स्तनदायिनी

– समीर गायकवाड

१९५० च्या दशकात महाश्वेतांच्या ‘स्तनदायिनी’ची कहाणी सुरु होते आणि १९७० च्या सुमारास संपते. ही कथा एका स्त्रीची आहे तिची स्त्रीयोनी आणि तिचे स्तन तिच्या मृत्यूस आणि शोषणास कारणीभूत ठरतात. यशोदा तिचं नाव. कांगालीचरण हा तिचा पती. तो दुर्गामातेच्या मंदिरातला पुजारी असतो. कांगालीचरण हा देवभोळा ब्राह्मण. त्याची देवधर्मावर पराकोटीची श्रद्धा. पत्नीच्या गर्भातून जन्माला येणारे अपत्य म्हणजे साक्षात ब्रह्मच. अशी त्याची संकल्पना. त्याच्या या नादात त्याची बायको सतत गर्भवती असते. यशोदाची वीस बाळंतपणं झालेली. यातली काही अपत्य जगली तर काही वाचली. यशोदाला तिची आई, मावशी, माहेर कसं होतं, हेही आठवता येत नाही इतकी ती मातृत्वात व्यस्त असते. यशोदाचं गर्भाशय रितं राहिलं, असं वर्ष जात नव्हतं. यशोदाचा देह म्हणजे मुलं निपजणारं यंत्र झालेलं. उलट्या झाल्या नाहीत वा चक्कर आली नाही असा दिवस तिला गतदशकात अनुभवास आला नव्हता. रोज कुठल्या तरी कोनाडयात, अंधारात, अडगळीत कांगालीचरण तिच्याशी संभोग करायचाच. त्याला दिवसरात्र वा स्थळकाळ याचे बंधन नसे. तो फक्त तिला अपत्यजननी समजायचा. पतीला परमेश्वर समजणाऱ्या यशोदालाही यात काही वावगं वाटत नव्हतं. आपलं हे अतिरेकी आईपण आपण सहन करू शकतो की नाही, याचादेखील ती कधी विचार करत नाही.

कांगालीचरण आणि यशोदाच्या आयुष्याला वेगळं वळण देणारी एक घटना घडते आणि त्यांच्या जीवनाचे मार्ग बदलतात. जगण्याच्या व्याख्या बदलतात. त्याच शहरातील एक सधन ब्राह्मण कुटुंबप्रमुख हलदारबाबू एक नवी गाडी खरेदी करतात, त्यांचा नालायक रिकामटेकडा ऐशआरामी दिवटा पोरगा नवीन ती गाडी घेऊन फेरफटका मारण्यास बाहेर पडतो. काही अंतर पार करून होताच रस्ता ओलांडणाऱ्या कांगालीचरणला नवीन धडक देतो. त्याच्या पायावरून गाडी जाते. त्याची बोटे जायबंदी होतात. त्यामुळे पूजाअर्चना करण्यास तो अपात्र ठरतो. त्यामुळे त्याचा रोजी रोटी बंद होते. इकडे नवीनचे वडील हलदारबाबूंना ब्रह्मशापाची भीती वाटू लागते. ते कांगालीचरणला रोजगार द्यायचे ठरवतात. आपल्या मुलाचं लग्न संपन्न झाल्यावर सोयऱ्यांची वर्दळ हटेल आणि ज्यांच्या राहण्यासाठी वापरलेली कार्यालायानजीकची वऱ्हांडयातली जागा त्याला देता येईल, असं ते ठरवतात. तिथे मिठाईचे दुकान थाटले तर जवळच असणाऱ्या दुर्गामंदिराच्या भाविकांच्या गर्दीमुळे ते चांगले चालेल, असा विश्वास ते कांगालीचरणला देतात. ही खुशखबर ऐकून कांगालीच्या आनंदाला पारावार उरत नाही. या दरम्यानच इकडे यशोदाला स्वप्न पडते की दुर्गामाता ज्या सिंहावर आरूढ झाली होती तो सिंह म्हणजेच कांगालीला धडकलेली ती गाडी होय. या स्वप्नामुळे यशोदा आणि कांगालीचरण त्या घटनेला देवीकृपा समजू लागतात. पण असं काही नसतं, हे त्यांना नंतर उमगते.

