नॉस्टॅल्जिक करणाऱ्या पत्रलेखनाच्या आठवणी…

-अविनाश दुधे

 आज जागतिक टपाल दिन. दरवर्षी समाजमाध्यमांवर याविषयातील संदेश पाहिले की, मन नकळतपणे २५-३० वर्ष मागे जातं . पत्र , पोस्ट ऑफिस आणि पोस्टमनच्या असंख्य आठवणी एकापाठोपाठ एक उचंबळून येतात. पत्रांसोबत, पोस्टासोबत फार लहान वयात माझा संबंध आला . यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार या अतिशय छोट्या गावात माझे बालपण गेले. अर्थातच तेव्हा तिथे पोस्ट ऑफिस नव्हते. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सकाळी ८ ते १० या वेळात शाळेचे मुख्याध्यापकच पोस्ट मास्टर म्हणून काम पाहायचे. मी तेव्हा दुसऱ्या -तिसऱ्या वर्गात असेल . मला वाचता बऱ्यापैकी येत असल्याने वासरात लंगडी गाय शहाणी ..या नात्याने आमचे पूर्ण वेळ मुख्याध्यापक आणि पार्ट टाईम पोस्ट मास्टर मोह्दरे सर मला मदतीला घ्यायचे. आलेल्या पत्रांचे (दिवसाला ८-१० पत्र ती यायची) Sorting करणे , कोणी पत्र लिहून घ्यायला आला असल्यास त्याला पोस्टकार्डवर मजकूर लिहून देणे . त्या पत्रावर पोस्टाचा तो काळाकुट्ट ठसा उमटविणे ( तो ठसा एवढा काळा असायचा की ते पाहून पत्र कुठून आलं, हे चुकुनही समजायचे नाही.) मनिऑर्डर फॉर्मवर एक -दोन ओळींचा निरोप लिहिणे , कोणाला हवं असल्यास पोस्ट कार्ड , आंतर्देशीय पत्र विकत देणे, अशी फुटकळ कामे मी करत असे. ते काम करतांना मजा यायची. पोस्टमन सुखदेव काका आमच्या सोबतीला असायचे.

आज एवढ्या वर्षानंतरही पोस्टमन म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर सुखदेवकाकाच येतात. यवतमाळहून येणारी टपालाची जाडी भरडी खाकी पिशवी त्यांनी उघडली की आज कोणाचे पत्र आले असतील, याची जाम उत्सुकता असायची. माझ्याकडे तेव्हा दर महिन्याला ‘चांदोबा’ मासिक न चुकता यायचे. आईने त्याची वर्गणी माझ्या नावे भरली असल्याने चांदोबाचे पाकीट माझ्या नावे यायचं. त्यामुळे खूप छान वाटायचं . त्याव्यतिरिक्त एखाद्यावेळी आजीने दुसऱ्याकडून लिहून घेतलेले पत्र तेवढं यायचं .

पुढे प्राथमिक शाळा सुटली . तोपर्यंत गावातही पोस्ट ऑफिस झाले . काही वर्षांत मीही गाव सोडले . सातवीनंतर शिक्षणासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी यवतमाळात आलो. पोस्टाचा थेट संपर्क तुटला . पण पत्र आणि पोस्ट ऑफिस मनात रुतून होतेच. पोस्टमन हा घरच्या सदस्यासारख्या जिव्हाळ्याचा माणूस वाटायचा. पत्र वाटप करतांना पाणी प्यायला , प्रसंगी चहा घ्यायला आठवड्यातील दोन तीन दिवस काही मिनिटं तरी तो घरी रेंगाळायचा. मात्र दहावीपर्यंत पत्र लिहिणे किंवा मला कोणाची पत्रे येणे असा प्रकार फार नव्हता . नातेवाईकांचे एखादे -दुसरे पत्र तेवढे यायचे .

