इस्लामपुरला तेव्हा वीस रुपयात कावीळचे गुणकारी औषध मिळत होते.अवघ्या वीस रुपयात.म्हसवड इस्लामपूर रोडवरील कोणत्याही गावातील माणसाने वीस रुपये आणि नावाची चिट्टी दिली की उद्या सकाळ संजय भाऊ आणि जहाँगिरभाई औषध घेऊन यायचे.अगदी आडबाजूच्या गावचेही लोक वीस रुपये आणि चिट्ठी घेऊन बसस्थानकावर थांबायचे.कसलीही ओळख नसलेल्या शेकडो लोकांना या चालक आणि वाचकांनी औषध आणून दिलंय. म्हसवडच्या पुढं अगदी पिलीव, माळशिरसला सुद्धा हे औषध पोहोचलं.निव्वळ सेवा.सरकारने या दोघांना गाडी चालवायचे काम नेमून दिलेले पण ते काम करत या दोघांची ही लोकसेवा सुरू होती.अफाट जनसंपर्क झालेला. एखाद्या मोठ्या नेत्याला जे वलय मिळावे तसे वलय या वाहक आणि चालकाला मिळाले होते.गावोगावी जत्रा,घरगुती कार्यक्रम यांच्याशिवाय होत नव्हती.जहाँगिर भई आणि संजू भाऊ हे साधारण तीस पस्तीस खेड्यात प्रसिद्ध झालेले.