मुन्नार: किंग ऑफ हिल स्टेशन

 -राकेश साळुंखे

केरळला ‘देवभूमी’ का म्हणतात, हे तिथे गेल्यावर कळते . हिरवागार निसर्ग , सुंदर समुद्र किनारे , बॅक वॉटर , प्राचीन देवळे , आयुर्वेदिक औषधे व पंचकर्म चिकित्सा  , कथकली हा नृत्यप्रकार यासाठी तर केरळ प्रसिद्ध आहेच सोबतच  मैलोनमैल पसरलेल्या चहाच्या मळ्यांनी हा प्रांत अधिकच देखणा झालं आहे . केरळ भेटील  King of Hill station असा ज्या स्थळाचा उल्लेख होतो, त्या मुन्नारला भेट देणे अजिबात चुकवू नये.  मुन्नार हे माझे सर्वात आवडते Hill-station आहे. मी पाहिलेल्या  कर्नाटक , तमिळनाडू , दार्जिलिंग व श्रीलंका येथील चहाच्या मळ्यांपेक्षा सर्वात सुंदर चहाचे मळे मुन्नारमध्येआहेत.

मुन्नार हे कोचीपासून १२८ किमी म्हणजे रस्त्याने चार तास अंतरावर आहे. येथे जाण्यासाठी बसेस किंवा खाजगी वाहन हाच पर्याय आहे . बरेचजण मुन्नार-थेक्कडी असा एकत्रित प्लान घेतात. मुन्नारला जायचे म्हणजे किमान दोन दिवस तरी हवेत. कोचीवरुन मुन्नारला निघालो की काही अंतरावर घाट लागतो  . घाट चालू  झाल्यावर वाटेत दोन धबधबे लागतात. एक ‘चियपारा’ आणि दुसरा ‘पायकारा’. चियपारा येथे आपण धबधब्यात भिजण्याचा आनंद घेऊ शकतो. ऑगस्ट महिना असेल तर वाटेत छोटे-छोटे बरेच झरे लागतात. या निसर्गरम्य प्रदेशातून  आपण पुढे पालीवासळला येतो. येथेही मोठा धबधबा असून तेथे दोन वर्षापूर्वीपर्यंत फार जुना असा लाकडी पूल होता. दोन वर्षापूर्वीच्या महापुरात हा पूल वाहून गेला. आता हा पूल नसल्याने धबधब्याकडे जाता येत नाही. त्याच्या जवळच बायसन-व्हॅली ही अतिशय सुंदर व्हॅली आहे. चहाच्या टेकड्या व मसाल्यांचे मळे असलेल्या या भागात बरेच रिसॉर्ट आहेत. मुन्नार गावातील हॉटेल्सपेक्षा येथील मुक्काम चांगला.

