शिमोगा…पश्चिम घाटातील स्वित्झर्लंड

-राकेश साळुंखे

शिमोगा… पश्चिम घाटातील हा निसर्गरम्य जिल्हा . कर्नाटकात जे प्राकृतिक विभाग आहेत त्यातील मालनाड या प्रसिध्द भागातील हा समृद्ध जिल्हा. साताऱ्यापासून ५१७ , कोल्हापूरपासून ३९८ किलोमीटर, तर हुबळी विमानतळापासून १९६ किमी अंतर आहे. शिमोगाला रेल्वे स्टेशनही आहे.
तुंगभद्रा नदीने हा भाग समृद्ध झालेला आहे . या भागात जायचे म्हटले की मन खूप आतुर होते. राष्ट्रीय महामार्गावरील NH4  रानेबेंनूर ओलांडले की होस्पेट -शिमोगा रोड वरून आत जायचे. रानेबेंनूरच्या वरून वळायचे नाही. तो रस्ता खूप खराब आहे. हम्पी होस्पेटच्या रस्त्यानेच शिमोगा च्या रस्त्याला लागलो की छोटी छोटी खेडी चालू होतात. दुतर्फा चिंचेच्या झाडांमधून हा रस्ता जातो. हळूहळू पोफळीच्या बागा आणि भातशेती दिसू लागते.आणखी जसजसे पुढे जाऊ तसतशी विस्तीर्ण भातशेती लागते . भात शेतीचे हे हिरवे-हिरवे गालिचे अतिशय देखणे दिसतात . पिकं कापणीला येतात तेव्हा सोनेरी अथांग पसरलेल्या भात शेतीचे दृश्यही अत्यंत विलोभनीय असते. ते पाहण्यात मन रमून जाते .फोटो काढत काढतच आपण शिमोगाला पोहोचतो.

मालनाडला बऱ्याच वेळा गेलोय तरी जेव्हा पहिल्यांदा शिमोगाला २० वर्षापूर्वी गेलो होतो तेव्हा तेथील तलाव आणि त्यातील कमळे यासाठी मला हा जिल्हा भावला होता.  मालनाड मध्ये कमळ असलेले विपुल तलाव आहेत. ऐतिहासिक राजवटीत येथे खूप तलाव खोदले गेले.त्यामुळे हा भाग पूर्वीपासूनच समृद्ध आणि स्वतंत्र होता. शिमोगाया नावाचा उगम पुढीलप्रमाणे सांगितला जातो. शिव मुख , शिवं मूगू म्हणजे शिवाचे नाक, शिवं मोग्गे म्हणजे शिवाला वाहिलेली फुले . आणखी एका दंतकथेनुसार सीही मोगे म्हणजे गोडाचे भांडे.

मौर्य, सातवाहन, मुख्यतः कदंब, चालुक्य ,होयसळ, विजयनगर आणि त्यानंतर हैदर अलीच्या म्हैसूर साम्राज्याच्या अधिपत्याखाली हा प्रदेश होता.शहाजी राजांनी सुद्धा या प्रदेशाच्या नायकाला जिंकले होते. शहाजी राजांचा या भागात वावर होता . येथून जवळच होदिगेरेला त्यांची समाधी आहे. १६३७ मध्ये आदिलशहाने शहाजीराजे व रणदुल्लाखान यांना या भागातील राज्यकर्ता वीरभद्र नायक याच्यावर चाल करण्यास पाठवले . ही इक्केरीची लढाई त्यांनी जिंकली. मात्र रणदुल्लाखानने अत्यंत दुष्टपणे अत्याचार करून लुटालूट करून बरीच संपत्ती आदिलशहाला अर्पण केली . या पराभवानंतर वीरभद्र नायक जंगलात पळून गेला. तो परत शहाजीराजेंच्या आश्रयाने सिंहासनावर बसला.