दरम्यान दहावीची परीक्षा पास झाल्यावर बारावीची तयारी सुरु केली . त्याकाळच्या प्रथेप्रमाणे इंजिनिअरच व्हायचे होते . आयुष्यात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नसते , हे तेव्हा मला कळायचे होते . अकरावीत सगळं काही ठीकठाक असतांना अनपेक्षितपणे मला Rheumatoid Arthitis या त्रासदायक आजाराने गाठले . हात पाय आणि संपूर्ण शरीर सुजले . जागेवरून उठून बसताना , झोपेत कड बदलातांनाही प्रचंड वेदना व्हायला लागल्या . सगळं काही बेडवर सुरु झालं. त्या काळात हा आजार फारसा कोणाला माहीत नव्हता . त्यात यवतमाळसारख्या छोट्या शहरात त्यावर उपाययोजना काय करायच्या , हे डॉक्टरांनाही व्यवस्थित माहीत नव्हते . परिणामी पुढील ४ वर्ष सतत बेडवर खिळला गेलो. पेनिसिलीनची इंजेक्शन घ्यायचीत आणि पडून राहायचं , एवढंच काम. या आजाराने बारावीची नियमित परीक्षा देऊ शकलो नाही . पुढील परीक्षा नापास झालो.

अमिताभ , सुनील गावस्कर, पु .ल. देशपांडे, सुहास शिरवळकर व अनेक मान्यवरांची पत्रे

त्या काळात पत्र आणि पोस्टमन पुन्हा एकदा साथीला आले .  शिक्षिका असलेली आई आणि माझ्यापेक्षा दोन वर्ष छोटी असलेली बहिण सकाळी दहाला शाळेत निघून जायच्या . मग दिवसभर मी एकटाच घरी . तेव्हा मग पुस्तकं आणि पत्र हीच माझी जिवाभावाची साथीदार असायची . तेव्हा मी रोज एका कादंबरीचा फडशा पाडायचो. सुहास शिरवळकर, बाबा कदमपासून पु. ल. देशपांडे , व. पु. काळे , विश्राम बेडेकर ,शंकर पाटील , द. मा . मिरासदारपर्यंत सारेच लेखक वाचायचो . मध्येच ‘महाभारत’, ‘सिंधू संकृती’ वगैरे जड विषयही असायचे. हे वाचून खूप सारे प्रश्न पडायचेत. मग लेखकांना पत्र लिहिण्याचा सपाटा सुरु केला. पुस्तकातलं काय आवडलं, हे त्यांना कळवायचो. अमुक एक पात्र असे का रेखाटले, वगैरे प्रश्न विचारायचो . सुहास शिरवळकरांचा मी जबर फॅन होतो. मी त्यांना खूप पत्र लिहायचो . विशेष म्हणजे ते उत्तरही द्यायचेत . त्यावेळी बहुतेक लेखक पत्रांना आवर्जून उत्तरे द्यायची. पु. ल. देशपांडे , व. पु. काळे , विश्राम बेडेकर ,शंकर पाटील , द. मा . मिरासदार असे अनेक नामवंत लेखकही पत्रांना उत्तरे द्यायची . त्यांची पत्रे मी अजूनही जपून ठेवली आहेत .

१८-१९ वर्षाच्या त्या वयात या मोठ्या लेखकांची पत्रे आली की मी खूप खुश असायचो . मोहरून जायचो. आजाराचा, वेदनांचा विसर पडायचा . माझ्या आयुष्यातील अतिशय कठीण काळ त्या पत्रांनी खूप आनंददायी करून टाकला होता. त्या काळात वाचनाइतकंच क्रिकेटचेही वेड होतं. सुनील गावस्कर हा आयडॉल होता. वेगवेगळ्या मासिकातील त्याची शंभरेक चित्रे मी कापून ठेवली होती . तो Batting करत असतांना अतिशय भक्तिभावनेने मी रेडिओवर Commentry ऐकत असे. शाळेत आठव्या – नवव्या वर्गात असतांना गावस्करची batting असली की वर्गात मन लागायचे नाही. मध्यंतराच्या सुट्टीत गावस्करचे रन किती झाले हे ऐकायला आम्ही चौकातील पानठेल्यावर जात असू . तिथे सुशील दोशी आपल्या उत्कंठावर्धक शैलीत गावस्कर शतकापासून काही धावाच दूर असल्याचे सांगत असे . मग पुढच्या तासाला दांडी मारून आम्ही गावस्करचे शतक पूर्ण व्हायची वाट बघायचो . अनेकदा त्या काही धावा काढायला तो बराच वेळ घेत असे . अशावेळी दोन तास बुडायचे. पण गावस्करसमोर चिंता कसली ? त्याचे शतक पूर्ण झाल्यावर जणू आम्हीच पराक्रम केला आहे, अशा थाटात वर्गात शिरायचो .

