तनिष्कच्या जाहिरातीमुळे ही जोडी पुन्हा चर्चेत आली. आपल्या समाजात आंतरधर्मीय विवाहांबाबतची बहुतेकांची मतं ही अज्ञान आणि पूर्वग्रह यांवर आधारलेली असतात हे या घटनेमुळं पुन्हा प्रकर्षानं समोर आलं. याच पार्श्वभूमीवर आंतरधर्मीय विवाह आणि त्याबद्दलचे गैरसमज यांविषयी रसिका आगाशे यांनी व्यक्त केलेल्या भावना…
‘मुसलमान मुलाशी लग्न केलं की मुलगी आपली राहतच नाही, तिला कन्व्हर्ट केलं जातं, कम्पलसरी बुरखा घालण्यास भाग पाडलं जातं, घरातच डांबलं जातं… थोडक्यात तिच्यावर अगणित, अनन्वित अत्याचार केले जातात’ अशी सगळी मांडणी असते. अशा वेळी मी जेव्हा स्वतःचं उदाहरण द्यायला जाते, ‘मी कुठं धर्मातर केलंय किंवा माझ्या आयुष्यात काय फरक पडलाय?’ असं सांगायला जाते तेव्हाही लोक सोयीनं हे तथ्य नजरेआड करतात. अशा विवाहांत सगळं काही बरं चाललंय हे जणू लोकांना ऐकायचंच नसतं. त्यांच्या मनातल्या पूर्वग्रहातूनच त्यांना जगाकडं पाहायला आवडत असतं.
आंतरधर्मीय असो किंवा आंतरजातीय लग्नं… त्या जोडप्यांच्या वैवाहिक आयुष्यात जगावेगळं काहीही घडत नसतं. फक्त आपल्याला आपली नजर स्वच्छ ठेवण्याची गरज आहे. अशा विवाहांबाबत लोकांचं सतत प्रबोधन करत राहणं आवश्यक आहे.