योद्धा मठाधिपती कैकाडी महाराज

-ज्ञानेश महाराव

——————————

      ‘बुवा-बापू-महाराज- परमपूज्य’ मंडळींशी माझा खूपच जवळचा संबंध !  पण पंढरपूरच्या ‘हभप’ शिवराज ऊर्फ रामदास महाराज जाधव यांच्याशी असलेला संबंध विचाराने घट्ट बांधलेला होता. तो २५ सप्टेंबरला ‘दुःखद बातमी’ने प्रत्यक्ष रूपात तुटला. तथापि, तो आठवणींच्या रूपात अतूट आहे. ते संत कैकाडी महाराजांचे पुतणे. कैकाडी महाराज हे गांधीवादी विचाराचे होते. संत गाडगे महाराजांच्या विचार-कार्याचे पाईक होते. विठ्ठल भक्तीच्या ओढीने ते मांडवगण- अहमदनगर येथून पंढरपूरला आले. गरीब, मागास समाजातील लोकांना भक्तीतून स्वाभिमानाने जगण्याची शक्ती देऊ लागले. त्यांचे मूळ नाव राजाराम जाधव. त्यांचे भाऊ कोंडीराम जाधव. ‘कैकाडी’ म्हणजे गाढव हाकणारे समाजी. म्हणून ‘हभप’ राजाराम जाधव महाराजांचे ते ‘कैकाडी महाराज’ झाले‌. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातून ‘बडवे हटाव’ मोहिमेत ते सहभागी झाले होते. समतेचे आणि विश्व शांतीचे ते आग्रही होते. भारतातही ‘युनो’चं कार्यालय असावं आणि अण्वस्त्र बंदी व्हावी ; या विचाराने त्यांनी पंढरपुरात ‘नामजपाची झोपडी’ बांधली.

      ही झोपडी भव्य आहे. त्यात अश्मयुगापासून ते भारताच्या स्वातंत्र्य लढ्यापर्यंतचे मूर्तिमंत विश्वदर्शन घडते. यात ‘युनो’चे कार्यालय आहे. देशाला प्रगतिपथावर नेणाऱ्या रेल्वेचा डबाही आहे. कार्ल मार्क्स प्रमाणेच महात्मा फुले, शाहूराजे, डॉ. आंबेडकर, ‘क्रांतिवीर’ नाना पाटील, भाऊराव पाटील यांचे माहितीसह पुतळे आहेत. हे ७-८ एकर वरचे ‘विश्व’ कैकाडी महाराजांनी आपले बंधू भाऊ कोंडीराम यांच्या सहाय्याने उभं केलं. सर्वांचे ‘दादा’ असलेले शिवराज महाराज हे या कोंडीराम यांचे पुत्र. तेच कैकाडी महाराजांच्या ‘नामजप झोपडी’ मठाचा व्याप गेली ५० वर्षं सांभाळत होते. त्यांचीही ओळख ‘कैकाडी महाराज’ अशीच होती. या मठाप्रमाणेच दादांचाही आचार-विचार होता. तो प्रगतीचा आग्रह धरणारा होता. ते वारकरी सांप्रदायी कीर्तन- प्रवचनकार. पण डोक्यावर फेटा नाही. धोतराऐवजी लुंगी नेसायचे. उंच धिप्पाड होते. वाणीत जरब होती. डोळ्यांतून शांती आणि क्रांतीचा आग्रह सारख्याच तेजात लखलखायचा.

     मे २००३ मध्ये ‘मराठा सेवा संघ’च्या सातारा अधिवेशनात माझे बुवाबाजीवर व्याख्यान होते. त्याचे ते अध्यक्ष होते. त्यांनी ‘चित्रलेखा’तून मला वाचले होते. मला त्यांचे प्रथमच दर्शन घडत होते. माझ्या भाषणात मी मुंगीच्या अकलेची गोष्ट सांगितली. ‘मुंगी गुरुकुलात वा कीर्तन- प्रवचन- सत्संगाला जात नाही. तिला नकाशा वाचन येत नाही. तिला आत्मज्ञान- भान देणारा कुणी आध्यात्मिक गुरू नसतो. तरीही ती  तुमच्या-माझ्या घरातला साखरेचा डबा शोधते आणि फस्त करण्यासाठी लाखो मुंग्यांना घेऊन येते. मुंगीचा मेंदू तो किती आणि तिची बुद्धी ती काय ? पण ‘साखर शोधणे’, हे तिचे जन्मजात ध्येय असते. तसे आपले ध्येय असावे. आपला गोडवा आपल्या बुद्धीने शोधावा. यासाठी गुरू ,मार्गदर्शक, बुवा महाराज यांची गरज नाही !’ असे मी बोललो. त्यात ‘शिवराज महाराज’ यांना चिमटा घेण्याचा हेतू होता‌. तो त्यांनी ओळखला‌.

