मालदीव:डोळ्याचे पारणे फेडणारा नितांतसुंदर देश

-राकेश साळुंखे

मालदीव पर्यटकांची पंढरी असली तरी काही येथे कायदे-कानून पाळणे पर्यटकांसाठी अनिवार्य आहे. मागील लेखात मी त्याचा उल्लेख केला होता. थोडे सविस्तर सांगू इच्छितो. जेणेकरुन तुमचे पर्यटन आनंदी व संस्मरणीय होईल. काही लोकांना पर्यटन म्हणजे मस्त नशाबाजी, दंगा, मोठ्या आवाजात गाणी असे वाटते. पण येथे थोडे सावध रहा. हे मुस्लिम राष्ट्र असल्याने त्यांच्या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी दारु पिण्यास तसेच दारुच्या बाटल्या  बाळगण्यास बंदी आहे. रिसॉर्टमधे मात्र दारुला बंदी नाही. पोशाखाबद्दल पण मी सांगितले आहे. त्यामध्ये तुम्ही पोहण्याचा पोशाख(बिकिनी) रिसॉर्ट परिसरात वापरू शकता. कोणत्याही प्रकारचे शंख-शिंपले, प्रवाळ (कोरल्स) ,वाळू जवळ बाळगणे हा या देशात गुन्हा मानला जातो. तुम्हाला बऱ्याच ठिकाणी हे सर्व विक्रीसाठी ठेवलेले आढळेल. परंतु तुम्ही ते विकत घेण्याचा मोह टाळा. कारण, हे सर्व तुम्ही तुमच्या देशात न्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला अटक होऊ शकते. तसेच तुमच्या कडून मोठा दंड वसूल केला जातो. मात्र तुमच्या स्वतः साठी अगदी थोडी वाळू तुम्ही Soveneir म्हणून विमानतळावरुन घेऊ शकता.

   पाण्याविषयी अजून थोडे सांगू इच्छितो.पाणी इथे किंमती आहेच.पण पाण्याचे खरे मोल येथे गेल्यावरच आपल्याला कळते. येथे समुद्राच्या पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरात आणले जाते. परंतु प्रक्रिया केलेले पाणी जास्त महाग पडते. सार्वजनिक नळाला येणारे पाणी हे पावसाच्या पाण्यावर प्रक्रिया करून येत असल्याने त्याची चव तितकीशी चांगली नसते.त्यामुळे ते आपण पिऊ शकत नाही. सर्व रिसॉर्ट मधून Purified Drinking Water दिले जाते. रोज 2 bottles आपल्याला Complimentary मिळतात. त्यापेक्षा जास्त bottles हव्या असतील तर त्या विकत घ्याव्या लागतात. साधारणपणे 7-8 डॉलरला 1 bottle मिळते. म्हणजे 500-550 रुपयाला एक लिटर पाणी. पाण्यावरून तिथे घडलेला एक गमतीदार किस्सा आठवला. आमच्या रिसॉर्टमध्ये रोज सकाळी 2 bottles रुम बाहेर ठेवल्या जात. एकदा सकाळी पोर्चमध्ये चाललेला गोंधळ ऐकून बाहेर आलो, तर आमच्याच ग्रुपमधील एक मध्यमवयीन स्त्री व तिची मुलगी त्यांच्या पाण्याच्या bottles गायब झाल्याने स्टाफवर ओरडत होत्या. नंतर त्या रिसेप्शनमधे जाऊनही भांडल्या. त्यांना  bottles मिळाल्यानंतरच त्या शांत बसल्या.पाण्यासाठी हाँटेलमध्ये भांडण मी प्रथमच पहात होतो.’पाणी हे जीवन’ आहे, असे का म्हणतात ते उमगले.

