इफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ !

-शेखर पाटील

कोरोनाच्या आपत्तीने फक्त मुद्रीत माध्यमाचेच कंबरडे मोडले नसून ब्रॉडकास्ट जर्नालिझमलाही जोरदार हादरा दिल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्ययावत न्यूजरूम्स, मनुष्यबळाची मोठी फौज आणि अर्थातच अवाढव्य इन्फ्रास्ट्रक्चरचा समावेश असणार्‍या वृत्तवाहिन्यांना संपर्काच्या अत्याधुनिक टुल्सने जेरीस आणले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर देशभरातील नामांकीत वर्तमानपत्रांनी ‘प्रिंट इज प्रूफ’ या अतिशय चपखल कॅचलाईनसह व्यापक जनजागृती मोहिम राबवली होती. मला स्वत:ला हे अत्यंत परिणामकारक असे कँपेन आवडले होते. तथापि, आपण पत्रकारितेच्या भविष्याकडे नजर लावली असता आपल्याला लाईव्ह जर्नालिझमच्या स्वरूपातला याच्या पुढील टप्पा नजरेस पडतो. याचसाठी मला वाटते की, ‘If Print Is proof…Then Live Is Truth !’ म्हणजेच, मुद्रीत माध्यम हा विश्‍वासार्हतेचा पुरावा असेल तर लाईव्ह मीडिया हा निखळ सत्य या प्रकारातील मानावा लागणार आहे. म्हणजेच, पत्रकारितेचे भवितव्य हे लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये असल्याचा पैलू आपण सर्वांनी समजून घेण्याची गरज आहे. याचमुळे आज लाईव्ह जर्नालिझमचा वर्तमान व भविष्य आणि यातील बरे-वाईट घटक याबाबत आपल्याला दोन शब्द सांगावेसे वाटतात.

मी गेल्या दहा वर्षांपासून डिजीटल मीडियाबाबत लिखाण करतोय. अनेकदा जाहीर व्यासपीठांवर याबाबतची सांगोपांग भूमिका देखील मांडलेली आहे. यातच गेल्या सुमारे एक वर्षांपासून मी तंत्रज्ञानाचे नवनवीन प्रवाह आणि बदलणारी पत्रकारिता यावर विपुल लिखाण केलेय. देशभरातील काही वरिष्ठ पत्रकार, मीडिया हाऊसेसचे मालक, संपादक आदींपासून ते गाव पातळीवरील साध्या वार्ताहरापर्यंत अनेकांच्या शंकांचे समाधान देखील मी करत आलेलो आहे. अशाच एका मोठ्या पत्रकारासोबत चर्चा करतांना मी सहजपणे ”इफ प्रिंट इज प्रूफ…देन लाईव्ह इज ट्रुथ !” असे उदगार काढले. यावर त्यांनी मला तातडीने थांबवत ‘याच वाक्याचा विस्तार असणारा सविस्तर लेख येऊ द्या’ असे सांगितले. यानुसार याबाबत आपल्याशी सांगोपांग चर्चा करत आहे.

