स्कॅम 1992 मध्ये वास्तवात असणाऱ्या सगळ्या खऱ्या माणसांच्या नावांचा बिनधास्त उल्लेख केला आहे आणि हे छान वाटतं. ऐंशी नव्वदच्या दशकातलं टाईम्स ऑफ इंडिया, बाँबे स्टाॅक एक्सेंज, एकूणच त्या काळातलं वातावरण,कपडे, गाड्या यानी मजा आणली आहे.टाईम्समधे फिरणारे आर.के.लक्ष्मण बघून छान वाटतं.
सुचेता दलाल च्या भूमिकेत श्रेया धन्वंतरी ही अभिनेत्री परफेक्ट आहे. तिचे काॅश्च्यूम्स अगदी साजेसे आहेत.शेअर मार्केट आणि फायनान्सच्या तेव्हाच्या काळातल्या पुरूषी जगात सुचेता दलाल म्हणजे पत्रकारितेतला एक विलक्षण धाडसी,आदरणीय, आदर्श नमुना म्हणायला हवी.हे दोघंही नवे कलाकार असल्याने त्यांची आधीची कुठली इमेज मनात नव्हती हे उत्तम आहे.सुचेताची तिच्या प्रोफेशनशी असलेली कमिटमेंट अगदी जाणवण्याइतकी प्रभावी आहे.पुरूष सहकाऱ्यासोबत सोबत तिचा सहज वावर, स्वतःच्या सोर्सेसना जपणं फार आवडतं .हर्षद तिला खरेदी करू पाहतो तेव्हा तिचा खमकेपणा आणि त्याच्यावर केसेस होतात तेव्हा त्याची बाजू मांडण्याचा प्रयत्न हे सगळं फार आवडतं.सुचेताचा पार्टनर देबाशिष बसू हे पात्र पण येतं. आपल्या टॅलेंटेड प्रेयसीमागे खंबीरपणे उभा राहणारा हा कोमल मनाचा पत्रकार विशेषच आहे.