‘अहमद भाईंनी शब्द दिला म्हणजे ते काम होणारच’ , अशी अहमद पटेल यांची काँग्रेस पक्षात प्रतिमा निर्माण झालेली होती आणि ती खरीही होती . मात्र , यातही एक विरोधाभास आहेच . नारायण राणे यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये जेव्हा प्रवेश केला तेव्हा अहमद पटेल यांनी त्यांना मुख्यमंत्री करण्याचं आश्वासन दिलं होतं , असं दस्तुरखुद्द नारायण राणे यांनी अनेकदा सांगितलं . मात्र , नारायण राणे यांना काँग्रेस पक्षात असेपर्यंत मुख्यमंत्रीपदानं कायमच हुलकावणी दिली . नारायण राणे यांनी अनेकदा उच्चार करुनही याच नाही तर आणि कोणत्याही ‘दिल्या घेतल्या वचनां’चा कधीही कोणताही खुलासा अहमद पटेल यांनी केला नाही . हे असं सोयीस्कर म्हणा का धूर्त म्हणा मौन बाळगून वावरणं हे अहमद पटेल यांच एक खास वैशिष्ट्य होतं .