माझा ‘हीरो’ गावस्करला मी पत्र लिहिलं नसतं, तरच नवल होतं. मी गावस्करचा मुंबईचा पत्ता मिळवून त्याला पत्र पाठविण्याचा सपाटा सुरु केला . पत्र पाठवतो, इथपर्यंत ठीक होतं. पण त्याने स्वत:च्या हस्ताक्षरातच मला उत्तर द्यावे ,असा आग्रह मी प्रत्येक पत्रात त्याला करायचो. तो क्रिकेट दौऱ्याच्या निमित्ताने जगभर फिरत असायचा . माझे पत्र तो वाचायचाही की नाही, हे कळायला काहीच मार्ग नव्हता . मी मात्र त्याला नियमित पत्र पाठवण्यात अजिबात खंड पडू देत नव्हतो . शेवटी माझ्या तपश्यर्येला फळ आलं. एक दिवस माझ्या दैवताचे चक्क त्याच्या हस्ताक्षरात पत्र आले. तो दिवस आठवला की मी अजूनही मोहरून जातो . ते पत्र घेवून मी शाळेत , मित्रांच्या घरी कुठे-कुठे जावून गेलो .जो भेटेल त्याला, बघा… मला सुनील गावस्करांचे पत्र आले, हे सांगत होतो. आई ज्या मिठाईवाल्याकडून नेहमी पेढे -बर्फी वगैरे आमच्यासाठी विकत आणायची, त्यालाही मी ते पत्र दाखवले .त्याने खुश होवून मला अर्धा किलो मिठाई त्याच्याकडून भेट दिली . ‘तुम्हारे सब दोस्तो को बाटो…’,म्हणाला .

गावस्करच्या पत्राइतकाच आनंद मला अमिताभ बच्चनच्या पत्रांनी दिला आहे . अर्थात ही गोष्ट फार नंतरची . मी पत्रकारितेत आल्यानंतरची . गावस्करसोबत अमिताभ हाही आमच्या पिढीचं दैवत. मी ‘लोकमत’ मध्ये जॉईन होऊन १५ दिवसच झाले होते . विजय दर्डांनी कुठल्या तरी कार्यक्रमासाठी अमिताभला यवतमाळला आमंत्रित केले होते . त्याला बघायला नजीकच्या ५-६ जिल्ह्यातून तुफान गर्दी जमा झाली होती . ती बातमी cover करण्यासाठी ‘लोकमत’ चे सिनिअर वार्ताहर नागपूरहून आले होते. माझ्यासारख्या नवख्या पत्रकाराला ती बातमी cover करण्याची संधी मिळणार नाही , हे स्पष्टच होते. त्यामुळे पत्रकार कक्षातही एन्ट्री नव्हती. पण अमिताभला तर पाहायचेच होते . मी त्या लाखोच्या गर्दीत घुसलो . आपल्याला मुख्य बातमी लिहिता येणार नाही . पण अमिताभवर वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या गर्दीवर आपल्याला वेगळी बातमी करता येईल , हा विचार माझ्या डोक्यात आला . अमिताभच्या आगमनापासून तो जाईपर्यंत गर्दी कशी बेभान झाली होती , वेगवेगळ्या भावनांवर हिंदकळत होती, यावर एक छानशी बातमी मी लिहिली . नागपूरला पाठवून दिली . ती छापून येईल, याची खात्री नव्हतीच . पण दुसऱ्या दिवशी मुख्य बातमीच्या शेजारी चौकटीत माझ्या नावे ती बातमी छापून आली होती . हा सुखद धक्का होता.

त्यापेक्षा मोठा धक्का दहा दिवसानंतर बसला . एक दिवस ‘लोकमत’ ऑफिसमध्ये काम करत असतांना कार्यालय प्रमुख किशोर दर्डा यांनी बोलावले आणि म्हणाले , ‘अरे अविनाश , हे बघ तुला अमिताभ बच्चनचे पत्र आले .’ मला वाटलं थट्टा करताहेत . पण खरेच अमिताभचे पत्र होते . माझ्या बातमीबद्दल आभार मानणारे पत्र त्याने पाठवले होते . अमिताभ कधीपासून ‘लोकमत’ आणि मराठी वर्तमानपत्र वाचायला लागला, हा प्रश्न मला पडला . पण त्याचा खुलासा त्या संध्याकाळी झाला.

