कोयाळी सास्ते: काळजात घर करून असलेलं गाव

– ललितकुमार वऱ्हाडे

@कोयाळी सास्ते-पंचायत समिती मेहकर, जिल्हा बुलढाणा- ऑक्टोबर २००१ ला मेहकर पंचायत समितीमधे प्राथमिक शिक्षण सेवक म्हणून नोकरीला लागलो. घरून शाळेवर ये जा करता येईल असं गाव मिळावं, ही अपेक्षा होती.रिक्त जागांची शोधाशोध सुरु होती. डोळ्यासमोर एकच गाव होतं असं होतं की, जे माझ्या देऊळगाव-माळी या गावापासून जवळ म्हणता येईल. ते गाव म्हणजे-कोयाळी सास्ते.

गावापासून अंदाजे पाच कि.मी. पण माझे गावापासून तिथपर्यंत थेट रस्ता नव्हता. बसने किंवा इतर साधनाने जायचे झालं तर ते अंतर १८ किमी होतं. मुख्यमार्गापासून आतमधे असणाऱ्या या गावाला जायला तसं कोणी तयारही नव्हतं..

घरातील मंडळी , मित्र व पंचायत समितीमध्येही कोणीही, हे गाव निवड असे मला म्हटले नाही.. उलट ते गाव अजिबात घेऊ नकोस असाच सल्ला  प्रत्येकाने दिला. त्यावेळी आमच्या गावचे पं.स. सदस्य होते.  त्यांनी पण हेच सांगितले की, दुसरे गाव घे .

सगळ्यांचा सल्ला ऐकला. सर्वबाजूंनी विचार केला आणि  शेवटी विचार पक्का केला . गटशिक्षणाधिकारी साहेबांना जावून भेटलो व मला कोयाळी सास्ते हे गाव द्या, असं सांगून टाकलं..

१३ऑक्टोबर २००१ शनिवार होता. सकाळची शाळा. मी सकाळी सहा वाजता गावातून निघालो.कोयाळीचा रस्ता माहीत नसल्याने आमचे गावातील कोयाळी शिवारात शेती असणारे वडिलांचे,काकांचे स्नेही श्री.दत्ता गिऱ्हे(महाराज) हे माझ्यासोबत आले. शाळेच्या रस्त्याने येणारे ते पहिले सोबती. त्यानंतर तिथं शेत असणारे श्री.उद्धव काका गिऱ्हे व गिऱ्हे परिवारातील इतर सदस्य  माझे शाळकरी मित्र झाले म्हणा की…एका अर्थाने शाळेत सोबत जाणारे मित्र म्हणजे शाळकरी मित्र…

गावाच्या विठ्ठल मंदिराचे मागून जाणाऱ्या रस्त्याने पुढं आलं की गावाची नदी (लेंडी म्हणतात तिला)ओलांडून समोर जायचं. कच्चा गिट्टीचा थर असणारा रस्ता चालत गेलं की पुढं दोन  कि.मी वर सुभानपूर नावाचं छोटंस गावं. ह्या गावाच्या पुढं कच्चा रस्ता पण नाही. मग पुढं सरळ शेताच्या धुऱ्यावरुन जाणारा बैलगाडी रस्ता. मग त्या शेतरस्त्याने चालत चालत पुढं दोन किमी. आलो की मेहकरवरुन मोहदरीला येणारा पक्का डांबरी रस्ता लागतो. तिथून एक किमीवर कोयाळी सास्ते हे गाव. नव्वद -शंभर घरांच जेमतेम ४५० लोकसंख्या असणार हे गाव. शेती व शेतमजुरी करणाऱ्या माणसांच गाव. या गावात सास्ते आडनावाचे बरेच जण राहतात.. म्हणून गावाच नाव -कोयाळी सास्ते..

सकाळी सात वाजता शाळेत पोहचलो. शिक्षक श्री.विष्णू लोढे(भाऊसाहेब) यांनी हसून स्वागत केलं.सहजासहजी न भरणारी जागा माझ्या रुपात भरली गेल्याने भाऊसाहेब खुश  होते. एक ते चार वर्ग व आम्ही दोन शिक्षक. माझेकडे पहिला व तिसरा वर्ग . सरांकडे दुसरा व चौथा..

