स्त्री-पुरुष संबंध (उत्तरार्ध)- पती-पत्नी नाते


-मिथिला सुभाष

माणसाचं भावविश्व जेवढं समृद्ध असतं तेवढंच त्याचं करियर चांगलं बहरतं, मनमाफिक आकार घेतं हे आता जगभरातल्या तत्वज्ञांनी मान्य केलेलं आहे. या भावविश्वात निर्व्याज प्रेम असतं, विश्वासाची सोबत असते, सुखाचा सहवास असतो तसंच संतुष्ट कामजीवन पण असतं. पण आपल्याकडे कामजीवनाबद्दल बोलणं हा एवढा मोठा Taboo – एवढं निषिद्ध मानलं जातं की फार कमी विवाहित जोडपी याबद्दल मोकळेपणाने बोलतात.

………………………………………………………………………

 जगातलं सगळ्यात गुंतागुंतीचं नातं म्हणजे स्त्री-पुरुष संबंध.. त्यातलंही नवरा-बायको संबंध म्हणजे तव्यावरची पोळी. नीट भाजली गेली तर ठीक, नाहीतर नुसतेच चटके आणि कच्ची किंवा करपलेली पोळी. पण जेव्हा डबाभर पोळ्या केल्या जातात, तेव्हा बनवणारी व्यक्ती तज्ज्ञ असली तर एखादीच पोळी करपते, एखादीच कच्ची राहते. चांगल्या पोळ्यांकडे फार कुणी पाहत नाही, बिघडलेल्या पोळीची याद मात्र जास्त काढली जाते. त्यामुळे मी काहीतरी समस्या असलेल्या जोडप्यांबद्दल लिहिणार असले तरी बहुसंख्य जोडपी सुखात असतात हेही मी सगळ्यात आधी मान्य करते. माझा संसार मोडला म्हणून ‘लग्नसंबंधच वाईट’ असतात असं म्हणणं म्हणजे सासूशी भांडण झालं म्हणून तिच्या मुलीला अद्दल घडवण्यासाठी आपलंच इंद्रिय कापून फेकण्यासारखं आहे!

पती-पत्नी नात्याबद्दल लिहितांना मी स्वभावांची कितीही विभागणी केली तरी काहीतरी राहूनच जाणार. सगळ्यात आधी छान सुखी पती-पत्नीचा संसार बघूया. तो आपण आपल्या नजरेने बघायचा नाही, त्यांच्या नजरियाने बघायचा. ही जोडपी एकमेकांसोबत सुखी असतात, म्हणजे त्यांनी काहीच जुळवून घेतलेलं नसतं असं नाही. पण त्या संसारात समजूतदारपणाचं एक उबदार अस्तर असतं. मला फार माया वाटते अशा जोडप्यांबद्दल. विवाहसंस्था ज्याने कुणी जन्माला घातली त्याला यश देणारी माणसं ही. आपल्या अंगावर कुठे चामखीळ आलं तर काही दिवसांनी आपल्याला त्याचीही सवय होते. तशी त्यांनी एकमेकांची सवय करून घेतलेली असते. खूप विचक्षणपणे सांगायचं झालं तर यातल्या बहुतेक लोकांना आपल्या भावनांचे, विचारांचे, लैंगिकतेचे भान नसते. कारण ती सर्वसामान्य माणसं असतात. आपण जे जगतोय, वागतोय, करतोय ते लै भारी असं वाटत असतं त्यांना. पण हा झाला ‘आपला विचार.’ ते त्यांच्या नजरियेने सुखात असतात. दुनिया भरी पडी है ऐसे लोगों से! समाजाचा एक मोठा स्तर या लोकांनी घडवलेला असतो. यांच्यामुळे विवाहसंस्थेवरचा विश्वास वाढतो.

पण कुणाचा?? कुणाचा वाढतो हा विश्वास?? ज्यांना कसलेच भान नसते अशा सामान्य माणसांचा. समाज अशा माणसांनी बनलेला असतो म्हणून ते महत्त्वाचे. पण एकदा का यातल्या एखाद्याला भान येते, तेव्हा नात्यात काहीतरी गडबड होते. बहुतेक ती पाण्यावर कधीच येत नाही. पण माणसाची घुसमट, वैफल्य वाढायला लागतं. नेमकं कारण चिमटीत येत नाही. पदार्थ झालाय तर चांगला, आपण पोटभर खाल्लाय, आपलं पोट भरलंय.. पण.. पण कुछ तो कम है, नक्की काय ते आधी कळत नाही, अचानक ती कमी भरून काढणारं कुणी सापडतं तेव्हा प्रकर्षाने जाणवतं की हां, हेच तर हवं होतं. अशा जोडप्यांबद्दल बोलूया.

