सॉक्रेटीस हा असामान्य बुद्धिमत्तेचा तत्त्वज्ञ होता. गांधीजींनी त्याला जगातला पहिला सत्याग्रही म्हटले. त्याच्या ज्ञानाएवढेच त्याच्या पत्नीचे, झांटिपीचे अज्ञान व कजागपण जगप्रसिद्ध आहे. ही झांटिपी सॉक्रेटीसहून 25 ते 30 वर्षांनी लहान होती. वयांतले हे अंतर त्या ज्ञानी माणसाला तिचे कजागपण लक्षात आणून देणारे नव्हते काय? ग्रीक नगरराज्ये आकाराने लहान असत, त्यांची लोकसंख्याही दीड ते दोन लाखांहून अधिक नसे. ती वाढू नये म्हणून त्यात पुरुष उशिरा लग्न करत. अविवाहित असताना त्यांना समलिंगी संबंध ठेवता येत असत. सॉक्रेटीसही याला अपवाद नव्हता. त्याची पत्नीविषयीची वृत्ती त्याच्या ज्ञानी असण्याला बाधित करत नव्हती काय?
फार दूर न जाता अमेरिकेच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणाऱ्या व विचारांच्या क्षेत्रात मोठे नाव मिळवलेल्या माणसांचाही विचार इथे केला पाहिजे. बेंजामीन फ्रँकलीन, जॉर्ज वॉशिंग्टन, अलेक्झांडर हॅमिल्टन व थॉमस जेफरसन यांच्यासारखे थोर नेते अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी इंग्लंडशी लढले व स्वातंत्र्याचे मानकरी ठरले… पण त्यांच्यातला प्रत्येकच जण अफ्रिकेतून पकडून आणलेल्या काळ्या माणसांची गुलाम म्हणून खरेदीविक्री करणारा व्यापारीही होता.
विचारांनी माणसे पुढे जातात, विचारांनीच ती बदलतात… मात्र विचार ही व्यक्तीची निर्मिती आहे. तो समूहाच्या वा संघटनेच्या उत्पादनाचा भाग नाही. धर्म हे संघटन आहे. आदिवासींचे समुदाय, लष्करातील पथके व एकत्र येऊन गर्दी करणारे लोक विचार करत नाहीत. धर्मांनी विचारांना अनुमती दिली… पण विचार धर्मानुसारच केला पाहिजे असे बंधन त्यावर घातले. परिणामी धर्म विचारी झाले नाहीत, श्रद्धेचे समुदाय झाले. ते पुढे गेले नाहीत, स्थिर झाले. विचार करणारी व विशेषतः स्वतंत्र विचार करणारी माणसे धर्मात किंवा गर्दीत बसणारी नव्हती. ती समाजाच्या टीकेचा व तिरस्काराचा, हेटाळणीचा व टवाळीचा भाग झाली. त्यांच्यातल्या एखाद्याचा विचार समुदायाला लाभदायक वाटला तर त्याने त्याचे काही काळ नेतृत्वही स्वीकारले, त्याला मोठे मानले… पण मोठी माणसे मोठ्या संख्येने जन्माला येत नाहीत. समाजात विचारवंत, महात्मे, संशोधक यांचा वर्ग नेहमीच अल्पसंख्य राहत आला आहे.