मानवजातीचे प्रश्नांकित भविष्य!

 -किशोर देशपांडे    

विश्वाच्या आणि काळाच्याही आरंभापूर्वी ही संपूर्ण सृष्टी केवळ एकाच बिंदूमध्ये सामावली होती, असा विज्ञानाचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे, पृथ्वीच्या पृष्ठभागावर किंवा पाण्यात अथवा आकाशात अनेक जीवजंतू, पक्षी व प्राणी (मानवासह) आहेत. त्या सर्वांचे देह पेशींचे (Cells) बनले असून सर्व पेशींची रचना व कार्यप्रणाली एकसारखी असते. त्यामुळे, सर्व सजीव प्राणिमात्रांची मूळ पूर्वज एकच पेशी असावी असा जीवशास्त्राचा अंदाज आहे.

   डॉ. युवाल नोआ हरारी हे ‘जेरुसलेम’ येथे इतिहासाचे प्राध्यापक असून, जागतिक इतिहासाचे ते विख्यात अभ्यासक आहेत. महा-वानर (Great Apes) नावाने ओळखल्या जाणाऱ्या चिंपांझी-गोरिला यांसारख्या जवळच्या कुळापासून, सुमारे २५ ते ६० लक्ष वर्षांपूर्वीच्या काळात मानवाची यथावकाश निर्मिती झाली. सुमारे २० लक्ष वर्षांपूर्वी मानव–प्रजाती (homos), आफ्रिकेतून स्थलांतर करीत करीत आशिया व युरोप-खंडांत पसरली. आपण आजचे मानव (Sapiens) म्हणजे या मानव-प्रजातीच्या एका शाखेचेच वंशज आहोत. डॉ. हरारी यांनी ‘सेपियन्स’ या नावाने मानव-जातीचा जो संक्षिप्त इतिहास प्रसिद्ध केला आहे, त्यात या बाबी प्रकर्षाने दिसून येतात.

 सुमारे ३ लक्ष वर्षांपूर्वी, आपल्या पूर्वजांना ‘अग्नी’ हाताळण्याची कला अवगत झाली. त्यामुळे, इतर प्राणी जगतावर आणि पृथ्वीच्या पर्यावरणावर वर्चस्व कायम करण्याच्या दिशेने मानवाचे पहिले पाऊल पडले. सुरुवातीच्या काळात, शिकार व अन्न गोळा करणाऱ्या आणि एकमेकांशी रक्तसंबंधाने बांधलेल्या आदी-मानवांच्या भटक्या टोळ्या असायच्या. त्यातील सदस्यांची संख्या स्वाभाविकच कमी असायची. मानवी मेंदू इतर प्राण्यांच्या तुलनेत मोठा असल्याने, मानवाला स्मृती आणि कल्पनाशक्ती जास्त होती. त्यात भाषेच्या उदयासोबतच समूहातील ‘जन’ एकमेकांशी गप्पा करू लागले. या गप्पांमध्ये अनुभव आणि कल्पित-कथा दोन्हींचे मिश्रण असे. त्यातूनच या वेगवेगळ्या भटक्या मानव-समूहांमध्ये, आपापल्या भिन्न-भिन्न दंतकथा व कल्पितांवर आधारित संस्कृतींचा उगम झाला.

   सुमारे बारा हजार वर्षांपूर्वी, शेतीचा शोध लागल्यानंतर, बहुतांश मानव-समूह शेती करण्यासाठी जागोजाग स्थिरावू लागले. या स्थिर समाजांमध्ये आपापसांत देवाण-घेवाण होऊन, पूर्वीपेक्षा अधिक व्यापक व जटील स्वरूपाच्या सांस्कृतिक कल्पना विकसित होत गेल्या. प्रत्येक व्यक्तीला तिच्या जन्मापासूनच या सांस्कृतिक दंतकथांचा, कल्पित-वास्तवांचा आणि मूल्यविषयक रीतीरिवाजांचा  दाट परिचय होत गेला. तो इतका गडद होता की त्यातील अनेक मूल्ये ही प्रत्येक व्यक्तीच्या ‘कृत्रिम अंतःप्रेरणे’चा (Artificial Instinct) अविभाज्य हिस्सा ठरू लागली. राष्ट्र व धर्म हे देखील कल्पित वास्तव असून त्यांचा अभिमान ही कृत्रिम अंतःप्रेरणा आहे.

