‘खरोखर’ खरे!

नंदा खरे

-प्रमोद मुनघाटे 

शिक्षकी पेशाचा एक फायदा म्हणजे अवतीभवती तरुण मुलं असतात. जानेवारीत दिव्याने माझ्याकडून नंदा खरेंची बरीच पुस्तकं वाचायला मागितली. पंधरा दिवसापूर्वी ती म्हणाली- ‘सर, मी ‘उद्या’ दोनदा वाचली. थोडफार कळतंय आता. आपण कधी जाऊ खरे सरांना भेटायला?’ मी म्हणालो, ‘पुन्हा एकदा वाच. मग जाऊ.’ काल तिचा फोन आला. ‘सर, खरेंना अकादमी पुरस्कार मिळाला. आता गेलंच पाहिजे.’ मी म्हटलं- ‘थांब आठेक दिवस आणि त्यांनी पुरस्कार स्वीकारला नाही, हे लक्षात ठेव.’

खरेंच्या शिवाजीनगरातील घरी १९८५-९०च्या दरम्यान कधीतरी मी गेलो तेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहिलं. निमित्त ‘माग्रस’ ची ग्रंथचर्चा होती. लोक तावातावात पुस्तकावर चर्चा करत होते आणि बंगल्याचे मालक चहा-पाणी करत होते, असे ते दृश्य आजही आठवते. (या घराबद्दल आणि त्यांच्या एकूण स्वत:बद्दल ‘ऐवजी’ मध्ये अलीकडे बरंच काही वाचायला मिळालं.)

पुढे राजन गवस किंवा संदेश भंडारे या मित्रांसह अनेकदा त्यांच्या घरी जाण्याचे प्रसंग आले. बरेचदा त्यांच्या घरी तरुण मुला-मुलींचा जमघट दिसे. आजही त्यांच्या घरी गेल्यावर अशा गटचर्चा अनुभवता येतात.  जगभरातील अनेक घटना-प्रसंग-साहित्यावर या चर्चा असतात. मला आमच्या विद्यापीठीय चर्चासत्रांपेक्षा खरेंच्या बैठकीतील चर्चा अधिक अर्थपूर्ण वाटत. कारण त्यात औपचारिकता नसे. प्रमाणपत्र नसत. स्पर्धा नसे. खरे आपल्या आवाजाचा टोन न बदलता कितीतरी घटनांचे दाखले देतात. फार जुन्या इंग्रजी कथा-कादंबऱ्यांचे दाखले देत ते आपली मते मांडतात. तेंव्हा माझ्यासारख्याला आपले अज्ञान किती अगाध आहे, या जाणिवेने वाईट वाटत नाही, तर त्या क्षणी इतक्या हळुवारपणे या माणसाने आपले अज्ञान कसे विरघळून टाकले, याच आनंदाने मन मोहरून जाते.

        नागपुरात मी शिकायला आलो तेंव्हा प्रथम मी खऱ्यांना ‘आजचा सुधारक’मध्ये वाचत होतो. पण मी वाचलेलं खरेचं पहिलं  पुस्तक म्हणजे ‘अंताजीची बखर’(१९९७). हे पुस्तक मला मला आवडायचं एक कारण म्हणजे माझ्या पीएच डीच्या संशोधनासाठी १९८७ ते १९९० मध्ये अठराशे सत्तावनसंबंधी मिळतील ती पुस्तकं वाचली होती. ती सगळी राजेरजवाड्यांवरची होती. (नाही म्हणायला एक सत्तावनच्या दिल्लीतील दंगलीनंतर ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या बायकांचे पुढे काय झाले, त्याच्या सविस्तर हकीकती असलेले एक हिंदी पुस्तक वाचायला मिळाले होते.)  पण ‘अंताजीची बखर’ ही सत्तावनच्या काळात सामान्य शिपाई नायक असलेली अफलातून कादंबरी आहे. अशा पद्धतीने इतिहास वाचता येतो आणि फिक्शन म्हणून का होईना इतिहास ‘रचता’ येतो, हे नवीन होते.

त्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर ‘बखर अंतकाळाची’ (२०१०) आली. इतरांना फक्त भूगोल असतो. मराठी माणसाला ‘इतिहास’ असतो, अशी एक दर्पोक्ती असते. पण तो इतिहास आहे कसा? राजेरजवाड्यांची सत्ता, सनावळ्या, त्यांच्या लढाया, त्यांचीच बाहेरची प्रकरणं  म्हणजेच इतिहास का? या काळात सामान्य लोक काय करत होते, कसे जगत होते? ते एका शिपुर्ड्याच्या तोंडून कथन करणाऱ्या या कादंबऱ्या आहेत. सामान्यांची भूक-पीडा, आणि वासनाविकारांनाही इतिहास असतो आणि त्यातूनच खरा गतकाळाचा परिचय होतो. अशी जाणीव देणाऱ्या या कादंबऱ्या आहेत.