      आपल्या अध्यक्षीय भाषणात त्याचा उल्लेख करून ते माझ्याकडे डोळे रोखत म्हणाले –

मुंगी आणि राव । आम्हा सारखाची देव

सोने आणि माती । आम्हाला समान हे चित्ती

ह्या संत तुकोबांनी शिवबांनी पाठवलेला नजराणा  परत करतानाच्या उपदेशपर अभंगातील ओळी ऐकवल्या आणि बुवाबाजी विरोधात तुफान बोलले. यात त्यांनी मजेशीर स्वानुभव सांगितला.

      ‘कीर्तन- प्रवचनाच्या निमित्ताने गावाकडे आलात, तर आमच्या घरी या,’ असा त्यांच्या शिष्यमंडळींचा आग्रह असायचा. त्यातला एक जण तर खूप आग्रह करीत होता, म्हणून एका प्रवासात ते त्याच्या घरी गेले. दारात पाच-पंचवीस मंडळी जमली होती. त्यांचे चेहरे गंभीर होते. दादांना काही समजेना. दारात जाऊन शिष्याला हाक मारताच, तो आनंदाने धावत आला. दादा घरात गेले. तो त्यांना घेऊन आतल्या खोलीत गेला. तिथल्या कॉटवर शून्यात नजर लावलेली, श्वास लागलेली वृद्ध आजी होती. दादा काय ते समजले. तिथून लवकरच निघायचे म्हणून त्यांनी ‘आजी नमस्ते’ अशी हाक दिली आणि  त्याच क्षणी आजींनी मान टाकली.

     त्या प्रसंगाने महाराज हादरले. ते त्यांच्याच शब्दांत वाचा.’मनात आलं आता जमलेली लोकं, ‘बुवाच्या पायगुणाने म्हातारी गेली’ म्हणत जोड्यानं मला हाणतील ! पण कसलं काय ! सूनबाईनं साखर आणून हातात दिली आणि म्हणाली, ‘आजींना चार दिवसांपासून घरघर लागली होती. तुमच्या पायगुणाने निवांत गेल्या!’ मी बाहेर असलेल्या लोकांच्या पायतानाचा विचार करत होतो. पण लोक ‘पायगुणाचा चमत्कार’ म्हणत माझ्या पाया पडत होती. आजी गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि ‘चमत्काराला नमस्कार’ करण्यासाठी अख्खं गाव माझ्यापुढे जमलं !’ अशा सोप्या शब्दांत त्यांनी बुवाबाजीचं मूळ सांगितलं. ते पटलं आणि दोघांचं सख्य जमलं. त्यांचं कार्य समजलं.

सत्यशोधक कीर्तनकार, परिवर्तनाचा साथीदार

    आषाढी-कार्तिकी एकादशीची वारी जगजाहीर आहे. तशीच विठोबा, तुकोबा आणि शिवबा यांचं वैचारिक नाते घट्ट करणारी वारी ते ‘तुकाराम बीज’ निमित्ताने १९८२ पासून काढीत.  त्यासाठी पंढरपूरहून  विठोबाची आणि रायगडावरून शिवाजीराजांची पालखी देहूच्या दिशेने निघते. या दोन्ही पालख्या बीजेच्या आदल्या दिवशी पुण्यात ‘निवडुंग विठोबा’ मंदिरात मुक्कामाला असतात. दुसऱ्या दिवशी देहूत पोहोचतात. भक्ती-शक्तीचे दर्शन घडवण्याचे सूत्र कैकाडी महाराजांप्रमाणे त्यांच्या ह्या वारसदारांनीही जपले होते.

      त्यांचे ‘संतकथा’चे प्रवचन सत्यशोधनाचे दिशादर्शन असायचे. संत ज्ञानेश्वर आणि संत एकनाथ यांचे जन्म-मृत्यू रीतिरिवाजा प्रमाणे झाले. संत नामदेवांचा जन्म शिंपल्यात! संत तुकारामांच्या मृत्यूसाठी ‘सदेह वैकुंठगमनाचा चमत्कार! संत चोखामेळा, संत नामदेव यांची ‘पायरी’!  समाधी का नाही? असा सनातन्यांच्या हरामखोरीचा पाढा ते वाचायचे. सत्यशोधनाची दृष्टी द्यायचे.