या वाटेवर बरेच मसाल्यांचे मळे लागतात. प्रत्येकी १००रु एंट्री फी  देऊन आत जाता येते . आतमध्ये Group-wise एक guide असतो. तो अनेक मासाल्यांची झाडे दाखवतो व त्याबद्दल माहिती देतो. Stevia, ज्याचे पान साखरेपेक्षाही कित्येकपटीने गोड असणारी वनस्पती व little-apple ही वनस्पती पहिल्यांदाच येथे पहिली. या गार्डन मध्ये खरेदी करताना मात्र चौकसपणे करावी . मुन्नार पाहताना प्रथम टॉप स्टेशनच्या दिशेने गेलेले चांगले. मुन्नार शहरातून वर निघाल्यावर घाट सुरू झाल्यानंतर Botanical garden आहे. खरंतर ही फुलांची बाग आहे. विविध फुले पाहत पाहत वर्तुळाकार फिरत फिरत आपण बाहेर पडतो . त्यानंतर वर जाऊ लागतो तसे चहाच्या मळ्यांनी आच्छादलेल्या  हिरव्यागार डोंगररांगा दिसू लागतात. डावीकडे फोटोपॉइंट म्हणून चहाच्या टेकडीच्या पार्श्वभूमीवर फोटो घेण्याचे सुंदर ठिकाण लागते. जसे बहुतेक पर्यटनस्थळी Instant photo प्रिंट देणारे photographer आढळतात तसेच येथेही आढळतात. चहाच्या मळ्यातल्या कामगारांची टोपली व त्यांच्या डोक्यावर असते तशी टोपी घालून येथे फोटो काढून देतात. तेथून मध्ये-मध्ये थांबत थांबत आपण त्या चहाच्या मळ्यांची विलोभनीय दृश्य पाहत टेकडी चढून वर जात असताना ज्यांना चहाची आवड आहे ते तेथे ताज्या चहाचा आस्वाद घेऊ शकतात. वर चढून गेल्यावर कन्ननदेवन हिल्सची चहाची फॅक्टरी आहे. आपण ही फॅक्टरी १००/- रु एंट्री फी देऊन पाहू शकतो व निरनिराळ्या चवीचा चहा चाखू शकतो , मात्र ते फुकट नाही. येथे चहाची खरेदीही करता येते. या फॅक्टरीमध्ये छोट्या छोट्या ग्रुपने सोडले जाते त्यामुळे आपल्याला थोडावेळ रांगेत उभे राहावे लागते. आतील माहिती देण्याकरिता एक माणूस नेमलेला आहे. तसेच तेथे स्क्रीनवर एक छोटा माहितीपटही दाखवला जातो.
येथे गेल्यावर चहाबद्दल मला बरीचशी माहिती कळली. जसे की, सुमारे दर २१ दिवसांनी चहाच्या पानांचा खुडा घेतला जातो. त्यापैकी मोठी पाने नेहमीच्या वापरातील चहासाठी तर एकदम कोवळी पाने ग्रीन-टी बनवण्यासाठी वापरतात. या चहाच्या झाडांचा शेंडा व्हाइट-टी बनवण्यासाठी वापरतात. चहा हे झुडूप स्वरूपात दिसत असले तरी ते झुडूपवर्गीय नसून त्याचे मोठे झाड होते परंतु त्याची नियमित छाटणी केल्याने ते आपल्याला छोट्या स्वरूपात पाहायला मिळते. चहाच्या झाडाचे आयुष्य १०० वर्षे असते.

या फॅक्टरीमध्ये चहाची पाने आत कशी आणतात यापासून त्याचे वर्गीकरण करून पॅकिंग करेपर्यंतची सर्व प्रक्रिया पाहायला मिळते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चहाची पाने अर्धादिवस सुकवून पुढे बारीक बारीक केली जातात. ही प्रक्रिया ज्या पट्ट्यावर पाने ओतली जातात तो पट्टा पुढे सरकत असताना घडत असते. Hopper वरुन पुढे सरकत असताना पानांचे बारीक तुकडे केले जातात. त्यानंतर fermentation केले जाते, त्यापुढे बॉयलरने हीट देऊन किनवण प्रक्रिया केली जाते. आता चहाचा रंग तपकिरी झालेला असतो. तो पुढे त्याच्या गुणवततेनुसार विभागला जातो व त्याचे पॅकिंग केले जाते. मोठा असतो तो उत्तम प्रतीचा मानलो जातो व dust असतो तो कमी प्रतीचा मानला जातो. जगभर मध्यम गुणवत्तेचा चहा जास्त प्रमाणात वापरला जातो. KDHPचा चहा ‘Ripple’ या ब्रॅंड-नेम ने विकला जातो. त्याव्यतिरिक्त तो मोठ्या कंपन्यांनाही विकला जातो. चहाच्या कारखान्यातून बाहेर पडलो की या मार्गावर मथूपेट्टी नावाचे धरण लागते. हे धरण उथिरापुझ्झा, चंदूवऱ्हाई आणि कुंडळे या तीन नद्यांच्या संगमावर आहे. या धरणातील पाण्याने जलविद्युत निर्मिती केली जाते. या धरणाच्या valve वरूनच पुढे जावे लागते. या धरणाच्या दरवाज्यातून सोडलेले पानी हे वरील valve वरुन पाहणे हा एक विलक्षण अनुभव आहे. या धरणापसून ते पुढे echo-point, कुंडला-धरणापर्यंत आपण महाराष्ट्रात आहोत की काय असे वाटावे  इतके मराठी ऐकू येते. येथे बहुतांश पर्यटक महाराष्ट्रातील असतात.  ‘Echo-point’ हे अत्यंत गर्दीचे असे ठिकाण आहे. येथे बोटिंग इत्यादि activity व खरेदीसाठी खूपशी छोटी छोटी दुकाने आहेत. येथील पाण्याच्या पलीकडील बाजूस निलगिरीचे जंगल आहे व त्यामागे पहाडी भाग आहे. त्यामुळे येथे जोरात ओरडले की आवाजाचा प्रतिध्वनि (Echo) ऐकू येतो. बरेचजण या गोष्टीची प्रचिती घेत असतात.
या ठिकाणच्या पुढे बऱ्याच पर्यटन संस्था पर्यटकांना नेत नाहीत. तिथे वनखात्याचे तपासणी केंद्र आहे, त्यामुळे कदाचित मोठ्या वाहनांना सोडले जात नसावे पण खरेतर पुढेच चहाचे सुंदर मळे आहेत.

