लॅम्बाडा: बेभान करणारा सौंदर्य, तारुण्य आणि कलात्मकतेचा अफाट संगम

– समीर गायकवाड

काही वर्षापूर्वीची गोष्ट आहे. बहुधा १९८९ – ९० साल असावे. माझ्यासारखेच काही फकीर दोस्त सोबत होते. गोव्यातील ‘टीटो’ – बार्डेज बारला ते ‘शिकार’ शोधत होते आणि मी माझ्याच धुंदीत होतो. काही वेळाने एका फेरीबोटवरून राऊंड मारायला गेलो. ‘टिटो’मधील काही मुली बोटवाल्याने डेकवर घेतल्या. बोटीने किनारा सोडला, संथ लयीत पाणी कापीत लाटांना खेळवत ती पुढे निघाली.

डेकवरची म्युझिक सिस्टीम सुरु झाली. एकेक करून त्या मुली सिंगल – कपल डान्स करू लागल्या. आपल्या माणसांना गोऱ्या चामडीचे भारी आकर्षण. त्यामुळे त्या डान्स ग्रुपमधील एका आफ्रिकन कपलला डान्सची संधीच मिळेनाशी झाली. तारुण्याने मुसमुसलेल्या तीन चार इंग्लिश पोरी आणि दोन तरणीबांड स्पॅनिश पोरं अगदी अंगातलं रक्त तापावं असं नाचत होती. भोवतालचा निळयाहिरव्या पाण्याचा अथांग सागर आणि समोर सौंदर्य, तारुण्य आणि कलात्मकता याचा अफाट संगम असं मन बेभान करणारा तो मौसम होता.

बघता बघता गाण्यांचा टेम्पो वाढत गेला. बोटीतल्या सगळ्याच सहप्रवाशांनी ताल धरला. नाचगाण्याला ‘दारू’कामाची जोड लाभली अन मग तर सगळा माहौल बेहोष करणारा झाला. डान्स ग्रुपमधील ते ‘ब्लॅक’ कपल मात्र हिरमुसल्या चेहऱ्याने एका कोपऱ्यात बसून होतं. इतक्यात अकस्मात म्युझिक सिस्टीम बंद पडली. ती संधी साधून मी त्या जोडप्याला नेत्रपल्लवी केली. ते जाम खुश झालं. त्यातली पोरगी अग्रेसिव्ह होती तिने वीजेच्या वेगाने हलचाल करत डीजेच्या कानात जाऊन तिच्या फर्माईशची पुटपुट केली.

संगीत थांबल्यामुळे आधी जोशात नाचणारे पब्लिक आणि त्यांना चेतवणारा डान्स ग्रुप काहीसा थबकून गेला होता. त्यामुळे पुढच्या हालचाली वेगाने करत तुकतुकीत काळ्या रंगाच्या, उंच्यापुऱ्या अन अंगाने भरलेल्या त्या मुलीने तिच्या साथीदाराला जवळ जवळ ओढतच मोकळ्या झालेल्या डेकच्या मधोमध आणले. तेव्हढ्यात निमिषार्धात संगीत सुरु झाले. त्या संगीतावर ती जोडी अशी काही थिरकली की, बोटीतील एका दोघांनी अंगातले शर्ट काढून कंबरेला गुंडाळले अन बेफाम नाचायला सुरुवात केली.

तो ‘लॅम्बाडा’ होता. (टीप- मला संगीतातली फारशी अक्कल नाही… या गाण्याची माहिती बोटीवरून उतरल्यावर गाणं लावणाऱ्या गोवेनीज पोराने दिली होती) आफ्रोबोलिव्हियन बोलीतलं काळजावर सुरी चालवणारं ते गाणं अन त्यावरचा ब्राझिलियन – पोर्तुगीज बीटमिक्स बेली डान्स. ‘मार्लबोरो व्हाईट’ सिगारेट विथ आईस मेल्टेड ‘जॉनी वॉकर ब्लॅक लेबल’ची एकत्रित किक त्यात होती. अगदी लवचिक अंगाची ती जोडी अशी काही अंगाला अंग घासत नाचत होती की, बघणारे सगळे अवाक झाले. पोरगी तर निव्वळ मासुळी होती अन पोरगा एखाद्या जिमनास्टच्या तोंडात मारेल अशा घोटीव गोटीबंद अंगाचा होता. तिच्या अंगात अत्यंत अपरा पांढरा स्कर्ट अन अगदी तंग टॉप होता. तर त्या पोराच्या अंगात फक्त गुडघ्यापर्यंतचा बर्म्युडाच होता. तिच्या दोन्ही मांड्यात गुडघा घालून तो असा काही बेफाम कंबर हलवत नाचत होता की हाय तौबा !!