हळूहळू गावकऱ्यांची ओळख होतं गेली. मी रोज देऊळगाव माळी ते कोयाळी पायी ये -जा करायचो. पाच किमी अंतर कापायला एक तास लागत असे..सकाळी ९.१५ ला घरुन निघालो की १०.१५ ला शाळेत. पावसाळ्यात थोडी फजिती व्हायची. गावच्या नदीला पाणी असले की अलीकडे फुलपैंट काढून कापडी पिशवीत ठेवायचा व अंडरपैटवर नदी ओलांडायची. पलिकडच्या काठावर फुलपैंट चढवला की पुन्हा निघायचे. सुभानपूरचे पुढं शेतरस्त्यामुळे पायातला बुट चिखलात फसत असे. म्हणून बुट काढून परत हातातल्या कैरीबैगमधे टाकला की मस्त चिखल तुडवत रपरप चालता यायचं.

पावसाळ्यात कधीकधी वाटे की. खरंच आपण हे गाव घ्यायला नको होतं. मात्र आजूबाजूला शेतात रोजच येणारी मंडळी बघितली, त्यांचे हसरे चेहरे बघितले की हुरुप यायचा.  व निराशा पार खाली चिखलात तुडविली जायची. नंतरच्या वर्षी पावसाळा संपला की दुसऱ्या सत्राच्या शाळेत सायकलने यायला सुरुवात केली. बैलगाडी रस्त्याने ये जा केल्यामुळे सगळ्या पैंटला गाडीच्या काळ्या वंगणाचे डाग लागायचे..पुढं तीन हजारात बाबांच्या मित्रांच्या मुलीची जुनी लूना घेतली.मग त्यानं ये-जा सुरु झाली. लुनाच्या गमतीजमती लई आहेत पण त्या नंतर कधीतरी.

पुढं शिक्षणसेवक पदाचा कालावधी पूर्ण झाल्यावर पूर्ण पगार मिळायला लागला . तोपर्यंत बी . ए पदवी पण प्राप्त झाली होती. मग मेहकरला राहून एमपीएससीचा अभ्यास करायचं ठरवलं. तिथं मित्रांसोबत रुम केली.  थेट गाडी  एखादीच असल्याने तिथून कोयाळी येणं पण जरा अवघडच होतं..रुमपासून चायगांव,कोयाळीचा ऑटोरिक्षा लागे तो पॉइंट जवळपास तीन किमी होता. मिळाली कोणाची गाडी तर ठीक, नाही तर पायी यायचं आणि चायगांवपर्यंत ऑटो मिळाला तर पुढं एक किमी पायी परत कोयाळीला जायचं…असं सुरु केलं.

२००१ ते २००९ असे आठ वर्षे मी या गावात शिक्षक होतो..सुरुवातीला कोणी म्हणायचे गाव लई डेंजर आहे, बारा भानगडीचं आहे.कोणी सांगे मुंबईचं पिल्लू आहे हे गाव. त्यामुळे मी जरा सावधच सुरुवात केली होती. हळूहळू ओळख वाढत गेली..माझे आजोबा या गावात पूर्वी भांड्यांवर व काचावर नावं टाकायला यायचे. लोखंडी पोगराने व हतोड्याने नाव टाकण्यात त्यांचा हातखंडा. एकतारा व चिपळा घेऊन भजनं म्हणायचे. त्यांचा नातू नारायण कसाराचा नातू (ते पंचक्रोशीत सादूबा म्हणून प्रसिद्ध होते) म्हणून मला गावातील ज्येष्ठ मंडळी माझ्याशी चांगलं बोलायला लागली. मोकळ्या मनाने वागू लागली. त्यामुळे माझा पण धीर वाढला . हळूहळू शिस्तबद्ध वागणं,बोलणं,शिकवणं त्यामुळे सगळ्यांशी स्नेह वाढला. लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात आपण डोकावलो नाही व आपलं काम नीट केलं की लोकं जवळ करतात, हे माझ्या वडिलांचे  सांगणे मी तंतोतंत पाळत गेलो व मी कोयाळीचा होत गेलो. गावात नोकरीवाले एकदोघेच. मग पारावर बसणाऱ्या बेरोजगार गैंगला मी मित्र बनवलं .त्यांना नोकरीचं, अभ्यासाचं महत्त्व सांगत गेलो.