माझ्या पहिल्या लेखात मी लिहिलं होतं की नवऱ्याला बायकोचा जेवढा त्रास होतो तेवढा इतर कुणाचाच होत नाही. पण विवाहित स्त्रीलाही नवऱ्याचाच त्रास सगळ्यात जास्त होऊ शकतो. कधी एकमेकांच्या स्वभावाचा, कधी एकमेकांच्या माहेरच्या नातेवाईकांशी असलेले वर्तन मनमाफिक नसते म्हणून आणि बहुतेकवेळा बौद्धिक अनुकूलता नसते, त्यामुळे लैंगिक अनुकूलता नसते म्हणून. बौद्धिक अनुकूलता नसल्यावरच लैंगिक अनुकूलतेचा मुद्दा जोर धरतो. दोघांची बौद्धिक वाढ समान पातळीवर झालेली नसते तेव्हाच लैंगिक अनुकूलतेचा विषय निघतो. नाहीतर दोघं एकमेकांना समजून, एकमेकांचे प्लस-मायनस विचारात घेऊन, त्यावर चर्चा करून लैंगिक मुद्द्यावर एकमत करून घेतात. त्यामुळे बौद्धिक आणि लैंगिक अनुकूलतेबद्दलच बोलू. हा तिढा सुटला की बाकीच्या गाठी नगण्य होतात. एकूण काय? जोडप्यापैकी कुणा एकाला ‘भान येणे’ ही घटना ‘विवाहसंस्थे’च्या मुळावर उठत असते.

‘बौद्धिक अनुकूलता’ हा शब्द एवढा गोमटा आहे की ती संकल्पना देखील माहित नसलेले लोक आपल्या विवाहबाह्य संबंधांना हे लेबल लावत असतात. हा एक भयंकर ढोंगी गट सुशिक्षित समाजात तयार झालाय. “आमची बौद्धिक भूक भागत नाही,” म्हणजे काय हो?? अशा लोकांसमोर खरोखर एखादी बुद्धिमान व्यक्ती येऊन उभी राहिली तर यांची ततपप होईल. बुद्धी धारण करणं हे खायचं काम नसतं. ती बुद्धी बाहेर प्रकाश फेकत असली तरी आत ती जाळत असते. आणि हे काही फक्त पुरुषच बोलतो असं नाही, अनेक सुशिक्षित आणि संभ्रांत स्त्रियांनी या भ्रमापायी स्वत:चे ‘दुकान’ करून घेतलेले आपण पाहतो. हे लोक स्वत:ला बृहस्पतीचे सगेवाले समजतात. असो. पुढे जाऊ.

