सातपुडा पर्वतरांगेतील ऐतिहासिक मैलगड किल्ला

-विवेक चांदूरकर

सातपुडा पर्वतरांगेवरील एका डोंगरावर मध्यप्रदेश आणि महाराष्टाच्या सीमेवर मैलगड किल्ला आहे. डोंगर एवढा उंच की पायथ्याहून वर नजर टाकल्यास अवसान गळते. डोंगरावर गेल्यावर येथे काहीच नसल्याचे निदर्शनास येते. मात्र, दगडांमध्ये कोरलेल्या भुयारासारख्या खोल्यांकडे बघितल्यावर अदभूत व विशेष पद्धतीने बांधकाम केलेल्या या किल्ल्याची महती पटायला लागते. विदर्भातील अन्य कोणत्याही किल्ल्यामध्ये अशाप्रकारचे बांधकाम दिसत नाही. अन्य कोणत्याही किल्ल्यावर न दिसणारी एक विशेष बाब येथे दिसते, ती म्हणजे किल्ल्याच्या सुरुवातीलाच एका किल्ल्याचा संपूर्ण नकाशा दगडावर कोरलेला आहे. या नकाशावरुनच किल्ल्याच्या भव्यतेचा परिचय येतो.

मैलगडपासून जवळच असलेल्या जामोद या गावाला प्राचीन इतिहास लाभला आहे. उत्तरेकडून दक्षिणकडे जाण्यासाठी पूर्वी पायनघाट हा मार्ग होता. या मार्गावर जामोद व मैलगड किल्ला आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणा-या प्रवाशी, व्यापारी किंवा राजे, महाराजांच्या मुक्कामासाठी एक ठाणे म्हणून या किल्ल्याचा उपयोग होत होता. मैलगड हा महाराष्ट व मध्यप्रदेशच्या सीमेवर आहे. बुलडाणा जिल्यातील जळगाव जामोद तालुका ठिकाणापासून १५ किमी आणि ब-हाणपूरवरुन ५० किमी अंतरावर असलेल्या या किल्ल्याचे बांधकाम केव्हा झाले व कुणी केले याची माहिती उपलब्ध नाही. मात्र, किल्ल्याच्या बांधकामावरुन किल्ला प्राचीन असल्याचे निदर्शनास येते.

एक चौरस मैल असे या किल्ल्याचे क्षेत्रफळ आहे. किल्ल्याचे बांधकाम गोलाकार आहे. डोंगराच्या चारही बाजूने खोल दरी आहे. गडावर फिरल्यानंतर दगडांमध्ये भुयारासारख्या खोल्या असल्याचे दिसते. खोल्यांमधील भिंती व खांब हे दगडांचेच आहेत. सध्या खोल्यांमध्ये माती व कचरा साचला असल्यामुळे आत जाता येत नाही. उंच डोंगरावरही पाणी उपलब्ध आहे. आम्ही यापूर्वी एप्रिल महिन्याच्या अखेरीस उन्हाळयात किल्ल्यावर गेलो होतो, तेव्हाही तेथे पाणी होते. येथे एक सासू-सुनेचे पाणी म्हणून प्रसिद्ध असलेले एक जलकुंभ आहे. दगडांमध्ये कोरुन हे जलकुंभ बांधण्यात आले आहे. येथे एका कपारीतील पाणी गरम तर दुस-या कपारीतील पाणी थंड असते, असे पायथ्याशी राहणारे आदिवासी सांगतात. आता मात्र, दोन खोल्यांमधील भिंत पडल्यामुळे पाणी थंड आहे. तसेच येथील पाण्याचा एक उपसर्गही आहे. गडावरुन १४ ते १५ किमी असलेल्या मोहिदपूर गावात या गडावरील पााण्याचा आउटलेट आहे. वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी येथे लिंबू टाकले तर मोहिदपूर येथे निघत होते, असे नागरिक सांगतात. सध्याही येथे पाण्यात निळ टाकली तर मोहिदपूर येथे निळे पाणी निघते. डोंगराच्या कडा समोरील बाजूने दगडांनी बांधल्या आहेत. मध्यप्रदेशच्या बाजूने डोंगरावर एक बुरुज आहे. हा बुरुज खालून दिसतो. सर्व बांधकाम हे दगडांमध्येच आहे. याचे बांधकाम दगडांमध्ये असून, शत्रूवर नजर ठेवण्यासाठी छिद्र आहेत. किल्ल्याच्या पायथ्याशी उत्तरेकडून एक अष्टकोनी विहीर व मंदिर आहे.