त्याच्या नंतर शिवाप्पा नायकाने व्यापाराच्या साह्याने या भागाला वैभव प्राप्त करून दिले. त्याचे राज्य केरळमधील निलेश्वर (कासारगोड) पर्यंत होते. १६३७ ला इक्केरीहून बेदनूरला राजधानी हलवण्यात आली होती.  शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयाच्या वेळी हे संस्थान त्यांचे मित्र संस्थान होते . त्यावेळी तेथील महिला राज्यकर्ती कालाडी चनाम्मा यांनी आपल्या सोबत्यांची  बैठक घेऊन छत्रपती राजारामांचा योग्य सन्मान करून त्यानंतर मुघलांशी युद्धही केले होते.  हे युद्ध पराभव न होता एका कराराने संपले . इथले एक व्यापारी सदाशिव यांनीही छ. राजारामांना आर्थिक मदत केली होती . शिवाप्पा व चनाम्मा यांनी आर्थिक शिस्त लावून या भागाचा विकास केला. अर्थात इथे राज्य केलेल्या सर्व राज्यकर्त्यांनी हा भाग समृद्ध होण्यात हातभार लावला आहे.

शिमोग्यात एक Museum आहे. ते Old Palace मध्ये आहे.  तो Palace शिवाप्पा नायक याने तुंगा नदीच्या काठी बांधलेला आहे. शिमोगा शहरापासून अगदी थोड्या अंतरावर आवर्जून भेट द्यावी अशी दोन मुख्य ठिकाणे  आहेत. त्यातील एक- ‘सक्रेब्याले एलिफंट कॅम्प’  (Sakrebyle Elephant Camp). दुसरे सागर  या तालुक्याच्या रस्त्याला असलेली ‘टायगर अँड लायन सफारी’ .बरोबर लहान मुले असतील तर ही दोनही ठिकाणे उत्तम. Elephant कॅम्प मध्ये सकाळी ९ च्या दरम्यान गेलो की बऱ्यापैकी हत्ती बघायला मिळतात. येथे रानटी हत्तींना शिकवण्याचे काम केले जाते. सकाळी ९ ते ११ या वेळेत त्यांना नदीवर स्नानासाठी आणले जाते. तिकीट काढून आपल्याला हत्ती जवळ जाता येते. समोरच असणारा धरणाच्या बॅकवॉटर चा प्रदेश व  हत्तींना  दिले जाणारे प्रशिक्षण, यामुळे हे २ तास निवांतपणे जातात. टायगर आणि लायन सफारीमध्ये बँकॉकच्या  सफारी वर्ल्ड येथील सफारीच्या धर्तीवर तशीच पण छोटी सफारी आहे.  आपण पिंजऱ्याच्या गाडीत असतो आणि बाहेर वाघ, सिंह मुक्त असतात. सागर तालुका दोन ठिकाणासाठी प्रसिद्ध. एक जगप्रसिद्ध जोग वाटरफॉल. आणि दुसरे म्हणजे नरसिंहपुरा येथील आयुर्वेदीक उपचार केंद्र.