  मालदीव मधे स्टेट बँकेची सेवा उपलब्ध आहे.SBI ची प्रमुख शाखा ‘माले’ मध्ये  आहे. त्यांचे प्रतिनिधी आठवड्यातून एकदा प्रत्येक बेटावर भेट देतात. मलाही त्यांचा एक प्रतिनिधी भेटला होता. इतक्या सुंदर देशात तो राहतो याचे मला अप्रुप वाटले. त्याच्या बोलण्यात मात्र घरची ओढ जाणवली. तिथे गेल्याबरोबर एक काम करा.लगोलग सीम कार्ड खरेदी करा. कारण येथे रोमिंग अतिशय महाग पडते व दुसरे असे की हे नवीन कार्ड घेतल्यानंतर 15 मिनिटांत Active होऊन कामाला लागते. म्हणजे आपण जगभराशी लगेच जोडले जातो. इंटरनेटची रेंज जबरदस्त आहे. समुद्रामध्ये तसेच विमानात ठराविक उंचीपर्यंत ती साथ सोडत नाही. आपण विमानातून मालदीव बेटांचे विहंगम दृश्य मोबाइल कॅमेरामधे घेऊन लगेच फेसबुक व व्हाट्सएप वर शेअर करू शकतो.

मी पहिल्या लेखात तिथल्या रिसॉर्ट विषयी सांगितले आहे. परंतु थोडे जास्त पैसे खर्च करणाऱ्यांसाठी तेथे आणखी काही पर्याय आहेत. त्यातील एक म्हणजे Water villa/ Water banglow. यांचे एका रात्रीचे टेरिफ साधारणपणे 300-1000$असते. ही ठिकाणे Super luxurious असतात.Relaxation, privacy तसेंच Amazing view साठी ती प्रसिद्ध आहेत. येथे जगातील पहिले Under Water Restaurant ‘ इथा’ (Ithaa) बांधले गेले. ‘इथा’ चा  अर्थ दिवेई भाषेत Mother of Pearl असा होतो. हे 5मीटर पाण्याखाली आहे. रात्री च्या जेवणासाठी 390$ आणि दुपारच्या जेवणासाठी 238$ साधारणपणे आकारले जातात. येथे आता अशी सहा Restaurants येथे आहेत. उच्च दर्जाची सेवा आणि अन्नपदार्थ यासाठी ही रेस्तराँ प्रसिद्ध आहेत.प्रत्येक रेस्तराँचे रेटस् वेगवेगळे आहेत. धनाढ्य लोक येथे खाजगी कार्यक्रम, विवाह समारंभ साजरे करतात.

हे वाचायला विसरू नका-मालदीव: पृथ्वीला पडलेले निळेशार स्वप्न-https://bit.ly/2WLWZXX

  मालदीवच्या समुद्राचा रंग  डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. थोडी माहिती घेतली असता मला कळाले की येथे पाण्याचा जो रंग आपल्याला दिसतो त्याला याठिकाणी उपलब्ध असणारे सूक्ष्म जीवाणू(plankton) हे कारणीभूत ठरतात. ते सूर्य प्रकाश शोषून घेतात व पुन्हा तो परावर्तित करतात, त्यामुळे पाण्याला निळा रंग येतो.रात्रीच्या वेळी आणखी एक आश्चर्य पहायला मिळते. आकाशगंगा तर मोहवून टाकतेच शिवाय समुद्रात अचानक प्रकाशाची जा ये होते. खूप वेळ चाललेला हा खेळ एका जागी खिळवून ठेवण्यास पुरेसा असतो. समुद्र उजळून टाकणारे दृश्य हे वाचण्यापेक्षा अनुभवणे जास्त रोमांचकारी ठरेल.

 राजधानी ‘माले’ हे शहर पाहण्यातही  गंमत आहे. मशिदी, रंगीबेरंगी इमारती या बरोबरच येथील मच्छिबाजारही प्रेक्षणीय आहे. आश्चर्य वाटले ना! पण मच्छिबाजार स्वच्छ, अनेक प्रकारचे मासे,भाजा, फ़ळे यांनी भरलेला पहायला मिळतो. संपूर्ण देशभरातून आलेल्या मच्छिमारांची मासे विक्री व  नवीन आलेले मासे उतरून घेण्यासाठी चाललेली लगबग पाहण्यासारखी असते. या बाजाराची खास सहल आयोजित केली जाते. फक्त दुपारच्या नंतरच हा देखावा आपण अनुभवू शकतो.

(लेखक ‘लोकायत’ प्रकाशनाचे संचालक आहेत)

84849 77899

Maldives- By Rakesh Salunkhe– हा Video पाहायला विसरू नका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here