आज धर्म, भाषा, नीती आणि लैंगिक आचारविचारांच्या क्षेत्रात ‘मूल्य’ राहिले नाही, बाजार झाला आहे; असे आपण म्हणत असताना तेव्हा तरी मूल्य होते का? कुणाला मूल्य होते? कसे होते? बाजार तेव्हा नव्हता का? व्यापार नव्हता का? अशा प्रश्नांची उत्तरे न विचारता मिळतात. त्यातून लेखकाची माणसांच्या मूल्यांकडे पाहण्याची दृष्टी लक्षात येते. इतिहासाचे ‘विपरीत’ वाचन हा लेखक काही रंजनासाठी करत नाही, हे त्यांच्या इतर पुस्तकातून वाचायला मिळते. ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’, ‘संप्रति’, नांगरल्याविन भुई’ आणि ‘दगडावर दगड…विटेवर वीट’ या पुस्तकांमधून या लेखकाची जगण्याकडे पाहण्याचे तत्त्वज्ञान दिसते. हे तत्त्वज्ञान स्वतःचे असे खास म्हणून उदात्तीकरण केलेले नसते. ते एकूणच ऐतिहासिक भौतिकवादी दृष्टीतून कसे विकसित किंवा अधोगतीत झाले आहे, या भूमिकेतून असते. त्यांच्या या  भूमिकेची संदर्भचौकट आपला देश, आपला समाज-आपली संस्कृती अशी नसते. ती वैश्विकच असते. ते फक्त जैविक उत्क्रांतीचा विचार करीत नाही. तर वैचारिक-तात्त्विक आणि मूल्यात्मक उत्क्रांतीचा वेध घेऊ पाहतात. त्यासाठी अनुभवाच्या कक्षा वैश्विकच असाव्या लागतात असे नाही. ‘दगडावर दगड…विटेवर वीट’ या पुस्तकात लिहिलेल्या अत्यंत व्यक्तिगत अनुभवातूनही त्यांच्या ‘अनुभूतीच्या’ कक्षा किती विशाल आहेत, हे जाणवते.

नंदा खरेंची ज्ञाताच्या कुंपणापलीकडे जाण्याची विजिगीषा व्यक्तिगत नाही. ते आपल्या सोबतच्या सर्वांच्या खांद्यावर हात ठेवून जाऊ पाहतात. म्हणूनच ‘कहाणी मानवप्राण्याची’ ‘वारूळ पुराण’ अशी पुस्तके लिहितात. ही त्यांची ‘कृती’ आहे. लेखकाला त्याची भूमिका हवी. तत्त्वज्ञान हवे असे ते प्रत्यक्ष सांगत नसले तरी त्यांची सगळी पुस्तके हेच सांगतात.

साहित्य म्हणजे केवळ ‘काव्यशास्त्रविनोद’ अशी भूमिका बाळगणाऱ्या आणि  सभोवतालच्या वास्तवाशी अस्पृश्यता बाळगणाऱ्या तथाकथित ‘रसिकतेला’ त्यांची पुस्तके प्रेमानेच थप्पड लगावतात. ही प्रेमाची थप्पड खात खात, बराचसा संयम ठेवून आपण त्यांची पुस्तके वाचत राहिलो, तरच त्यांच्या ‘उद्या’पर्यंत जाता येते.

लेखकाची कोणतीही कृती ही राजकीयच असते. कारण त्याचे लेखन काही एकाएकी आकाशातून पडत नाही, असे खरेंना वाटते. तेव्हा त्यांची ही ‘कृती’ केवळ पुस्तकी कृती नसते. ते प्रत्यक्ष कृतीत सहभागी होतात. वर्तमान अघोषित आणीबाणीच्या विरोधात जे जे कोणी रस्त्यावर उतरतात आणि निषेध करतात, त्यांच्या बाजूने नंदा खरे उभे राहतात. २०१५-१६ मध्ये आम्ही नागपुरात केलेल्या ‘दक्षिणायन’च्या अभियानाला  त्यांचा मोठा आधार होता.