२० वर्षांपूर्वी पावसाळ्यात मी,  वडील (डॉ .आ. ह. साळुंखे )  आणि ड्रायव्हर सावंतवाडीतून जोग फॉलला निघालो होतो. कारवारच्या खाली होनावरलाच संध्याकाळ झाली होती. जोगच्या फाट्याच्या वळणावर  आम्ही चहा घेतला. ढगाळ वातावरण होते.  पुढे काय वाढून ठेवलंय याचा यत्किंचितही अंदाज आम्हाला आला नाही.  जोग फॉल येथील हॉटेलला फोन करून  रूम बुक करण्यास सांगितले होते.  घाट लागायच्या आधीच तुफान पाऊस सुरू झाला. तसं पावणे दोन तासाच्या रस्त्यापैकी अर्धा तासच झाला होता. आता अंधार ही पडला होता. घाट चढू लागलो तेव्हा  पावसाचे रौद्र रूप दृष्टिस पडू लागले.  रस्त्यात झाडे पडलेली होती, रस्त्यावरून पाणी वाहत होते.   रस्ता पूर्ण निर्मनुष्य. पुढे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. एका ठिकाणी विजेच्या उच्च दाबाच्या  तारा ही पडलेल्या होत्या.  दोन तास झाले तरी काही जोग फॉल च्या ब्रिजचा फाटा दिसेना, आता मात्र कुठं फसलो असं वाटायला लागलं. त्याकाळात तेथे मोबाईल नेटवर्क नव्हतं. चौकशी करायला कोणी दिसेना. एवढयात त्या काळ्याकुट्ट अंधारात कमरेला कोयते अडकवलेले तिघे पुढे चालताना दिसले. त्यांना भाषा समजणारच नव्हती. त्यामुळे त्यांना विचारायचा प्रश्नच नव्हता.  जवळपास वस्ती असेल असा अंदाज मात्र आला. पाऊस कमी झालेला होता. अंदाज बरोवर ठरला. १०-१५ मिनिटात एक दोन धाबे लागले. तेथे चौकशी केली, तर आम्ही बरेच पुढं आल्याचं समजलं. परत उलट गेलो. पाऊस कमी झाल्याने ब्रिजची वाट दिसली. ब्रिज ओलांडून हॉटेलवर गेलो. मॅनेजर एकटाच होता. तो म्हणाला,  आधी रेस्तोरंटमध्ये जाऊन जेवण करा. ९.३०-१०.00  झालेले. वीज कुठेच नव्हती. मॅनेजरने गॅसचे  मोठे सिलेंडर दिवाबत्तीला जोडून प्रकाश केला होता. म्हणजे   सांबर आणि भात फक्त उपलब्ध होता. तात्यांना पथ्यामुळे सांबार खाणे शक्य नव्हते.  तरी त्यांनी ते खाल्ले.  रूम वर गेलो. लाईट नव्हतीच. Generator ही चालू होत नाही, असे त्याने सांगितले. त्याने एक मेणबत्ती  आम्हाला दिली. त्यानंतर तो जो गायब झाला, तो गायबच. हॉटेलमध्ये भयानक शांतता होती, कोण आहे की नाही,  असा प्रश्न पडत होता. भयानक शांततेत  झोप लागणे, तसं मुश्किल होतं. मात्र  धबधब्याचा आवाज त्या शांततेत ऐकत ऐकत झोपी गेलो.

 सकाळी लवकर उठून उजडताच धबधबा पाहायला गेलो  पण पुढचं दृश्य निराशाजनक होते. दरी संपूर्ण धुक्याने भरून गेली होती.  काहीच दिसत नव्हते. १५-२०  मिनिटांनी थोडे वारे चालू झाले आणि धुक्याची चादर बाजूला झाली आणि डोळ्याचे पारणे फिटले . अतिशय  नयनमनोहर दृश्य दृष्टीस पडले. भारतातील सर्वात उंच आणि जगातील मोजक्या प्रसिद्ध वॉटरफॉलपैकी एक असलेल्या या जोग फॉलमध्ये  चारही प्रवाह वेगाने आणि विपुल पाण्यासह खाली पडत होते.

 विलोभनीय Jog Falls- क्लिक करा

  हा धबधबा पाहण्याची ही माझी दुसरी वेळ होती. त्यानंतरही सर्व ऋतूत त्याची रूपं पाहिली पण ही भेट जास्त आठवणीत राहिली. जवळच हायड्रोइलेक्ट्रीक पॉवर स्टेशन आहे  Rope ट्रेनने तिथे जाऊन आलो. शरावती नदीवरील या वॉटरफॉलची उंची ८२९ फूट आहे. यात चार प्रवाह आहेत राजा, राणी, रॉकेट आणि  रोअरर.  ऑगस्ट महिन्यात येथे भेट देणे उत्तम.  याचे दुसरे नाव गिरसप्पा असेही आहे. नरसिंहपुरा हे ठिकाण तसे  कॅन्सरच्या पेशंटना जास्त माहिती. तिथे नारायण म्हणून एक वैद्य आहेत. ते  पिढीजात वैद्य आहेत. लोक अलोपॅथीबरोबरच त्यांच आयुर्वेदिक औषध घेत असतात.

