वणीत भाऊसाहेब शेवाळकर व्यासपीठाचे लोकार्पण

प्रख्यात साहित्यिक व वक्ते राम शेवाळकर यांचे यवतमाळ जिल्ह्यातील वणी या छोट्या गावात २५ वर्ष वास्तव्य होते . या कालावधीत त्यांनी या गावात नानाविध साहित्यिक , सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते . तेव्हापासून ‘विदर्भाचे पुणे’ अशी ओळख या शहराला लाभली आहे .शेवाळकरांच्या निधनानंतर त्यांचे चिरंजीव आशुतोष शेवाळकर यांनी राम शेवाळकर यांचे वणीत ज्या जिनिंग फॅक्टरीच्या आवारात १५ वर्ष वास्तव्य होते , तो परिसर विकत घेवून तिथे राम शेवाळकर निवासी व व्यायसायिक संकुल उभारले . या संकुलातील प्रत्येक इमारतीला शेवाळकरांच्या वेगवेगळ्या पुस्तकांची नावे देण्यात आली आहेत .आज शेवाळकरांच्या जयंतीनिमित्त स्थानिक कलाकारांना कलागुणांच्या प्रकटीकरणासाठी राम शेवाळकर व्यासपीठाचे लोकार्पण करण्यात आले आहे . त्यानिमित्त आशुतोष शेवाळकर यांचे हे मनोगत

………………………………………………………

 प्रिय सुहृद,

वणीला उभ्या होत असलेल्या ‘राम शेवाळकर परिसर’ या आमच्या प्रकल्पाविषयी आपल्याला कल्पना असेलच. तरीही थोडक्यात ही संकल्पना पुन्हा आपल्या कानावर टाकतो आहोत.

नांदेडला बाबा पीपल्स कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम करत होते. त्या काळात नरहर कुरुंदकर, ना. य. डोळे, स. रा. गाडगीळ, हेमचंद्र धर्माधिकारी हे सगळे त्याच कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करीत असत व के. रा. शिरवाडकर (कुसुमाग्रजांचे लहान भाऊ) तिथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. कालांतराने या सगळ्यांनाच कुठल्या न कुठल्या कॉलेजच्या प्राचार्य पदाची संधी आली, तशीच ती बाबांना वणीच्या कॉलेजची आली.

वणीला प्राचार्य म्हणून १९६५ ला रुजू झाल्यावर गावाबाहेरच्या एका जिनिंग फॅक्टरीच्या आवारात आम्हाला एक घर साठ रुपये महिना भाड्याने मिळालं होतं व त्याच घरात आम्ही पुढची १५ वर्ष राहिलोत. बाबांच्या कर्तृत्वाच्या पहिल्या बहराची इथेच सुरुवात झाली.

आम्ही वणी १९९० मधे सोडलं नंतर कालौघाने गावाचा परीघ वाढत जाऊन मग ही जिनिंग फॅक्टरी गावाच्या मध्यभागी आली आणि आगीचा धोका असल्यामुळे गावाबाहेर हलवण्याचे आदेश होऊन ती बंद पडली. ती चालवण्याऱ्या सहकारी संस्थेने कालांतराने मग ती जागा जाहीर लिलावाद्वारे विकण्याचा निर्णय घेतला. त्या लिलावात आमची या जागेतली भावनिक गुंतवणूक उघडी पडून इतर व्यापाऱ्यांनी भाव चढवायला सुरूवात केली. त्यामुळे लिलाव महागात जात गेला. पण शेवटी जिद्द करून आम्ही ती जागा विकत घेतली. या जागेत ‘राम शेवाळकर परिसर’ नावानी रहिवासी वसाहत उभी करतो आहोत. यातल्या प्रत्येक इमारतींना बाबांच्या एकेका पुस्तकांचं नाव देऊन एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने हे स्मारक उभारलं जात आहे. जगातल्या कुठल्याही भाषेच्या एखाद्या साहित्यिकाचं वा शिक्षकाचं असं स्मारक क्वचितच कुठे असेल.

तीन वर्षांपूर्वी या प्रकल्पाची पहिली ‘फेज’ पूर्ण झाली. तेव्हा तिथल्या स्थानिक विदर्भ साहित्य संघानी ‘साहित्य संमेलनाचं’ आयोजन या परिसरातच केलं होतं. त्या वेळेसचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणीस यांनी या संमेलनाचे उद्घाटन केले होते व केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी व लोकमत समूहाचे प्रमुख विजय दर्डा यांनी संमेलनाचा समारोप केला होता. महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवर साहित्यिक, प्रतिभावंतांची भेट घडून येण्याचे भाग्य तेव्हा या परिसराला लाभले होते.

