मान लो तो हार है… ठान लो तो जीत है!

शारजात सुरु असलेल्या IPL मधील  २७ सप्टेंबरला खेळला गेलेला किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामना आठवतोय?  रात्रीचे ११.३० झाले होते.  सोळाव्या ओव्हरमधील तिसरा बॉल पडल्यावर हिंदी कमेंट्री करताना आकाश चोप्रा म्हणाला ” इस वक्त आधा भारत राहुल तेवतिया को दोषी मान रहा होगा.राजस्थान रॉयल्स ये मॅच उनके वजह से हार रहे हैं! वो जिता नहीं सकते.”

१६.४ ओव्हर झाल्यावर आकाश चोप्रा सुनील गावस्करांना म्हणाला, “सनी भाई मुझे आपसे एक बात पुछनी है… अगर बल्लेबाज इतना स्ट्रगल कर रहा है तो उसे रिटायर्ड आउट क्यों नहीं घोषित कर देते! इसको इतना क्यों बुरा समजा जाता हैं?

अगर कोई बॉलर अच्छी बॉलिंग नही कर रहा है, तो उसे अगले ओवर नही देते. वैसेही राहुल तेवतिया को राजस्थान रॉयल्सनेही रिटायर्ड आउट देने में क्या दिक्कत हैं.
ऑलरेडी तेवतिया को रॉबीनके पहले भेज कर रॉयल्स राजस्थानने गलती कर दी हैं!”

१६.५ व्या बॉलला सुनील गावस्कर म्हणतात, “बहोत अच्छा सवाल है! हाँ ऐसा हो सकता हैं! अगर राहुल तेवतिया को कोई संदेसा भेजे की, भई तुम वापस आ जाओ! कोई बहाना कर लो!”

सतरावी ओव्हर संपली. जिंकण्यासाठी हवा असलेला रन रेट  १७ वर पोहचला होता. दोन बॉल खेळलेला नवा बॅट्समन रॉबिन उथप्पा पिचवर होता. व देशभरातील क्रिकेट चाहते ज्याची निर्भर्त्सना होत होती तो राहुल तेवतिया गेल्या तासाभरापासून चाचपडत खेळत होता. राजस्थान रॉयल्स सामना  जिंकण्याची तसूभरही आशा उरली नव्हती. तेवतिया पिचवर आल्यापासून एकदाही बॉलसोबत नीट टायमिंग साधू शकला नव्हता. वीस बॉल्स खेळून एकही चौकार किंवा षटकार तो खेचू शकला नव्हता. तो जीव तोडून प्रयत्न करत होता. पण यश मिळत नव्हतं. फक्त हसं होत होतं.

सर्वच मोठ्या नावाजलेल्या क्रिकेट वेबसाईटवर राहुलतेवतियावर सौम्य शब्दांत टीका सुरू होती.
ट्विटरवर तीक्ष्ण ट्विटबाण बरसत होते. दर सेकंदाला  हजारो जोक्स,मिम्स सुरू होते.

स्पोर्ट्स वेबसाईटवर सामना सुरू असताना दोन्ही टीमची सामना जिंकण्याची शक्यता टक्के प्रमाणात दाखवतात, राजस्थान रॉयल्सची जिंकण्याची शक्यता ६०% टक्क्यांपासून प्रत्येक बॉलसोबत कमी होत सतरावी ओव्हर संपल्यावर किंग्स इलेव्हन पंजाब : ९८% तर राजस्थान रॉयल्स : २% असे दाखवत होते.

अठरावी ओव्हर वेस्ट इंडिजचा सॅल्युट स्पेशल कॉट्रेल टाकायला आला. चाचपडणारा राहुल तेवतिया स्ट्राईकवर. त्याच्याकडून शून्य आशा. मात्र त्यानंतर जे घडलं ते अविश्वसनीय होतं. चमत्कार घडून यावा, असं होतं. तोपर्यंत बॅटला धड बॉल लागत नसलेल्या राहुलने डावखोऱ्या कॉट्रेलच्या पहिल्या चार बॉलवर डीप स्क्वेअर लेग, मिड ऑन व लॉंग ऑफवरून चार सिक्स आणि सहाव्या बॉलवर पुन्हा सिक्स हाणत राजस्थान रॉयल्सला मॅचमध्ये परत आणलं.