प्रत्यक्षात नियतीच्या मनात काही वेगळंच असतं. हलदारबाबूंना हृदयविकाराचा मोठा धक्का बसतो आणि त्यात ते मरण पावतात. कांगालीला ज्यांनी दुकान लावून देण्याचा शब्द दिला ते देवाघरी जातात आणि त्यांच्यापाठी त्यांचा शब्दही विरून जातो. कांगालीचरणच्या अपंगात्वास जबाबदार असल्याच्या भावनेतून हलदारबाबूंच्या घरून येणारे दाणापाणीही बंद होण्याची नौबत येते. तरीही कांगालीच्या डोक्यातले दुकान आणि हलदारबाबू जात नाहीत. त्याचे भोळे मन त्यातच गुंतून पडते. पण यशोदा ओळखते की, आता निवांत बसून चालणार नाही. हातपाय मारलेच पाहिजेत. शेवटी तीच उंबरठा ओलांडते.

ती तडक हलदारबाबूंच्या सुखसंपन्न घराचा रस्ता धरते. त्यांच्या मोठ्या खटल्याच्या घरातील स्वयंपाकीणीचं काम मिळाले तरी आपलं भागेल असा तिचा आडाखा असतो. दारातच तिची गाठ बाईशी पडते. (मराठीतलं गावाकडचं ‘बाई’ – बंगाली ‘गिनी’ / गृहिणीचा बंगाली अपभ्रंशात्मक शब्द) सहा महिन्याच्या नातवाला मांडीवर घेऊन बसलेली बाई तिची विचारपूस करते. मात्र यात तिचा स्वार्थ असतो. खरं तर आपल्या मुलामुळे कांगालीचरण रस्त्यावर आला हे ही तिला मान्य नसतं. याकरिता ती नवीनला दोषी मानत नसते. त्यामुळेच यशोदेबद्दलही तिच्या मनात सहानुभूती नसते. मात्र आपल्या कामापोटी ती छद्मीपणे गोड बोलते. बाईच्या सहाही मुलांची लग्ने झालेली. तिची मुले तथाकथित तत्कालीन ब्राह्मणी संस्कारात वाढलेली असल्याने पंचांग पाहूनच ते आपल्या बायकांशी शरीर संबंध ठेवतात, असा तिचा समज असतो. बाईच्या घराच्या वरच्या मजल्यावर चक्क प्रसूतीकक्षाच्या खोल्या होत्या. या खोल्या कधी कुलूपबंद नसत. कारण सदैव कुठली न कुठली बाळंत सून त्या खोलीत निवास करे. यशोदा आली होती तेव्हा देखील त्या खोलीत बाईच्या सूना होत्या. खंडीभर नातवंडं त्या घरात होती. मात्र सततच्या बाळंतपणामुळे सूना त्रासून गेलेल्या होत्या. कामाच्या शोधात आलेली यशोदा जेव्हा बाईच्या पुढ्यात उभी होती तेव्हाही बाईच्या हातात नातवंड असतं. मधल्या मुलाचा मुलगा असतो तो. आईला दूध नसल्याने तो सारखा रडायचा, आईचं आजारपण त्या तान्हुल्याला बेजार करत होतं. धष्टपुष्ट स्तनांच्या यशोदेला पाहून बाईच्या डोक्यात लख्ख वीज चमकते. आपला नातू तिच्या हातात देत ती यशोदाला विनवते की, ‘बाळाला दूध खूप कमी पडतेय, तू त्याला उराशी धरशील का ?’