‘Echo-Point’ वरून पुढे निघालो की कुंडले नदीवरील कुंडला धरण लागते. इथे water sports आहेत तसेच घोड्यावरून सैरसपाटा मारता येतो. येथे प्रदूषण होऊ नये म्हणून सर्व Boats या Paddle-boats आहेत, तसेच येथे तराफेही आहेत. बहुतांश पर्यटक येथूनच परत जातात. ज्यांना माहिती आहे ते पुढे top-station पर्यन्त जातात. वाटेत खूप सुंदर ठिकाणे आहेत. आपण गाडीतून  जात असताना आपल्याला खूपदा खाली उतरण्याचा मोह आवरता येत  नाही त्यामुळे खरंतर चालतच जावे असे वाटते. पुढे छोटी खिंड लागते, ज्यापासून जवळच तामिळनाडू राज्याची सीमा आहे.
मी व माझे पुतणे एकदा इकडे गेलो असता, फोटो काढण्यासाठी या खिंडीतील चहाच्या मळ्यात गेलो . चालत असताना माझ्या एका पुतण्याच्या पायाला जखम झाली व त्यामधून रक्त येऊ  लागले . त्या परिस्थितित त्याला साप चावला असावा असे वाटले . आम्ही व तेथील चहाच्या टपरीवरील एक वृद्ध व्यक्ती ती जखम साप चावल्याने झाली आहे का हे निरखू लागलो. नंतर ती जखम ही चहाच्या झाडाची वाळलेली  फांदी लागल्याने झाली आहे असे लक्षात आले . परंतु त्याच्या मनातील सर्पदंशाची शंका मात्र दूर होईना. आम्ही समजूत काढूनही काही उपयोग झाला नाही . मग मात्र आम्ही परत माघारी फिरायचे ठरवले. परतीच्या मार्गावरील चहाच्या मळ्यातील सुंदर अशी दृश्ये पाहून ही घटना त्याच्यासह सर्वजणच  विसरले व पुनः एकदा सर्व जण या मळ्यांचे सौंदर्य निरखण्यात मग्न झाले.

 या खिंडीच्या पुढे तामिळनाडू राज्याच्या हद्दीत एक कडा आहे त्याला Top-Station म्हणतात, येथे गाडी पार्क करून अर्धा किलोमीटर पुढे चालत गेल्यावर Watch-station लागते त्यावरून दिसणाऱ्या सभेवतालच्या दृश्यापेक्षा पुढे अर्धा एक किलोमीटर खाली उतरून गेल्यावर आपल्याला खरा निसर्ग अनुभवता येतो येथे डोंगर-दऱ्यांना न्याहाळत पायवाटेने आपण जस जसे खाली उतरू लागतो  तसे दरीतील पशुपक्ष्यांचे आवाज आपल्याला स्पष्टपणे कानावर पडू लागतात. येथून पुढचा भाग निर्मनुष्य असल्याने येथील जंगल सुस्थितीत आहे. दरीतून येणाऱ्या शुद्ध हवेने आपण ताजेतवाने होतो. तेथील नीरव शांतता आपल्या मनालाही शांती देऊन जाते. तेथून माघारी फिरावेसे वाटत नाही. येथून जेवणासाठी थेट मुन्नारलाच जाणे गरजेचे असते. कुंडला डॅम किंवा Echo-Point-ला खाद्यपदार्थांच्या छोट्या टपऱ्या आहेत पण तेथे खाण्यापेक्षा उशीर झाला तरी मुन्नारमध्येच जेवायला जावे.