अमिताभच्या वडिलांचे स्नेही प्रवीण जानी यवतमाळला राहायचे. त्यांनी यवतमाळच्या सभेच्या बातम्या अमिताभला पाठवल्या होत्या . माझी बातमी वाचून ते पत्र अमिताभने पाठवले होते. आज टपाल दिनाच्या निमित्ताने खूप शोधाशोध केली , पण ते पत्र सापडले नाही . मात्र त्यानंतर दोन वर्षाने अमिताभने पाठवलेले दुसरे एक पत्र मात्र सापडले . अमिताभच्या वडिलांचे- प्रख्यात हिंदी कवी हरिवंशराय बच्चन यांचे- निधन झाल्यानंतर आम्ही ‘लोकमत’ यवतमाळच्या संपादकीय चमूने त्यांच्या आठवणींवर आधारित एक खास पान प्रकशित केले होते . लोकमतचा तो अंक मागील वेळेप्रमाणेच प्रवीण जानी यांनी अमिताभकडे पाठवला होता . त्यातील तो मजकूर वाचून अमिताभने मला आणि माझा सहकारी संतोष कुंडकरला ( संतोष हे आता ‘लोकमत’ चे वणी विभागीय प्रतिनिधी आहेत) आभार मानणारे पत्र पाठवले होते . त्यादिवशी आम्ही कार्यालयात पुन्हा एकदा आंनदोत्सव साजरा केला होता . अमिताभसारखा विख्यात नट दोनदा पत्र पाठवतो, याची नशा काही और होती.

पत्रांच्या अशा खूप साऱ्या आठवणी आहेत . शालेय व महाविद्यालयीन काळात मी मित्रांना आठ -आठ पानांची पत्रे लिहायचो . त्याच काळात ‘लोकमत’ , ‘लोकसत्ता’ , ‘नागपूर पत्रिका’ हे दैनिकं व ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात वाचकांच्या मनोगतासाठीही मी नियमित पत्र पाठवायचो. ती प्रसिद्धही व्हायची. आजारपण व शिक्षण खंडित झाल्याने आलेल्या निराशावस्थेत वर्तमानपत्रात प्रकाशित होणाऱ्या पत्रांमुळे उमेद मिळायची. मन उत्साहित व्हायचे . नवीन उमेद मिळायची . आपण कोणीतरी वेगळे आहोत , असे वाटायचे .वर्तमानपत्रांना पत्र पाठविण्याच्या माझ्या सवयीने केवळ १८ व्या वर्षी ‘नागपूर पत्रिके’ त शिकावू पत्रकार म्हणून माझी निवड झाली. गमतीगमतीत ‘वार्ताहर पाहिजे’ ची जाहिरात वाचून अर्ज पाठवला आणि माझी निवड झाली . मात्र होम सिक झाल्याने महिनाभरातच मी नागपुरातून पळून आलो .

पत्रलेखनाच्या गमती जमती खूप आहे . मी पत्र लिहिताना वाचनात आलेले चांगले उतारे , आवडलेल्या कवितांचे कडवे वगैरे टाकत असे . त्यामुळे माझी पत्र वाचनीय होत . माझ्या काही मित्रांनी माझ्या या कौशल्याचा वापर पोरी पटविण्यासाठी केला . चांगल्या घरच्या पोरींना इम्प्रेस करायचे असेल तर ते माझ्याकडून साहित्यिक पत्रे लिहून घेत . विशेष म्हणजे त्या पोरी त्यांना पटतही असे. एकदा मला खूप आवडणाऱ्या पोरीला मी पत्र देण्याची हिंमत करू शकलो नाही. पण माझ्या जवळच्या मित्राने माझ्याकडून तिच्यासाठी पत्र लिहून घेतले . त्याला ती पटली . पुढचं महाभारत म्हणजे एक भन्नाट किस्सा आहे .