माणसाचं भावविश्व जेवढं समृद्ध असतं तेवढंच त्याचं करियर चांगलं बहरतं, मनमाफिक आकार घेतं हे आता जगभरातल्या तत्वज्ञांनी मान्य केलेलं आहे. या भावविश्वात निर्व्याज प्रेम असतं, विश्वासाची सोबत असते, सुखाचा सहवास असतो तसंच संतुष्ट कामजीवन पण असतं. पण आपल्याकडे कामजीवनाबद्दल बोलणं हा एवढा मोठा Taboo – एवढं निषिद्ध मानलं जातं की फार कमी विवाहित जोडपी याबद्दल मोकळेपणाने बोलतात. तारुण्य धुंदीत निघून जातं, पण चाळीशीनंतर हा मुद्दा हळूहळू डोकं वर काढतो. ‘चाळीशीनंतर’ हा फारच कळीचा मुद्दा आहे. मुळातच स्त्री ही Passive पार्टनर असते. म्हणजे तिच्याकडून ज्या Activeness ची अपेक्षा असते, त्यात तिने या क्रियेसाठी शारीरिकदृष्ट्या ‘तयार होणं’ हा प्रकार नसतो. ती मनाने तयार नसली तरी त्यात सहभागी होऊ शकते. पुरुषाचे असे नसते. त्याला यासाठी तयार व्हावे लागते. आणि ते ‘तयार होणे’ शारीरिक असले तरी बरेचसे मनावर, मेंदूवर अवलंबून असते. शिवाय वय वाढत असतं. ती बऱ्यापैकी मोकळी झालेली असते. रजोनिवृत्तीनंतर तर ती अगदीच आश्वस्त झालेली असते. आणि तो दबावाखाली असण्याची शक्यता त्याच काळात वाढलेली असते. तसंही लैंगिकतेच्या बाबतीत स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक सक्षम असते. तिचं Passive असणं हेही त्यामागे एक कारण असतं. म्हणजे अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ज्या काळात तिच्या शरीरातली आग जोमाने वाढायला लागते, त्या काळात तो थोडा Back Foot ला जात असतो. संसारात असा असमतोल होऊ नये म्हणून आपल्या समाजाने काही अलिखित नियम केलेत. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे, बाईला लहानपणापासून हे सांगत राहणे की विशिष्ट वयानंतर, मुलं हाताशी आल्यावर तिने तिचं लैंगिक आयुष्य संपवायचे. हवंसं वाटलं तरी बोलायचं नाही, तो विषय बोलणारी बाई ‘चांगली’ नसते. आणि बहुसंख्य सामान्य बायका या तत्वाला बळी गेलेल्या असतात. आसपास पाहा. पन्नाशी जवळ आल्यावर अनेक बायका चिडचिड्या होतात. सतत कटकट करतात, त्याचं कारण बहुतेकवेळा हेच असतं. तारुण्यात आगीसारखा तळपणारा माणूस पन्नाशी जवळ आली की बायकोच्या अर्ध्या वचनात जातो, त्याचं देखील कारण हेच असतं. हिला जे हवंय, ते आपण देऊ शकत नाहीयोत हा गिल्ट त्याला असतोच. फक्त मोठा प्रचंड घोळ हा आहे की तिला काय हवंय हे तिलाच माहीत नसतं. आणि ती कटकटी बाई म्हणून कुटुंबात प्रसिद्धी पावत राहते. तो गप्पं राहतो.

मी काही अजिबातच स्त्रीवादी वगैरे नाहीये. पण बुद्धी आणि निरीक्षण हे दोन जालीम गुण माझ्यात एवढे ठासून भरलेत की मला पहिल्या नजरेत माणूस कळला नाहीच, तर त्याच्या पहिल्या एकदोन वाक्यात तो कळतोच कळतो. मग मी माझ्या मनातली एक पायरी त्याला देऊ करते आणि तो कसा तिथेच राहील, ही सोय बघत राहते. म्हणूनच या विषयावर काहीतरी मत मांडण्याचा अधिकार संपादकांनी मला दिलाय असं मी समजते. माझ्या मनाच्या सगळ्यात खालच्या पायरीवर पुरुषांची गर्दी आहे. असे पुरुष जे स्त्रीचा अतिशय सूक्ष्म, महीन छळ करतात. “माझ्यावर सगळ्या बायका मरतात आणि माझं बाहेर कुठेतरी काहीतरी आहे,” या भीतीखाली बायकोला ठेवणे हा अनेक सामान्य पुरुषांचा खेळ असतो. आणि तो चाळीशीनंतरच सुरु झालेला असतो. “माझ्याशी नीट वाग” ही सुप्त धमकी असते ती. “तुझ्यावर अमकी मरते ना, चालायला लाग, तुझी लायकी तिला पण कळू दे,” असं बाई म्हणत नाही. या दोघांच्या या वागण्याचं मूळ त्यांच्या नैसर्गिक घडणीत आहे.

माणूस जेव्हा उत्क्रांत होत होता, तेव्हा त्याची बाई नऊ महिन्यांसाठी अडकल्यावर तो मुकाट्याने घरात बसला असता तर माणसांची पैदास थांबली असती. तसं होऊ नये म्हणून निसर्गानेच त्याच्यात बहुपत्नीत्वाचे – Polygamy चे गुण दिले. पुरुष एकाचवेळी दोन किंवा तीन स्त्रियांवर एकसारखे प्रेम करू शकतो. अरे पण राव, निसर्गाचे सगळे नियम आपण धाब्यावर बसवले, तसा हाही बदलायला पाहिजे. नाहीतर कापडं घालणं सोडा की, तो पहिला नियम आहे निसर्गाचा. तसंही, उत्क्रांतीच्या काळात आहार वेगळा असायचा. आता चार बायका पाळायच्या म्हणजे बाकीचे तर जाऊच द्या, कंबर आणि गुडघ्यात जोर आहे का हे नको का तपासून बघायला? हे इतकं टोकाचं मी बोलतेय त्यालाही कारण आहे. मुंबईत जेव्हा ‘लेडीज स्पेशल’ लोकल सुरु झाली तेव्हा फक्त बायकांसाठी काहीतरी विषय करावेत म्हणून मी काही वर्तमानपत्रीय स्टोरीज केल्या होत्या. समाजातल्या सोवळ्या लोकांच्या फारच डोळ्यावर आल्या होत्या त्या. पण वर्तमानपत्रीय स्टोरीचं ते यशच असतं.