मट्टूर हे एक शिमोगामधील प्रसिद्ध गाव आहे. त्याचे कारण तेथील सर्व लोक  अजूनही संस्कृतमध्ये  बोलतात.  विजयनगरच्या राजाने या लोकांच्या पूर्वजांना त्यांच्यावर तमिळनाडू मध्ये संकट आल्यावर इथे जागा दिली होती.  गावात बहुतांश  ब्राह्मण  असून सर्व गाव संस्कृत बोलते. त्या व्यतिरिक्त   तामिळ व कन्नड तसेच इंग्रजी भाषाही बोलली जाते. गावात अजूनही जुन्या  परंपरागत पद्धतीच्या इमारती आहेत.  गावात घरटी IT इंजिनिअर आहेत. संस्कृत बोलणारी  हाताच्या बोटावर मोजता येणारी काही गावे आहेत , त्यातील हे एक गाव. शिमोगा जिल्ह्यात शेट्टीहल्ली वाइल्ड लाईफ  संक्चुरी,  भद्रा या दोन Wildlife Sanctury आहेत.

शिमोगा जिल्ह्यात मुख्य भोजनामध्ये तांदूळ सर्वात लोकप्रिय आहे.  या जिल्ह्यातील अन्न हे  उडुपी पाककृतीसारखेच आहे. मीडिगायी – उपीनाकाई (अख्ख्या लहान कैरीचे आंब्याचे लोणचे), सॅंडिगे (तांदळाच्या कुरडई सारखे), आवलाकी (Rotten Riceपोहे)  आणि अक्की रोट्या अशा पदार्थांचा समावेश आहे,  हव्याका लोकांचे स्वतःचे खाद्यप्रकार आहेत. जिनेसाल (गूळ, तांदूळ आणि नारळ यापासून बनवलेले गोड), थोतादेव (तांदूळ आणि उसाच्या रसापासून बनविलेले गोड) आणि थांबली (दही तयार ज्यामध्ये आले, हळदीचे गड्डे, चमेली सारखे पदार्थ असतात आणि  गुलाबाच्या अंकुरांचा) यांचा त्यात समावेश आहे. येथील अजून एक   लोकप्रिय पदार्थ  म्हणजे पेट्रोड (आपल्याकडील अळूच्या वडी सारखा)   अळूच्या पानांच्या सुरळीमध्ये तांदळाचे पीठ, गूळ आणि चिंच घालून उकडून बनवलेली ही वडी  असते. अतिशय रुचकर असणारा हा पदार्थ उत्सवाच्या काळात करतात.  शिमोगाची आणखी एक विशेष डिश हलासिना हॅनिना कडूबू आहे, जो  फणसापासून बनविलेला करंजीसारखा गोड पदार्थ आहे. हा वाफवलेला असतो. खरोखर स्वादिष्ट असतो.

अशा निसर्गसंपन्न  मालनाडच्या प्रवेश द्वाराला एकदा नक्की भेट द्या . धबधबे आणि पावसाची रूप पाहायची असतील तर ऑगस्ट -सप्टेंबर आणि फुललेली भातशेती, बहरलेला निसर्ग  पाहायचा असेल तर पावसाळ्यानंतर हिवाळा संपेपर्यंत कधीही जा .

(लेखक लोकायत प्रकाशनचे संचालक आहेत)

84849 77899

हा Video पाहायला विसरू नका

 

Previous articleघराघरात ‘बबडू’ कसे तयार होतात?
Next articleभाटगिरी वा ट्रोलिंगच्या पलीकडे !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.