‘रामप्रसाद की तेरहवीं’: मनोरंजनाच्या पलीकडे जाणीवेपर्यंत नेऊन ठेवणारा चित्रपट

©सानिया भालेराव

‘रामप्रसाद की तेरहवीं’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि खूप तो खूप कारणांसाठी स्पेशल आहे. एकतर स्वतः उत्तम अभिनय करणाऱ्या अत्यंत ताकदीच्या अभिनेत्री सीमा पाहवा यांनी दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट. दुसरं म्हणजे मनोज पाहवा, विनय पाठक,निनाद कामत, परमब्रत चट्टोपाध्याय, सादिया सिद्दकी, ब्रिजेंद्र काला, राजेंद्र गुप्ता, विनीत कुमार, कोंकणा सेन शर्मा, विक्रांत मैसी, दीपिका अमीन, सुप्रिया पाठक आणि नसीरुद्दीन शाह अशी तगडी स्टारकास्ट. या सगळ्यांना एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणं म्हणजे..आपले सगळे आवडते लज्जतदार पदार्थ बुफेमध्ये मांडलेले असणं आणि पहिले काय चाखावं, असा आपल्याला प्रश्न पडणं असं काहीसं आहे.

तर सगळ्यात आधी हे स्पष्टपणे सांगायला हवं की हे चित्रपटांचं परीक्षण नाहीये. मला आवडलं म्हणजे तुम्हाला आवडेल असं नाही. स्पेशली हा चित्रपट आणि याचा जॉनर हा फार एक्सक्लुजिव्ह आहे. जर तुम्हाला स्लो बर्न मुव्हीज आवडत असतील, विशेष करून मानवी नात्यांसंबंधित हळुवार भाष्य करणाऱ्या आणि चित्रपटाअंती कोणत्याही खास अशा कन्क्ल्युजनवर न पोहोचणाऱ्या, आपल्या खऱ्या खुऱ्या आयुष्याप्रमाणे ज्या मुव्हीज प्रवाही असतात आणि काहीशा साचलेल्या सुद्धा… अशा मुव्हीज जर तुम्हाला आवडत असतील तर चित्रपट नक्कीच तुमच्यासाठी आहे. अदरवाईज, हा पिक्चर पचणार नाही. अन्यथा, मी जेव्हा चित्रपटगृहात हा चित्रपट बघत होते,तेव्हा माझ्या पुढच्या रो मध्ये बसलेल्या दोन तरुणांप्रमाणे “क्या बकवास मुव्ही है यार” असं म्हणत चित्रपटभर एकतर एकेमकांशी बोलत अन्यथा आपल्या मोबाईलवर किडे करत तुम्ही स्वतःचा आणि ज्यांना हा चित्रपट खरोखर आवडला आहे अशा लोकांचा विनाकारण वेळ वाया घालवाल.

चित्रपटाची गोष्ट मी उलगडून दाखवणार नाहीये, पण गंमत ही की मी ती सांगितली तरीही स्पॉयलर होणार नाहीये कारण जिथे शब्द खुंटतात त्याच्यापुढे अनुभूती सुरु होते आणि हा संपूर्ण चित्रपट आहे अनुभूतीचा. रामप्रसाद जेव्हा मरण पावतात तेव्हा त्यांचं भलं मोठं कुटुंब त्यांच्या मूळ घरी एकत्र येतं आणि दिग्दर्शक अत्यंत प्रभावीपणे या कुटुंबातल्या डिस्फन्क्शनॅलिटीचे पापुद्रे उलगडून दाखवायला सुरवात करतात. चित्रपटभर एक अत्यंत डिस्टिंक्ट मेलनकॉलीक फील आपण अनुभवत राहतो.. काही प्रसंगी आपल्या आयुष्यातले प्रसंग समोर चालले आहेत असं सुद्धा वाटतं. कितीही नाही म्हटलं तरीही शेवटी कुटुंब, नाती ही सगळीकडे सारखीच असतात. भावजयांमधले हेवेदावे, भावांमधली विस्कटलेली वीण, बहिणीचं वाटणं, नणंद – भावजयी यांच्यामधले चढ उतार अशा अनेक बारीकसारीक गोष्टी या चित्रपटात फार कमालीच्या सहजतेने दाखवल्या आहेत. वडील गेल्यावर आपला बाप कसा होता यावर बोलणारे मुलं, स्वतःच्या आईबद्दल प्रखरपणे बोलणारी मुलगी.. मला नाही वाटत इतक्या प्रांजळपणे आणि इतक्या ऑरगॅनिकली आजवर हिंदी चित्रपटांमध्ये मेलेल्या बापाबद्दल आणि मागे उरलेल्या आईबद्दल त्यांची पोरं असं बोलतांना दाखवलं आहे.. एकतर आपल्याकडे ‘बागबान’ टाईप श्रावण बाळ तरी दाखवतात नाहीतर मग सोडलं आहे आई वडिलांना मारायला टाईप’ असं दुसरं टोकतरी दाखवतात.. या दोन टोकांच्यामध्ये झुलणारे ९० टक्के पोरं – पोरी ज्यांना ममत्व आहे, वाटतं आहे पण स्वतःच्या स्वार्थापुढे, त्रिकोणी कुटुंबापुढे कदाचित बघावंसं वाटत नाहीये, ज्यांनी स्वतःची काहीबाही सांगून समजूत काढली आहे की मी एक चांगला मुलगा/ मुलगी आहे अशा ९० टक्के मुलांना रिप्रेझेंट करणारी ही गोष्ट आहे.