माझ्या एमपीएससीच्या अभ्यासामुळे पुढे मला काही रजा घ्याव्या लागल्या तेव्हा याच गैंगमधील काही जणांनी माझे गैरहजेरीत मुलांना शिकविण्याचे काम केले..या गावानं माझ्यावर भरभरून प्रेम केलं..कधी काही चुकलं असेल ,तर ती चूकही पोटात घेतली.

माझी उपजिल्हाधिकारी म्हणून जेव्हा निवड झाली ,तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद होता. सोबतच मी हे गाव सोडून जाणार म्हणून होणारं दुःख त्यांच्या डोळ्यात तरळत होतं . मला आज एवढ्या वर्षानंतरही ते दृश्य जसंच्या तसं नजरेसमोर दिसतयं. माझा निरोप समारंभ एकदम जंगी होता..प्रत्येक कुटुंबाने फुल ना फुलाची पाकळी जमा करुन गाव जेवण दिलं. माझे आई,वडिलांना व मला कपड्यांचा आहेर करण्यात आला . गावातल्या सगळ्या ४५० लोकांनी पुढं येऊन मला गुलाबफुल देऊन माझं अभिनंदन केलं. गावच्या पोराचा निरोप कसा शाही थाटात असतो हे इथल्या प्रत्येकानेच अगदी मजुरी करणाऱ्या माणसानंही दाखवून दिलं..

त्यामुळेच कोयाळी सास्ते या गावाचा तो स्नेह मी हृदयाच्या आतील कप्प्यात जपून ठेवलायं. आता कामाच्या व्यस्ततेमुळे  गावाकडे जास्त जाता येत नसलं तरी मी नियमित  खबरबात घेत असतो. दिवाळीत कधीतरी धावती का होईना,  गावात भेट नक्की देतो . त्या भेटीमुळे मला  जेवढं समाधान मिळते, त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद आणि अभिमान गावकऱ्यांना वाटतो. मी ज्या मुलांना शिकविले त्यापैकी बरीच मुलं आता नोकरीला लागलीत. मुलींची लग्ने झालीत. काही मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करताहेत. गावाच्या अंगणवाडीत त्यांनी अभ्यासिका सुरु केली आहे.काही जण शेतीतच रमलेत.  मागं वळून पाहिलं की काळ किती वेगानं पुढं जातो, हे लक्षात येतं. प्रत्येकवेळी कोयाळी सोडतांना मन जड होतं.

या दिवाळीत कोयाळीला धावती भेट दिली. गावातून चक्कर मारली.  सगळ्यांसोबत बोललो. शाळेत गेलो. पोरं मोहळासारखी चिपकली होती. गावातील बरीच मंडळी सोबत होते. त्यांच्यासोबत फोटो काढलेत. कोणीही सोडायला तयारच नव्हते. मुलांचा आणि गावकऱ्यांचा स्नेह पाहून गदगद झालो.

गावाचा निरोप घेताना विचार आला – कोणतेही गाव चांगलं  किंवा वाईट असत नाही. आपण कसं आहोत, याचं ते प्रतिबिंब असतं. कोयाळीच्या अनुभवातून मी हे शिकलोय.

(लेखक यवतमाळचे निवासी जिल्हाधिकारी आहेत)

9822730412

Previous articleस्त्री-पुरुष संबंध (उत्तरार्ध)- पती-पत्नी नाते
Next articleढिम्म साहित्य-संस्कृती मंडळ आणि अशोक चव्हाणांचं अगत्य !
Team Media Watch
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here