चिकमंगळुरू: टेस्ट ऑफ कॉफी

-राकेश साळुंखे 

कुद्रेमुख हे कर्नाटकच्या चिकमंगळुरू जिल्ह्यातील मलयगिरीनंतरचे उंच शिखर आहे.  उडुपी ते बेल्लूर या मार्गावर कुद्रेमुख वन्यजीव अभयारण्य लागते.  कुद्रेमुखचा कन्नड अर्थ  ‘घोड्याचे तोंड’ असा होतो. हा भाग निसर्गसंपन्न अशा पश्चिम घाटात मोडतो.

प्रथमतः मी जेव्हा या भागातून जात होतो, तेव्हा मनात थोडी धाकधूक होती. या भागात नक्षली  आहेत, असं ऐकण्यात आले होते.  जंगलाच्या प्रवेशद्वारावर वाहनाची व  आमची नोंद करून दीड तासाच्या आत जंगल क्रॉस  करण्याची वेळ दिलेला पास घेतला. उडुपीचा घाट चढून वर जसजसे जाऊ लागलो तशी नक्षलींची भीती निरर्थक ठरली . अधूनमधून येणाऱ्या धुक्याची मजा घेत घाट क्रॉस केला.  एका बाजूला  दिसणारा कुद्रेमुखचा पर्वत  आणि  दाट जंगलातुन जाणारा रस्ता यामुळे दीड तास कसा संपला, हेच कळले नाही.  गेटवर पास देऊन पुढे निघालो . पूर्वी कुद्रेमुखला जगातील  लोहखनिजाची मोठी खाण होती. २००६ मध्ये ती बंद करण्यात आली. त्यानंतर या भागाचा समावेश अभयारण्यात करण्यात आला.

कुद्रेमुख पर्वताला ‘वराह पर्वत’, ‘सामसे पर्वत’ असेही म्हटले जाते. येथे  गंगामुल या ठिकाणच्या गुहेत जवळपास दोन मीटरएवढी वराह मूर्ती आहे. हा भाग नेत्रावती, तुंगा, भद्रा यातीन नद्यांच्या उगमाचा समजला जातो.  दाट जंगलाबरोबरच  कॉफीचे व तुरळक ठिकाणी चहाचे मळेही या भागात आहेत. कळसा आणि होरनाडू  येथील प्रसिद्ध मंदिरेही याच भागात आहेत. येथे राणी अबक्काजीने पोर्तुगीजांचा पराभव केला होता. या राणीचे अंमल या भागावर होता. येथे देवनागरीतील काही शिलालेख आहेत.

 चिकमंगळुरू भागातील केलागुरचा परिसरही अतिशय निसर्गरम्य आहे. केलागुर हे मुदिगेरे तालुक्यातील चहा व कॉफी लागवडीसाठी प्रसिद्ध असलेले एक सुंदर हिरवेगार खेडे आहे. केलागुर हे मंगलोर पासून १२५ ,बंगलोरपासून ३०६ तर चिकमंगळुरूपासून अवघ्या ६२ किमी अंतरावर आहे . मुदिगेरे व कळसा या दोन्हीच्या मध्ये हे ठिकाण आहे . १६ व्या शतकात बाबा बुदान या सुफी संताने स्वतः चा जीव धोक्यात घालून येमेन मधून कॉफीच्या बिया भारतात आणल्या. त्या काळात फक्त येमेनमध्येच कॉफीची लागवड केली जायची. याच बाबा बुदान यांनी चिकमंगळुरू भागात कॉफीची लागवड केली . तो भाग बाबा बुदानगिरी म्हणून ओळखला जातो . डच व पोर्तुगीज यांच्यामार्फत येथूनच पुढे जगभर कॉफीचा प्रसार झाला असे म्हटले जाते .