‘चित्रलेखा’ त काम करत असतांना संपादक ज्ञानेश महाराव यांना काही काळ मी भरपूर पत्र लिहायचो. मनात साचेल ते सारं काही त्यांच्याजवळ मोकळं करायचो . आदर्शवाद डोक्यात घेवून पत्रकारितेला सुरवात केल्यानंतर होत असलेला भ्रमनिरास सविस्तरपणे त्यांना लिहून कळवत असे. आता मागे वळून पाहताना वाटतंय की, खूप भाबडेपणा होता माझ्या पत्रात . महाराव साहेब वाचायचे ते पत्र . मला जग कसं असतं, हे समजावून सांगायचे . (‘चित्रलेखा’ चे दिवस हा पुन्हा एक वेगळा लिहायचा विषय आहे.) विसावं शतक संपता संपता मात्र माझ्यातला पत्र लेखनाचा उत्साह सरायला लागला . ईमेल-मोबाईल आल्यावर तर पत्रास कारण की .. मागेच पडले . शेवटचे पत्र मी कधी कोणाला लिहिलं, आता आठवत नाही . आता तर सही करण्याशिवाय कागदावर इतर काही लिहितो म्हटलं, तर कठीण जाईल अशी स्थिती आहे .

मी आज माझी बायको असलेल्या प्रतिभाच्या प्रेमात पडलो, तेव्हा माझ्या पत्रलेखनाला बहर आला होता. ती अमरावतीत. मी यवतमाळात. माझ्याकडे फोन नव्हता . त्यामुळे पत्र पाठवणे हाच एकमेव आधार . लग्न होण्यापूर्वीच्या ७ वर्षाच्या कालावधीत मी तिला तब्बल १२१ पत्रे लिहिलीत . तिने मला ९१ (तो पत्रव्यवहार एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे . त्यावर पुन्हा कधीतरी.) त्या काळात तिच्या पत्राची कायम वाट असे . यवतमाळ येथे मी जिथे राहायचो, ती आनंद नगरची आमची कॉलनी टुमदार होती . पोस्टमन आमच्या ओळीत शिरला की तो त्या ओळीतील एकेक नाव मोठ्याने घेत सायकलची घंटी वाजवत पत्र द्यायचा. माझं घर ओळीत शेवटचं . तो अगोदरच्या घराजवळ आला की मी फाटकाजवळ येऊन उभा राहायचो . पोटात गोळा निर्माण व्हायचा . माझं नाव घेतला की चेहरा फुलून यायचा .पोस्टमनने आज काही नाही म्हटलं की, खंतावून घरात जायचो.

पुढे लग्नासाठी तातडीने नोकरी मिळविण्याची निकड निर्माण झाली . तेव्हा माझ्यात असलेले लेखन कौशल्य नोकरीसाठी कामी आलं. लग्नानंतर पत्र लेखन मात्र थांबलंच. मात्र पत्राचे, पत्रलेखनाचे ते दिवस आठवलेत की मी अजूनही कातर होतो . पत्र म्हटलं की अजूनही काळजात काहीतरी लकाकतं. पोस्टाची पत्रपेटी माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देते . यवतमाळला गेलो की मी अजूनही मुख्य पोस्ट ऑफिसजवळ एखादी तरी चक्कर मारतोच मारतो . तेथील पोस्टाच्या पेट्या उगाच मोठ्या प्रेमाने न्याहाळतो . त्या पेटीमध्ये हात खोलवर सारून मी माझी प्रेमपत्र टाकत असे, हे मला आठवते . त्या पत्रपेट्यांसोबत एकेकाळी आपलं किती जिव्हाळ्याचे नाते होते , हे आठवून हळवा होतो . पूर्वीचे पोस्टमन आता उरले नाही . तो खाकी पोशाखही आता नाही . मात्र पत्र आणि पोस्टमन म्हटलं की मी अजूनही Nostalgic होतो.

(लेखक ‘मीडिया वॉच’  दिवाळी अंक, पब्लिकेशन व वेब पोर्टलचे संपादक आहेत )

8888744796

………………………………………….

अविनाश दुधे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –अविनाश दुधे– type करा आणि Search वर क्लिक करा.

 

Previous articleकोलकत्याचं विशाल हृदय
Next articleपुष्पाताई नसणं म्हणजे…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

10 COMMENTS

  1. अतिशय उत्तम लेख आहे. आपापल्या पत्रलेखनाच्या आठवणींनी कातर करणारा! तुमची ही बाजू फार कोवळी आणि म्हणून मनभावन आहे.