   स्थिर समाजांची आपापसांत वस्तू-विनिमयाची प्रक्रिया वाढत गेल्यानंतर ‘पैसा’ नावाचे कल्पित-वास्तव जन्माला आले. त्यास एक कल्पित-वास्तव याचसाठी म्हणावयाचे की, जोपर्यंत पैशाच्या मूल्यावर मानवाची श्रद्धा आहे तोपर्यंतच ते मूल्य टिकून राहील. एरव्ही त्या कागदी नोटेचे अथवा नाण्याचे ‘स्वतंत्र’ असे काहीच मूल्य नसते. तसेच, पैशाचे हे कल्पित मूल्य टिकून असेपर्यंतच मानव-समाजाची त्यावरील श्रद्धा कायम राहील. वस्तू-विनिमयात पैशाचा वापर सुरु झाल्यानंतर व्यापाराचे क्षेत्र प्रचंड वाढले. एकमेकांना सर्वस्वी अनोळखी असलेले पृथ्वीवरील वेगवेगळे मानव-समूह व्यापाराव्दारे एकमेकांच्या संपर्कात आले. उदाहरणार्थ, रोम कुठे आहे हे माहीत नसलेले प्राचीन भारतातले व्यापारी रोमच्या सम्राटाची ‘मुद्रा’ असलेले नाणे मात्र परदेशी व्यापाऱ्यांकडून आनंदाने स्वीकारत होते. कारण रोमचे राज्य स्थिर असून, त्या नाण्याने घोषित केलेले मूल्य आपल्याला निश्चित मिळेल असा त्यांचा विश्वास होता. अमेरिकी डॉलरचा असाच प्रभाव आज आपणांस जगभर पहायला मिळतो.

  डॉ. हरारींच्या मते, मानवजातीला संघटीत करणारी दुसरी महत्वाची प्रक्रिया म्हणजे साम्राज्यांचा ‘विस्तार’! आपण जरी भारतापुरते तपासायचे ठरवले तरी, एखाद्या हल्लीच्या जिल्ह्यांएवढा विस्तार असणारी असंख्य छोटी-छोटी राज्ये भारतात पूर्वी अस्तित्वात होती. कालौघात मौर्य, गुप्त, मुघल, मराठा, इंग्रज इत्यादी साम्राज्यांमुळे त्या छोट्या-छोट्या राज्यांचा ‘लय’ होऊन आकाराने अधिक मोठी नि सुसंघटीत व शक्तिशाली राज्ये वाढत गेली. अनेक राज्यांच्या एकत्रीकरणा-सोबतच, प्रजेच्या भिन्न-भिन्न संस्कृतींचे देखील ‘संमिश्रण’ होत गेले. नवनवीन कल्पित रचना मोठ्या संस्कृतींच्या रूपात प्रसृत होऊ लागल्या. छोट्या राज्यांच्या आपांपसांतील सततच्या लढाया थांबून प्रजेला बरेचसे स्थैर्य लाभू लागले. असेच ‘ऐक्य’ एकेश्वरवादी धर्मांनी देखील साध्य केले, असे डॉ. हरारींचे मत आहे. ‘ख्रिश्चन’ व ‘मुस्लिम’ या दोन्ही एकेश्वरवादी धर्मांचा, तसेच केवळ बुद्धालाच ‘तथागत’ मानणाऱ्या बौद्ध धर्माचा आश्चर्यकारक ‘प्रसार’ जगातल्या दूर-दूरच्या भागांमध्ये झाला. त्यामुळे, त्या-त्या धर्मातील परस्परांना अपरिचित असणाऱ्या व एकमेकांपासून हजारो मैल दूर राहणाऱ्या  व्यक्तींच्या मनात आपुलकी व एकजुटीची भावना बळावत गेली.

    साम्राज्यवाद आणि धर्म यांनी इतिहासात मानवजातीला बऱ्याच प्रमाणात एक करण्याच्या कामी महत्त्वाची भूमिका बजावली हे तर निःसंशय. परंतु आता त्यांची सद्दी संपत आली असून, ‘राज्यसंस्था’ व भांडवलशाहीतील ‘जागतिक बाजारपेठ’ हे अधिकाधिक प्रभावी ठरू लागले आहेत. भांडवलशाही-पूर्व काळात कुटुंब, जात, गाव व प्रदेश यांच्या बंधनात व्यक्ती असत. भांडवलशाहीत मात्र राज्यसंस्था व जागतिक बाजारपेठ हातात हात घालून कुटुंब, गाव, जाती-समूह व प्रादेशिकता यांचे ‘वर्चस्व’ मोडून काढण्याचे कार्य करीत आहेत.

    गेल्या दोन शतकांत, वाढत्या औद्योगीकरणामुळे बाजार-व्यवस्थेची शक्ती प्रचंड वाढली आहे. परिणामी, राज्यसंस्थेच्या मदतीनेच कुटुंब, जाती-समूह, रीती-रिवाज व परंपरा यांच्या बंधनातून नव्या पिढीला मुक्त करणे व नवा ग्राहक-वर्ग तयार करणे हे कार्य भांडवली व्यवस्थेने भक्कम प्रमाणावर साधले आहे. त्यासाठी जाहिरातबाजी, कायदे तसेच चित्रपटसृष्टी वा तत्सम माध्यमांचा ‘पुरेपूर’ वापर करण्यात आला. भारतीय चित्रपटांच्या गेल्या ६०-७० वर्षांतील इतिहासाकडे नजर टाकली तरी, कुटुंबाने ठरविलेला जोडीदार न पसंत करता स्व-मर्जीने प्रेम-विवाह करण्यास त्यांनी सतत प्रोत्साहन दिल्याचे आढळून येते.