     २००४च्या कार्तिकी एकादशीच्या आधीची गोष्ट ! २००३ च्या चातुर्मासात बडवे-उत्पात मंडळींनी विठ्ठल मंदिराच्या सभामंडपात ‘मनुस्मृती’चे पारायण लावले होते. त्याचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’वादी पत्रकार विवेक घळसासी हे ‘निरूपणकार’ होते. तो कार्यक्रम शिवराज महाराजांनी अर्ध्यावर गुंडाळायला लावला. त्याजागी त्यांनी पुढच्या वर्षी ‘तुकाराम गाथा’ पारायण सुरू केले आणि रात्री तुकाराम महाराजांची थोरवी सांगणारी पाच दिवसांची व्याख्यानमाला आयोजित केली‌‌. दुसऱ्या दिवसासाठी मला आमंत्रित केले. फोनवर म्हणाले,’ तुम्ही व्याख्यान करू नका प्रवचन करा !’

मी : प्रवचन हा माझा प्रांत नाही.

मी कधी केले नाही.

महाराज : अहो, असं काय म्हणता ? बुवा-बापू लोकांना भादरवता ते काय असतं ? तेच खरं प्रवचन ! तेच करा !

मी : तुकाराम महाराजांचा १२३६ वा अभंग आहे – ‘जे करती गुरु गुरु…’

महाराज : तोच विषय ! पण नेहमीसारखं ठोकून बोला !

   तसेच झाले ! श्रोत्यांच्या प्रचंड गर्दीत आणि छत्रपती शिवराय, फुले- शाहू- आंबेडकर यांच्या जयघोषात माझे भाषण सुरू झाले. बडव्यांची लगबग सुरू झाली. ‘ब्रह्मवृंद समाज संस्थे’चे कार्यकर्ते तक्रारीसाठी पोलिसात गेले. मात्र दीड तासाच्या भाषणाने श्रोते खूष झाले. हशा-टाळ्यांचा धुमधडाका उडाला. महाराज पाठ थोपटवीत  म्हणाले, ‘आता महारावचे महाराज झालात!’

     पंढरपुरात गेलं की, त्यांची भेट घेतल्याशिवाय माझी वारी पूर्ण व्हायची नाही. कामानिमित्ताने फोनवरून बोलणं व्हायचं. सगळ्याच छोट्या- मोठ्या सामाजिक कार्यकर्त्याला ते मित्र, सहकारी  म्हणूनच वागवत-बोलत. सामाजिक परिवर्तनाच्या विचार कार्याला साथ देत.

     वर्षभरापूर्वीच माझी नाट्यनिर्मिती असलेल्या आणि त्यात काम करीत असलेल्या ‘संत तुकाराम’ नाटकाचा  पंढरपुरात प्रयोग झाला. त्याला ते आवर्जून उपस्थित राहिले. यातल्या ‘तुकोबा-शिवबा’ भेटीच्या प्रसंगाने तृप्त झाले. सर्व कलाकारांचे भरपूर कौतुक केले. तेव्हा ते थकलेले वाटले. शुगर आणि ब्लड प्रेशरचा त्यांना त्रास होत होता‌. पण उत्साह कायम होता. निरोप देताना म्हणाले,’ तुमची लेखणी ,वाणी आणि हे तुकोबा- शिवबाचे नाटक थांबवू नका ! शेवटपर्यंत सुरू ठेवा !’ मी पाया पडू लागलो, तर छातीशी धरले. माझ्यासारखं प्रेम, हिंमत त्यांनी असंख्यांना दिलंय.

    त्या सर्वांचाच त्यांनी आता निरोप घेतलाय. ७७ वर्षं हे जाण्याचं वय नव्हतं. पण लोकोपयोगी पडण्याच्या अट्टहासापायी त्यांना ‘कोरोना’ने गाठलं. त्यातून ते बरेही झाले. पण तो दोन दिवसांचा विसावा होता. कीर्तनकार- प्रवचनकार- मठाधिपती असूनही त्यांनी ‘योद्धा’ ही ओळख अखेर सार्थ केलीच !

■ (लेखक साप्ताहिक ‘चित्रलेखा’चे संपादक आहेत.)

9322222145

Previous articleम्हसवड-इस्लामपूर: मूलखाचं भावविश्व व्यापणारी एसटी
Next articleमानवजातीचे प्रश्नांकित भविष्य!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

2 COMMENTS

  1. खुप महत्वाचा परंतु उशीरा गवसलेला खजीना. बौध्दिक तृप्ततेकडे घेउन जाणारा! (गांधी 150 संदर्भात)

  2. संतोष सर आणि ज्ञानेश सर यांच्या लेखाने महाराजांच्या आठवणीत आणखी भर पडली.
    फार मोठे नुकसान झाले संत चळवळीचे
    शिवांजली महाराजांना.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here