माणूस जाणं म्हणजे काय असतं नक्की? तो गेल्यानंतर तेरा दिवस सुतक पाळणं, सगळे विधी करणं ( उरकणं) आणि यात आजूबाजूच्यांची असेलली आणि नसलेली भावनिक गुंतवणूक यावर हा चित्रपट अत्यंत सटली भाष्य करतो. माणूस गेल्यानंतरचे सगळे विधी मला कायम अनाठायी वाटत आले आहेत. जाणारा जातो पण खरं मरण अनुभवतो जो मागे उरतो तो! खऱ्या सुटकेची गरज असते ती उरलेल्या माणसाला. शांती त्याला लाभायला हवी. कारण माणूस गेल्यानंतर इतरांचे जे रंग दिसायला लागतात ते पाहून आपण मेलो असतो तर बेहत्तर असं वाटू शकतं. प्रॉपर्टी, पैसा त्यावरून कुटूंबात होणारं राजकारण हे कोणालाही चुकलं नाहीये. नाती ही खरंतर ट्रांझॅक्शनल असतात. त्यात आपण खून के रिश्ते वगैरे म्हणून उगाच रंग बिंग चढवत असतो. एकदा का माणूस गेला की काही काळ वाईट वाटतं. पण जगण्याची इच्छा इतकी उपजत असते माणसामध्ये की दुःखाने थोडं देखील गुदमरायला झालं तरी तो मुंडी बाहेर काढण्यासाठी तडफड करतो आणि त्याचं तसं करणं हे नैसर्गिक असतं. आपलं कोणी गेलयावर निदान त्याचं तेरावं होईस्तोवर स्वतःच इगो, हेवेदावे, स्वार्थ बाजूला ठेऊ न शकणारे आपण सगळे जणं.. ही गोष्ट आपल्या अप्पलपोटेपणाची आहे आणि म्हणूनच तो टोचते, काही ठिकाणी हसवते आणि रडवते सुद्धा! चित्रपटात भावलेल्या अजून असंख्य गोष्टी आहे पण त्याची मजा प्रत्यक्ष्य पाहून अनुभण्यामध्ये आहे म्हणून अजून जास्त लिहिणार नाहीये त्याबद्दल!

‘एक अधुरा काम है’ हे गाणं फार सुरेख जमून आलं आहे. सुप्रिया पाठक यांनी विशेष काही न बोलतां केवळ त्यांच्या डोळ्यातून दाखवलेले भाव अवर्णनीय आहे. सगळेच जणं अभिनयातले बाप माणूस आहेत पण मनोज पहावा यांनी साकारलेला मोठा भाऊ, विनय पाठक यांचा मधला भाऊ आणि निदान कामत यांनी साकारलेला भावाचं करेक्टर झकास. अभिनेता मुळातच स्वतःच्या अभिनयाबाबत सिक्युअर असला की मी किती ग्रेट असं म्हणून त्याला वेगळी ऍक्टिंग करावी लागत नाही याउलट आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कित्येकदा अंडरप्ले करावं लागतं आणि हे या चित्रपटात फार सुरेखरीत्या जमून आलं आहे. निनाद कामत, ब्रिजेंद्र काला आणि मामाजी म्हणजे विनीत कुमार यांनी त्यांच्या भूमिकेला दिलेला अंडरटोन वाखाणण्या जोगा आहे. रामप्रसाद म्हणतात तसं की आयुष्यातले सूर सात आहेत. एकदा का आपला सूर आपल्याला सापडला की सगळं आयुष्य मग लयबद्ध आणि सुरेल होऊन जातं.. विचार करून बघा.. लाख मोलाची गोष्ट आहे ही..