    जुनी साम्राज्ये नष्ट होऊन जागतिक भांडवली उत्पादन पद्धती आणि बाजारपेठ यांचे एकछत्री साम्राज्य जगभर विस्तारत आहे. बिनचेहऱ्याचे ‘कंपनी’ नावाचे कल्पित वास्तव आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेली राज्य संस्था हे या नव्या साम्राज्याचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. एकीकडे असे चित्र असले तरी या भांडवली व्यवस्थेच्या सोयीसाठी का होईना पण स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय या नवीन कल्पितांना गेल्या दोन शतकात मूल्यांचा दर्जा प्राप्त झाला असून आज्ञाधारकता, स्वामीनिष्ठा , कुटुंबनिष्ठा  ही जुनी मुल्ये क्षीण होत गेली आहेत. आयपीएल सारख्या क्रिकेट मधील नव्या प्रकारांनी, तसेच इंटरनेट, पर्यटन व स्थलांतर यांच्या ओढीने राष्ट्रनिष्ठा देखील पातळ केली आहे. स्वातंत्र्य, समता ही मूल्ये कृत्रिम अन्तःप्रेरणांच्या स्वरुपात विकसित होत आहेत.

    डॉ. हरारी यांच्या मते, मानवी इतिहासाला एक निश्चित दिशा आहे आणि ती दिशा विविधतेकडून ‘एकत्वा’कडे होत जाणारा प्रवास दर्शविते. इसवीसनाच्या पंधराव्या शतकापर्यंत तर युरोप, आशिया व आफ्रिका खंडाला ‘महाकाय’ अमेरिका खंडाचे नावही माहीत नव्हते. मग त्यात नांदत असलेल्या विकसित संस्कृतींची माहिती असणे दूरच राहो. आज सर्व जग आंतर-राष्ट्रीय मान्यता लाभलेल्या विविध राष्ट्र-राज्यांमध्ये विभागले गेले आहे. त्या सर्व राष्ट्र-राज्यांमधील लोकं समान बाजारपेठ, राज्य-व्यवस्था, मूलभूत हक्काची तत्वे व मानवाधिकारांसारख्या अन्य तत्सम संकल्पना यांचे एकत्र ‘वाटप’ करून घेत आहेत. चीन व भारत अथवा अमेरिका व इराण यांच्यात कितीही विवाद झाले तरीही, परस्पर-वादाचे मुद्दे एकमेकांना समजतील अशा भाषेत आज मांडले जाऊ शकतात. तो वाद सोडविण्याची उभय-मान्य यंत्रणा आज अस्तित्वात असू शकते.

   डॉ. हरारींचे कथन तर असे आहे की, दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर आजपर्यंत जगात जितकी शांतता, स्थैर्य व समृद्धी आहे, तितकी यापूर्वी इतिहासाच्या कुठल्याही कालखंडात नव्हती! अगदी भटक्या व शिकारी आदि-मानवांच्या टोळ्यादेखील, एकमेकांना शत्रु किंवा प्रतिस्पर्धी मानून नष्ट करण्याच्या प्रयत्नात असत. अर्थात, मानवजातीची ही शांततेकडील वाटचाल होण्यात अण्वस्त्रांचा ‘धाक’ हासुद्धा एक मोठा घटक आहे असे डॉ. हरारी आवर्जून नमूद करतात.

अशा प्रकारे, एकीकडे मानवजातीचे एकीकरण तर दुसरीकडे प्रत्येक व्यक्तीच्या ‘खाजगी’ अवकाशाचा विस्तार असा वरवर पाहता विरोधाभासी परंतु प्रत्यक्षात ‘सुसंगती’ असलेला हा मानव-समाजाचा विकास-क्रम असावा असे दिसते.

तथापि नव-नवीन वैज्ञानिक संशोधनांमधून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा जो आविष्कार होत आहे त्याने आणि भांडवली उत्पादन पद्धतीच्या आंधळ्या विस्तारामुळे पर्यावरणाचा जो ऱ्हास  होत आहे त्यामुळे मानवजातीचे भविष्य प्रश्नांकित झालेले आहे.

(लेखक नामवंत विधीज्ञ व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत)

9881574954                                                           

Previous articleयोद्धा मठाधिपती कैकाडी महाराज
Next articleकामाठीपुऱ्यातील जोहराबाई आणि सोनागाचीतील ‘अमर प्रेम’!
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here