त्याओव्हरमधील पहिल्या सिक्सनंतर आकाश चोप्रा म्हणाला, ”इस मॅच की कहानी अभी बाकी है मेरे दोस्त” कॉट्रेलच्या एक ओव्हरमध्ये ३० रन्स ठोकले गेले. त्यानंतर मोहम्मद शमीला सिक्स मारुन शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त २ रन्स काढायचे काम तेवतियाने बाकी ठेवले. यावेळी त्याच प्रसिद्ध वेबसाईटवर किंग्स इलेव्हन पंजाब जिंकण्याची शक्यता दाखवली जात होती 2%*आणि राजस्थान रॉयल्स जिंकण्याची शक्यता दर्शवली जात होती ९८%. केवळ १२ बॉल्समध्ये समीकरण उलट झालं होतं.हरलेल्या राहुल तेवतियाने सामना फिरवला होता.

आकाश चोप्रा म्हणाला त्याप्रमाणे राहुल तेवतियासाठी ‘पिक्चर अभि बाकी थी’.
शेवटी हॅपी एंडिंग राहुल तेवतीयाला मिळालंच.


मॅच जिंकल्यावर तेवतियासंदर्भात आकाश चोप्रा सुनील गावस्करांना म्हणाला-

‘मान लो तो हार है… ठान लो तो जीत हैं…’

मॅच हातातून सुटतेय आणि पराभवाला आपण कारणीभूत ठरणार आहोत, हे तेवतियाला अठराव्या ओव्हरपर्यंत समजलं नसेल का? राजस्थान रॉयल्सचे चाहते त्याच्या नावाने बोटे मोडत होते . समालोचक वाटेल ते बोलत होते. तेव्हा तो प्रयत्न करत नव्हता का ? नक्कीच करत असणार …त्याच्या हातात इतकंच होतं की जे समोर येईल त्यावर बेस्ट देण्याचा प्रयत्न करणं. तो ‘प्रयत्न’ तो करत होताच .पहिले वीस बॉल त्याला यश आलंच नाही. त्याचं हसं झालं. नंतर चमत्कार घडला.

कदाचित त्यालाही हे माहीत नव्हतं की, अठराव्या ओव्हरला आपण गेम चेंज करणार आहोत.पण टप्प्यात आलेला बॉल आणि संधी त्याने अचूक हेरली आणि तोगेम चेंजर बनला.

२०२० वर्ष आणि त्या  सामन्यातील राहुलची इनिंग हाच संदेश देत आहे…

पिच सोडू नका, स्वतःहून रिटायर्ड आऊट होऊ नका!

२०२० वर्ष वाईट जात असलं, सगळं काही प्रतिकूल घडतं असलं तरी एखादी गेम चेंजर ओव्हर प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ शकते . त्या संधीची वाट पाहायची आहे. प्रत्येकाच्या वाट्याला ती नक्की  येणार आहे. फक्त तोवर उभं राहायचं आहे. जीव तोडून प्रयत्न करायचा आहे. ‘क्यूकी… पिक्चर अभी बाकी हैं मेरे दोस्त.’

२०२० सामन्यातील राहुल तेवतियाची ती खेळी, त्याआधी किलिंग बॉलिंग करणारा कॉट्रेल, सामन्यातील १८ वा ओव्हर आणि २०२० वर्ष हे सगळं समजून घेतलं तर बरंच काही शिकता येतं. तर… तर… स्वतःहून रिटायर्ड आऊट होऊ नका. दिवा तेवत ठेवा. तुम्हीही

गेम चेंजर होऊ शकता.

राहुल तेवतियाची ती Heroic inningपाहण्यासाठी समोरील लिंकवर क्लिक करा-https://bit.ly/2GOKLcV

मजकूर बुलडाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्या सौजन्याने

 

 

Previous articleमहात्मा गांधी आणि कुमार गंधर्व
Next articleसम्यक क्रांतीचे धगधगते चांदणे
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here