माणूस मेल्यानंतर करण्यात येणाऱ्या दहन विधींभोवती सिनेमा फिरवणं ही तशी मनहूस गोष्ट नाही का? सीमा पहावा यांचं खरंतर अभिनंदन करायला पाहिजे कारण यानिमित्ताने त्यांनी कित्येक गोष्टींमधला फोलपणा दाखवला आहे आणि हे मुद्दामून केलेलं नाहीये आणि म्हणून ते अधिक खोलवर रुततं. सॉरी आणि थँक यू हे जगातले दोन अत्यंत महत्वाचे शब्द आहेत आणि या चित्रपटाचं सार काही असेल तर ते म्हणजे ग्रेटफूल राहणं, आपलं वाटणं दुसऱ्यापर्यंत पोहोचवणं, जीवनाच्या धबडग्यात उद्या करू असं म्हणून आपण आपली जिवाभावाची नातीच बॅकसीटला टाकून जगभर फिरत राहतो, सो या नात्यांना फॉर ग्रँटेड न घेणं, आपलं माणूस दूर जात असेल तर आपला इगोचा डोंगर सर करून त्याला जवळ करणं आणि वास्तव काय आहे याची जाणीव असणं… या आणि अशा कित्येक गोष्टी हा चित्रपट रिअलाईज करून देतो आणि हे या चित्रपटाचं श्रेय आहे. एकतर हे असे सोलफूल चित्रपट आपल्याकडे फार रेअरली बनतात. त्यातही अभिनय क्षेत्रातले हिरे एकाच ठिकाणी बघायला मिळणं म्हणजे जन्नत.

या चित्रपटातला ह्युमर सुद्धा इतका खतरनाक आहे की बुडाला टोचतंय पण हसू येतंय अशी अवस्था होते काही ठिकाणी.. हे असं पहिल्याच दिग्दर्शनात जमणं कमाल आहे. हा चित्रपट आवर्जून पाहायला हवा. एकतर कोव्हीड नंतर चित्रपटगृहात आलेला हा पहिला चित्रपट आहे. असे चांगले चित्रपट मोठ्या पडद्यावर आणताना काय दमछाक होते आपल्या सारख्या सामान्य माणसांना माहिती सुद्धा नसतं. चांगला प्रोड्युसर मिळण्यापासून ते कमीत कमी बजेटमध्ये मॅक्सिमम आउटपुट देणं यासाठी करावं लागणारं जीवाचं रान काय असतं हे आपल्याला कळणार सुद्धा नाहीये. हे असे चित्रपट हाऊसफुल होऊन या चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाच्या खिशात मावणार नाही इतका पैसा पडायला पाहिजे असं माझ्यामधल्या फिल्मी किड्याला वाटत राहतं. या सर्व लोकांचं त्यांच्या क्राफ्टवर असणारं प्रेम या चित्रटातून माझ्यापर्यंत झिरपलं हे मात्र नक्की. आज सकाळी मी हा चित्रपट दुसऱ्यांदा पाहून आले. मी एकटी होते पण चार तिकिटं विकत घेतली. माझ्या स्वार्थासाठी.. लोक का नाही येत असे चित्रपट पाहिला या गिल्टमधून मोकळं होण्यासाठी कदाचित हा माझा दयनीय प्रयत्न असावा किंवा सीमा पहावा यांना आणि या चित्रपटात काम करणाऱ्या सगळ्यांना चांगल्या चित्रपटांकडे पाठ फिरवणऱ्या ऑडियन्स तर्फे सॉरी म्हणण्याचा केविलवाणा प्रयत्न असावा.

“पर कुछ भी हो सीमाजी, मुझे यकीन है के अगर एखाद तार टुट भी गया होगा, तो हम लोग वो जोड़ पाएंगे और फिर साज अधूरी नहीं रहेगी… वो बेहद सुरीली होगी, आपकी इस पिक्चर कि तरह! जाते जाते आपको और इस मूव्हीसे जुड़े सभी लोगोंको “थॅंक यू” कहना चाहूंगी, मुझे एहसास दिला ने के लिए के शायद मुझे मेरे सुर मिल गए है, किसी और को वो समझ आए ना आए, मेरे लिए मेरी सरगम पूरी है और सुरीली भी!”

सो मंडळी, एखादा सूर खाली वर झाला असेल, किंवा रुसून बसला असेल तर वेळ काढून जा चित्रपट बघाच. मनोरंजनाच्या पलीकडे जाणीवांपर्यंत नेऊन ठेवणारे हे चित्रपट जेम असतात. न चुकवावे असे… तुमचे सूर तुम्हाला गवसो.. सरगम पूर्ण होवो… Cheers to finding a tune on which a soul can sing and dance..Cheers to life and to death as well!

ढूँडने वाले ग़लत-फ़हमी मैं थे

वो अना के साथ अपने सुर में था….

– नुसरत ग्वालियारी

(लेखिका संशोधिका असून पाणी प्रदूषण या विषयात काम करतात . त्यांची स्वतःची पर्यावरणपूरक उत्पादने तयार करणारी ‘इकोसोल’ नावाची कंपनी आहे) [email protected]

Ram Prasad ki Tehrvi | Official Trailer

 

Previous articleमालदीव:डोळ्याचे पारणे फेडणारा नितांतसुंदर देश
Next articleमुजऱ्याच्या पाऊलखुणा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.