डिजीटल माध्यमाचा विचार केला असता, साधारणपणे पहिला टप्पा हा वेबसाईट-ब्लॉगचा, दुसरा टप्पा सोशल मीडियाचा आणि तिसरा टप्पा हा लाईव्ह स्ट्रीमिंग व मॅसेंजर्सचा असल्याचे आपल्याला दिसून येते. आज डिजीटल पत्रकारितेत हे तिन्ही प्रकार अगदी बेमालूमपणे मिसळून गेले आहेत. आता या तिन्ही घटकांचा बहुतांश मीडिया हाऊसेस हे एकत्रीतपणे वापर करत आहेत. यात अलीकडच्या काळातील सर्वाधिक उत्कंठावर्धक भाग हा अर्थातच लाईव्ह स्ट्रीमिंगचा होय. सध्या सुरू असणार्‍या लॉकडाऊनच्या कालावधीत तर झूमसारख्या अ‍ॅपचा वापर करून याचे रेकॉर्डेड अथवा लाईव्ह टेलीकास्ट करण्याचे फॅड अगदी खेडोपाडी पोहचले आहे. या सर्व घडामोडींच्या केंद्रस्थानी असणारे लाईव्ह स्ट्रीमिंग हे पत्रकारितेच्या भवितव्यात मोठी भूमिका पाडणार असल्याची बाब स्पष्ट आहे. वास्तविक पाहता दूरचित्रवाणीच्या माध्यमातून कोणत्याही घटनेचे ‘लाईव्ह टेलीकास्ट’ गेल्या अनेक दशकांपासून केले जात आहे. यानंतर जगभरात इंटरनेटचे प्रचलन सुरू होत असतांना अर्थात नव्वदच्या दशकाच्या प्रारंभीच आंतरजालाच्याच मदतीने लाईव्ह प्रक्षेपण सुरू झाले. अर्थात, हे तंत्रज्ञान तेव्हा बाल्यावस्थेतच होते. २००५ साली सुरू झालेल्या युट्युबने (ज्याची कॅचलाईनच ‘ब्रॉडकास्ट युवरसेल्फ’ अशी होती !) खर्‍या अर्थाने याला वेग दिला. २०११ पासून ‘युट्युब लाईव्ह’ हे मोजक्या युजर्सला तर २०१३ पासून सर्वांना उपलब्ध झाले. २०१५ साली ट्विटरने लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा असणार्‍या पेरिस्कोपला खरेदी केले. तर २०१६ साली फेसबुक व इन्स्टाग्रामवर याची सुविधा आली. आता या विविध मंचांवरून लाईव्ह प्रक्षेपणाचा विपुल प्रमाणात वापर केला जात आहे.

आज लाईव्ह स्ट्रीमिंग प्रचलीत होऊन पाच-सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याच्या विकासातील तीन महत्वाचे फॅक्टर आपण समजून घेतले पाहिजे. एक तर, वर नमूद केल्यानुसार विविध कंपन्यांनी युजर्सला मोफत लाईव्ह प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध करून दिली. याच्या जोडीला ‘फोर-जी’ तंत्रज्ञान प्रचलीत झाल्याने इंटरनेटचा वेग वाढला. तर विविध कंपन्यांनी किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम कॅमेर्‍यांनी युक्त स्मार्टफोन्स सादर केले. म्हणजे टेक्नॉलॉजी, कॅरिअर (वाहक) आणि उपकरणे या तिन्ही आयामांमधून मिळालेली चालना ही लाईव्ह स्ट्रीमिंगला बूस्टर डोस देणारी ठरली असून याचा डिजीटल मीडियात मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंगमुळे कुणालाही आपल्या हातामध्ये असणार्‍या स्मार्टफोनमधून आपल्या भोवतालच्या घडामोडींना जगापर्यंत अगदी ‘रिअल-टाईम’ या प्रकारात पोहचवण्याचे स्वातंत्र्य मिळाले. यामुळे वृत्त वाहिन्यांप्रमाणे महागड्या ओबी व्हॅन्सऐवजी हातातल्या अगदी पाच-सात हजारांचा स्मार्टफोनचा वापर करून महानगरांपासून ते वाडी-वस्त्या व अगदी दुर्गम भागांमधूनही अगदी थेट प्रक्षेपण करण्याचा हक्क सर्वांना मिळाला. याचेच फलीत म्हणजे आज आपल्या भोवती लाईव्ह स्ट्रीमिंगचा विस्फोट झाल्याचे दिसून येत आहे. जगभरातील मान्यवर सेलिब्रिटींपासून ते गल्लीबोळातल्या पोराटोरांपर्यत बरेच जण आता याचा मनसोक्तपणे वापर करत असून याच्या माध्यमातून ब्रॉडकास्टर्सची एकाधिकारशाही संपुष्टात आलेली आहे. कोरोना पश्‍चातच्या जगातील पत्रकारितेत हेच टुल महत्वाची भूमिका पार पाडणार असल्याचेही आता स्पष्ट झाले आहे.