  2. छान .
    पत्र लेखनाच्या अनेक आठवणींनी फेर धरलं .
    -प्रब

  3. मा . अविनाशजी,
    उपरोक्त लेख म्हणजे आपले अतिसंक्षिप्त आत्मचरित्र वाचायला मिळाले . एक निष्ठावान, निःस्पृह , निर्भीड, प्रामाणिक , सामर्थ्यवान प्रतिभावंत पत्रकार/ लेखक निर्माण करण्यासाठी नियतीने केलेला विधायक कट लक्षात आला . माणसाचे जीवन हे नियोजनापेक्षा अपघातातून ज्यास्त घडत असते हेच खरे . अप्रतिम लेख , आपले शतशः अभिनंदन व मानाचा मुजरा .

  4. फारच सुंदर रीतीने शब्द बद्ध केल्या आहेत पत्र लेखनाच्या आठवणी.
    सुनिल गावस्कर यांचे स्वहस्ताक्षसरातले पत्र म्हणजे
    तुमच्या पत्र लेखनास मिळालेली सर्वोच्च दाद आहे .
    आता पत्र ही विस्मरणात गेले आणि पत्र वाटणारे पोस्टमन ही विस्मरणात गेले

  5. सुंदर, खूप छान लिहिल्यात तुम्ही पत्र आठवणी ! इतक्या थोर – मोठ्या व्यक्तीची तुम्हाला आलेली पत्रे तुमच्या संग्रही असणे हा तर तिजोरीतील अनमोल ठेवाच . तुमचे अर्धे बालपणही या आठवणीत उलगडले आहे. आणि हे सर्व हृदयस्पर्शी आहे.

  6. वाचून मीही nostalgic झालो.
    1969 ते 1975 चिखलदरा येथे Govt Public School येथे शिकायला होतो.
    घरापासून 250 किमी दूर त्यामुळे पत्र हाच आधार होता.

    आपण आजार काळाचा खूप विधायक उपयोग केला. मीडिया वॉच ला शुभेच्छा.

    • तेव्हाचे चिखलदरा खूपच सुंदर असणार …आठवणी नक्की लिहा .

  7. आपल लहानपण व माझे लहानपण सारखेच आहे. मीही खेड्यातील इमारत नसलेल्या शाळेत म्हणजे देवळात भरणाऱ्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले. माझे वडील पण प्राथमिक शिक्षक व त्यांनापण अर्धवेळ गुरुजी व अर्धवेळ पोस्टमास्तरचे काम करावे लागले. मीही त्यामुळे पोस्ट मन व पोस्टाचे काम यांच्याशी परिचित झालो.शाळेच्या वाचनालयाचे ग्रंथ पालही वडिलच त्यामुळे भरपूर वाचनही करायला मिळाले.
    नंतर ५ वी ते ११ वी हे शिक्षण आजोळी म्हणजे मोठ्या गावात झाले. व कॉलेज साठी तेही गाव सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी मग उच्च कलाशिक्षणासाठी मुंबई व नंतर नोकरी साठी भारतभर फिरलो.त्यामुळे कुटुंब मुंबई त मुलांच्या शिक्षणासाठी व मी नोकरीमुळे इतर शहरात त्यामुळे १९८८ ते १९९७ पर्यंत खूप पत्रे मी व बायकोने एकमेकांना लिहिली. मग STD वर नंबर लाउन बायकोला रात्री फोन करणे २००० पर्यंत केले. नंतर मोबाईल आला मग मोबाईल ने रोज रात्री फोन. नंतर स्मार्टफोन आले.पण तोपर्यंत निव्रुत्त झालो.मी ती पत्रे जपून ठेवली आहेत. तसेच चित्रकार F.N.Souza, Prabhakar Barave आणि Prafulla Dahanukar अशा चित्रकारांची पत्रे जपून ठेवली आहेत.
    मीही दहा वर्षे लोकसत्ता व लोकप्रभामधे स्तंभलेखक व कलासमिक्षक म्हणून काम केले.त्यापुर्वी नागपूरला असताना लोकमतमध्ये कलाविषयक लिखाण रविवार पुरवणीसाठी पाच वर्षे केले.

  8. खूप सुंदर आठवणी आहेत तुमच्या … आणि तुमच आजारपण हे वाचन अन् लिखाण जोपासायला किती सकारात्मक ठरल..वाईट काळातही चांगल शोधण्याची इच्छा प्रेरक ठरली….पण ती 121 अन 91 पत्राची साठवण परत सुंदर आठवणीतल पुस्तक म्हणून वाचायला मिळेल या प्रतिक्षेत 😃

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here