चिकमंगळुरू हा भाग कॉफीचा असला तरी केलागुरला मात्र चहाचे मळे मोठ्या प्रमाणात आहेत . हा भाग मुन्नारचीच छोटी प्रतिकृती वाटतो . जिकडे पहावे तिकडे हिरवे गालिचे पसरलेले दिसतात. या गालिच्यांमधूनच लाल मातीच्या नागमोडी वाटेने डोंगर चढून वर गेल्यावर आजूबाजूच्या डोंगर दऱ्यांचे विहंगम दृश्य नजर खिळवून ठेवते . बल्लाल रायन्ना हा किल्लाही नजरेच्या टप्प्यात येतो . १२ व्या शतकात होयसळ राजा रायप्पा यांनी हा किल्ला बांधला . ट्रेकिंगची आवड असणऱ्यांसाठी हा एक छोटा ट्रेक होऊ शकतो . उंच डोंगर, खोल दऱ्या , थंडगार हवा , मधूनच येणारे धुके व सोबतीला हिरवा निसर्ग सगळेच सुंदर .

मेगुर होम स्टे हा फॅमिलीला राहण्यासाठी योग्य पर्याय येथे उपलब्ध आहे . निरव शांतता व चहाच्या मळ्याने वेढलेले हे ठिकाण आहे . येथील अगत्यशील स्टाफ व रुचकर जेवण आपल्या सहलीची मजा वाढवते . त्यांच्या मार्फत आपल्याला साईट सीइंग पण करता येते .

मी फेब्रुवारी महिन्यात या भागात आल्याने मला कॉफीची  फुले पहायला मिळाली . जाईच्या फुलांसारखी दिसणारी व साधारण तसाच वास असलेली ही पांढऱ्या रंगांची फुले खूपच सुंदर दिसतात.फळांनी लगडलेल्या फांद्या  तर आपण नेहमीच पहातो पण फुलांनी लगडलेल्या फांद्या पाहून  डोळ्याचे पारणे फिटते.

याच भागात शृंगेरी हे एक  ऐतिहासिक ठिकाण आहे . आठव्या शतकात येथे आद्य शंकराचार्यानी शृंगेरी पिठाची स्थापना केली . शृंगी ऋषीच्या जन्म स्थानावरून या गावाचे नाव शृंगेरी पडले ,असे म्हटले जाते .  तुंगा नदीच्या काठावर असलेले विद्याशंकर मंदिर हे एक प्राचीन व देखणं  असे मंदिर आहे . या मंदिराच्या स्थापत्य रचनेवर द्रविड, चालुक्य आणि विजयनगर यांचा प्रभाव दिसून येतो . येथे बरेचसे शिलालेखही पहावयास मिळतात . आवर्जून भेट द्यावी असे हे मंदिर आहे . शृंगेरी ते होरनाडू हा प्रवास खूपच सुंदर अनुभव देणारा आहे . रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी असणारे कॉफीचे मळे , निरनिराळ्या मसाल्यांची झाडे व वेली हे सर्व न्याहाळत हा रस्ता कधीच संपू नये असे वाटते .

चिकमंगळुरू जवळ शिमोगा रोडवर ‘हनी ड्यु’  नावाचे रिसॉर्ट आहे. कॉफी पिण्यासाठी हा  अत्यंत सुंदर स्पॉट आहे. चिकमंगळुरू शहरातील ‘पांडुरंग कॉफी ‘ ही खूप प्रसिद्ध कॉफी आहे . चांगल्या प्रतीचा चहा व मसाल्यांची खरेदी करावयाची असेल तर सामसे भागात बरीच दुकाने आहेत .  तेथे  किफायतशीर दरात आपल्याला चहा व मसाले मिळतात. कळसा – होरनाडूवरून पुढे बेलूर हलेबीड या ठिकाणी जाता येते .

Rakesh Salunkhe Presents Kalasa-Shringeri

This video is filmed on route, Shimgoa-Kalasa-Shrimgeri-Belur-Hale Beedu, Haveri

(लेखक लोकायत प्रकाशनचे संचालक आहेत)

84849 77899

Previous articleऑनलाईन शिक्षण: ‘अक्षरनंदन’ शाळेने संवेदनशीलतेने केली अडचणींवर मात
Next articleसोनिया गांधींचं तोंडदेखलं शहाणपण !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.