त्या मुलाचा जन्म २२ ऑक्टोबर १९३७ चा, अफगाणिस्तानच्या काबूलमधला. कर्मठ पश्तून काकड जमातीचे हे कुटुंब. फाळणीनंतर या जमातीचे अनेक लोक राजस्थानात स्थलांतरित झाले. त्याचे वडील अब्दुल रहमान कंदहारचे तर आई इकबाल बेगम आताच्या पाकिस्तानातील बलुच प्रांतातील पस्शीनची. त्याच्या मात्यापित्याच्या पोटी त्याच्या आधी तीन अपत्ये जन्मली होती पण जन्मानंतर काही काळातच ती दगावली. दरम्यान त्याच्या मातेला असं वाटू लागलं की इथलं वातावरणच आपल्याला मानवत नाहीये. तेव्हा आपण जागा बदलून दुसरीकडे जाऊ. नाहीतर हा चौथा मुलगा देखील मरण पावेल. इकबाल बेगमच्या हट्टापुढे कोणाचे काही चालले नाही. सगळा बाड बिस्तरा घेऊन हे कुटुंब भारतात आले. बरीच भटकंती करून ते मुंबईत आले. ग्रांटरोडच्या झोपडपट्टीतल्या एका झोपडीत त्यांना छप्पर मिळालं. तिथल्या गटार कचऱ्याच्या गलिच्छ वातावरणात ते राहू लागले. दारूअड्डे, जुगार अड्डे, वेश्यावस्ती आणि कत्तलखाने यांचा त्या कोवळ्या मनाच्या मुलावर खोल आघात झाला. अनंत हाल अपेष्टा आणि उपेक्षा सहन करून तो मुलगा पुढे मोठा लेखक झाला. त्याच्यातल्या संवेदनशील मनाने जोहराबाईला शब्दबद्ध केलं, त्यात थोडा फिल्मी मसाला घातला. चित्रपट सुपरडुपर हिट झाला. तो लेखक कादरखान होता !
त्याच काळात एक अत्यंत भणंग अवस्थेतला उदासवाण्या चेहऱ्याचा तरुण आपल्या मित्रासोबत तिथं यायचा. किशोरवयात त्या तरुणाचं लग्न झालं होतं आणि लग्नानंतर अवघ्या काही वर्षात त्याची पत्नी निवर्तली. तेव्हा त्याचं वय होतं केवळ १९ वर्षे ! तो तरुण पुष्पाला डोळे भरून बघायचा आणि पहाटेस निघून जायचा ! तसं त्याच्याकडे काहीच नव्हतं.एकदम कफल्लक आणि डिप्रेस्ड होता तो ! काही वर्षांनी त्याच्या मनानं उभारी घेतली तेव्हा त्याने हाती लेखणी घेतली. आधी मानवी नात्यांच्या कथा लिहिल्या. मानवी मनाची उकल निगुतीनं मांडली. त्याच्या काळजाच्या एका कोपऱ्यात ठाण मांडून बसलेला आनंदबाबू आणि पुष्पा देखील शब्दबद्ध झाले. त्याने त्यांच्यावर कथा लिहिली, तिचं नाव होतं ‘हिंगेर कचोरी’ ! ते साल असावं १९३० च्या आसपासचं. त्या तरुणाचा १९५० च्या सुमारास मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर १९ वर्षांनी अरविंद मुखर्जी यांनी ‘निशी पद्मा’ हा बंगाली सिनेमा बनवला. सिनेमा खूप चालला, त्याला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. १९७२ मध्ये शक्ती सामंत यांनी याच सिनेमावर आधारित ‘अमर प्रेम’ बनवला. यातला राजेश खन्नाने साकारलेला आनंदबाबू आणि शर्मिला टागोरने साकारलेली पुष्पा विसरणं अशक्य गोष्ट आहे. पुष्पाला अजरामर करून गेलेला तो महान प्रतिभाशाली लेखक होता विभूतीभूषण बंदोपाध्याय !
विभूतीभूषण बंदोपाध्याय यांच्या आयुष्यात इतके चढ उतार आणि हलाखीचे दिवस येऊन गेले की त्यांच्यावरच एक सिनेमा निघायला हवा. त्यांची पहिली पत्नी लग्नानंतर एका वर्षात निवर्तली. तेव्हा त्यांचे वय होते १९ वर्षे. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी दुसरे लग्न केले. त्यांना तारादास नावाचा एक मुलगा झाला. मुलाच्या जन्मानंतर ४ वर्षांनी आताच्या झारखंडमधील पूर्वी सिंहभूम जिल्ह्यातील घाटशिला येथे त्यांचे १९५१ साली निधन झाले. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर जवळजवळ २७ वर्षे ते विधुर म्हणून एकांताचे आणि अनेक हालअपेष्टांचे जिणे जगले. याच काळात त्यांनी जी दुनिया बघितली त्यावर आधारित अनुभवांना ते शब्दबद्ध करत गेले. त्यांनी १६ कादंबऱ्या लिहिल्या. त्यांच्या कथांवर अनेक महान चित्रपटांची निर्मिती झाली आहे. मुजरेवाल्या बायकांच्या कथा बॉलिवूडला नेहमीच भुरळ घालत आल्या आहेत. मुजऱ्याचा इतिहासच मुळात रंजक आहे. त्यावर लिहीत गेलं की लेखणीला घुंगरु फुटतील ,पण शाईच्या ऐवजी रक्त पाझरेल हे नक्की !