मी हायब्रीड मीडियाबाबत अनेकदा उहापोह केला आहे. यात बहुतेक वर्तमानपत्रांना आता ‘फिजीटल’ हे मॉड्यूल अवलंबवावे लागणार असल्याचे मत मी आधीच मांडलेले आहे. यातील एक महत्वाचा घटक हा लाईव्ह स्ट्रीमिंगचा होय. खरं तर आता अनेक प्रमुख नेत्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपापली मते मांडण्यास प्रारंभ केला आहे. याचा शासकीय, निम-शासकीय व खासगी वापर विपुल प्रमाणात वाढेल. येत्या कालखंडात अगदी खुर्द वा बुद्रुक गावातील ग्रामसभा देखील याच प्रकारातून लाईव्ह करण्याचे सरकारी आदेश निघतील हे लिहून ठेवा. आपण एका अतिशय पारदर्शक युगात प्रवेश केला असून आपल्या भोवती असंख्य लोकांच्या हातात स्मार्टफोनरूपी लाईव्ह प्रक्षेपणाचे टुल आहे. सध्या यातील बहुतांश युजर्स हे हौशी या प्रकारातील ब्रॉडकास्टर असले तरी ते एका अतिशय गतीमान आणि पारदर्शक अशा जीवंत ‘इको-सिस्टीम’चा भाग बनतील. वर्तमानपत्रांच्या मर्यादा लक्षात घेऊन डिजीटल मीडिया सुसाट वेगाने पुढे निघून जातांना आपल्याला दिसतोय. मुद्रीत माध्यम पोहचत नाही तिथे नवमाध्यमाची पोहच असल्याने हे शक्य झालेय. अगदी त्याच प्रकारे व्यावसायिक वृत्त वाहिन्यांनी सोडलेली ( वा ते पोहचू शकले नाहीत अशी ) ‘स्पेस’ ही लाईव्ह स्ट्रीमिंगच्या माध्यमातून भरून निघणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये नजीकच्या काळात नेमके काय बदल होणार याबाबत मी स्वतंत्र पोस्ट लिहणार आहेच. यात याच्या व्यापक परिणामांचाही समावेश करण्यात येईल. आता, उरला प्रश्‍न आजच्या लेखातील मुख्य गाभा असणार्‍या शीर्षकाचा. तर, वर्तमानपत्रांना शतकापेक्षा जास्त असणार्‍या इतिहासामुळे लाभलेली विश्‍वासार्हता कुणी नाकारू शकणार नाही. मुद्रीत माध्यम हे ‘प्रूफ’ असल्याचा वर्तमानपत्रांचा दावा देखील कुणी खोडू शकणार नाही. तथापि, पुरावा म्हणजे निर्विवाद सत्य नव्हे. खरं तर, हा नकारात्मक शब्द आहे. आम्ही दिलेली माहिती ही खरी असल्याचा पुरावा वर्तमानपत्र देऊ शकते. मात्र ”आम्ही फक्त खरेच छापतो” हे कुणी म्हणू शकणार नाही. कारण मुद्रीत माध्यमांच्या दाव्यानुसार ते फेक कंटेट छापत नसले तरी ओपिनियन मेकींगसाठी करण्यात येणार्‍या कोलांटउड्या अगदी सर्वसामान्य वाचकांच्याही लक्षात येतात. अगदी एखादी साधी घटना ही वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये त्यांच्या स्वत:च्या विचारधारेनुसार छापून येते हे नव्याने सांगण्याची गरज नाही. अर्थात, पुरावा हा पूर्वग्रहदूषित असू शकतो, तो मॉर्फ करता येतो. डिजीटल माध्यमात तर हा प्रकार सर्रास घडतो. तथापि, लाईव्ह जर्नालिझमध्ये याला पूर्णपणे आळा बसणार आहे.

