्याची गरज नाही, असे म्हणत जेव्हा संजय राऊत एकाकीपणे एक हाती किल्ला लढवत असतात, तेव्हा त्यांना आपले काय होईल याची चिंता भेडसावताना दिसत नाही.

शिवसेना, सामना, बाळासाहेब ठाकरे आणि संजय राऊत हे एकमेकात इतके मिसळले की, संजय राऊत यांना स्वत:चे वेगळे अस्तित्व राहिलेच नाही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अशा तीन पिढ्यांसोबत त्यांनी स्वतला शिवसेना नावाच्या यज्ञात समर्पित केले दै. ‘सामना’ हे शिवसेनेच्या मुखपत्राने अनेकांना ऊब दिली, अनेकांना दिशा दिली आणि अनेकांचे दहनही केले. माझी त्यांच्यासोबतची व्यक्तिगत ओळख ते ‘लोकप्रभा’मध्ये होते तेव्हापासून आहे.  त्यांची लेखनी सुरुवातीपासूनच  संवादी आणि प्रसंगी मित्रांवरही कोरडे ओढणारी आहे .मात्र त्यांचे कोरडे समाजाचा व्यवस्थेवरचा विश्वास वाढविणारे असतात.

दत्तात्रय गायकवाड नावाचा आमचा एक सहकारी १९८८ साली पंजाबमध्ये शीख कुटूंबाला वाचविताना शहीद झाला. त्याची आई सरुबाई गायकवाड प्रतिकूल परिस्थितीत घरकाम करून जगणारी. एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी त्याच्या आईला शासनाच्या वतीने घर देण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्षात ते तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण करू शकले नाही. ही गोष्ट संजय राऊत यांना कळाल्यावर ते स्वत:च्याच सरकारवर तुटून पडले. पुण्यात भगतसिंगाची आई भांडी घासते आहे आणि सरकार झोपले आहे.,अशा आशयाचा लेख त्यांनी लिहिला. यावेळी टिळकांच्या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? या लेखाची आठवण झाली होती.  टिळकांनी परकीय सत्तेविरुद्ध लिहिले होते. मात्र स्वत:च्या सरकारविरुद्ध लिहिणे जास्त अवघड असते.  केवळ सरकारविरुद्धच नाही तर पक्षातीलही अनिष्ठ रूढी, परंपरांवर त्यांनी नामदेव-तुकारामांची परंपरा चालवित आघात केले आहेत.

पुण्यात एकदा हुरियत कॉन्फरन्सचे नेते शब्बीर शहा यांना ‘सरहद’ने बोलवले होते त्यांच्याशी राऊत साहेबांची भेट झाली. त्यांच्यावर वैचारिक हल्ले करताना आणि आपल्या भूमिकांवर ठाम असतानाही त्यांनी शब्बीर शहावर ‘एक वाघ माणसाळतोय…’ या शीर्षकाने ‘रोखठोक’ मध्ये लेख लिहिला. काही मोठे संपादक स्वत: निरपेक्ष आहे अशी स्वत:ची प्रतिमा बनवून टिळक ते तळवळकर यांचे आपण वारस आहोत, कुमार केतकर आणि संजय राऊत हे विशिष्ठ विचारांचे अथवा पक्षांचे प्रवक्ते आहेत असे भासवून प्रत्यक्षात मात्र व्यक्तिगत हल्ले करतात. त्याला निरपेक्षतेचा मुलामा लावतात. या पार्श्वभूमीवर विरोधी विचारांच्या भूमिकांवर हल्ले करताना त्याच विचाराच्या व्यक्तींबद्दल त्यांच्यात जे उत्तम आहे, त्याबद्दल लिहिताना संजय राऊत यांनी कंजुसी दाखविली नाही म्हणूनच संजय राऊत हे लोकमान्य टिळक आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याच परंपरेतील संपादक आणि पत्रकार आहेत. ही दखल इतिहासाला घ्यावीच लागेल.