  दुपारच्या Session मध्ये राजमला म्हणजे एरावीकुलम नॅशनल पार्कला जावे. तेथे निलगिरी ताहर हा केरलचा राज्यप्राणी कळापाने दृष्टीस पडतो. हा प्राणी  बोकड व हरिण यांच्या मिश्रणासारखा दिसतो . बोकडासारखा आकार, दाढी पण हरणाचे तोंड व हरणांसारखाच रंग. संध्याकाळी मुन्नार गावाच्या सुरुवातीला KDHP चे Outlet आहे. तिथे चहा खरेदी करण्यासाठी भेट द्यावी . हे कन्ननदेवन हिलस् येथील चहाच्या फॅक्टरीचे Outlet आहे. मुन्नारला चहाची अनेक दुकाने आहेत परंतु तेथे  फसवणुकीची शक्यता जास्त असते . गावातील काही दुकानात  सुंदर चवीची , ताजी होममेड चॉकलेटस् मिळतात . मुन्नार येथे ‘हॉटेल सरवना’ म्हणून एक प्रसिद्ध रेस्टोरंट आहे, ते येथे येणाऱ्या पर्यंटकांत खूप प्रसिद्ध आहे. तेथे मिळणाऱ्या साऊथ इंडियन पदार्थांची चव बरेच दिवस जीभेवर रेंगाळत राहते आणि आठवण आली तरी तोंडाला पाणी सुटते . मी येथे प्रथमच कमळाच्या आकाराचा डोसा खाल्ला होता.

दुसऱ्या दिवशी Thunder-world व जीप सफारी करावी , पोनमुडी डॅमच्या दिशेने ही सफारी असते. दरीतील चढउतार अनुभवत सिंगल रोडने ही जीप सफारी होते. या वाटेवर थोडे कॉफीचे मळेही लागतात. चहाचे मळे कमी व दाट झाडीमध्ये कॉफी व मसाल्याची झाडे दिसतात. मिरीचे वेल झाडावर चढवलेले असतात. खास मसाला गार्डन पाहायला गेलो नाही. कारण या वाटेवर वेलदोडा, मिरी, दालचीनी, ई. अनेक मसाल्यांचे छोटे-छोटे मळे दिसतात. वेलडोद्याची झाडे हळदीसारखी असून त्याला जमिनीपासून तुरे येऊन त्याला  वेलदोडे लागतात. साधारणपणे झाडाझुडपांच्या शेंड्याला फुले येऊन फळे येतात हा नेहमीचा अनुभव पण हा प्रकार मी  येथे पहिल्यांदा पाहिला  तेव्हा अचंबित झालो . Silver-Oak च्या झाडावर चढवलेल्या मिरीच्या वेलावरील मिरी कशी काढतात ही सुद्धा उत्सुकता होती तेव्हा मिरी एक विशिष्ट शिडीने काढताना पहिली. या जीप सफारीमध्ये दरीत खाली उतरून गेलो की Ripple Waterfall लागतो. पावसाळ्याव्यतीरिक्त इतरवेळी खाली उतरून धबधब्यासामोर जाता येते. येथे पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सोयी केल्या आहेत.