बाळंतपणं, बाळूती, पान्हा आणि लेकुरवाळेपण यात गुरफटून गेलेल्या यशोदाला त्यात काही वावगं वाटत नाही. ती त्या मुलाला छातीशी धरते. मुल तिचे दूध पिऊन शांत होते. नंतरही बऱ्याच वेळा ती दुध पाजते. ते बाळ तृप्त होते. रात्री नऊ वाजेपर्यंत यशोदा तिथंच थांबते. इथे येण्यामागचं आपल्या मनातलं अंतस्थ प्रयोजन ओठावर आणणं तिला बरंच जड जातं. पण ती हिय्या करून बोलतेच. ‘हलदारबाबू तर आता गेलेत आणि माझ्या नवऱ्याचेही पाय आता काम करत नाहीत. तेव्हा काही काम द्या’ अशी विनवणी ती करते. बाई ते ऐकून न ऐकल्यासारखं करते. बाई तिला आयुष्यभर आसरा द्यायला राजी नसते. मात्र यशोदेच्या पाव हिस्सा दूध देखील आपल्या कुठल्या सुनेच्या स्तनात नाही, हे तिला पक्के ठाऊक असते. यशोदाचं मातृत्व आणि शारीरिक ठेवण एका अत्यंत देहसमृद्ध आईसारखी आहे याची बाईला जाणीव असते. यशोदाच्या विनवणीचा विचार या अर्थाने करत ती उत्तरते- ‘अगदी वेळेवर आलीस बघ, देवाने तुला कामधेनू बनवून माझ्या घरी पाठवलंय’ !
यावर भोळी भाबडी यशोदा उत्तरते की, ‘न जाणो का… ते माहिती नाही, पण मी पूर्वीपासूनच अशीच आहे, माझ्यात काहीच बदल झाला नाही !’ हे ऐकताच बाई चपापते. ती यशोदाला दुसऱ्या दिवशी परत यायला सांगते.

हसतमुखाने यशोदा तिथून बाहेर पडते. मात्र यशोदाने दिलेले उत्तर त्या घरातल्या सर्व बायकांच्या, पुरुषांच्या कर्णोपकर्णी पोहोचते. अगदी त्या बाळाच्या आईच्या कानीही पोचते ज्याला दिवसभरात यशोदाने दूध पाजले होते. ती बाईची मधली सून होती. तिचा नवरा हा जरा जास्तीच देहाकर्षी होता, त्याला बायकोच्या देहाचं जास्त आकर्षण होतं. यशोदाची ही गोष्ट त्याच्याही कानावर येते आणि त्याच्या डोक्यात एक कल्पना येते. तो रात्रभर बायकोशी गुफ्तगू करतो. सकाळ होताच तो बाईजवळ जातो आणि यशोदाला कामावर बोलवण्यासाठी विनवतो. त्याचं म्हणणं असतं की, सतत बाळंतपण होऊन आणि मुलांना दूध पाजून बायकोचा बांधा बिघडू लागला आहे. तिचा एकेकाळचा कमनीय बांधा बेडौल होऊ लागलाय. आणखी काही बाळंतपण झाली तर तिच्यात आकर्षणच उरणार नाही. शिवाय बाळांना दुध पाजून तिचे स्तन अनाकर्षक होतील, असं तो बाईला सुनावतो. त्याचं ‘तसलं’ बोलणं ऐकून बाईला आधी वाईट वाटतं, पण नंतर त्यातली मेख कळते. आपल्या पोराचे म्हणणे तिला शतप्रतिशत पटते. सूनांच्या देहातले आकर्षण कमी झाले तर आपली मुलं बाहेर तोंड घालतील असा विचार तिच्या मनात येतो. सतत दूध पाजून आणि दुधाच्या भाराने स्तन ओघळून गेले तर मुले आपआपल्या बायकांकडे बघणारदेखील नाहीत, यावर काहीतरी उपाय करायलाच हवा हे तिला पटते.

आपल्या मुलाचे म्हणणे रास्त समजून ती यशोदाला कामावर ठेवते. यासाठी कांगाली आधी राजी नसतो. मात्र बाई त्याला बरोबर गळ घालते. महिन्याकाठी काही पैसे, दुर्गापूजेच्या काळात एखादा कपडालत्ता आणि खायला प्यायला घरचं देऊन तिच्या दुधाला आपली नातवंडे चिटकावून द्यायची असा तिचा बेत ती तडीस नेते. अशा प्रकारे यशोदाची तिथे वर्णी लागते. खरं तर बाईची आणखी एक इच्छा अशी असते की, आपल्या सहा सुनांपैकी एका तरी सुनेने आपल्याइतकीच मुलं जन्माला घालावीत. कारण असं घडलं तर त्या आईबापाचं पुन्हा लग्न लावून देण्याचा रिवाज त्या घरात होता. बाईच्या पोटीही वीस अपत्ये जन्माला आली होती. पण बाईची एकही सून तिच्या इतकी पोरे जन्माला घालू शकत नाही. तेरा चौदा बाळंतपणात सगळ्या गुडघ्यावर येतात. त्यामुळे बाई हताश होऊन जाते. याउलट यशोदाचं असतं. या कारणाने बाईच्या मनात यशोदेबद्दल उशीरा का होईना स्नेह उत्पन्न होतो. याचा परिणाम असा होतो की, घरातली सगळी पोरं, नातवंडं यशोदाला प्रातःस्मरणीय समजू लागतात. तिच्या पायी मस्तक टेकवू लागतात. बघता बघता बाईच्या नातवंडांची लग्ने होतात, त्यांनाही मुलं होतात. बाईच्या नातसूना कामानिमित्त बाहेर जाऊ लागतात आणि त्यांची मुले यशोदाच्या छातीला बिलगून राहू लागतात. विशेष म्हणजे ही मुलंही यशोदेच्या स्तनांना जळू लागल्यागत चिटकून राहतात.