फेरीबोट किनाऱ्याला लागेपर्यंत त्या आफ्रिकन कपलने पाब्लिक घामाघूम करून टाकलं…. नंतर असली जोडी पुन्हा कधीच अन कुठे पाहण्यात आली नाही. नंतर मुंबईच्या ‘कॉस्मिक रेस्टो’ला आणि ‘व्हेलोर’ला देखील अशी रसरसलेली जोडी शोधून पाहिली पण सापडली नाही. नाहीतर काही वेगळं कंटेन्ट मिळालं असतं…. असो…

१९९१ च्या असपास सनी देओलचा ‘घायल’ पाहण्यात आला आणि त्याने लॅम्बाडाच्या या अप्रतिम स्मृतीवर अक्षरशः पाणी ओतले. एका बेफाम शृंगारिक गाण्याची उचलेगिरी करून त्याचे एक तद्दन बॉलिवुडी रडगाणे करून ठेवले होते. मी मात्र आजही कधी वेळ मिळाला की काओमाचा लॅम्बाडा पाहतो अन गोव्यातल्या फेरीबोट मधील त्या जोशिल्या जोडीला आठवून त्या क्षणाची पुनरानुभूती घेतो…

९० च्या दशकात ‘लॅम्बाडा’ हे ग्लोबल हिट सॉंग देणारा काओमा हा ग्रुप फ्रान्सचा होता आणि त्यातली मुख्य गायिका – गीतलेखिका लोअल्वा ब्राझ होती. या गाण्याने तिला जगभरात अफाट प्रसिद्धी मिळवून दिली. मृत्यूच्या दिवसापर्यंत तिने शो केले होते.. १९ जानेवारी २०१७ रोजी रिओ द जीनेरो पासून काही अंतरावर असणारया साक्वारेमामधील तिच्या राहत्या घरानजीक कारमध्ये जिवंत जाळून तिची हत्या केली गेली… लुटारूंनी अवघ्या काही डॉलर्ससाठी तिला पेटवून दिले होते… मृत्यूसमयी ती ६३ वर्षाची होती …तिचा उत्साह आणि हुरूप वाखाणण्याजोगा होता हे तिच्या प्रत्येक शोवरून स्पष्ट होते … ब्राझीलमधील बेरोजगारी आणि गरिबी तिने अनुभवली होती… मृत्यूपूर्वी पंधरा दिवस आधी तिने गरीबीवर दया येऊन कामास ठेवलेल्या तरुणानेच आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने तिला जिवंत जाळल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते … तिचा असा अंत व्हायला नको होता ….

सेक्सवर्कींग मिथ्सचा पर्दाफाश करणाऱ्या मार्थाचा खून झाल्यानंतर मागील पाच वर्षात गोव्याला गेलेलो नाही. ही रिपोस्ट डकवताच तिथली हॉटेल्स, बीचेस आणि तिथला माहौल पुन्हा खुणावतोय. कळंगुट बीचवर आता जे चालते त्यावर लिहायचे आहे पण त्या साठी एक प्रदीर्घ दौरा आखावा लागेल. गोव्याची नाईट लाईफ अनेकांना तिरस्करणीय वाटू शकते पण त्यात अनेक रंग ठासून भरलेले आहेत. आताचा पब कल्चरवाला गोवा इझी मनीचा मोस्ट डिझायर्ड एरिया झाला आहे. गरज इथे घेऊन येते आणि मुलींच्या नकळत नंतर परतीचे रस्ते बंद करते…गोव्याच्या आत्म्यावर असे अनेक व्रण असले तरी निसर्गाने समृद्ध असलेल्या या भागात जीव रमतो हे मात्र खरे ….

काओमाच्या लॅम्बाडाची ही यु ट्यूब लिंक – https://www.youtube.com/watch?v=csaUvkYOkLY
(ज्यांना कलात्मकता आणि अश्लीलता यातील फरक कळत नाही त्यांनी ही लिंक पाहण्याऐवजी ऐकलेली बरी, पुन्हा माझ्या नावाने उद्धार व्हायला नको)

सनी देओलच्या ‘घायल’मधील गाण्याची लिंक https://www.youtube.com/watch?v=EeOeoqVF3zY

दोन्ही गाणी ऐकणाऱ्यांच्या / पाहणाऱ्यांच्या कॉमेंटस वाचायला मला नक्की आवडेल..

ओरिजिनल लॅम्बाडामध्ये एका किशोरवयीन जोडीचं परस्पर आकर्षण इतक्या देखण्या पध्दतीने दाखवले आहे की पाहणाऱ्याने प्रेमात पडावे. यातली मुलं तरतरीत आणि चुणचुणीत आहेत. त्यांच्या भोवताली बीचवरील हॉटेलमधली सगळी मंडळी संगीताच्या कैफात धुंद होऊन गेलीत. ती गौरकन्या हॉटेलमालकाची मुलगी आहे आणि तो तिथला वेटरबॉय आहे. आसपासच्या बेधुंद माहौलात या दोघांची नेत्रपल्लवी सुरु होते आणि डोळ्यांची भाषा आपलं काम करून जाते. या गाण्यातलं एक अक्षरही कळलं नाही तरी फरक पडत नाही पण गाणं श्रवणीय आणि प्रेक्षणीय आहे. यातली काही दृश्ये आपल्या काही लोकांना अश्लील वाटू शकतात, आपले विचार आकसलेले आहेत आणि त्यांचे कपडे आकसलेले आहेत ! इतकाच तर फरक आहे. गाण्याचा निखळ आनंद घ्यावा या मताचा मी आहे न की त्यातले मायनस पॉइंट शोधत बसावं… आय लव्ह इट… सिम्पली ग्रेट म्युझिक …

(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)

8380973977

Previous articleइथे ओशाळला असेल कोरोनाही…
Next articleजेसिंडा आर्डेनचे जादुई नेतृत्व
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.