Ripple-Waterfall  पाहिल्यानंतर  चढ चढत असताना  एका वळणावर दक्षिण भारतातील सर्वात जुना झुलता पूल लागतो. तसेच थोडे वर पोनमुडी डॅमची भिंत लागते. येथे बऱ्याच सिनेमांचे चित्रीकरण झालेले आहे. धरणाच्या भिंतीवर जायला आपल्याला परवानगी वगैरे काही लागत नाही. मुन्नार मधीत एक वैशिष्ट्य आहे कि येथे बहुतांश सर्व धरणांवर जाता येते. येथेही पुढे एक इको पॉइंट आहे .पोनमुडी धरणाच्या बॅक वॉटरच्या कडेला प्रचंड उंच निलगिरीची झाडे असून त्यापुढे पाण्यापर्यंत लाँन सारखे  गवत सर्वदूर पसरलेले आहे. अशा नयनरम्य ठिकाणी सिनेमांचे चित्रीकरण झाले नसेल तर नवलच ! तेथून पुढे एकदम डोंगरमाथ्यावर गेले की तेथून सभोवतालचा संपूर्ण परिसर दिसतो. डोंगररांगा व दरीमध्ये असणाऱ्या दाट झाडीमधल्या नारळी पोफळीच्या बागा दिसतात. संध्याकाळची वेळ असेल तर सूर्यास्त बघूनच परतीच्या मार्गी लागावे.

  आम्ही एकदा तेथे जीपने गेलो होतो. गाडी चालवणारा एक स्थानिक मुलगा होता, तो वाटेत  तेथील बरीच माहिती सांगत होता . मुलगा एकदम चुणचुणीत वाटला .  येथील जवळच्याच खेड्यातील राहणारा होता. त्याच्या बोलण्यातून समजले की सिझन मध्ये एका दिवसाला त्याला ४००रु मिळतात . इतरवेळी मात्र पोट भरण्यासाठी काही छोटीमोठी कामे करावी लागतात . परंतु नोटबंदीनंतर पर्यटक बरेच कमी झाल्याने सिझनलाही फारशी कमाई होत नाही. येथील  स्थानिक लोकांचा रोजगार हा बराचसा पर्यटकांवरच अवलंबून असल्याने नोटबंदी नंतर तो अडचणीत सापडला आहे.
येथे केरळीयन मसाजची सोय देखील आहे . केरलीयन मसाज जगप्रसिध्द आहे . पण मित्रांच्या बाबतीतील मसाजसंदर्भात घडलेला किस्सा आठवून ही सुविधा मात्र  मी प्रत्येक वेळी टाळत असतो . माझे  हे ५-६ मित्र केरळला गेले होते त्यातल्या दोघा तिघांना मसाज करून घ्यायची हुक्की आली. हॉटेल चांगलेच होते, त्यामुळे मसाजही चांगलाच होईल हा त्यांचा कयास. चांगल्या हॉटेलमध्ये मसाज करायचा असल्याने तिघेही जण बिनधास्त ! सुरुवातीला एक जण मसाज करून आला, बाहेर आल्यावर त्याला सर्वांनी विचारले की कसा होता अनुभव, तर तो म्हणाला की चांगला मसाज होतोय, खूप Relax वाटतय. ते बघून दुसराही गेला व बाहेर आल्यावर त्यानेही तेच उत्तर दिले. असे करून तिघांनीही मसाज करून घेतला. कसे वाटते तर छान . असेच या तिघांचेही उत्तर. परंतु जेव्हा दुसऱ्या दिवशी एकाला अंगदुखी सहन होईना तेव्हा तो कण्हत पहिल्या दोघांना म्हणाला, “काय राव  स्पष्ट सांगायचे नाही का? कणिक तिंबल्यासरखे तिंबलय! कसला मसाज आणि कसले काय !” सगळे अंग दुखतंय .  ज्यादा पैसे देऊनही शास्त्रोक्त पद्धतीने मसाज न होता फक्त तेलाने अंग रगडणे यालाच मसाज म्हणतात की काय असे त्यांना वाटले . त्यानंतर संपूर्ण प्रवासभर केरळीयन मसाजचे नाव निघाले की सर्वजण मनमुराद हसून घेत व अजूनही हसू फुटते. त्यामुळे व्यवस्थित माहिती घेवूनच मसाज घ्या.
केरळला कितीदाही वेळा भेट दिली तरी मन भरत नाही . दरवेळी वेगळा अनुभव देणारे केरळ खरोखरच देवभूमी आहे.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

 

Previous articleअहमद पटेल नावाची काँग्रेसी दंतकथा !
Next articleस्त्री-पुरुष संबंध (उत्तरार्ध)- पती-पत्नी नाते
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.