तिच्या पुढ्यात सदैव एक न एक मूल असायचेच. तरीही ती त्यात समाधानी होती. कारण त्याशिवाय तिला दुसरे काम नव्हते. आपल्याला बरे दिवस आले असं यशोदाला वाटू लागतं आणि पुन्हा एकदा तिचे नशीब दगा देतं. एका सकाळी उलट्या होऊन बाईचा अकस्मात मृत्यू होतो. बाई देवाघरी जाते आणि यशोदाचे दिवस फिरतात. नाही तरी आता तिची फारशी गरजही उरलेली नसते आणि तिचं शरीरही आता थकत चाललेलं असतं. यशोदाचा सन्मान जातो आणि तिला हिडीसफिडीस होऊ लागते. एके दिवशी घरातल्या मोठया सुनेसोबत खटके उडतात. ती यशोदाला तिचे वास्तव जाणवून देते. तिची जागा दाखवून देते. यशोदा ते घर सोडते. ती कांगालीचरणकडे जाते. तो आता नकुलेश्वर शंभूच्या मंदिरात पुजारी झालेला असतो. यशोदाची पोटची मुले त्या मंदिरात आणि परिसरात देखरेखीला कामाला असतात. शिवाय ते आपल्या बापाचे भोंदू चेले बनलेले असतात. कांगालीचं कुटुंब आता यशोदाशिवाय जगत असतं आणि त्या कुटुंबात यशोदाला स्थान नसतं. शिवाय त्यांना आता यशोदाच्या पैशांचीही फारशी गरज नसते, यशोदाची भाची गुलाबोमध्ये कांगालीचरणने म्हातारचळातले शरीरसुख हेरून ठेवले असते. त्याच्या वृद्धत्वात गुलाबो सारखी टंच भैरवी सहजासहज उपलब्ध होती. त्यामुळे देहाची लक्तरे झालेल्या यशोदाच्या मारूबिहागला तो पाने पुसतो. हताश होऊन तिथे परतलेल्या यशोदाची यामुळे घोर निराशा होते.

आधीच्या कांगालीच्या अपघातानंतर जसे स्वप्न पडले होते तसे स्वप्न या मंदिराच्या परिसरात पडेल या आशेवर ती निलट होऊन तिथेच राहू लागते. मंदिराबाहेर कटोरा घेऊन जागेवरच पडू लागते. पण या खेपेस तिला काही केल्या कसलंही स्वप्न पडत नाही. यशोदा ओळखते की, ‘आपण भिकारी म्हणून मरून गेलो तरी इथे कोणाला काही फरक पडणार नाही. त्यामुळे आपण हलदारांच्या घरी गेलेलं बरं’ असा विचार करून ती पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेते. तिला वाटते की हलदारबाबूंना जसे ब्रह्मशापाचे भय वाटले होते, तसे बड्या बहूलाही आपल्या विनाशाबद्दल भय वाटेल. पण तिचे विचार फोल ठरतात. घरातल्या मोलकरणीबरोबरच्या वादात तिचा पाणउतारा केला जातो. ब्रह्मशापाचे भूत तिच्याच मानगुटीवरून उतरते.