असाच एक किस्सा. एस. एस. विर्क महाराष्ट्र केडरचे पोलिस अधिकारी पंजाबमधील दहशतवादाच्या काळात ऑपरेशन ब्ल्यू स्टार नंतर पंजाबमध्ये गेले. त्यांनी पंजाबमध्ये दहशतवादाविरोधात मोठी लढाई केली. ऑपरेशन ‘ब्लॅक थंडर’ या जगातील यशस्वी दहशतवादविरोधी कारवाईचे नेतृत्वही त्यांनी केले. ते करताना अतिरेक्यांच्या हल्ल्यात ते मरता मरता वाचले. नंतर काही वर्षांपूर्वी राजकीय कारणांमुळे तेथील सरकारने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. त्यावेळी संजय राऊत यांनी विर्क यांच्या सोबत उभे राहण्याची भूमिका घेतली. वास्तविक पाहता पंजाबमध्ये शिवसेनेचा मित्र पक्ष भाजपा आणि अकाली दल सत्तेत होता मात्र त्यांना काय वाटेल याचा विचार न करता जो माणूस देशासाठी लढला, त्याच्यासाठी आपल्याला भूमिका घ्यावी लागेल हा निर्णय घेऊन विर्क यांना ‘सामना’ने पाठिंबा दिला. त्यावेळी विर्क यांच्या डोळ्यात अश्रू आलेले मी पाहिले आहे.  विर्क म्हणाले, ‘हे फक्त महाराष्ट्रच करू शकतो. ‘विर्क यांचे म्हणणे म्हणजे संजय राऊत आणि सामना हे महाराष्ट्राचे प्रतिक आहे हे सुचविणारे होते आणि ते सत्यही आहे.

अशा अनेक कथा आणि व्यथांना संजय राऊत यांनी केवळ वृत्तपत्रात नाही तर आपल्या जगण्यातही स्थान दिले. ‘पंजाब केसरी’ या पंजाबमधील वृत्तपत्र समुहाचे मुख्य संपादक विजय कुमार चोप्रा,अकालीदलाचे नेते जीवनसिंग उमरानानग यांची शिवसेना प्रमुखांशी भेट  घडवून आणण्यासाठी त्या त्या वेळी संजय राऊत यांनी पुढाकार घेतला. या भेटींचा मोठा परिणाम झाला. ‘सरहद’ संस्थेच्या कामाला शक्ती देताना ‘सामना’च्या दसरा अंकात काश्मीर डायरी छापणे असो की, काश्मिरी मुलांच्या दौर्‍याची सर्व व्यवस्था असो, आपल्यापेक्षा वेगळी भूमिका असणार्‍यांच्या बाबत संजय राऊत यांनी सदैव मनाचा मोठेपणा दाखविला.  जो इतर पक्ष आणि नेत्यांना क्वचितच जमतो.

‘गोफ’ हे  ‘रोखठोक’ या सदरात प्रकशित झालेल्या लेखांचा संग्रह आहे. संजय राऊत यांनी रोखठोक मधून जे विषय हाताळले, ज्या प्रश्नांना वाचा फोडली ते पाहता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘सामना’ सुरु करताना जे स्वप्न पाहिलं होतं, त्याची पूर्तता राऊत यांनी केली, असे म्हणावे लागते.’मार्मिक’ या मराठी माणसाचा आवाज बुलंद करणार्‍या साप्ताहिकानंतर दैनिक सुरु करताना शिवसेना प्रमुखांनी ‘दैनिक नव्हे सैनिक’ अशी सामनाच्या आगमनाची जाहिरात केली होती. सामनाच्या सुरुवातीपासून हे दैनिक शब्दश: सैनिकाची भूमिका बजावत आहे. सैनिक प्राण पणाने लढत असतो. तो समूहात असला तरी एकटाच असतो. त्यालाही वेदना असतात. दु:ख असतात, पण तो लोकांच्या दुखाला वाचा फोडताना, त्यांच्यासाठी लढताना त्यांच्या जखमांना मलम लावताना आपल्या जखमा विसरून जातो. आपल्याला व्यक्तिगत आयुष्य असते, आपले कुटुंब असते, हे विसरून हा देश आपले कुटुंब आहे या भावनेने तो डोळ्यात तेल घालून पहारा देत असतो. संजय राऊत आणि शिवसेना आज तीच भूमिका जगताहेत.  आणि म्हणूनच देशाच्या प्रादेशिक पक्षांचे पर्यायाने देशाचे नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळो, हीच शुभेच्छा!

(लेखक ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक आहेत)

9421656666

 

Previous articleमी पुन्हा येईन ! ऑपरेशन फेल !
Next articleदीनबंधूंनी उघडलंय मजुरांसाठी अन्नछत्र
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.