“Orgasm चा अनुभव किती बायकांनी घेतलाय,” असा तो विषय होता. Orgasm म्हणजे काय, हे आधी बहुतेकींना समजावून सांगावं लागलं. शारीर समागमाच्या वेळी येणारा उत्कट आनंद वगैरे पुस्तकी व्याख्या सांगून न थांबता, त्यावेळी बाईला नेमका काय किंवा कायकाय अनुभव येऊ शकतो, हेही मी सांगत होते. आईशप्पत, उत्तरं ऐकून मी व्यथित झाले. जवळजवळ ऐंशी टक्के बायकांनी तो अनुभव घेतलाच नव्हता. आपण असं समजू की त्यातल्या काही टक्के बायका मला उत्तर देतांना खुलल्या नसतील, तरी साठ, पासष्ट टक्के कुठेच नाही गेले?? हे फार भीषण आहे. भारताने जगाला कामसूत्र दिलं, खजुराहो दिला वगैरे आपण बोलतो, पण ते तितपतच असतं. खुद्द त्या खजुराहोमधे रसिक कमी आणि आंबटशौक़ीन जास्त असतात. असो.

गडबड काय झालीये माहितीये का? माणूस उत्क्रांत झाला. मग हळूहळू सुधारायला लागला. समाजस्वास्थ्याचा विचार करून समाजधुरिणांनी विवाहसंस्थेचा पुरस्कार करून कुटुंब व्यवस्था जन्माला घातली. पण याच्या जीन्समधली Polygamy संपत नाहीये. मग, ‘ती माझ्यावर मरते,’ ‘ती मला सिग्नल्स देते,’ वगैरे गमजा सुरु होतात. असे सिग्नल्स बायकांना देखील मिळतात. पण निसर्गाने त्यांना मुळातच ‘एका वेळी, एका पुरुषाची’ बनवलेली आहे. (नीट वाचा हं, ‘एका वेळी, एका पुरुषाची’ म्हणतेय मी.) त्यामुळे ती त्या सिग्नल्सची नोंद घेत नाही आणि संस्कारांच्या पगड्यामुळे त्याबद्दल अवाक्षर काढत नाही. सुधारित समाजात राहायचे तर पुरुषांनी देखील डोक्यातली ही Polygamy संपवली पाहिजे. बाईला ताब्यात ठेवण्यासाठीच्या या क्लृप्त्या फारच छिछोऱ्या असतात. त्यासाठी फार सोप्या आणि वेगळ्या युक्ती असतात. अगदी लैंगिक समाधान मिळवून देण्यासाठीसुद्धा असतात. पण त्या सांगणं हे माझं काम नाही!

कुठलंही नातं निभावून नेणं – कॅरी करणं, हे काम कौशल्याचं असतंच, त्याहून जास्त जबाबदारीचं असतं. कारण नातं म्हणजे ड्रेस नसतो. नाही आवडला, फेकून दिला, हे चालत नाही नात्यात. नवरा-बायकोचं नातं तर अतिशय फूलकोमल. पूर्वी लहान वयात लग्नं व्हायची. मुलगी सासरच्या साच्यात मोल्ड होऊन जायची. त्यांच्या रंगात रंगून जायची. आज विचारांनी, मनाने आणि मेंदूने परिपक्व झालेली दोन माणसं लग्न करून एक होतात. त्यांना एकमेकांशी जुळवून घेणं अधिक कौशल्याचे असते. पण याच परिपक्वतेमुळे ते जमणे सहज सोपेही होऊ शकते.