‘यशोदा तू इथे आपल्या मर्जीने परत आलीस, तुला कोणी बोलवलेलं नव्हतं. तेव्हा तू आपल्या मर्यादा ओळखून राहा.’ असा खोचक आदेश बडी बहू देते. तिथे गुमान राहण्यावाचून यशोदाकडे तरणोपाय नव्हता. ती मौन राहू लागते. जमेल ते काम करू लागते. मात्र राहून राहून तिला जाणवू लागते की, ‘आपल्या शरीरातील चेतना हरवू लागलीय, आपण कमालीचे थकत चाललो आहोत.’ तिला आपले स्तन पोकळ आणि चिंधडया उडाल्यागत वाटू लागतात. आपल्या स्तनाला कुठल्या बालकाने ओठ लावले नाहीत, असा दिवसही आपल्या आयुष्यात येईल याची त्या बिचारीला कल्पना सहन होत नसते. तिला आपला देह गळून गेल्यासारखं वाटू लागतं. पण घरातल्या कर्त्या स्त्री पुरुषांना याची जाणीव होत नाही. अखेर घरातली नातवंडेच आपल्या या जुनाट दुधआईच्या खंगत चाललेल्या प्रकृतीने चिंताक्रांत होतात. ही बाब ते आपल्या आयांच्या कानी घालतात. त्या नुसतं ऐकून घेतात.

असेच संथ बेजान दिवस जात राहतात. एके दिवशी दुपारी यशोदा काम आटोपून माजघरात पडलेली असते. वर्षानुवर्षाच्या दूध पाजण्याच्या सवयीतून नेहमीप्रमाणे त्याही वेळी तिचे स्तन उघडे पडले होते. खरे तर ते झाकण्याची ताकदही तिच्यात उरलेली नसते. तिच्या उघड्या देहावर बडी बहूची नजर जाताच ती भीतीने शहारून जाते. यशोदाच्या छातीवर आणि डाव्या बगलेजवळ लालसर चट्टे पडलेले असतात आणि त्यातून स्त्राव पाझरत असतो. चमकून ती यशोदाला त्याबाबत विचारणा करते. यशोदा यावर वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करते. मग तिला दवाखान्यात नेले जाते. डॉक्टर तिला तपासतात. अंदाज व्यक्त केला जातो की, तिला बहुधा स्तनांचा कर्करोग असू शकतो. बडी बहूच्या नवऱ्यास मात्र हे रुचले नव्हते. तिचे उपचार घरीच सुरु ठेवण्यावर तो भर देतो. यशोदाला दवाखान्यातून घरी आणले जाते. तिच्या छातीला कसले तरी मलम लावले जाते हाच काय तो तिचा उपचार सुरु राहतो. याने जे व्हायचे तेच होते. तिच्या जखमा मोठ्या आणि खोल होत जातात. असह्य दुर्गंधी येऊ लागते. ही बातमी कानावर आल्यावर बरेच दिवस मुर्दाडासारखा बसून असणारा कांगालीचरण एके दिवशी रडतकढत धाय मोकलत तिथे येतो. यशोदाची ही अवस्था पाहून त्याला भरून येते. त्याने ज्या गुलाबोवर डोळा ठेवला होता ती गुलाबो तिच्या तरण्याताठया प्रियकराबरोबर मंदिराची दानपेटीतला गल्ला घेऊन पळून गेलेली असते. कांगालीचरण उन्मळून पडतो. त्याला त्याची चूक उमगते. स्वतःला अपराधी समजत तो भ्रमिष्टागत ऊर बडवत परततो. यशोदाच्या उपचारासाठी तो नवीनला राजी करतो. यशोदाला इस्पितळात दाखल केलं जातं.