आता हा प्रकल्प आणखी समोर गेला आहे. रहिवासी इमारतीमध्ये साठ टक्के लोक राहण्यासाठी आलेले आहेत. रिलायन्स ग्रुपची ‘स्मार्ट शॉपी’ हे डिपार्टमेंटल स्टोअर आणि ‘ट्रेंडस’ हे कापडाचे दुकान, आदित्य बिर्ला ग्रुपचे ‘पँटॅलून’, पतंजली अशी अनेक दुकाने इथे उघडली गेली आहेत व त्यांना गावकऱ्यांचा भरभरून प्रतिसाद पण मिळतो आहे.

या परिसराच्या मध्यवर्ती मोकळ्या जागेत एक मुक्त ‘व्यासपीठ’ आम्ही आता उभारलं आहे. आमचे आजोबा आणि त्याकाळातले प्रसिद्ध कीर्तनकार कीर्तन केसरी श्री भाऊसाहेब शेवाळकर यांचं नाव या व्यासपीठाला देत आहोत.

बाबांच्या वणीच्या वास्तव्यात महाराष्ट्रातल्या साहित्य, कला या क्षेत्रांच्या जवळपास प्रत्येक प्रतिभावंतांचा कुठला ना कुठला कार्यक्रम बाबांनी वणीत आयोजित केला होता. या सगळ्यांना ऐकून त्या काळातल्या वणीकरांचं सांस्कृतिक उन्नयन होत असे. स्थानिक कलावंतांना आणि प्रतिभावंतांना प्रोत्साहन आणि प्रसिद्धी देणारे अनेक कार्यक्रम बाबा कुठल्यातरी सभा, संमेलनाच्या निमित्ताने आयोजित करीत असत. त्यामुळे एक अत्यंत सकस असं सांस्कृतिक वातावरणच त्या काळात वणीत तयार झालेलं होतं. गावाला भेट देणारे काही प्रतिभावंत तर हे ‘विदर्भाचं पुणं’ आहे असाही वणीचा गौरव त्या काळात करत असत. हे वातावरण पुन्हा आणण्याचा एक छोटा प्रयत्न करायचा आमचा विचार आहे.

त्यासाठी गावातल्या स्थानिक कलागुणांना वाव द्यायला हे ‘व्यासपीठ’ आम्ही त्यांना नि:शुल्क उपलब्ध करून देणार आहोत. तसंच नागपूरला भेट देणाऱ्या शक्य तितक्या प्रतिभावंताचा, कलावंतांचा एखादा कार्यक्रम वणीलाही या ‘व्यासपीठावर’ आयोजित करण्याचाही आम्ही प्रयत्न करणार आहोत.

आज २ मार्चला बाबांचा जन्मदिवस असतो. त्या निमित्तानी या व्यासपीठाचे उद्घाटन करून यावर स्थानिकांच्या वत्कृत्व, संगीत, नृत्य आणि एकांकिका यांच्या स्पर्धांचा ४ दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन आम्ही केलं होतं. पण बदललेल्या कोविड परिस्थितीमुळे ऐनवेळी आम्हाला ते रद्द करावं लागलं.

त्यामुळे श्रीमती विजया शेवाळकर यांच्या हातानी या व्यासपीठाच्या नामफलकाचे अनावरण आणि चि. अभिराम आणि चि. कु. बिल्वा शेवाळकर यांच्या सरस्वती स्तवनानी या व्यासपीठाचे लोकार्पण, अशा कौटुंबिक स्वरूपाचं या व्यासपीठाचं उद्घाटन करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे.

आपल्याला या सर्वांची माहिती द्यायला व तसाच या उपक्रमासाठी आपल्या शुभेच्छा, आशीर्वाद याचं पाठबळ मागायला हे पत्र लिहितो आहोत.

आपल्या इच्छाशक्तीचं बळ असंच आमच्या पाठीमागे नेहमी असू द्यावे, ही आग्रहाची विनंती आणि परमेश्वरचरणी प्रार्थना.

आपले विनीत

राम शेवाळकर कुटुंबीय

 

Previous articleआपण, जग आणि चार्वाक : पूर्वार्ध
Next articleशेवाळकर नावाचे माणूसपण…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here