आपल्याकडे लग्नाचं जे वय आहे, त्या वयात कुठल्याही मुलीला/मुलाला माणूस ओळखण्याची अक्कल आलेली नसते. ती मुलं शिक्षण घेऊन त्यांच्या विद्येत पारंगत, शहाणी झालेली असतात. पण त्यांनी जग बघितलेलं नसतं. ठरवलेली लग्नं तर कौटुंबिक हुकुमशाहीचा कळस असतात. माणसाच्या स्वतंत्र बुद्धी आणि विचारांवर तो सरळसरळ प्रहार असतो. चांगल्या शिकल्यासावरल्या मुलामुलींना हे कळत नाही ही शोकांतिका आहे. समाजाला जबरदस्तीने एक झापड लावायचं आणि मग म्हणायचं, बघा आमची संस्कृती किती भारी आहे, कसे एका रांगेत चालतायत बघा सगळे बैल. ठरवलेलं लग्न मुला-मुलीचं लग्न नसतं. दोन कुटुंबांचं लग्न असतं. अगदी मुलीला निवडीचे ‘तथाकथित’ स्वातंत्र्य देणारे आई-वडीलही, “बघ बाई, आम्हाला असं वाटतं की हे स्थळ हातचं जाऊ नये, नकार देण्यासारखे काहीही नाहीये त्याच्यात..” असा नैतिक दबाव आणत असतात. त्यात एक मेख मारतात, “तरीही तू म्हणशील तसं,”.. मुलीला आपला बाप म्हणजे बृहस्पती आणि आई म्हणजे गार्गी-मैत्रेयी वाटत असतात. आणि मग होऊन जातं लग्न. ही लग्नं सुरु ठेवण्यासाठी बुद्धिमान माणसाला कसरती कराव्या लागतात आणि सामान्य बुद्धीच्या माणसाला मर्कटलीला कराव्या लागतात.

मी हा लेख लिहिणे अक्षरश: दोन वर्षं टाळलं आहे. कारण, पती-पत्नी नात्यात त्यांचे कामजीवन अतिशय कळीची भूमिका करत असतं हे मुळातच सगळ्यांना मान्य होण्यासारखे नाही. आपल्याकडे आदर्शवादाचा झेंडा खांद्यावर घेऊन, तो झेपला नाही तर, तोंडघशी पडणारे महाभागच जास्त. भावनिक क्षेत्रातल्या आदर्शवादाने तर माणसाचा पार खुळा खुळखुळा करून टाकलाय. ज्या भावना नैसर्गिक आहेत, त्या आम्हालाही होतात, हे सांगायला पण माणसं कचरतात. हा विषय उचकीसारखा माझ्या घशात अडकला होता. कुठलेही आवेग थांबवता येतात, उचकी थांबवता येत नाही. ती थांबवायची असेल तर श्वास रोखून धरावा लागतो. ज्यासाठी श्वास पणाला लावावा लागतो, ते विषय संपवून श्वास जपावा या हेतूने मी हा लेख लिहून काढलाय.

जोपर्यंत कामजीवन हे अतिशय महत्त्वाचे आहे, तुमचे शारीरिक स्वास्थ्य ठीक असेल तर कुठल्याही वयात ते निषिद्ध नाही, सेक्स हा नुसता उपभोग देण्याचा आणि उपभोग घेण्याचा प्रकार नसून ती एक आर्ट आहे, तसंच ते सायन्स देखील आहे, त्यात एक कुणीतरी ‘घेणारा’ आणि दुसरी कुणीतरी ‘देणारी’ नसून दोघं सुखाची देवाणघेवाण करत असतात, हे जोपर्यंत तमाम लोकांच्या गळी उतरत नाही तोपर्यंत हा विषय समाजाच्या तळाशी गुपचूप धुमसत राहणार.

मी विचार करते. ते मांडते. ते प्रत्येकाला मान्य असावेत असा माझा आग्रह कधीच नसतो. आजही नाही. तसेच मी कौन्सिलर नाही. तुम्हाला माझा लेख आवडला असेल तर मी आभारी आहे. नसेल आवडला तरी सिर आंखों पे! पण मला फोन करून आणि मेल पाठवून माझा आणि स्वत:चा अमूल्य वेळ वाया घालवू नये ही हात जोडून नम्र विनंती! जे काही लिहायचे असेल ते इथल्याच कमेंट बॉक्समधे लिहा, मी यथावकाश सगळ्यांची नोंद घेईनच.

(लेखिका नामवंत पटकथाकार आणि संवाद लेखिका आहेत)

ज्या वाचकांनी ‘स्त्री–पुरुष (विवाहबाह्य) संबंध’ या विषयावर मिथिला सुभाष यांनी लिहिलेला पहिला भाग अद्याप वाचला नाही त्यांच्यासाठी तो उपलब्ध करून देत आहोत. कृपया समोरील लिंकवर क्लिक करा http://bit.ly/2TuYWFm

Previous articleमुन्नार: किंग ऑफ हिल स्टेशन
Next articleकोयाळी सास्ते: काळजात घर करून असलेलं गाव
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.