किल्ल्याचे फार थोडे अवशेष आता शिल्लक आहेत. किल्ल्याचा भाग वनविभागाच्या अखत्यारीत येतो. शासनाने याकडे लक्ष दिले नाही तर ते अवशेषही नष्ट होतील, अशी स्थिती आहे . सातपुडा पर्वतरांगेत असे अनेक किल्ले आहेत, ज्याची माहिती अजूनही कुणाला नाही. कालांतराने ते नामशेष होतील. इ. स. १८०१ च्या सुमारास व-हाडात गाजीखान नावाच्या व्यक्तीने सैन्य जमवून लुटालूट चालविली होती. त्यामुळे व्दितीय रघुजी भोसले यांनी यशवंतराव भवानीशंकर काळू यांना पाच हजार सैन्य देवून पाठविले होते. गाजीखान हा मैलगड किल्ल्यात बसला होता. काळू यांनी या किल्ल्यावर तोफांनी मारा सुरु केला. किल्ल्यावर सैनिकांच्या हल्ल्यानंतर गाजीखानला पराभवाचे लक्षण दिसताच तो लष्करी साहित्य सोडून पळून गेला.

सोळाव्या शतकात हा किल्ला हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात होता. छत्रपती शिवाजी महाराज आग्राहून औरंगजेबाच्या तावडीतून निसटून वेशांतर करून रायगडावर जाताना ते ब-हाणपूरवरुन मैलगडावर आले होते. येथे ते वास्तव्यास राहणार होते. औरंगजेबाने शिवाजी महाराजांना पकडून देणा-याला मोठे बक्षिस जाहीर केले होते. त्यावेळी किल्लेदार असलेल्या गोसावीला शिवाजी महाराज मैलगडावर मुक्कामास आले असल्याचे समजले. त्याने बक्षिसाच्या लालसेपोटी औरगंजेबाला ही माहिती देण्याचे ठरविले. त्याने सैनिकांसोबत  केलेला वार्तालाप त्याच्या सुनेने ऐकला व तिने गडावर असलेल्या प्रवाशांमध्ये जावून शिवाजी महाराजांना ही माहिती दिली. त्यामुळे शिवाजी महाराज तत्काळ येथून निघून गेले. असे या भागातील नागरिक सांगतात. पुस्तकांमध्ये मात्र असा उल्लेख सापडत नाही.

मंगळवारी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मराठवाडा संघटक किशोर वाघ, चिखली येथील इतिहास संशोधक डॉ. शाम देवकर सर,सवडतकर सर आम्ही मैलगड व अशीरगड किल्ला बघायला गेलो.हिरव्यागार पर्वतावर असलेल्या मैलगडवर जाताना मनोहारी निसर्गरम्य वातावरणात फिरण्याचा आनंद मिळाला. मैलगडावरून खाली नजर टाकल्यास सर्वत्र हिरवळ दिसते. हिरवेगार जंगल पाहून डोळ्याचे पारणे फिटले. मैलगडावर मी यापूर्वीही गेलो आहे. मात्र प्रत्येकवेळी एक नवा अनुभव या किल्ल्यावर जाताना येतो. त्यातच सवडतकर सरांनी दिलेली सप्तरूषींची नवीन माहिती मिळाली. सर्वांशी चर्चा करताना अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या.

(लेखक ऐतिहासिक वास्तूंचे अभ्यासक आहेत. त्यांचे ‘उध्वस्त वास्तू..समृध्द इतिहास’ हे पुस्तक मीडिया वॉच पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाले आहे.)
9552847092

Previous articleसितारमेकर बशीरसाहेब मुल्ला
Next articleमनातल्या पूर्वग्रहांतूनच जगाकडं पाहायला लोकांना आवडतं…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.