ती कॅन्सरच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं निदान डॉक्टर करतात. भेदरलेला कांगाली यावर डॉक्टरांना विचारतो की, या जागेवरही कॅन्सर होतो का ? या प्रश्नावर डॉक्टर असहाय होतात. कांगालीला राहवत नाही तो उस्मरून जातो. ‘तिने आपल्या पोटच्या वीस आणि बाबूंच्या घरच्या तीस मुलांना दुध पाजलंय, तिने खूप माया प्रेम वात्सल्य दिलेय, तिला असं व्हायला नकोय. पण तिच्या स्तनांना यामुळेच असं झालं आहे काय ?” असं म्हणत कांगाली हतप्रभ होतो. यशोदाने पन्नासेक मुलांना आपलं दुध पाजलं आहे, हे ऐकून डॉक्टर थक्क होतात. ते कांगालीला सांगतात की, आता तिच्याकडे फारसा वेळ उरला नाही. या घटनेनंतर यशोदाची प्रकृती आणखी खालावत जाते. सर्वांना कळून चुकते की, यावर आता काही उपाय उरला नाही. हळूहळू तिच्याकडे भेटायला येणाऱ्या लोकांची संख्या घटत जाते, परिस्थिती इतकी बिघडते की तिच्या देहाच्या दुर्गंधीने डॉक्टर आणि नर्सेसना तिचे उपचार करणं देखील असह्य होऊन जातं. तिच्या शिरेतून केवळ वेदनाशामक औषधे दिली जातात, त्यामुळे ती अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडून राहू लागते. आपलं दुध प्यालेला एक तरी मुलगा डॉक्टर झाला असेल असा विचार तेव्हा ती करू लागे. आपल्यावर उपचार करणारा डॉक्टर हाही आपलाच दूधपिता मुलगाच आहे असं ती समजू लागते. उपचारासाठी तो जवळ आला की थोडं शुद्धीवर असली तरी ओरडायची की, ‘दूध पिऊन पिऊन इतका मोठा झालास आणि आता मलाच सतावतोस का ? माझ्या दुधाची हीच फेड आहे का ?’

