समुद्राच्या पोटात नक्की काय आहे?

-अमित जोशी

आपल्याला कोणाबद्दल जास्त माहिती आहे चंद्राबद्दल की समुद्राबद्दल ?…..

उत्तर आहे चंद्राबद्दल

आपल्याला जेवढी चंद्राबद्दल माहिती आहे तेवढी माहिती समुद्राबद्दल किंवा समुद्राच्या आत काय दडलं आहे याबद्दल नाही असं म्हंटलं तर चुकीचे होणार नाही. पृथ्वीवरील समुद्र अथांग आहे, पृथ्वीचा 71 टक्के भाग हा समुद्राने व्यापला आहे, कित्येक शतकांपासून मानवाचा समुद्राद्वारे मुक्त संचार सुरू आहे, समुद्र पार केल्यानेच मानवाची प्रगती झाली, व्यापाराचे नवे मार्ग सापडले. असं असलं तरी पृथ्वीवरील हा समुद्र अजून माणसासाठी बऱ्यापैकी अज्ञात आहे, पूर्णपणे माहिती झालेला नाही. विशेषतः खोल समुद्रातली दुनिया कशी आहे, काय आहे…याबद्दल चंद्रापेक्षा कमी माहिती उपलब्ध आहे.

याबद्दलची दोन उदाहरणे…..

बघा ना पृथ्वीवर असलेल्या समुद्रातील सर्वात खोल भाग असलेल्या Challenger Deep या ठिकाणी आत्तापर्यंत फक्त 13 लोकं पोहचली आहेत.

Challenged Deep हे ठिकाण पॅसिफिक समुद्रात फिलिपिन्स देशाच्या पूर्वेला 607 बेटांनी बनलेल्या Federated States of Micronesia देशाच्या जवळ आहे.

Federated States of Micronesia या देशाच्या पूर्वेला Mariana Islands नावाच्या ज्वालामुखीमुळे तयार झालेल्या बेटांची रांग आहे. या भागात Challenged Deep हे पृथ्वीवरील सर्वात खोल ठिकाण – भाग आहे.

Challenger Deep ची खोली ही सरासरी 10,920 मीटर ( 35,826 फूट ) आहे. म्हणजे एव्हरेस्टच्या उंचीपेक्षा या Challenger Deep ची खोली 2000 मीटरपेक्षा जास्त आहे. हा जो खोल भाग आहे हा काही प्रमाणात उंचसखल आहे, थोडक्यात रस्त्यासारखा सपाट नाहीये.

या जागेचा शोध हा 1872 – 76 च्या सुमारास ब्रिटिशांच्या सर्व्ह जहाज HMS Challenger ने लावला. या खोलीपर्यंत पोहचण्याचे प्रयत्न त्यानंतर झाले असले तरी 1960 ला पहिल्यांदा या खोलीपर्यंत माणूस पोहचला. तर प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉन यांनीही 2012 ला हा तळ गाठण्यात यश मिळवले आहे.

असं असलं तरी समुद्राच्या या खोलीबद्दल, तिथे असलेल्या जीवसृष्टीबद्दल संपूर्ण माहिती मिळालेली नाही. किंवा पृथ्वीवर असलेल्या समुद्राच्या इतर तळाच्या ठिकाणी, समुद्राच्या पोटात नक्की काय काय आहे, खोलीच्या ठिकाणी कशी जीवसृष्टी आहे याची पूर्ण माहिती नाही.

एवढंच काय समुद्राच्या तळाचा संपूर्ण नकाशा – अगदी खडानखडा नकाशा अजूनही तयार नाहीये. थोडक्यात अथांग समुद्र अजूनही माणसाला बऱ्यापैकी अज्ञात आहे.

तर दुसरीकडे चंद्राकडे माणसाने जरा उशिरानेच लक्ष केंद्रित केले. 16 व्या शतकात दुर्बिणीचा शोध लागल्यानंतर चंद्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली खरी, पण चंद्राकडे खरं लक्ष हे अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यामधील अवकाश स्पर्धेमुळे गेले आणि चंद्रावर पोहचण्याची स्पर्धा सुरू झाली. एकीकडे 1972 पर्यन्त चंद्रावर 12 अंतराळवीरांनी संचार केला असतांना त्यावेळी Challenger Deep पर्यन्त फक्त दोनच लोकं पोहचली होती. आता ही संख्या 13 झाली आहे. चंद्रावरची 100 किलोपेक्षा जास्त वजनाची दगड – माती ही पृथ्वीवर आणली आहे, विविध कृत्रिम उपग्रहांनी चंद्राच्या इंच न इंच जमिनीची छायाचित्रे घेत संपूर्ण नकाशा तयार केला आहे. विविध मोहिमांमधून चंद्राबद्दलची पुष्कळ माहिती उपलब्ध झाली आहे. आता तर चंद्रावर वस्ती करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.

तेव्हा आपल्याला चंद्र चांगलाच माहित झाला आहे, परिचयाचा – ओळखीचा झाला आहे, पण अजून समुद्राच्या पोटात काय काय आहे याची पूर्ण माहिती आपल्याकडे नाहीये असंच म्हणावं लागेल.

गुगल मॅप वरील या लिंक वर क्लिक करा आणि थेट समुद्राच्या तळाला भेट द्या

https://geohack.toolforge.org/geohack.php?pagename=Challenger_Deep&params=11_22.4_N_142_35.5_E_

(लेखक ‘झी २४ तास’ वृत्तवाहिनीत कार्यरत आहेत)

9833224281

Previous articleरिया चमकेगी ; कंगना खनकेगी
Next articleआपण सारे भयंकराच्या जबड्यात ….
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.