जगभरात कोट्यवधी लोक आपापल्या स्मार्टफोनवरून लाईव्ह करत असले तरी हे तंत्रज्ञान अद्याप अत्युच्च पातळीवर पोहचलेले नाही. आगामी काळात आर्टीफिशियल इंटिलेजीयन्स म्हणजेच कृत्रीम बुध्दीमत्तेच्या मदतीने लाईव्ह स्ट्रीमिंगचे अचूक वर्गीकरण करता येईल. अर्थात, लोकेशन, विशिष्ट घटना आदींशी संबंधीत लाईव्ह प्रक्षेपणाला अचूकपणे शोधण्याची प्रक्रिया आणि साधने अस्तित्वात येतील. तसेच सध्या हाय-टेक कॅमेरा सेटअप पासून ते स्वस्त स्मार्टफोनपर्यंतची उपकरणे यासाठी उपयुक्त असली तरी लवकरच वेअरेबल्स अर्थात परिधान करण्याजोग्या उपकरणांचे (उदा. स्मार्ट गॉगल्स, वेअरेबल अ‍ॅक्शनकॅम आदी) लाईव्ह स्ट्रीम प्रचलीत होईल. अर्थात, तेव्हाच आपण खर्‍या अर्थाने पारदर्शक अशा माध्यमाच्या युगात प्रवेश करू. याचा सरळ फटका हा मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि काही प्रमाणात डिजीटल माध्यमालाही बसणार आहे. आतापर्यंत डिजीटल मीडियात शब्द, प्रतिमा, ध्वनी व व्हिडीओ यांचा समावेश असणार्‍या स्टोरी टेलींगचा फॉर्मेट वापरला जातो. या ऐवजी रॉ-फुटेजचा वापर प्रचलीत होईल. लाईव्ह प्रक्षेपणाच्या माध्यमातून लोकल न्यूजरूम्स वा हौशी पध्दतीत सादर करण्यात आलेल्या बातम्या या ‘सुपर फिनिश्ड’ नसल्या तरी त्या पाहणार्‍यांना सत्यस्थितीची जाणीव करून देतील. याच माध्यमातून सत्याच्या जवळपास नेणारे एक नवीन सशक्त माध्यम उदयास येईल. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल माध्यमांमध्ये लाईव्ह स्ट्रीममधून येणारे फिड आणि याच्याशी संबंधीत बातम्यांचे प्रमाण लक्षणीय प्रमाणात वाढेल.

याच्या वापरातील घातक पैलूंचे धोके देखील आपल्याला लक्षात घ्यावे लागतील. आता सहजपणे कुणीही लाईव्ह व्हिडीओ प्रक्षेपीत करू शकत असून याचे अनेकविध गैरवापर आपल्या समोर आलेले आहेच. नेमका हाच प्रकार भविष्यात गंभीर स्वरूप धारण करू शकतो. लाईव्हची सुविधा देणार्‍या बहुतांश कंपन्यांनी आता हेट स्पीच, लैंगिक व हिंसक कंटेंट आदींना रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू केले असले तरी याला पूर्णपणे आळा घालता आलेला नाही. मानवी विकृतीला लाईव्ह करण्याची सहज उपलब्धता ही अतिशय धोकेदायक ठरू शकते. तथापि, तंत्रज्ञानाच्या प्रगतीची दिशा आणि गती कुणी थांबवू शकत नाही. यामुळे पत्रकारितेत लाईव्ह हा अविभाज्य घटक बनला असून याकडे कुणी दुर्लक्ष करू शकणार नाही. अर्थात, ‘इफ प्रिंट इज प्रूफ….देन लाईव्ह इज ट्रुथ’ असल्याचे (सध्या तरी) मीडियासाठी कटू सत्य असले तरी ते पचवावे लागेल.

( नजीकच्या भविष्यात लाईव्ह स्ट्रीमिंग हा कोणत्याही स्वरूपातील मीडियाचा अविभाज्य घटक बनणार आहे. तथापि, लाईव्ह प्रक्षेपणाला मॉर्फ करण्यास सक्षम असणारे ‘डीप फेक’ हे तंत्रज्ञान क्षितीजावर उदयमान झालेले आहे. तर याला ओळखण्यासाठीची प्रणाली देखील वापरात आली आहे. हा लपाछपीचा खेळ नेमका आहे तरी काय ? याबाबत मी लवकरच सविस्तर पोस्ट लिहतो. धन्यवाद )

(लेखक नामवंत पत्रकार , ब्लॉगर व टेक्नोक्रेट आहेत.)

92262 17770

https://shekharpatil.com

Previous articleउद्धव अन कळसूत्री बाहुले ? मुळीच नाही !
Next articleचौथी औद्योगिक क्रांती : आव्हानांचा पूर्णपणे नव्याने विचार करण्याची गरज
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.