डॉक्टरांना कळून चुकते की, इतकी वर्षे दुध पाजून पाजून आता आजारपणाने ग्रासलेल्या यशोदाच्या डोक्यावर परिणाम झालाय, ती जगातल्या सगळ्या पुरुषांना आपलं अपत्य समजू लागलीय, हा प्रत्येक पुरुष आपल्या स्तनाग्रांना कधी तरी बिलगून होता अशीच तिची धारणा झालीय. अशा अवस्थेतही यशोदा आपली अंतिम इच्छा व्यक्त करते. तिच्या मृत्यूनंतर तिला नातलगांऐवजी एखाद्या डोंबाच्या हाताने अग्नीसंस्कार दिला जावा अशी तिची इच्छा असते. काही दिवसांतच एका मध्यरात्री यशोदा इहलोकाच्या यात्रेस निघून जाते. बडे बाबूच्या घरी दवाखान्यातून फोन जातो पण रात्री ते फोन बाजूला काढून ठेवत असल्याने त्यांना निरोप जात नाही. इस्पितळात पडून असलेल्या तिच्या अचेतन देहावर बेवारसाप्रमाणे डोंबाकडून दाहसंस्कार केला जातो. तिच्या पश्चात लोक चर्चा करू लागतात की, ‘यशोदाने ज्या ज्या इच्छा व्यक्त केल्या होत्या त्या पुऱ्या झाल्या, ती देवाचा अवतार होती, ती महान होती, तिचे व्यक्तिमत्व अफाट होते’ अशा वल्गना केल्या जाऊ लागतात. कथेच्या शेवटी महाश्वेतादेवी म्हणतात की, ‘लोक ज्याला देवस्वरूप देतात किंवा महान ठरवतात त्याला एकटं सोडून दिलं जातं अन अखेरीस लोक त्यांना एकाकी मरण्यासाठी सोडून देतात.’

~~~~~~~~~

स्त्रीच्या देहसापेक्ष सौंदर्यव्याख्या, तिच्या देहरचनेचे तोटे, तिचे स्तन हे जीवनदायी असण्यापलीकडे मृत्यूदायी देखील असतात हा विचार, स्तनांचा पुरुषी हव्यास कसा असतो, स्तनांचे आकर्षण कसे अमर राहील आणि स्तनसौंदर्याची अखेर कशात होते यावर अत्यंत मार्मिक भाष्य या कथेत येतं. स्त्रीला सर्वात जास्त नुकसान तिच्या अवसानघातकीपणा सोबतच कचखाऊपणामुळे होते अन स्वतःला कमजोर समजतानाच खंगत जाणाऱ्या शरीरभावामुळे ती मानसिकदृष्ट्या खचत जाते याकडे लक्ष वेधताना महाश्वेतादेवी मातृत्वामुळे होणाऱ्या स्त्रीच्या फरफटीकडे अत्यंत स्थितप्रज्ञागत पाहतात.

यातील स्त्रियांची वर्णने आणि स्त्रीबद्दलचे पुरुषांचे विविध दृष्टीकोन वाचताना हे लेखन कोण्या पुरुषाने केले की काय, असे काही काळ वाटू लागते इतके ते सरस आणि सकस आहे. स्त्रीचा वापर सगळेच जण हत्यारासारखा करतानाच तिचे शोषणही बिनदिक्कत करतात हे अधोरेखित करताना यात स्त्रियादेखील मागे नसतात हेही येथे जाणवते. बाईचं वय ढळल्यानंतरचं जगणं आणि तरुणपणीचं जगणं यातला फरक जितका जीवघेणा दिसतो त्याहून अधिक भीषण फरक त्यांच्याकडे बघण्याच्या जगाच्या दृष्टीकोनात जाणवत राहतो. स्त्रीचं दुध पाजणं आणि त्यामुळे तिच्या स्तनांचे बेडौल होणं याबद्दलचे उतारे डोक्यात घण घालतात.

ही कथा वाचणारा वाचक जर पुरुष असेल तर येथून पुढे त्याला दिसणाऱ्या प्रत्येक स्तनात त्याची आई आठवावी इतका प्रभावी परिणाम ही कथा साधते, माझ्या मते महाश्वेतांच्या लेखणीचे हे सर्वोच्च यश म्हणावे लागेल. विशेष म्हणजे ‘हजार चौरांसी की मां’ या कथेतून महाश्वेतादेवींनी नेमका उलटा संदेश इतक्याच परिणामकारकरित्या दिला होता.

‘स्तनदायिनी’ ही केवळ कथा नसून स्त्रीच्या तथाकथित सौंदर्यात्मक लक्षणांची चिरफाड करणारी व तिच्या संवेदना, तिचं देवभोळेपण, तिच्या त्यागभावना, तिच्या आयुष्याचं अव्यवहारीक गणित, तिचं परावलंबित्व, तिच्यातल्या नातेसापेक्ष चित्तवृत्ती, तिचं एकंदर जगासाठी झिजणं आणि स्वत्वाच्या शोधापासून कोसो दूर असणं हे कथेत आस्ते कदम डोकावत राहतं. मात्र यावर कटाक्ष न टाकता ते काम त्यांनी वाचकावर सोडलं आहे. कथा संपते तेव्हा अत्यंत विषण्ण करून जाणारी विमनस्कता डोक्यात राहते. आपल्या सभोवतलच्या यशोदा आपल्याला दिसू लागतात आणि आपले स्तन झाकत आपल्याला पुरुषी श्वापदांच्या कचाटयातून वाचवण्याची धडपड करणाऱ्या यशोदाही दिसू लागतात. आजच्या काळात पूर्वीइतक्या मोठ्या संख्येने मुलं जन्माला घातली जात नसली तरी नारीच्या स्तनसापेक्ष सौंदर्याच्या पुरुषी आणि स्त्री मनातील व्याख्या अजूनही तशाच आहेत, किंबहुना आणखी बिघडल्या आहेत हे सत्य टोकदारपणे समोर येते.

महाश्वेतादेवींनी ‘स्तनदायिनी’च्या नायिकेचं नाव यशोदा ठेवून एक संदेश दिलाय. आपल्याला स्त्रीत्वाकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन बहाल करते हे या कथेचे सर्वात मोठे यश होय. या कथेत वासना, प्रेम, आस्था, स्नेह, परोपकार, त्याग, तिरस्कार, स्वार्थ, घृणा, वेदना, व्यथा यांची वीण इतकी घट्ट ओवलीय की यातली सर्व नाती आणि सर्व पात्रे आपल्या परिचयाची वाटतात. शिवाय एका अलौकिक साहित्यकृतीचा निखळ आनंद मिळतो तो वेगळाच.

(लेखक नामवंत स्तंभलेखक व ब्लॉगर आहेत)

8380973977

Previous articleआभासी दुनियेतील स्वप्नभंगाचे बळी
Next articleछत्रपती छत्रपती शाहूराजांचा रिलेव्हन्स काय?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here