विषमता आणि अज्ञानाच्या विरोधात कृती करण्याची खरेंची शैली मात्र आणखी वेगळी आहे. त्यासाठी ते ‘शिक्षण’ हे माध्यम निवडतात. हे शिक्षण कधी औपचारिक असते तर कधी अनौपचारिक असते. आयुष्यभर अभियंता आणि कंत्राटदार म्हणून काम केलेले खरे, लेखन तर करतातच पण ते शाळेतल्या मुलांना विज्ञान शिकवतात. भाषिक कौशल्यासोबतच पृथ्वी, खगोलशास्त्र आणि पर्यावरण काय असते ते शिकवतात. निव्वळ  घोषणाबाजी, दिखाऊगिरी आणि प्रबोधनाची तथाकथित नशेत चूर असलेल्या बोलक्या ‘कृती’वीरांपेक्षा खरे यांची प्रबोधनाची ही कृती मला अधिक सच्ची आणि महत्त्वाची वाटते.

   नंदा खरे ‘उद्या’ या कादंबरीत मनुष्याच्या तात्त्विक उत्क्रांतीचा कथात्मक शोध घेतात.  युटोपिया किंवा डिस्टोपिया अशा पद्धतीने विचार न करता ‘उद्या’ ही कादंबरी मला खरे यांनी मांडलेला मानवाच्या तात्त्विक आणि मूल्यात्मक उत्क्रांतीचा पटच वाटतो. गुहेत राहणारा, शिकार करणारा माणूस सामाजिक-राजकीय  व्यवस्था निर्माण करतो. पण पुढे त्या व्यवस्थेशीच संघर्ष करत करत सत्य-न्याय आणि स्वातंत्र्य या मूल्यांचे स्वप्न पाहतो. या प्रवासात मूळचा माणूस किती उरला आहे. प्राण्याहून वेगळे होण्यासाठी ज्या तंत्रज्ञानाचा, ज्या व्यवस्थेचा आधार माणसाने घेतला, त्या व्यवस्थेच्या, त्या तंत्रज्ञानाच्या सापळ्यात तो स्वतःच अडकला का? हे काही प्रश्न आहेत. अनेक तत्त्वप्रणाली, अनेक राजकीय प्रणाली यांच्या दीर्घ प्रवासात लोकशाहीसारख्या व्यवस्थेत ‘स्वातंत्र्याचा’ शोध लागल्याचा मनुष्याचा आनंद क्षणिक ठरतो की काय, असे ‘उद्या’चे चित्र पाहताना वाटते. खरे यांना दिसणारे उद्याचे चित्र त्यांच्या अपेक्षेपेक्षा लवकरच नजरेच्या टप्प्यात येऊ घातले आहे की काय असे वाटते.

जॉर्ज ऑर्वेलने ‘१९८४’ ही कादंबरी १९४८ मध्ये लिहिली होती. खरे यांनी ‘उद्या’ ही कादंबरी आज लिहिली आहे. ऑर्वेलच्या कादंबरीतील वास्तव प्रत्यक्षात यायला जितका काळ लागला, त्यापेक्षा खरेंच्या कल्पनेतील ‘उद्या’ प्रत्यक्षात येण्याचा वेग कितीतरी पट आहे. कारण ज्या वेगाने माणसाची माहिती त्याच्या सांकेतिक क्रमांकात आणण्याचे तंत्रज्ञान प्रगत होत आहे, त्या वेगाने लोकशाही, न्याय, समता आणि स्वातंत्र्य या गोष्टी इतिहासजमा होत आहेत, हा या कादंबरीचा विषय आहे. अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीच्या राडारवर गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलातील आदिवासीना आणण्याची आता कुणाला घाई करावी लागत नाही. ते कुणाच्या हातातच उरले नाही. माणसाने आपला विवेक आणि नीती अशा हातात कधीच सोपवले आहे की उद्याची फार वाट पहावी लागणार नाही. आजची रात्रच काळरात्र आहे की काय असे वाटावे अशी स्थिती आहे. ‘उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ असे आपण एकमेकांचे हात हातात घेऊन पुढे येणे, एवढेच आपल्या हाती आहे. हाच संदेश फार न बोलता नंदा खरे आपल्याला आज देऊ पाहतात.

(लेखक नामवंत समीक्षक व नागपूर विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख आहेत)

7709012078 

 

Previous articleधर्मारेषा ओलांडताना-श्रुती पानसे आणि इब्राहीम खान
Next articleश्रद्धा आणि चार्वाक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.